व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी फॉरेनला जावं का?

मी फॉरेनला जावं का?

तरुण लोक विचारतात . . .

मी फॉरेनला जावं का?

“मला फॉरेनला जायची खूप इच्छा होती.”—सॅम.

“मी फॉरेनला जायला फार उत्सुक होते. काहीतरी नवीन पाहावं असं नेहमी वाटायचं.”—मरेन.

“माझ्या एका जवळच्या मित्रानं मला सांगितलं, की मी घराबाहेर पडून जरा बाहेरच्या जगाची मजा लुटावी.”—ॲन्ड्रीयास

“मला काहीतरी बदल हवा होता.”—हेगन

तुम्ही फॉरेनला जायचं कधी स्वप्न पाहिलं आहे का? कायमचं नाही, तरी निदान तात्पुरत्या काळासाठी. दर वर्षी हजारो तरुण फॉरेनला जातात. ॲन्ड्रीयास म्हणतो: “संधी मिळाली तर मला पुन्हा फॉरेनला जायला आवडेल.”

काही युवक पैसे कमवण्यासाठी किंवा परदेशी भाषा शिकण्यासाठी फॉरेनला जातात. एखाद्याच्या कुटुंबात राहून त्यांच्या घरकामात साहाय्य करून परदेशी भाषा शिकण्याची सोय असते. यामुळे, घराचं भाडं आणि खाण्याचा खर्च यांच्या बदल्यात हे तरुण लोक, त्यांचं घरकाम करतात आणि रिकाम्या वेळात परदेशी भाषा शिकतात. काही तरुण उच्च शिक्षणासाठी, तर काही कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून नोकरी करण्यासाठी फॉरेनला जातात. आणि काही तरुण फक्‍त, शिक्षण संपल्यानंतर काय करायचं हे समजत नाही म्हणून सुट्टी घालवायला फॉरेनला जातात.

पण, यहोवाचे साक्षीदार असलेले काही युवक आपली ख्रिस्ती सेवा वाढवण्यासाठी सुवार्तिकांची जेथे जास्त गरज आहे अशा देशांत गेले आहेत. कारण काहीही असले तरी परदेशात राहिल्यामुळे एका प्रौढ व्यक्‍तीला स्वतंत्र राहण्याची सवय होऊ शकते. वेगवेगळ्या संस्कृतींचाही परिचय होऊ शकतो. कदाचित नवीन भाषा शिकल्यामुळे चांगली नोकरी मिळण्याचीही शक्यता वाढेल.

पण, फॉरेनमध्ये राहणं वाटतं तितकं सोपं नाही. सूझनचं उदाहरण घ्या. ती एक वर्ष एक्सचेन्ज स्टूडंट म्हणून परदेशात होती. ती म्हणते: “मला वाटलं होतं की एक वर्ष तिथं खूप चांगलं जाईल. पण तसं झालं नाही.” काही युवकांचा गैरफायदा घेतला जातो किंवा काही जण इतक्या गंभीर पेचात सापडतात की त्यांच्या जीवाला देखील धोका असतो. तेव्हा, फॉरेनला जाण्यासाठी बॅग भरायला सुरू करण्याआधी शांतपणे बसून पुढचा मागचा विचार करण्यात सुज्ञता आहे.

आधी जाण्यामागील कारणांचे परीक्षण करा

पुढचा मागचा विचार करताना, तुम्ही कोणत्या उद्देशास्तव फॉरेनला जात आहात याचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही आध्यात्मिक कारणासाठी किंवा कौटुंबिक जबाबदारीमुळे जात असाल तर गोष्ट वेगळी. पण लेखाच्या सुरवातीला ज्या युवकांबद्दल सांगितले आहे, त्यांच्याप्रमाणे अनेक जण फक्‍त मौजमजा करायला, किंवा स्वातंत्र्य हवे म्हणून फॉरेनला जातात. एका दृष्टीने यात काही चूक नाही. कारण, उपदेशक ११:९ मध्ये तर तरुणांना आपल्या “तारुण्यात आनंद” करण्याचे प्रोत्साहन दिले आहे. पण १० व्या वचनात अशी ताकीदही दिली आहे, की “आपल्या मनांतून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख.”

तुम्ही आईवडिलांपासून स्वातंत्र्य मिळावं म्हणून परदेशात जाऊ इच्छित असाल तर खरे पाहता तुम्ही ‘उपद्रवाला’ आमंत्रण देत आहात. तुम्हाला येशूने दिलेल्या उधळ्या पुत्राचा दृष्टान्त आठवतो का? त्याला स्वातंत्र्य हवे असते म्हणून तो एका दूर देशी जातो. पण थोड्या दिवसांतच त्याच्या खिशांतील सर्व पैसे संपतात, त्याला खायला अन्‍न मिळत नाही, अंग झाकायला त्याच्याकडे पुरेसे कपडेही नसतात, तो आध्यात्मिकरीत्या दुर्बळ होतो.—लूक १५:११-१६.

