हसा नि ठणठणीत राहा!
हसा नि ठणठणीत राहा!
जपानमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
पाहिल्या पाहिल्या मनाला दिलासा मिळतो. मग, राग, द्वेष, अविश्वास कशाकशाला मनात थारा राहत नाही. मन आनंदाने बागडू लागतं. ते जणू म्हणते, “तुझ्या भावना मला समजतात, तू काहीही काळजी करू नको. मी तुला कधीही अंतर देणार नाही.” ही कशाची जादू बरं? एका स्मितहास्याची. ही स्मितलकेर तुमचीही असू शकते.
हास्य काय आहे? “आनंद, गंमत वगैरे व्यक्त करणारा, तोंडाच्या कडा किंचित वर उचलून होणारा चेहऱ्यावरील अविर्भाव” अशी शब्दकोशांमध्ये त्याची व्याख्या केली आहे. हीच तर आहे स्मितहास्याची जादू ज्याद्वारे शब्दांपलिकडील विचार व्यक्त करता येतात. ही गोष्ट वेगळी की हसण्याद्वारे राग, तिरस्कार देखील व्यक्त केला जाऊ शकतो.
हसल्याने खरेच काही फरक पडतो का? जरा आठवा, तुमच्या समोर आलेल्या व्यक्तीचा हसरा चेहरा पाहून तुम्हाला कधी दिलासा मिळाल्यासारखे किंवा मनातली भीती दूर झाल्यासारखे वाटले का? किंवा समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव पाहून भीती किंवा आपण त्याला नापसंत आहोत अशी भावना तुमच्या मनात निर्माण झाली होती का? हो ना? पाहिलंत, हसल्याने केवढा फरक होतो ते. हा परिणाम हसणाऱ्या व्यक्तीवर आणि त्याला पाहणाऱ्या व्यक्तीवरही होतो. बायबलमधील ईयोब या व्यक्तीने आपल्या शत्रुंविषयी असे म्हटले: “ते विश्वासहीन होत असत तेव्हा मी त्यांच्याकडे हास्यमुख करीत असे, आणि माझे मुखतेज ते उतरीत नसत.” (ईयोब २९:२४) ईयोबच्या चेहऱ्यावरील “मुखतेज” म्हणजे त्याचा आनंदी किंवा हसरा चेहरा असावा.
आजच्या तणावग्रस्त काळातही स्मितहास्याचे चांगले परिणाम सिद्ध होतात. जसे की, स्मितहास्याने तणाव नाहीसा होऊ शकतो. प्रेशर कुकरच्या सेफ्टी व्हॉल्व्हसारखे ते असते. हसल्याने तणाव कमी होऊ शकतो आणि आपल्याला परिस्थितीशी तोंड द्यायला मदत मिळू शकते. उदाहरणार्थ, टोमोको हिच्या लक्षात आले की सगळेजण तिला निरखून पाहात असतात आणि त्यांच्याकडे तिचे लक्ष जाताच ते दुसरीकडे बघू लागतात. ते आपली मस्करी करत असावेत असे तिला वाटायचे. टोमोकोला याचे फार वाईट वाटायचे. तिला एकटेएकटे वाटायचे. तिच्या एका मैत्रिणीने तिला सांगितले की, “लोक तुझ्याकडे पाहतील तेव्हा तूही त्यांच्याकडे पाहून हस.” मग टोमोकोने दोन आठवडे आपल्या मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार केले तेव्हा इतरांकडूनही तिला चांगला प्रतिसाद मिळाला. तिचा सगळा
तणाव दूर झाला. ती म्हणते, “आता खरंच मला बरं वाटतं.” हास्याने खरेच मनातली भीती दूर होते आणि इतरांशी आपली मैत्री वाढते.स्वतःवर आणि इतरांवर होणारा चांगला परिणाम
हसऱ्या स्वभावाचा मानसिकदृष्ट्या फायदा होतो. तसेच हसणे प्रकृतीलाही चांगले असते. हसणे औषधासारखे आहे असे म्हणतात. डॉक्टरांचे तर असे म्हणणे आहे की, मानसिक स्थितीचा प्रकृतीशी फार मोठा संबंध आहे. अनेक अभ्यासांवरून असे निष्पन्न झाले आहे की, एकसारखा तणाव, नकारात्मक विचार करणे अशा गोष्टींमुळे शरीराची रोगप्रतिबंधक शक्ती कमजोर होते. तर दुसऱ्या बाजूला, हसण्यामुळे मानसिक स्थितीही चांगली राहते आणि रोगप्रतिबंधक शक्ती देखील सुदृढ होते.
हसण्याचा इतरांवरही मोठा प्रभाव पडतो. समजा तुम्हाला कोणी सल्ला देत आहे किंवा तुमची सुधारणूक करत आहे. अशा वेळी सल्ला देणाऱ्या व्यक्तीचा चेहरा अगदी गंभीर असला तर असे वाटेल की त्याला राग आला आहे किंवा त्याला आपण मुळीच पसंत नाही. पण तेच जर त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असेल तर तुम्हाला इतके घाबरल्यासारखे वाटणार नाही आणि त्याचा सल्ला तुम्ही अगदी आनंदाने स्वीकारालही. नाही का? तणावपूर्ण स्थितीत असताना स्मितहास्यामुळे बऱ्याच गैरसमजुती दूर होतात.
