जगावरील दृष्टिक्षेप
जगावरील दृष्टिक्षेप
विषारी औषध?
इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीनच्या अहवालानुसार, औषधांमुळे दरवर्षी ४४,००० ते ९८,००० रुग्णांचा मृत्यू होतो. इस्पितळे, दवाखाने आणि औषधालयांच्या चुकीच्या कार्यपद्धतीचा हा परिणाम आहे असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, औषधे देणाऱ्या व्यक्तींना डॉक्टरांचे अक्षर नीट वाचायला येत नाही. डॉक्टरांनी १० मिलिग्राम लिहिले आहे की १० मायक्रोग्रॅम हे काही कळत नाही. त्यात आणखी भर म्हणजे, पुष्कळशा औषधांची नावे सारखीच वाटतात. त्यामुळे, डॉक्टर, नर्स, औषध देणारे आणि रुग्ण यांच्यात गोंधळ होतो. इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीनने पुढील पाच वर्षांच्या आत वैद्यकीय चुकांमध्ये ५० टक्के घट करायला सांगितली आहे.
पाळीव प्राण्यांच्या बाबतीत सावधान
फ्रेंच दैनिक ल माँड नुसार, फ्रान्समधील ५२ टक्के घरांमध्ये पाळीव प्राणी आहेत. तथापि, फ्रान्सच्या मेसन्स-ऑल्फोर्ट येथील तुलनात्मक प्राणी रोगप्रतिकारकशास्त्र संस्थेतील एका पशुवैद्य गटाने अलीकडेच घेतलेल्या एका अभ्यासात असे दिसून येते की, बुरशी आणि परजीवींचे वाहक असलेल्या फ्रान्समधील ८,४०,००,००० मांजरींमुळे आणि ७,९०,००,००० कुत्र्यांमुळे त्यांना पाळणाऱ्या लोकांना विविध प्रकारचे रोग होतात. या रोगांमध्ये रिंगवर्म, राऊंडवर्म (जंत), खरूज, लीशमॅनिआसिस आणि टॉक्सोप्लाझमोसिस यांचा समावेश आहे. लीशमॅनिआसिस आणि टॉक्सोप्लाझमोसिस या रोगांमुळे गर्भवती स्त्रीचा गर्भपात होऊ शकतो किंवा अर्भकात विकृती निर्माण होऊ शकते. त्या वृत्तात असेही म्हटले होते की, फ्रान्समध्ये पाळीव प्राण्यांमुळे आणि कुत्र्यांच्या चाव्यांमुळे झालेल्या संसर्गांमुळे वेगवेगळ्या ॲर्लजीसुद्धा निर्माण होतात. दरवर्षी अशी सुमारे १,००,००० प्रकरणे घडत असतात.
पंखधारी जीवाश्म एक फसवणूक
चीनच्या लिआओनिंग प्रांतामध्ये एक जीवाश्म मिळाले होते. नॅशनल जिओग्रॅफिकच्या वृत्तानुसार असे सांगण्यात आले की, ते जीवाश्म, “डायनॉसर आणि पक्ष्यांना जोडणाऱ्या जटिल साखळीतला दुवा आहे ज्याचा शोध चालला होता.” आर्केओरॅप्टर लायोनिंनजेन्सीस असे नाव दिलेल्या या जीवाश्माला डायनॉसरची शेपटी आणि पक्ष्याची छाती व खांदे आहेत असे म्हटले गेले. परंतु, सायन्स न्यूज म्हणते की, आता शास्त्रज्ञांना अशी खात्री पटत आहे की, “खोटा जीवाश्म तयार करून काहीतरी फसवणूक करण्यात आली आहे.” या जीवाश्माचे परीक्षण करताना शेपटी आणि शरीराला जोडणारी हाडे गायब होती आणि दगडावर काम केल्याचे चिन्ह दिसत होते हे पाहिल्यावर जीवाश्मतज्ज्ञांना शंका आली. त्या अहवालानुसार, कॅनडातल्या आल्बर्टा येथील ड्रमहेलरमधील रॉयल टायरल म्युझियम ऑफ पेलिऑन्टोलॉजीचे फिलिप्प करी यांचा असा संशय आहे की, “कोणीतरी डायनॉसरच्या शेपटीचा एक भाग पक्ष्याच्या जीवाश्माला जोडून आर्केओरॅप्टरचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.”