काही तरुण असेही असतात ज्यांना घरातील समस्यांतून मुक्‍त व्हायचे असते म्हणून ते परदेशात जाऊ पाहतात. पण, हाईक बर्ग नावाची लेखिका वॉट्‌स अप नावाच्या तिच्या पुस्तकात अशा तरुणांना म्हणते की: “तुम्ही घरात खूष नाही म्हणून जर तुम्ही जात आहात व . . . दुसरीकडे समस्या नसतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे.” येणाऱ्‍या प्रत्येक समस्येला तोंड देणे उत्तम असते. आपल्या मनासारखी परिस्थिती नाही म्हणून पळून जाणे ही तर पळवाटच झाली, यातून तुम्ही काहीही साध्य करू शकणार नाही.

काही तरुणांचे हेतू वेगळेच असतात. पैशाच्या किंवा भौतिक गोष्टींच्या लोभामुळे ते फॉरेनला जातात. मोठमोठ्या कंपन्या असलेल्या देशातील जीवन सुखसोयींचे, ऐषोआरामाचे असेल असे मनातल्या मनात स्वप्न रंगवायला लागतात. काही तरुणांना वाटतं की पाश्‍चिमात्य देशांत राहणारे सगळेच श्रीमंत असतात. पण हे मुळीच खरे नाही. पुष्कळ तरुणांना परदेशात गेल्यावर पैशाची चणचण जाणवू लागते. * शिवाय, बायबल आपल्याला ताकीद देते: “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्‍वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.”—१ तीमथ्य ६:१०.

तुमची तयारी आहे का?

विचार करण्याजोगी आणखी एक गोष्ट आहे: फॉरेनला गेल्यावर तुम्ही येणाऱ्‍या प्रत्येक परिस्थितीला, समस्येला तोंड देण्याइतपत प्रौढ आहात का? परदेशात गेल्यावर तुम्ही ज्या कोणाबरोबर राहाल त्यांच्याशी तुम्हाला प्रत्येक बाबतीत जुळवून घ्यावे लागेल. स्वतःच्या घरात तुमचं सर्वांशी पटते का? तुम्ही अविचारी व स्वार्थी आहात अशी तक्रार तुमचे आईवडील तुमच्याविरुद्ध करतात का? खाण्यापिण्याच्या बाबतीत तुम्ही नखरे करता का? घरातले तुमच्या वाट्याचे काम तुम्ही आनंदाने करता का? आताच जर तुम्हाला या सर्व गोष्टी अवघड वाटत असतील तर मग तुम्ही एका परक्या देशात गेल्यावर तुम्हाला किती त्रास होईल याचा विचार करा.

तुम्ही यहोवाचे साक्षीदार आहात तर तुम्ही स्वतःहून तुमची आध्यात्मिकता टिकवून ठेवू शकता का? की, तुमच्या आईवडिलांना तुम्हाला वारंवार बायबल अभ्यास करण्याची, सभांना उपस्थित राहण्याची, प्रचार कार्याला जाण्याची आठवण करून द्यावी लागते? परक्या देशात आल्यावर समोर येणाऱ्‍या मोहपाशांना तोंड देण्याइतपत तुम्ही आध्यात्मिकतेत मजबूत आहात का? एक तरुण ख्रिस्ती एक्सचेन्ज स्टूडंट म्हणून एका परक्या देशात गेला होता तेव्हा शाळेच्या पहिल्याच दिवशी त्याला सांगण्यात आले, की त्याला ड्रग्ज कोठे मिळू शकतील. नंतर त्याला शाळेतल्याच एका मुलीनं एकान्तात भेटण्यास बोलवले. त्याच्या स्वतःच्या देशात कोणत्याही मुलीने इतके धाडस केले नसते. युरोपला गेलेल्या एका आफ्रिकन तरुणानेही म्हटले: “आमच्या देशात अश्‍लिल चित्रे सार्वजनिक ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. पण इथं, तुम्हाला सगळीकडं ती पाहायला मिळतील.” त्यामुळे, परक्या देशात “विश्‍वासांत दृढ” नसलेल्याचे आध्यात्मिक जहाज फुटून जाऊ शकते.—१ पेत्र ५:९.

