व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

डोळ्यांना दिसते त्यापलीकडे तुम्ही पाहू शकता का?

डोळ्यांना दिसते त्यापलीकडे तुम्ही पाहू शकता का?

डोळ्यांना दिसते त्यापलीकडे तुम्ही पाहू शकता का?

वळणावरून जाताना सहसा ड्रायव्हर्सना पुढून येणाऱ्‍या गाड्या दिसत नाहीत. म्हणूनच काही देशांत वळणांवर मोठे आरसे लावलेले असतात. या आरशात ड्रायव्हरला पुढून येणाऱ्‍या गाड्या दिसतात आणि यामुळे दुर्घटना टाळता येतात. अशाचप्रकारे, या विश्‍वाच्या निर्माणकर्त्याला मानव पाहू शकत नाहीत; तो अदृश्‍य आहे. पण तो अस्तित्वात आहे याची खात्री करण्याचा काही मार्ग आहे का?

काही अदृश्‍य गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसत नसल्या तरी त्या आपण कशा पाहू शकतो याविषयी पहिल्या शतकातील एका लेखकाने असे म्हटले: “सृष्टीच्या निर्मितीपासून [देवाच्या] अदृश्‍य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की, त्यांना कसलीहि सबब राहू नये.”—रोमकर १:२०.

यावर थोडा विचार करा. आपल्या भोवती आपण अशा कितीतरी गोष्टी पाहतो, ज्या मनुष्य कधीच निर्माण करू शकत नाही. या गोष्टींच्या निर्मितीमागे असलेली अफाट बुद्धीमत्ता तुम्ही पाहू शकता का? मनुष्यापेक्षाही कोणीतरी श्रेष्ठ अस्तित्वात आहे याची जाणीव तुमच्या ‘अंतकरणाचे डोळे’ तुम्हाला करून देतात का? काही उदाहरणांचा विचार करा.—इफिसकर १:१८.

सृष्टीतून शिकण्यासारखे

चांदण्या रात्री आकाशाकडे पाहून कधी तुमच्या मनात सृष्टीच्या महान निर्मात्याविषयी विचार आला का? प्राचीन काळात एका लेखकाने असे लिहिले: “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते.” हाच लेखक देवाच्या महानतेचा विचार करत म्हणतो: “आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यांत तू नेमलेले चंद्र व तारे ह्‍यांच्याकडे पहावे तर—मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे?”—स्तोत्र ८:३, ४; १९:१.

मनुष्याच्या सामर्थ्यापलीकडे असणाऱ्‍या निर्मित वस्तू पाहिल्यावर साहजिकच आपण अचंबित होतो. एका प्रसिद्ध इंग्रजी कवितेत कवीने असे म्हटले की “फक्‍त देवच वृक्ष निर्माण करू शकतो.” याहीपेक्षा आणखी अद्‌भुत म्हणजे एका बाळाचा जन्म. आपले बाळ कसे असावे याविषयी आईवडिलांना कोणत्याही सूचना द्याव्या लागत नाहीत. पित्याच्या शरीरातील शुक्राणू जेव्हा आईच्या शरीरातील अंडासोबत मिळतो तेव्हा नव्या पेशीतील डीएनएत लगेच बाळाचे सर्व गुण निश्‍चित केले जातात. डीएनएत असलेली ही माहिती “लिहून काढल्यास ६०० पानांची एक हजार पुस्तके तयार होतील.”

पण ही तर केवळ सुरवात असते. त्या पहिल्या पेशीचे विभाजन होऊन तिच्या दोन पेशी होतात, मग चार, मग आठ असे करत वाढ होत जाते. मग जवळजवळ २७० दिवसांनंतर, २०० प्रकारच्या हजारो-लाखो जिवंत पेशी असलेल्या बाळाचा जन्म होतो. या वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य पेशी निर्माण करण्यासाठी आणि तेसुद्धा योग्य वेळी योग्य पेशीची निर्मिती करण्यासाठी लागणारी सर्व माहिती त्या पहिल्याच पेशीत होती, हे खरोखर अद्‌भुतच नाही का? याचा विचार केल्यावर तुम्हाला निर्माणकर्त्याची स्तुती करण्यास प्रेरणा मिळत नाही का? स्तोत्रकर्त्याने निर्माणकर्त्याची या शब्दांत स्तुती केली: “तूच माझे अंतर्याम निर्माण केले; तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो.”—स्तोत्र १३९:१३-१६.