बायबलचे आणखी भाषांमध्ये भाषांतर
मेक्सिकन बातमीपत्र एक्सेलसियर यातील वृत्तानुसार, “विविध भाषांच्या भाषांतरामध्ये बायबलच्या तोडीचे अजूनपर्यंत कोणतेही पुस्तक नाही.” जर्मन बायबल सोसायटीनुसार, १९९९ मध्ये बायबलचे भाषांतर २१ भाषांमध्ये झाले होते. याचा अर्थ, सध्या त्याचे काही भाग तरी २,२३३ भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यांपैकी, “संपूर्ण जुना व नवा करार ३७१
भाषांमध्ये भाषांतरित झालेले आहेत; १९९८ सालापेक्षा यात ५ भाषा वाढल्या आहेत.” या इतक्या भाषा कोठे बोलल्या जातात? ते बातमीपत्र पुढे म्हणते, “सर्वात जास्त भाषांतरे आफ्रिकेत ६२७, त्यानंतर आशियात ५५३, ऑस्ट्रेलिया/पॅसिफिकमध्ये ३९६, लॅटिन अमेरिका/कॅरिबियनमध्ये ३८४, युरोपमध्ये १९७ आणि अमेरिकेत ७३.” तरीपण, “पृथ्वीतलावरील निम्म्या भाषांमध्येही बायबलचे अद्याप भाषांतर झालेले नाही.” पण का? कारण फारच कमी लोक त्या भाषा बोलतात आणि त्या भाषांमध्ये बायबलचे भाषांतर करणे फार अवघड आहे. तसेच काही लोकांना दोन भाषा येत असतात; त्यांच्या एका भाषेत बायबल नसले तरी ते दुसऱ्या भाषेतील बायबल वाचू शकतात.लंडनमधील भाषा
इंग्लंडमधील लंडन शहरातील द टाईम्स बातमीपत्रानुसार, तेथील शालेय मुलांना कमीत कमी ३०७ भाषा येतात. लंडनमध्ये सध्या बोलल्या जाणाऱ्या भाषांचे प्रथम सर्वेक्षण घेणाऱ्यांपैकी डॉ. फिलिप्प बेकर यांना इतक्या विविध भाषा पाहून आश्चर्य वाटले. ते म्हणाले: “आता तर आम्हाला खात्री पटली आहे की, संपूर्ण जगात लंडन शहर हे न्यूयॉर्क शहरापेक्षाही सर्वाधिक भाषा बोलले जाणारे ठिकाण आहे!” ३०७ या संख्येत तर शेकडो पोटभाषांचा समावेशसुद्धा केलेला नाही. ही संख्या कमी देखील असू शकते. शहरातल्या ८,५०,००० शालेय मुलांपैकी फक्त दोन तृतीयांश मुले घरी इंग्रजी भाषा बोलतात. परदेशी भाषा बोलणारे सर्वात जास्त लोक भारतीय उपखंडातील आहेत. येथे कमीतकमी १०० आफ्रिकन भाषा बोलल्या जातात. फक्त एकाच शाळेमधील विद्यार्थी ५८ भाषा बोलतात.
जड दप्तरे
अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ ओर्थोपेडिक सर्जन्सने घेतलेल्या एका अभ्यासातून असे निष्पन्न झाले आहे की, मुलांमधील पाठीचे व खांद्याचे दुखणे आणि जड दप्तरे यांच्यात फार जवळचा संबंध आहे. दप्तरात शाळेची पुस्तके, जेवणाचा डबा, पाणी, संगीत वाद्ये, एक ड्रेस असे करून त्या दप्तरांचे वजन कधीकधी १८ किलो असते. बालरोगतज्ज्ञ असा इशारा देत आहेत की, प्राथमिक शाळेतली मुले दररोज अशीच जड दप्तरे शाळेला नेऊ लागली तर त्यांना पाठीचे गंभीर आजार होतील किंवा पाठीच्या कण्यात बांक येईल. काही तज्ज्ञांनी मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना असे सुचवले आहे की, मुलांच्या दप्तराचे वजन त्यांच्या शरीराच्या वजनाच्या २० टक्क्यांइतकेच असावे, त्यापेक्षा जास्त नाही. नाहीतर, “दप्तरे गाड्यांनी पोचवली जावीत, किंवा कंबरेला पट्टा असावा आणि पाठीमागच्या बाजूला कुशन असावे,” असे मेक्सिको शहरातील एक्सेलसियर बातमीपत्राचे वृत्त आहे.
प्रदूषण पसरवणाऱ्या मूर्ती
एखाद्या विधीनंतर जवळपासच्या तलावात, नदीत अथवा विहिरीत मूर्तींचे विसर्जन करण्याची प्रथा हिंदूंमध्ये रूढ आहे. मूर्तींना नैसर्गिक रंगांनी रंगवले जात होते तेव्हा ही एक वातावरण समस्या नव्हती. परंतु, भारी धातू आणि कार्सिनोजन यांनी तयार केलेले रंग वापरण्यात येऊ लागले तेव्हापासून खरी समस्या सुरू झाली आहे. नद्यांमध्ये आणि तलावांमध्ये अशा हजारो मूर्तींचे विसर्जन केल्यावर भारतातल्या काही ठिकाणी पाण्याचे गंभीर प्रदूषण झाले आहे. हे टाळण्यासाठी एका शहरातल्या रहिवाश्यांनी सगळ्या मूर्ती गोळा करून एका मोठ्या पटांगणात नेऊन त्यांचा चुराडा केला. डाऊन टू अर्थ ही पत्रिका म्हणते की भारतात सगळीकडे असेच केले जावे आणि मूर्ती तयार करणाऱ्यांनी कृत्रिम रंगांऐवजी पुन्हा एकदा पारंपरिक रंग वापरावेत. “नाहीतर,” ती पत्रिका म्हणते, “हिंदूंना पवित्र असलेल्या नद्या त्यांच्या पूज्य मूर्तींच दूषित करतील.”