मन आनंदी असेल तर चेहऱ्यावर हास्य उमलते
आपण बहुतेकजण, कोणत्याही वेळी चेहऱ्यावर लोभस हास्य असणाऱ्या नटनट्यांसारखे नाही; आणि त्यांच्यासारखे आपल्याला खोटे खोटे हसायचेही नाही. आपले हास्य खरे आणि मनापासून असावे अशी आपली इच्छा आहे. दळणवळणाविषयी शिकवणाऱ्या एका शाळेतील शिक्षकांनी म्हटले की: ‘अगदी मनमोकळेपणाने हसावे नाहीतर आपले हास्य अगदी नकली वाटेल.’ पण आपण मनापासून कसे हसू शकतो? यासाठी बायबल आपली मदत करू शकते. आपल्या बोलण्यासंबंधी मत्तय १२:३४, ३५ येथे म्हटले आहे: “अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढितो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट काढितो.”
लक्षात असू द्या की, हसणे हा शब्दावाचून मनातल्या भावना व्यक्त करण्याचा मार्ग आहे. ‘अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघते’ आणि ‘चांगल्या भांडारातूनच चांगले निघते’ यावरून स्पष्ट होते की, आपले विचार आणि आपल्या भावना योग्य असतील तरच मनापासून हसणे शक्य आहे. आपल्या अंतःकरणात जे भरले आहे ते कधी न कधी तरी बाहेर येतेच; आणि ते फक्त आपल्या बोलण्यातून किंवा कृतीतूनच दिसून येत नाही तर आपल्या चेहऱ्यावरील अविर्भावांवरूनही स्पष्ट होते. म्हणूनच, चांगले विचार मनात बाळगण्याची सवय आपण केली पाहिजे. इतरांबद्दल आपल्याला जे वाटते ते आपल्या चेहऱ्यावरील
हावभावांवरून दिसून येते. म्हणूनच आपल्या घरातील सदस्य, शेजारपाजारचे लोक किंवा जवळचे मित्रमैत्रिणी यांच्या चांगल्या गुणांकडे पाहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग त्यांच्याकडे पाहून आपल्याला मनापासून हसता येईल. मनापासून यासाठी हसता येईल कारण त्यांच्याविषयी आपल्या मनात चांगल्या गोष्टी, प्रेम आणि करुणा भरली आहे. आपल्या डोळ्यांमधून तो आनंद झळकेल आणि इतरांनाही कळेल की आपल्याला मनापासून आनंद झालेला आहे.पण आपण हेसुद्धा लक्षात ठेवायला हवे की, सर्वचजण हसतात असे नाही; काहीजण आपल्या पार्श्वभूमीमुळे किंवा परिस्थितीमुळे जरा शांत असतात. आपल्या शेजाऱ्यांविषयी त्यांच्या मनात चांगली भावना असली तरीही हसणे हे त्यांच्या स्वभावातच नसते. उदाहरणार्थ, जपानी लोकांमध्ये अशी परंपराच आहे की त्यांच्या पुरुषांनी नेहमी शांत आणि गंभीर असावे. म्हणून, ते अनोळखी लोकांकडे पाहून सहसा हसत नाहीत. कदाचित इतर संस्कृतींमध्येही असेच होत असावे. किंवा काही व्यक्ती बुजऱ्या स्वभावाच्या असतात आणि त्या सहसा इतरांकडे पाहून हसत नाहीत. म्हणून, एखादी व्यक्ती केवढे मोठे स्मितहास्य देते किंवा कितींदा हसते यावरून त्या व्यक्तीबद्दलचे मत ठरवू नये. लोक वेगवेगळे असतात, त्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात आणि इतरांबरोबर दळणवळण करण्याच्या त्यांच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात.
पण, तुम्हाला इतरांकडे पाहून हसायला कठीण जात असेल, तर प्रयत्न करायला काय हरकत आहे? बायबल म्हणते: “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; . . . आपण सर्वांचे . . . बरे करावे.” (गलतीकर ६:९, १०) ‘सर्वांचे बरे करण्याचा’ एक मार्ग म्हणजे त्यांच्याकडे पाहून हसणे—आणि हे तुम्हाला सहज करता येण्यासारखे आहे! म्हणून हसऱ्या चेहऱ्याने स्वतः पुढाकार घेऊन इतरांची विचारपूस करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या. लोक त्याची प्रसंशा करतील. आणि नंतर तुम्हालाही सवय झाली तर हसणे कठीण वाटणार नाही.
[२७ पानांवरील चौकट]
सावधानतेचा इशारा
परंतु, आज खोटे खोटे हसणारे लोकसुद्धा आहेत. फसवे लोक आणि आपला फायदा पाहणारे सेल्समन उगाच लोभस हसून आपल्याला खूष करायचा प्रयत्न करतात. त्यांना ठाऊक आहे की, हसून ते लोकांना फसवू शकतात. वाईट चालीचे किंवा अनैतिक लोकही इतरांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी लडिवाळपणे हसतात. परंतु, त्यांचे हास्य फसवे आणि खोटे असते. (उपदेशक ७:६) पण प्रत्येकावर शंका घेण्याची गरज नाही. तरीही, कठीण असलेल्या या “शेवटल्या काळी” जगत असताना येशूने सांगितल्याप्रमाणे आपण “सापांसारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी” असावे.—२ तीमथ्य ३:१; मत्तय १०:१६.
[२८ पानांवरील चित्र]
हसऱ्या चेहऱ्याने स्वतः पुढाकार घेऊन इतरांची विचारपूस करा