व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवघेणे “चुंबन”

जीवघेणे “चुंबन”

जीवघेणे “चुंबन”

ब्राझीलमधील सावध राहा! बातमीदाराकडून

तुम्ही गाढ झोपेत आहात. तो तुमच्या जवळ येतो. तुम्हाला त्याची चाहूलही लागत नाही. तो तुमचे “चुंबन” घेतो, तरी तुम्हाला पत्ता लागत नाही.

रात्रीच्या वेळी अनाहूत येऊन चुंबन घेणारा हा कोण? बार्बर बीटल नावाचा कीडा. हा दक्षिण अमेरिकेत सहसा आढळतो. याला ‘किसिंग बग’ (चुंबन घेणारा किडा) नाव पडले आहे. या किड्याचे चुंबन काही साधेसुधे नसते. कधीकधी तो १५ मिनिटांपर्यंत हळूहळू तुमचे रक्‍त शोषत असतो. मुळात या किड्याचे चुंबन जीवघेणे नाही, पण तुमच्या त्वचेवर किड्याच्या मलाचे कण राहतात; यात ट्रायपॅनोसोमा क्रूझी किंवा संक्षेपात टी. क्रूझी नावाचा एक सूक्ष्मजीव असण्याची शक्यता असते. हा परजीवी डोळ्यांतून, तोंडातून किंवा त्वचेवरील जखमेतून शरीरात गेल्यास अमेरिकन ट्रायपॅनोसोमिॲसिस किंवा सहसा चॅगस डिसीज नावाने जाणला जाणारा रोग होऊ शकतो.

हा रोग सुरू होऊन बळावतो तेव्हा सर्वात सहज ओळखू येणारे एक लक्षण म्हणजे डोळा सुजणे. थकवा, ताप, भूक न लागणे किंवा अतिसार (डायरिया) ही लक्षणे देखील दिसू शकतात. औषधोपचार केला नाही तरी, एक किंवा दोन महिन्यांनंतर ही लक्षणे आपोआप नाहीशी होतात. पण याचा अर्थ धोका टळला असे नाही. १० ते २० वर्षांनंतर रोग्याला हृदयविकार होऊ शकतो. हृदयाच्या गतीत उतार चढाव येऊ शकतात आणि कधीकधी तर हृदय निकामी होते. *

दर वर्षी, अंदाजे १,८०,००,००० लोकांना चॅगस डिसीज होतो आणि त्यांपैकी ५०,००० दगावतात. या सर्व रोग्यांना किसिंग बगने चावलेले नसते. काहींना आईच्या दुधातून संसर्ग झालेला असतो. गरोदर स्त्रीच्या बालकाला गर्भातच किंवा बाळंतपणाच्या वेळी संसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच रक्‍त संक्रमणातून किंवा टी. क्रूझी जिवाणू असलेले कच्चे अन्‍नपदार्थ खाल्ल्याने देखील हा रोग संभवू शकतो. *

चॅगस डिसीजचा प्रतिकार करण्याकरता काय केले जात आहे? कीटकनाशकांचा उपयोग करून बार्बर बीटल या किड्यांचे प्रमाण कमी करण्यात बरेच यश आले आहे. पण घरांत कीटकनाशक फवारणे बऱ्‍याच जणांना नकोसे वाटते; शिवाय दर सहा महिन्यांनी पुन्हा फवारणी करावी लागते. पण फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रियो दि झानेइरूने एक नवा मार्ग शोधून काढला आहे—कीटकनाशकयुक्‍त रंग. ४,८०० घरांना हा आगळावेगळा रंग लावण्यात आला. परिणाम? चक्क दोन वर्षांपर्यंत ८० टक्के घरांत हे किडे आढळले नाहीत! संशोधकांनी आणखी एक शोध लावला आहे. तो म्हणजे कडुनिंब किंवा ब्राझिलियन सिनामोमो या झाडातील एका बिनविषारी पदार्थाचा (अझाडिरॅक्टिन) उपयोग करून संसर्गित किड्यांना संसर्गमुक्‍त करता येते आणि इतर किड्यांनाही यामुळे संसर्ग व्हायचा थांबतो.

