लैंगिक अत्याचाराला मी कसे तोंड द्यावे?
तरुण लोक विचारतात . . .
लैंगिक अत्याचाराला मी कसे तोंड द्यावे?
“मुलं शिट्या मारतात आणि जोरजोराने ओरडतात.”—कार्ला, आयर्लंड.
“मुली एकसारख्या फोन करत राहतात. नुसतं भंडावून सोडतात.”—जेसन, अमेरिका.
“तो सारखा माझा हात पकडण्याचा, मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा.”—युकिको, जपान.
“मुली काहीतरी घाणेरडं बोलतात.”—ॲलेक्झांडर, आयर्लंड.
“एक मुलगा शाळेच्या बसमधून मला काहीतरी ओरडून बोलत होता. त्याला मला काही भेटायचं नव्हतं, फक्त तो मला छेडत होता.”—रोझलिन, अमेरिका.
कोणाकडे वाईट नजरेने पाहणे, “द्वीअर्थी” भाषा, घाणेरडे विनोद, कामुक स्पर्श यांद्वारे कोणाला आवडत नसतानाही वारंवार छेडणे म्हणजेच लैंगिक अत्याचार. संपूर्ण जगात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे अचूक प्रमाण मिळणे कठीण असले तरी अमेरिकेत शाळेला जाणाऱ्या बहुतांश तरुणांना त्याचा अनुभव कधी न कधी आलाच आहे.
लैंगिक अत्याचार नेमके कशाला म्हणतात? डॉ. व्हिक्टोरिया शॉ यांनी लिहिलेले कोपिंग वीथ सेक्शुअल हरॅसमेंट ॲण्ड जेंडर बायस या पुस्तकात असे म्हटले आहे की, “लैंगिकरित्या केलेली कोणत्याही प्रकारची छेड” म्हणजे लैंगिक अत्याचार आहे. त्यात पुढे असे म्हटले आहे की, “ही [छेडाछेडी] शारीरिक (जसे की, कोणाला कामुक स्पर्श करणे) किंवा शाब्दिक (जसे की, एखाद्याच्या स्वरूपाविषयी त्या व्यक्तीला आवडत नसतानाही टिपणी करणे) असू शकते, किंवा शब्दांविना इतर मार्गांनीही केली जाऊ शकते.” काही वेळा तर असा थिल्लरपणा अगदी खालच्या स्तराला जातो.
शाळेमध्ये सहसा समवयस्कांकडूनच जास्त छेडाछेडी होत असते. परंतु, काही प्रकरणांमध्ये शिक्षकांचाही त्यात वाटा असतो. रेडबुक पत्रिकेतील एका लेखात असे म्हटले आहे की, लैंगिक अत्याचाराचा प्रत्यक्षात आरोप फक्त बोटांवर मोजण्याइतक्या शिक्षकांवर केला आहे; मात्र “असा अत्याचार करणाऱ्या शिक्षकांची संख्या भरपूर आहे.”
बायबल काळातही स्त्रियांवर—आणि काही वेळा तर पुरुषांवर देखील—असे अत्याचार होत होते. (उत्पत्ति ३९:७; रूथ २:८, ९, १५, सुबोध भाषांतर) बायबलमध्ये आधीच असे भाकीत केले होते: ‘शेवटच्या दिवसांत कठीण समय आपल्यावर येतील. लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, शिव्याशाप देणारे, इतरांवर प्रीती न करणारे, क्षमा न करणारे, चहाडखोर, मोकाट सुटलेले आणि क्रूर’ असतील. (२ तीमथ्य ३:१-३, ईजी टू रीड व्हर्शन) त्यामुळे तुमच्यावरही असा लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता टाळता येत नाही.
देवाचा दृष्टिकोन
पण छेडाछेडीमुळे सर्वच तरुणांना मनःस्ताप होतो असे नाही. काहींना छेडणे हे फक्त मनोरंजन वाटत असेल नाहीतर
त्यांना ते आवडतही असेल. अमेरिकेत घेतलेल्या एका सर्वेक्षणात एक धक्कादायक गोष्ट प्रकाशात आली. ती अशी की, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्यांपैकी ७५ टक्के लोकांनी कबूल केले की, त्यांनी देखील इतरांवर असाच अत्याचार केला होता. काही प्रौढ असा विचार करतील की, ‘ही काही गंभीर समस्या नाही, मुले अजूनही बालिश आहेत, त्यांच्यात असे चालणारच.’ पण प्रौढांची ही मनोवृत्ती समस्या वाढण्यात भर घालते. देवाचा या बाबतीत काय दृष्टिकोन आहे?देवाच्या वचनात अर्थात बायबलमध्ये लैंगिक अत्याचाराच्या सर्व प्रकारांचा धिक्कार केलेला आहे. आपल्याला असे सांगितले आहे की, लैंगिक मर्यादांचे उल्लंघन करून इतरांचा “गैरफायदा घेऊ नये.” (१ थेस्सलनीकाकर ४:३-८) उलट, तरुण पुरुषांनी “तरुण स्त्रियांस पूर्ण शुद्धतेने बहिणीसमान” मानावे अशी त्यांना स्पष्ट आज्ञा देण्यात आली आहे. (१ तीमथ्य ५:१, २) आणि बायबलमध्ये “घाणेरडे विनोद” करण्याचाही धिक्कार केला आहे. (इफिसकर ५:३, ४, ईजी टू रीड व्हर्शन) त्यामुळे, कोणी छेडल्यावर चीड येणे, राग येणे, गोंधळून जाणे किंवा अपमानित वाटणे यात काहीच गैर नाही!
