व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

साज-शृंगार—करण्यात मर्यादेची आवश्‍यकता

साज-शृंगार—करण्यात मर्यादेची आवश्‍यकता

बायबलचा दृष्टिकोन

साज-शृंगार—करण्यात मर्यादेची आवश्‍यकता

एका फ्रेंच महिला कादंबरीकाराने म्हटले, “स्वतःच्या सौंदर्याची घमंड बाळगणे म्हणजे जणू विचारशक्‍तीचा गळा दाबण्यासारखे आहे.” कित्येक शतकांपासून मानवाने आपल्या सौंदर्याखातर अशा काही प्रकारांचा वापर केला जे अर्थहीन तर असतातच, पण जीवावर बेतणारे देखील ठरू शकतात. उदाहरणार्थ, १९ व्या शतकातील स्त्रिया कंबर अगदी लहान ठेवण्यासाठी पोटावर एक प्रकारचे घट्ट अंतर्वस्त्र घालायचे; ते बांधून इतके घट्ट केले जायचे की त्यांना श्‍वास घेता यायचा नाही. काहींची कंबर तर १३ इंच इतकी लहान होती असे म्हणतात. आणि काही स्त्रियांची ही वस्त्रे इतकी घट्ट होती की त्यांच्या बरगड्या यकृतात घुसून त्या मरण पावल्या.

सुदैवाने, आज ती फॅशन राहिलेली नाही. पण, स्वरूपावर जास्त जोर देण्याच्या मनोवृत्तीत मात्र काहीच फरक झालेला नाही. आजही, आपले नैसर्गिक स्वरूप बदलण्यासाठी काही स्त्री-पुरुष त्रासदायक आणि घातक प्रयोग करतात. जसे की, अमेरिकेत एकेकाळी गुंड किंवा मवाली लोकच अंगावर गोंदून किंवा टोचून घ्यायचे. पण आता गोंदणारी किंवा अंग टोचून देणारी दुकाने बाजारात आणि गावांमध्ये सर्रास आढळतात. अलीकडे, अमेरिकेत तर गोंदण करून देणारी दुकाने फुटकळ व्यापारांमध्ये सहाव्या क्रमांकावर होती.

आजकाल, विशेषतः तरुण लोकांमध्ये चित्र-विचित्र प्रकारचा साज-शृंगार लोकप्रिय होऊ लागला आहे. अंगावर जिकडे तिकडे (स्तन, नाक, जीभ आणि जननेंद्रियांवरही) टोचून घेण्याची प्रथा रूढ होत आहे. काहींना तर आताच याचा देखील कंटाळा येऊ लागला आहे. म्हणून हे लोक, डाग देणे, चिरफाड * करणे आणि अंग कोरण्याचे (ज्यामध्ये लोकांचे ध्यान आकर्षित करण्याकरता त्वचेत काही वस्तू घुसवून मोठमोठे छेद आणि उंचवटे केले जातात) अधिकाधिक भयंकर प्रकार शोधून काढत आहेत.

प्राचीन प्रथा

खरे पाहिले तर, साज-शृंगार करणे किंवा शरीरात काही बदल करणे ही प्रथा काही नवीन नाही. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये, विशिष्ट कुटुंबांना किंवा जमातींना ओळखण्यासाठी विधीनुसार अंगावर कापण्याची आणि गोंदण्याची प्रथा शतकानुशतकांपासून आचरली जात आहे. पण यांतल्या अनेक देशांमध्ये आज या प्रथांबद्दल लोकांचे चांगले मत राहिलेले नाही आणि म्हणून त्या प्रथा हळूहळू नाहीशा होत आहेत.

गोंदणे, अंग टोचणे आणि कापण्याची प्रथा बायबल काळातील खासकरून मूर्तिपूजक लोकांची धार्मिक प्रथा होती. म्हणूनच, यहोवाने यहुद्यांना त्या लोकांप्रमाणे न करण्याची आज्ञा दिली. (लेवीय १९:२८) देवाची “पवित्र प्रजा” या नात्याने यहुद्यांना खोट्या धार्मिक प्रथांपासून संरक्षण मिळाले.—अनुवाद १४:२.

ख्रिस्ती स्वातंत्र्य

मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करण्याकरता जरी ख्रिस्तीजन बांधील नाहीत तरी त्यातील काही तत्त्वे ख्रिस्ती मंडळीने घेतली होती. (कलस्सैकर २:१४) म्हणून, उचित साज-शृंगार किंवा स्टाईल करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. (गलतीकर ५:१; १ तीमथ्य २:९, १०) परंतु या स्वातंत्र्याला मर्यादा आहेत.—१ पेत्र २:१६.

पौलाने १ करिंथकर ६:१२ येथे लिहिले: “सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही.” पौलाने हे जाणले होते की, ख्रिस्ती या नात्याने त्याला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे इतरांचा विचार न करता मन मानेल तसे वागण्याची त्याला मोकळीक नव्हती. तर तो जे काही करत होता ते इतरांबद्दल त्याला प्रेम असल्यामुळे करत होता. (गलतीकर ५:१३) त्याने असे आर्जवले की, “तुम्ही कोणीहि आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्‍याचेहि पाहा.” (फिलिप्पैकर २:४) त्याची ही निःस्वार्थ मनोवृत्ती, कोणत्याही प्रकारचा साज-शृंगार करणाऱ्‍या ख्रिश्‍चनापुढे एक उत्तम आदर्श आहे.