संसर्गित रोग्यांकरता

चॅगस डिसीजचा संसर्ग झालेल्या लाखो लोकांकरता काही आशा आहे का? होय निश्‍चितच. आंतरराष्ट्रीय स्तरावर वैज्ञानिक टी. क्रूझी जिवाणूच्या १०,००० जनुकांचा कसून अभ्यास करत आहेत. भविष्यात कदाचित या रोगाचे निदान करण्याकरता नव्या चाचण्या, लशी आणि अधिक गुणकारी औषधे निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वैज्ञानिकांनी टी क्रूझी या सूक्ष्मजीवातील प्रथिनांचा अतिशय कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या स्थितीत अभ्यास करण्याकरता १९९७ साली जुलै महिन्यात ही प्रथिने कोलंबिया नावाच्या स्पेस शटलमधून अंतराळात नेली. टी. क्रूझी या सूक्ष्मजिवाशी जुळणारी औषधे तयार करण्याच्या दिशेने हे अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. नवी औषधे शोधून काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण हा रोग बळावल्यानंतर सध्या उपलब्ध असलेले कोणतेच औषध त्यावर गुणकारी ठरत नाही. *

लवकरात लवकर उपचार करणेच फायद्याचे आहे हे लक्षात घेऊन, ब्राझिलियन जीवशास्त्रज्ञ कॉनस्टान्का ब्रिटो यांनी एका पॉलिमरेस-चेन-रिॲक्शन चाचणीचा शोध लावला आहे. या चाचणीने दोन दिवसांत निदान करणे शक्य आहे. पण समस्या अशी आहे की रोगाच्या सुरवातीच्या टप्प्यात आपल्याला काहीतरी झाले आहे याची रोग्याला जाणीवही नसते.

उपचारापेक्षा प्रतिबंध बरा

तुम्ही राहता त्या परिसरात बार्बर बीटल किडे असल्यास तुम्ही कोणती प्रतिबंधक पाऊले उचलू शकता?

घर मातीचे किंवा गवताचे असल्यास, मच्छरदाणी लावून झोपा.

कीटकनाशके वापरा. यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.

भिंतीत असलेल्या भेगा व फटी बुजवून टाका, कारण हे बार्बर बीटल किड्यांचे राहण्याचे व वाढण्याचे ठिकाण ठरू शकते.

घरात स्वच्छता ठेवा. फोटोंच्या व फर्निचरच्या मागची बाजू नियमित स्वच्छ करा.

अधूनमधून गाद्या व ब्लँकेट उन्हात ठेवा.

प्राणी देखील या रोगाचे वाहक असू शकतात हे विसरू नका; यात पाळीव प्राण्यांचाही समावेश आहे.

एखादा किडा बार्बर बीटल आहे अशी शंका असल्यास, खात्री करण्यासाठी जवळपासच्या हेल्थ सेंटरमध्ये पाठवा.

[तळटीपा]

^ लक्षणे थोडीफार वेगळी असण्याचीही शक्यता आहे. यांतील काही तर खास चॅगस डिसीजचीच लक्षणे आहेत असे म्हणता येणार नाही. वरील लक्षणे केवळ रोगाची सर्वसामान्य कल्पना येण्याकरता सांगण्यात आली आहेत, पण केवळ याच लक्षणांच्या आधारावर रोगाचे निदान करण्यात येऊ नये. बऱ्‍याच लोकांना तर हा रोग बळावण्यापर्यंत यांपैकी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

^ यु. एस. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल ॲन्ड प्रिव्हेंशन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार काही देशांत रक्‍तपेढ्यांतील रक्‍ताची चॅगस डिसीज शोधण्याकरता चाचणी घेतली जात नाही.

^ टी. क्रूझीवर उपचाराकरता सहसा डॉक्टर नायफर्टिमॉक्स या औषधाचा उपयोग करतात पण या औषधाचे सहसा गंभीर दुष्परिणाम होतात.

[१३ पानांवरील चौकट]

चॅगस डिसीजचा शोध

ब्राझीलमधील मिनास गेरास राज्यात, १९०९ साली कार्लोस चॅगस हे ब्राझिलियन डॉक्टर मलेरियाने पिडित असलेल्या रेल्वे बांधकाम मजुरांवर उपचार करत होते. त्यांच्या लक्षात आले की बऱ्‍याच रोग्यांमध्ये वेगळ्याच प्रकारची लक्षणे दिसत होती. या प्रदेशातील घरांत बार्बर बीटल्स नावाचे, रक्‍त शोषणारे असंख्य किडे होते असेही त्यांच्या लक्षात आले. या किड्यांच्या आंतड्यांतील कणांचा अभ्यास करताना चॅगस यांना एक नवा जंतू आढळला. चॅगस यांनी आपला मित्र, ऑस्वाल्डो क्रूझ या वैज्ञानिकाच्या सन्मानार्थ या नव्या जंतूला ट्रायपॅनोसोमा क्रूझी असे नाव दिले. कार्लोस चॅगस यांनी बराच अभ्यास व संशोधन केल्यामुळेच या रोगाचा शोध लागला आणि म्हणूनच या रोगाचे नाव चॅगस डिसीज पडले.

[१२, १३ पानांवरील चित्रे]

ग्रामीण भागांतील घरांत सहसा बार्बर बीटल मोठ्या संख्येने असतात

[चित्राचे श्रेय]

चित्रे: PAHO/WHO/P. ALMASY