व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“जंगलातला सर्वात सुंदर पक्षी”

“जंगलातला सर्वात सुंदर पक्षी”

जंगलातला सर्वात सुंदर पक्षी”

स्वीडनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

जून महिन्यात एके दिवशी मला तो माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहायला मिळाला. येथील काही लोकांच्या मते, तो “जंगलातला सर्वात सुंदर पक्षी” आहे. करड्या रंगाचा हा पक्षी दुसरा कोणी नसून घुबड आहे. त्याला लॅपलंड आऊल (घुबड) या नावाने देखील ओळखले जाते.

हे विशाल आणि आकर्षक घुबड फिनलंडच्या काही भागांमध्ये, उत्तर स्वीडनमध्ये तसेच पूर्वेकडील सायबेरिया, अलास्का आणि कॅनडा या देशांमध्ये आढळते. ते कोणाच्याही नजरेस पटकन येत नाही. त्याचे घरटे माहीत नसले तर त्याला शोधून काढणे फार कठीण असते. पण एकदा का त्याचे घरटे तुमच्या नजरेस पडले की हा पक्षीसुद्धा किती धीट आहे हे तुम्हाला कळेल.

शिकाऱ्‍याचे परीक्षण

एक लॅपलंड नर अन्‍न शोधत होता तेव्हा मला त्याचे अगदी जवळून परीक्षण करता आले. त्याच्या अंगावरची नक्षी अगदी स्पष्ट दिसत होती. उंदीर दिसताच त्याने फांदीवरून एकदम झेप घेतली. बिचारा उंदीर त्याच्या तावडीतून निसटण्याची शक्यताच नव्हती! भक्ष्य धरून झाडावर पुन्हा येताना त्याच्या तीक्ष्ण पंज्यांमध्ये धरलेला उंदीर मला स्पष्ट दिसत होता. त्याचे पंखसुद्धा भलेमोठे होते; उड्डाणाच्या वेळी त्याच्या एका पंखाच्या टोकापासून दुसऱ्‍या पंखाच्या टोकापर्यंतची लांबी १४० सेंटीमीटर होती.

इतर घुबडांप्रमाणे, लॅपलंड घुबडांच्या विणीचा हंगाम दर वर्षी नसतो. हा विशाल पक्षी फक्‍त उंदीर खात असल्यामुळे, उंदीर जास्त उपलब्ध नसतात तेव्हा त्यांचे प्रजनन पूर्णतः थांबते. पण ज्या वर्षी, अन्‍न विपुलतेत उपलब्ध असते त्या वर्षी प्रत्येक घरट्यात चार किंवा त्याहूनही जास्त पिले असतात.

साथीदाराची निवड

वसंत ऋतू हा घुबडांच्या विणीचा हंगाम असतो. साथीदार निवडण्याच्या बाबतीत मादी घुबड फार चोखंदळ असते. आपल्या मानवांसारखी ती नराचे फक्‍त स्वरूप पाहत नाही. काही पक्षी निरीक्षकांच्या अभ्यासांनुसार, नराला त्याच्या शिकारीचे कौशल्य दाखवावे लागते. आपला संसार मांडण्याआधी त्याला मादीचे पोषण करावे लागते.

उंदरांची संख्या जास्त असली आणि नर अन्‍न मिळवण्यात पटाईत असला तर तो मादीला आणून देत असलेल्या अन्‍नामुळे तिचे वजन वाढते. तिचे वजन वाढल्यामुळे किती अंडी घालावीत याचा संकेत मादीला मिळतो.

त्यानंतर मग, नरालाच सगळी शिकार करावी लागते कारण मादी अंडी घालण्यात आणि त्यांची काळजी घेण्यातच व्यस्त असते. तिच्या हाकांकडे त्याला दुर्लक्ष करता येत नाही. पण तिला भरवणे हे काही सोपे काम नसते; त्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागते.

घरट्याचा शोध

माझ्या दुर्बीणीतून मला नर घुबड वारंवार भक्ष्य घेऊन माझ्या डोक्यावरून उडताना स्पष्ट दिसत होता. शेवटी, मला त्याचे घरटेसुद्धा दिसले. लॅपलंड घुबडे आपले घरटे स्वतः कधीच बांधत नाहीत; पण जंगलातील इतर शिकारी पक्ष्यांची घरटी ते बळकावतात. त्यांना घरटे मिळाले नाही तर झाडांच्या ढोलीत ते आपले घरटे बनवतात.

घरट्यात मला दोन गुबगुबीत पिले दिसली; त्यांच्या अंगावर मऊ पिसे होती. ती अवतीभोवती उगाच टकमक पाहत बसली होती. जवळच पहारा ठेवून बसलेल्या आपल्या आईकडे त्यांची नजर गेली, आणि ती पिले एकसाथ च्याव च्याव करू लागली. या वेळी पिलांच्या जवळ जाणे धोक्याचे होते. कारण पिलांना धोका असल्याचे मादीला जाणवताच ती अतिक्रमण करणाऱ्‍यावर अणकुचीदार नख्यांनी कोठून हल्ला करील याचा पत्ता लागत नाही. म्हणून सावध राहून दूरूनच त्यांचे परीक्षण केलेले बरे.

भरवणे आणि शिकवणे

भक्ष्य घेऊन नर घरट्यात आल्यावर, पायांमधला उंदीर तोंडात घेऊन तो आपल्या एका पिलाला भरवू लागतो. एका पिलाला अन्‍न भरवत असता दुसरे पिल्लू अन्‍नाकरता अधीर होऊन जोरजोरात ओरडत होते.

या भुकेल्या पिलाच्या पोटात अन्‍न पडताच त्याच्यात अगदी मजेशीर हालचाली होऊ लागतात. त्याचा तरतरीतपणा जाऊन ते नशेत असल्यासारखे वागू लागते! आणि नंतर धबकन्‌ खाली पडते. अन्‍नाच्या पचनाकरता सारी शक्‍ती वापरली जात असल्यामुळे असे होते. याचवेळी दुसरे पिलू आपल्या नशेतून सावरत असते, कारण आपल्या हिश्‍याचे अन्‍न खाऊन त्याला बराच वेळ झालेला असतो.

जून महिन्याच्या मध्यापर्यंत असेच चालत राहते. तोपर्यंत, ही पिले चार आठवड्यांची होतात आणि आईचे बोलावणे ऐकून पंख फडफडवत तिच्यामागे उडत असतात. प्रथम, ते फार कुशलतेने झाडांवर चढतात. झाडावर त्यांना शिकारी प्राण्यांचा इतका धोका नसतो जितका जमिनीवर असतो.

काही दिवसांनी ही पिले एका फांदीवरून दुसऱ्‍या फांदीवर उडण्याचा सराव करतात. मग काही दिवसांनी ते सहजपणे उडू लागतात आणि शिकार देखील करू लागतात. बघता बघता त्यांचे स्वरूप बदलते आणि तेसुद्धा ‘जंगलातले सुंदर पक्षी’ बनतात.

[१८ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Joe McDonald

© Michael S. Quinton

[१९ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Michael S. Quinton

© Michael S. Quinton