या अद्‌भुत ‘चमत्कारांविषयी’ विचार करणारे लोक पुरते अचंबित होतात. शिकागो ॲण्ड इलिनाइस स्टेट मेडिकल सोसायटीजचे भूतपूर्व अध्यक्ष डॉ. जेम्स एच. हटन यांनी सांगितले की जिवंत पेशी “नव्या पेशींना अचूक माहिती पुरवतात हा खरोखर एक चमत्कारच आहे. संशोधकांना या सर्वांविषयी जाणून घेता आले हे देखील अद्‌भुतच आहे. पण निश्‍चितच हे चमत्कार घडायला लावणारी कोणतीतरी अतिश्रेष्ठ व अतिबुद्धिमान शक्‍ती असली पाहिजे.”

डॉ. हटन पुढे म्हणतात: “मी एन्डोक्रायनोलॉजी या एका विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. एन्डोक्राइन ग्रंथींची गुंतागुंतीची रचना, त्यांच्या क्रिया आणि त्यांत निर्माण होणारे विकार आदींचा अभ्यास केल्यावर दैवी शक्‍तीवरचा माझा विश्‍वास अधिकच पक्का झाला आहे.” ते शेवटी म्हणतात: “निसर्गातील अद्‌भुत गोष्टींचा विचार केल्यावर मला ही खात्री पटते की या विश्‍वाची योजना, सुरवात आणि आता त्याचे नियंत्रण करणारी कोणतीतरी अतिप्रबल, सर्वज्ञ शक्‍ती असलीच पाहिजे.”

“पण ही शक्‍ती म्हणजे देव आहे का? भूमीवर पडणाऱ्‍या प्रत्येक चिमणीची दखल घेणारा देव?” असा प्रश्‍न डॉ. हटन पुढे विचारतात. त्यांचे उत्तर: “याची मला खात्री नाही. माझ्या जीवनातल्या क्षुल्लक घटनांकडे तो लक्ष देतो असे मला वाटत नाही.”

सृष्टीच्या ‘चमत्कारांमागे’ बुद्धिमत्ता दिसून येते हे बरेच लोक कबूल करतात, पण मानवजातीबद्दल काळजी वाटणारा देव अस्तित्वात आहे हे मात्र बऱ्‍याच जणांना पचवायला कठीण जाते. असे का असावे?

देवाला खरच आपली काळजी आहे का?

बऱ्‍याच जणांचे असे म्हणणे आहे की देव असता तर त्याने मानवाला इतके दुःख सोसू दिले नसते. असे लोक सहसा म्हणतात, “देवाची आम्हाला गरज होती, तेव्हा तो कुठे होता?” दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान नात्सी लोकांनी केलेल्या हजारो लोकांच्या क्रूर कत्तलीतून जिवंत बचावलेल्या एकाने म्हटले: “माझे हृदय कोणी चाटून पाहिले तर त्याला विषबाधा होईल.”

यामुळे बरेच लोक देवाच्या अस्तित्वाबाबत साशंक आहेत. प्राचीन काळातील याआधी उल्लेख केलेल्या लेखकाने म्हटल्याप्रमाणे सृष्टीतील अद्‌भुत सुसंगतता आणि विविध वस्तूंची रचना पाहिल्यावर आपल्याला निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाची खात्री पटते. पण जर देवाला खरच आपली काळजी आहे तर मग आज जगात इतके दुःख का आहे? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्‍न आहे. आणि जर आपल्याला देवाबद्दल माहिती घेऊन त्याची योग्यप्रकारे उपासना करायची आहे, तर या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर मिळालेच पाहिजे. हे उत्तर आपल्याला कोठून मिळेल?

यासाठी कृपया देव खरोखरी आपली काळजी करतो का? या माहितीपत्रकाची एक प्रत मागवा. सावध राहाच्या! या अंकाच्या पृष्ठ ३२ वर दिलेले कूपन तुम्ही पाठवू शकता. या माहितीपत्रकात, “देवाने दुःखाला परवानगी का दिली” आणि “बंडाळीचा परिणाम काय झाला?” या विषयांचे परीक्षण केल्यास तुम्हाला तुमच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळतील, अशी आमची आशा आहे.

[१० पानांवरील चित्रे]

हे सर्व पाहून तुम्हाला निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही का?