विचारात घेण्याजोगी बायबलची तत्त्वे

ख्रिश्‍चनांना देण्यात आलेली एक सर्वात महत्त्वाची आज्ञा म्हणजे लोकांना सुवार्ता सांगणे आणि शिकवणे. (मत्तय २८:१९, २०; फिलिप्पैकर २:१५) तेव्हा, आपल्या पेहरावामुळे किंवा साज-शृंगारामुळे लोकांचे लक्ष देवराज्याच्या संदेशापासून बहकू नये म्हणून ख्रिश्‍चनाने खबरदारी घ्यावी.—२ करिंथकर ४:२.

गोंदण्याची किंवा अंग टोचण्याची प्रथा काही लोकांमध्ये रूढ असली तरी एखाद्या ख्रिश्‍चनाने स्वतःला असे विचारले पाहिजे की, ‘माझ्या या वेगळ्या प्रकारच्या शृंगारामुळे माझ्या परिसरातील लोकांना काय वाटेल? त्यांना ते विचित्र वाटेल का? लोक मला तऱ्‍हेवाईक समजतील का? गोंदणे किंवा अंग टोचणे माझ्या विवेकाला पटत असले तरी मंडळीतल्या इतरांवर त्याचा काय परिणाम होईल? हा “जगाचा आत्मा” आहे असे त्यांना वाटेल का? माझ्या ‘सुबुद्धीबद्दल’ त्यांना कदाचित शंका वाटू लागेल काय?—१ करिंथकर २:१२; १०:२९-३२; तीत २:१२, पं.र.भा.

साज-शृंगाराच्या काही पद्धती घातक असतात. दूषित सुयांनी गोंदल्याने हेपाटायटीस आणि एचआयव्हीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो असे म्हटले जाते. काही वेळा गोंदण्यासाठी वापरलेल्या रंगांमुळे त्वचा रोग होतात. तसेच, अंगावर टोचून घेतल्याची जखम बरी व्हायला कधी कधी महिने लागतात आणि पुष्कळ दिवस वेदना होत राहतात. त्यांच्यामुळे रक्‍त दूषित होणे, रक्‍तस्राव, रक्‍ताच्या गुठळ्या, नसांना इजा आणि गंभीर प्रकारचे संसर्ग होऊ शकतात. शिवाय, साज-शृंगाराचे हे प्रकार जवळजवळ कायमचेच असतात. उदाहरणार्थ, कोणाला गोंदण मिटवायचे असेल तर फार खर्चीक आणि त्रासदायक उपचार करावा लागतो; आणि हा उपचार गोंदणाच्या आकारावर आणि रंगावर अवलंबून असतो. अंग टोचल्याने तर कायमचा व्रण राहून जातो.

हे धोके स्वीकारायचे की नाही हा प्रत्येकाचा व्यक्‍तिगत निर्णय आहे. परंतु, देवाला संतुष्ट करू पाहणारी व्यक्‍ती हे जाणून घेईल की, ख्रिस्ती होण्यासाठी देवाला स्वतःचे पूर्णपणे अर्पण करावे लागते. आपली शरीरे देवाला केलेले जिवंत यज्ञ आहेत; ती त्याची आहेत. (रोमकर १२:१) म्हणून, आपली शरीरे आपलीच मालमत्ता आहे आणि त्याला वाटेल ते करू शकतो असा विचार प्रौढ ख्रिस्ती करत नाहीत. विशेषतः, मंडळीमध्ये पुढाकार घ्यायच्या योग्यतेचे असलेले बांधव नेमस्त, स्वस्थचित्त व सौम्य असतात.—१ तीमथ्य ३:२, ३.

बायबलच्या शिक्षणाद्वारे प्राप्त झालेली विचारशक्‍ती विकसित करून आणि तिचा उपयोग करून ख्रिश्‍चनांना आत्मपीडनासारख्या जगाच्या विकृत प्रथा टाळण्यास मदत मिळेल. कारण या गोष्टी ‘देवाच्या जीवनाला पारख्या झाल्या’ आहेत. (इफिसकर ४:१८) अशाप्रकारे ते आपला विनय सर्व लोकांना कळू देतील.—फिलिप्पैकर ४:५, पं.र.भा.

[तळटीप]

^ वैद्यकीय कारणांसाठी किंवा कुरूपपणा घालवण्यासाठी चिरफाड करणे वेगळे आहे आणि तरुण लोक विशेषकरून किशोरवयीन मुली करतात ती हानीकारक चिरफाड किंवा कापाकापी ही वेगळी आहे. हानीकारक चिरफाड किंवा कापाकापी सहसा गंभीर भावनिक तणावाचे किंवा अत्याचाराचे लक्षण असते. यासाठी तज्ज्ञांकडून मदत घेण्याची आवश्‍यकता भासेल.