मी कसे उत्तर द्यावे?
तर मग, कोणी तुमची छेड काढत असेल तर तुम्ही काय कराल? काही वेळा खडखडीत उत्तर दिले नाही किंवा स्पष्ट आवाजात बजावले नाही तर छेडणाऱ्या व्यक्तीला आणखीनच चेव येईल. बायबलमध्ये एक उदाहरण आहे. योसेफाला त्याच्या मालकीणीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायला सांगितले तेव्हा त्याने फक्त तिच्याकडे दुर्लक्ष केले नाही. पण बायबल सांगते की, त्याने ठामपणे तिचा तो अनैतिक प्रस्ताव नाकारला. (उत्पत्ति ३९:८, ९, १२) आजही, ठामपणे आणि स्पष्टपणे नकार देणे हाच सर्वात उत्तम मार्ग आहे.
कधी कधी असेही होते की, छेड काढणाऱ्या व्यक्तीला तुमचे मन दुःखवायचे नसते. फक्त त्याला किंवा तिला तुमचे लक्ष आकर्षित करायचे असते; पण ते योग्यप्रकारे कसे करावे हे त्याला किंवा तिला ठाऊक नसते. अशा वेळी, तुम्हाला ती व्यक्ती आवडत नाही म्हणून तिचा अपमान केला पाहिजे असे समजू नका. ‘मला असलं बोललेलं आवडत नाही’ किंवा ‘तुमचे हात जरा दूर ठेवाल का?’ फक्त असे म्हटले तरी पुरेसे आहे. पण तुम्ही तुमच्या बोलण्यातून हे दाखवून द्या की ही काही क्षुल्लक गोष्ट नाही. एकदा नाही म्हटल्यावर तुमचा निर्णय पुन्हा बदलू नका. ॲन्ड्रिया म्हणते की, “चांगल्या शब्दांत सांगूनही त्यांनी ऐकले नाही तर कडक शब्दांत सांगावे लागते.” अगदी कडक शब्दांत “बस, फार झाले” असे म्हटले तरी पुरे आहे.
पण, एवढे करूनही काही फरक पडत नसेल तर मग एकट्याने काही करण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या आईवडिलांशी
किंवा इतर प्रौढ व्यक्तींशी बोला. काही व्यावहारिक सल्ला देऊन ते तुमची मदत करू शकतील. त्यांच्या प्रयत्नांनंतरही काही झाले नाही तर ते कदाचित शाळेतल्या अधिकाऱ्यांना कळवतील. असे करणे तुम्हाला नको वाटेल पण निदान तुम्हाला संरक्षण मिळेल.छेडाछेडी टाळणे
छेडाछेडी मुळात टाळलेलीच बरी. हे कसे शक्य आहे? ॲन्ड्रिया म्हणते: “असल्या गोष्टींत तुम्हाला मुळीच इंटरेस्ट नाही हे लोकांना दाखवून द्या. कारण तुम्हाला इंटरेस्ट आहे असे इतरांना कळाल्यावर ते उलट तुमच्यावर जास्त दबाव आणतील.” आपण कोणत्याप्रकारचे कपडे घालतो ही गोष्ट देखील महत्त्वाची आहे. मारा म्हणते: “मी आजीबाईसारखे कपडे घालत नाही तरीपण माझ्या शरीराकडे कोणाचे लक्ष जाईल असे कपडे मी कधीच घालत नाही.” एकीकडे नकार द्यायचा आणि दुसरीकडे असभ्य कपडे घालायचे अशाने आपल्याला त्यांच्यात इंटरेस्ट आहे हेच आपण दाखवून देऊ. त्यामुळेच तर बायबलमध्ये सांगितले आहे की, आपण स्वतःला “भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे.”—१ तीमथ्य २:९.
तुमची मित्रमंडळी कोणती आहे हे देखील महत्त्वाचे आहे. (नीतिसूत्रे १३:२०) रोझलिन म्हणते: “एका ग्रूपमधल्या काही मुलींना मुलांचं चिडवणं वगैरे आवडत असलं, तर मुलांना वाटतं त्या ग्रुपमधल्या सगळ्याच मुली तशा आहेत.” कार्लासुद्धा असेच म्हणाली: “तुमच्या मैत्रिणी जर मुलांच्या चिडवण्याला प्रतिसाद देत असतील किंवा त्यांचं चिडवणं त्यांना आवडत असेल तर मग तुम्हालासुद्धा छेडलं जाईल.”
