व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अंधांच्या काळोख्या जगात प्रकाश आणणारा लुइ ब्रेल

अंधांच्या काळोख्या जगात प्रकाश आणणारा लुइ ब्रेल

अंधांच्या काळोख्या जगात प्रकाश आणणारा लुइ ब्रेल

तुम्हाला लिहिता व वाचता येते का? आपण लिहिण्यावाचण्यास असमर्थ असतो तर? याचा कधी तुम्ही विचार केला का? बरेच लोक कधी याचा विचारही करत नाहीत. पण वस्तूस्थिती अशी आहे, की लिहिता वाचता आले नसते तर आपल्याला काहीही शिकणे अशक्य झाले असते. ज्ञानाच्या खजिन्यापासून आपण वंचित राहिलो असतो.

शेकडो वर्षांपर्यंत अंधांची हीच स्थिती होती; वाचता येणे त्यांच्याकरता निव्वळ एक स्वप्न होते. पण १९ व्या शतकादरम्यान अंधांच्या या समस्येबद्दल कळकळ वाटणाऱ्‍या एका कर्तबगार तरुणाने संदेशवहनाची एक अनोखी पद्धत शोधून काढली. यामुळे त्याचे स्वतःचेच नव्हे तर इतर लाखो लोकांचे देखील भले झाले.

अंधारात आशेचा किरण

लुइ ब्रेल यांचा जन्म १८०९ साली फ्रांसमध्ये, पॅरिसपासून ४० किमी अंतरावर असलेल्या कूव्रे या लहानशा गावात झाला. त्यांचे वडील सायमन-रेने ब्रेल यांचा घोड्याचे ओढण तयार करण्याचा व्यवसाय होता. लुइ बऱ्‍याचदा त्यांच्या वर्कशॉपमध्ये खेळायला जात असे. एकदा मात्र एक भयंकर दुर्घटना घडली. लुइने एक टोकदार हत्यार हातात घेतले आणि खेळता खेळता ते त्याच्या डोळ्यात घुसले. लुइचा तो डोळा कायमचा गेला. मग दुसऱ्‍या डोळ्यातही इन्फेक्शन झाले आणि अशारितीने तीन वर्षांचा लुइ पूर्णपणे अंध झाला.

अंध असूनही लुइला शिकता यावे अशी इच्छा असल्यामुळे त्याच्या आईवडिलांनी आणि त्यांचे पाळक झाक पॉलवी यांनी गावातल्या शाळेत इतर मुलांसोबत लुइला वर्गात बसण्याची व्यवस्था केली. निव्वळ स्मरणशक्‍तीच्या जोरावर लुइ बरेच काही शिकत होता. कधीकधी तर सबंध वर्गात त्याचा पहिला नंबर यायचा! पण अंध मुलांना बऱ्‍याच मर्यादा असतात. सामान्य मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या शिक्षण पद्धतीपासून त्यांना कितपत लाभ होऊ शकेल? त्यामुळे १८१९ साली लुइला रॉयल इंस्टिट्यूट ऑफ ब्लाइंड यूथ या संस्थेत दाखल करण्यात आले.

या संस्थेचे संस्थापक व्हॅलेंटाईन ऑई हे अंधाना वाचता येईल अशी पद्धत शोधून काढणारे पहिलेच होते. अंध व्यक्‍ती कधीच सुशिक्षित होऊ शकत नाही हा तेव्हाच्या लोकांचा समज चुकीचा होता हे त्यांना सिद्ध करून दाखवायचे होते. ऑई यांनी सुरवातीला जाड कागदावर मोठमोठी उठावदार अक्षरे काढण्याची पद्धत विकसित केली. अर्थात या पद्धतीतही काही दोष होते, पण ऑई यांच्या सुरवातीच्या प्रयत्नांमुळे पुढील कार्याकरता जणू पाया घातला गेला.

लुइ ब्रेल, ऑई यांच्या लहानशा लायब्ररीतील उठावदार अक्षरांची पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करू लागले. पण ही पद्धत अतिशय वेळ घेणारी आणि गैरसोयीची होती असे त्यांच्या लक्षात आले. कारण उठावदार असली तरी ही अक्षरे मुळात डोळ्यांनी पाहण्यासाठी तयार करण्यात आली होती, बोटांनी स्पर्शण्यासाठी नव्हे. आनंदाची गोष्ट म्हणजे, हे दोष लक्षात घेऊन दुसरी नवीन पद्धत शोधून काढण्यात आली.

अनपेक्षित व्यक्‍तीचे योगदान

लुइ ब्रेल अवघ्या बारा वर्षांचा असताना, म्हणजे १८२१ साली, चार्ल्स बार्बिया या निवृत्त फ्रेंच सैनिकी अधिकाऱ्‍याने रॉयल इंस्टिट्यूट ऑफ ब्लाइंड यूथ या संस्थेला भेट दिली. तेथील अंध विद्यार्थ्यांना त्यांनी रात्रीच्या संदेशवहनाकरता तयार करण्यात आलेल्या एका लेखन पद्धतीविषयी माहिती दिली. ही लेखन पद्धती अर्थात सोनोग्राफी, रणांगणावर रात्रीच्या वेळी वापरण्याकरता तयार करण्यात आली होती. यात सहा उठावदार बिंदूंच्या दोन उभ्या रांगा होत्या. अंध व्यक्‍ती या बिंदूंना स्पर्श करून संदेश वाचू शकत होती. ही संकेतांच्या माध्यमाने शब्द वाचण्याची पद्धत अंध विद्यार्थ्यांना पसंत पडली. ब्रेल यांनी या नव्या पद्धतीचा मोठ्या उत्साहाने अभ्यास केला व काही सुधारणा देखील केल्या. ही पद्धत अंधांना वापरण्याजोगी करण्याकरता ब्रेल यांना बराच काळ प्रयत्न करावा लागला. त्यांनी आपल्या डायरीत एकदा असे लिहिले: “वेगवेगळ्या लोकांबद्दल, घटनांबद्दल, कल्पनांबद्दल व सिद्धान्तांबद्दल मला खूप जाणून घ्यायचं आहे, पण माझे डोळे मला साथ देणार नसतील तर मी दुसरा मार्ग शोधून काढीन.”