आधी वस्तुस्थिती जाणून घ्या

फॉरेनला राहायला जाण्याआधी तुम्हाला तेथील वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. समजा, तुम्हाला स्टूडंट एक्सचेन्ज कार्यक्रमात नाव नोंदवायचे आहे, तर त्या कार्यक्रमाचा किती खर्च असेल हे जाणून घ्या. बहुतेकदा हे कार्यक्रम बरेच महागडे असतात. शिवाय, फॉरेनमध्ये घेतलेल्या शिक्षणाचा तुमच्या मायदेशी किती उपयोग होईल. तुम्ही ज्या देशात जाऊ इच्छिता, तेथील कायदे, संस्कृती, रीतीरिवाज सर्वांची आधीच माहिती घेतलेली बरी. तिथे स्वस्ताई आहे की महागाई? तुम्हाला कोणकोणते टॅक्स भरावे लागतील? तिथले हवामान तुम्हाला सहन होईल का? तेथे राहून आलेल्या लोकांशी प्रत्यक्ष बोलल्यावर तुम्हाला खरे तर चांगली माहिती मिळू शकेल.

शिवाय, तुम्ही कोठे राहणार तोही विचार करण्याजोगा एक प्रश्‍न आहे. एक्सचेन्ज स्टूडंट्‌सकडून बहुतेकदा पैशाची अपेक्षा केली जात नाही. तरीपण, तुम्ही जर यहोवाचे साक्षीदार आहात तर बायबल तत्त्वांचा आदर न करणाऱ्‍या लोकांबरोबर राहिल्यामुळे कदाचित तुमच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर राहात असाल तर वेगळी गोष्ट. ते तुम्हाला त्यांच्याबरोबर राहायची गळ घालत असले तरीपण त्यांच्यावर ओझे न घातलेले बरे. नाहीतर तुमचे चांगले नातेसंबंध बिघडू शकतात.—नीतिसूत्रे २५:१७.

परदेशात राहात असताना तुम्ही नोकरी करणार असाल तर वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन राहण्याविषयी बायबलमध्ये दिलेली आज्ञा कायम लक्षात ठेवा. (रोमकर १३:१-७) तेथील कायद्यानुसार तुम्ही तेथे काम करू शकता का? असल्यास, तुम्हाला कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील? बेकायदेशीरपणे काम केल्याने तुमची ख्रिस्ती या नात्याने असलेली भूमिका धोक्यात येऊ शकते आणि कदाचित तुम्हाला अपघात विम्याचा देखील लाभ घेता येणार नाही. आणि जरी तेथे काम करण्यास कायद्याने तुम्हाला परवानगी असली तरी तुम्हाला नेहमी सावधानी व सुज्ञता दाखवावी लागेल. (नीतिसूत्रे १४:१५) कारण, स्वार्थी मालक त्यांच्याकडे काम करणाऱ्‍या परदेशी लोकांचा सहसा गैरफायदा घेतात.

निर्णय घेणे

या चर्चेवरून हे स्पष्ट झाले आहे, की फॉरेनला जाण्याचा निर्णय हा काही साधासुधा निर्णय नाही. फॉरेनला गेल्यावर तुम्हाला कोणता फायदा होईल, किंवा कोणत्या धोक्याचा सामना करावा लागेल यावर आपल्या पालकांबरोबर चर्चा करा. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका तर समजुतदारपणा दाखवा. तुम्ही कोणत्या उद्देशास्तव फॉरेनला जाऊ इच्छिता यावरही विचार करा. तुमच्या आईवडिलांचे काय म्हणणे आहे ते लक्षपूर्वक ऐका. कारण, तुम्ही फॉरेनला गेल्यावरसुद्धा त्यांच्यावर तुमची जबाबदारी राहतेच. कारण तुम्हाला त्यांच्याकडून आर्थिक साहाय्याची आवश्‍यकता तर लागेलच.

आणि सर्व गोष्टींचा विचार केल्यावर तुम्हाला जर वाटले की तुमचे फॉरेनला जाणे उचित नाही तर निराश होऊ नका. तुम्ही तुमच्या मायदेशात राहूनही अनेक गोष्टी करू शकता. तुमच्या मायदेशात अशी कितीतरी मनोरंजक ठिकाणे आहेत ज्यांना तुम्ही अद्याप भेट दिलेली नाही. किंवा, फॉरेनला जाऊन नवीन भाषा शिकण्यास सुरवात करण्याऐवजी आतापासूनच शिकायला सुरू करा. आज ना उद्या तुम्हाला फॉरेनला जायची संधी जरूर मिळेल.

आणि समजा तुम्ही आताच फॉरेनला जायचा विचार करत आहात तर? तर, फॉरेनला गेल्यावर तुम्ही काय काय करू शकता हे पुढील लेखात चर्चिले जाईल.

[तळटीपा]

^ वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या जानेवारी १, १९९२ अंकातील “समृद्ध देशात स्थलांतरीत होण्याची किंमत मोजणे” लेख पाहा.

[१५ पानांवरील चित्र]

काही तरुण राज्याच्या प्रचार कार्यात जास्त भाग घेता यावा म्हणून परदेशी जातात

[१६ पानांवरील चित्र]

फॉरेनला गेल्यावर तुम्हाला कोणता फायदा होईल, किंवा कोणत्या धोक्याचा सामना करावा लागेल यावर आपल्या पालकांबरोबर विचार करा