बायबलमध्ये दीना नावाच्या मुलीविषयी सांगितले आहे. तिची कनानच्या मुलींबरोबर दोस्ती होती. कनानमधल्या या स्त्रियांचे चालचलन मुळीच चांगले नव्हते. या चुकीच्या संगतीमुळे दीनावर बलात्कार झाला. (उत्पत्ति ३४:१, २) म्हणूनच, “तुम्ही कसे जगता, याविषयी सावध असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका. तर शहाण्या लोकांसारखे व्हा” हे बायबलमधील शब्द उचितच आहेत. (इफिसकर ५:१५, ईजी टू रीड व्हर्शन) आपण कसे कपडे घालतो, कसे बोलतो आणि कोणासोबत मैत्री ठेवतो या सर्व बाबतीत “सावध” राहिलो तर आपण छेडाछेडी टाळू शकतो.
ख्रिस्ती तरुणांसाठी एक सर्वात सोपा मार्ग म्हणजे इतरांना आपल्या धार्मिक मताविषयी सांगणे. टीमोन हा एक यहोवाचा साक्षीदार आहे; तो म्हणतो: “मी साक्षीदार आहे हे सगळ्या मुलांना ठाऊक होतं. म्हणून कोणी माझी छेड काढत नव्हतं.” ॲन्ड्रिया म्हणते: “आपण साक्षीदार आहोत हे इतरांना सांगितलं तर फार मोठा फरक पडतो. त्यांना लगेच लक्षात येतं की तुम्ही त्यांच्यापासून वेगळे आहात आणि तुम्ही चालचलनाच्या बाबतीत कधीच हातमिळवणी करत नाही.”—मत्तय ५:१५, १६.
तुमची छेड काढलीच तर. . .
आपण कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा असभ्य आणि थिल्लर लोकांपासून आपण पूर्णपणे आपले संरक्षण करू शकत नाही. पण तुम्ही खऱ्या ख्रिश्चनांसारखे वर्तन राखूनही कोणी तुमची वारंवार छेड काढत असेल तर स्वतःला दोष देत राहू नका. (१ पेत्र ३:१६, १७) तुम्हाला जर खूप मानसिक त्रास होत असेल तर आपल्या पालकांशी बोला किंवा ख्रिस्ती मंडळीतील प्रौढ जणांशी बोला. रोझलिन कबूल करते की, कोणी आपल्याला छेडत असते तेव्हा सहसा आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो. ती म्हणते, “आपली कोणी मैत्रीण असली किंवा आपण कोणाजवळ मन मोकळं करू शकत असलो, तर बरं वाटतं.” हेसुद्धा लक्षात असू द्या की, ‘जे कोणी यहोवाचा धावा करतात त्या सर्वांना तो जवळ आहे.’—स्तोत्र १४५:१८, १९.
अत्याचाराचा विरोध करणे सोपे नाही पण असे करण्यातच आपली भलाई आहे. बायबलमध्ये शुनेमच्या एका तरुण स्त्रीचा वृतान्त दिला आहे; तो आपण पाहू या. आजकाल छेडले जाते त्याप्रमाणे तिला छेडले गेले नव्हते; पण यहुदाचा श्रीमंत आणि शक्तिशाली राजा शलमोन याने तिला गळ घालण्याचा पुष्कळदा प्रयत्न केला होता. तिचे प्रेम मात्र दुसऱ्या एका व्यक्तीवर असल्यामुळे तिने शलमोनाला नकार दिला. म्हणूनच ती स्वतःबद्दल अभिमानाने असे म्हणू शकली की, “मी तटासारखी होते.”—गीतरत्न ८:४, १०.
तुम्हीसुद्धा अशाप्रकारचा ठामपणा आणि दृढनिश्चय दाखवा. तुम्हाला नको असताना कोणी तुमच्या मागे लागले असेल तर ‘तटासारखे’ दृढ राहा. तुमचे ख्रिस्ती मत काय आहे ते सर्वांना कळू द्या. असे केल्याने, तुम्ही “निर्दोष व शुद्ध” राहू शकता आणि देवाला आनंदी केल्याची खात्री तुम्हाला मिळू शकेल.—फिलिप्पैकर २:१५, ईजी टू रीड व्हर्शन. *
[तळटीप]
^ मे २२, १९९६; ऑगस्ट २२, १९९५; आणि मे २२, १९९१ या सावध राहा! (इंग्रजी) अंकांमध्ये लैंगिक अत्याचार या विषयावर आणखी माहिती दिली आहे.
[२६ पानांवरील चित्र]
आपल्या ख्रिस्ती विश्वासांविषयी सर्वांना सांगितल्याने तुम्हाला संरक्षण मिळू शकेल
[२६ पानांवरील चित्र]
चुकीच्या लोकांबरोबर संगत न ठेवल्याने तुम्ही छेडाछेडी टाळू शकता