बार्बिया यांच्या लेखन पद्धतीला अधिक सोपे करण्याकरता पुढची दोन वर्षे ब्रेल यांनी अथक प्रयत्न केले. शेवटी त्यांनी एक नवी आणि अधिक चांगली पद्धत शोधून काढली. या पद्धतीत केवळ तीन उठावदार बिंदू असलेल्या दोन उभ्या रांगा होत्या. १८२४ साली लुइ ब्रेल १५ वर्षांचा असताना त्याने एकूण सहा बिंदूंची ही लिपी तयार केली. काही काळानंतर अंधांच्या त्याच संस्थेत ब्रेल स्वतः शिकवू लागले. आपण शोधून काढलेली नवी लिपी त्यांनी १८२९ साली जगासमोर मांडली. आजही ही लिपी त्यांच्याच नावाने सुप्रसिद्ध आहे. थोड्याफार बदलांव्यतिरिक्‍त त्यांची लिपी अजूनही जशीच्या तशी वापरली जाते.

ब्रेल लिपी सबंध जगात प्रसिद्ध होते

सन १८२० च्या उत्तरार्धात ब्रेल यांच्या उठावदार बिंदूंच्या नव्या लिपीबद्दल समजावून सांगणारे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. पण तेव्हा याला फार कमी प्रतिसाद मिळाला. रॉयल इंस्टिट्यूट ऑफ ब्लाइंड यूथ या संस्थेतही ब्रेल यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांपर्यंत म्हणजे १८५४ पर्यंत त्यांच्या लिपीला अधिकृत मान्यता मिळाली नव्हती. पण हळूहळू ही अत्यंत उपयुक्‍त लिपी लोकप्रिय होऊ लागली.

बऱ्‍याच संस्थांनी ब्रेल लिपीत विविध ग्रंथ प्रकाशित केले आहेत. १९१२ साली इंग्रजी भाषेकरता या लिपीत अद्याप फेरबदल केले जात असताना वॉचटावर संस्थेने या लिपीत साहित्य प्रकाशित करण्यास सुरवात केली होती. आज ब्रेल प्रिन्टिंगच्या अत्याधुनिक सोयींचा वापर करून वॉचटावर संस्था दर वर्षी आठ भाषांतून लक्षावधी ब्रेल पुस्तके तयार करून ७० देशांत वितरीत करते. ब्रेल लिपीतील बायबल आधारित साहित्याच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अलीकडेच संस्थेने आपली उत्पादन क्षमता दुप्पट वाढवली आहे.

आज वापरली जाणारी ब्रेल लिपी सोपी व अत्यंत सोयीची असल्यामुळे लाखो अंधांच्या काळोख्या जगात ज्ञानाचा प्रकाश उगवला आहे; अर्थात हे सर्व, २०० वर्षांआधी एका कर्तबगार तरुणाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच शक्य झाले!

[१५ पानांवरील चौकट/चित्रे]

ब्रेल लिपी अशी वाचतात

ब्रेल लिपी एका किंवा दोन्ही हातांच्या बोटांच्या साहाय्याने डावीकडून उजवीकडे वाचली जाते. सहा बिंदूंच्या प्रत्येक ब्रेल सेलपासून ६३ संभाव्य संकेतचिन्हे तयार होतात. त्यामुळे जवळजवळ सगळ्याच भाषांतील वर्णमालांच्या अक्षरांकरता व मात्रांकरता विशिष्ट संकेत वापरता येतो. बऱ्‍याच भाषा तर ब्रेल लिपीचे केवळ काही संकेत वापरतात. कारण या भाषांत सहसा येणाऱ्‍या जोडाक्षरांकरता किंवा शब्दांकरता संकेत वापरले जातात. काही लोक ब्रेल लिपी वाचण्यात इतके पारंगत आहेत की ते २०० शब्द प्रती मिनिटाच्या वेगाने ही लिपी वाचू शकतात!

[चित्रे]

पहिल्या दहा अक्षरांसाठी केवळ वरच्या दोन रांगांत बिंदूंचा उपयोग करतात

पुढच्या दहा अक्षरांकरता पहिल्या दहा अक्षरांच्या संकेतांत डावीकडील खालचा बिंदू जोडतात

शेवटल्या पाच अक्षरांत खालचे दोन्ही बिंदू पहिल्या पाच अक्षरांच्या संकेतांत जोडले जातात; फक्‍त “W” हे अक्षर याला अपवाद आहे कारण फ्रेंच वर्णमालेत ते नंतर जोडण्यात आले होते

[१४ पानांवरील चित्राचे श्रेय]

पोट्रेट: © Maison Natale de Louis Braille - Coupvray, France/Photo Jean-Claude Yon