व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कॉपर कॅन्यनला तुमचे स्वागत!

कॉपर कॅन्यनला तुमचे स्वागत!

कॉपर कॅन्यनला तुमचे स्वागत!

मेक्सिकोमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

कॉपर कॅन्यन म्हणजे मेक्सिकोच्या उत्तरेकडे असलेल्या सिएरा माद्रे ऑक्सिडेंटाल या पर्वतरांगांतील एक अद्‌भुत नैसर्गिक आविष्कार. ही कॅन्यन (निदरी) ५०,००० चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेली आहे, म्हणजेच कोस्टा रिका या देशाइतके हिचे क्षेत्र आहे.

पण कॉपर कॅन्यन या नावावरून वाटते त्याप्रमाणे ही केवळ एकच खोल दरी नसून २० दऱ्‍यांचे जाळे आहे. यांपैकी एक कॉपर कॅन्यन असून या संपूर्ण जाळ्यालाच हे नाव पडले आहे. रिचर्ड फिशर या शोधकाच्या मते या कॅन्यन्सपैकी निदान तीन तरी अमेरिकेतील ग्रँड कॅन्यनपेक्षा खोल आहेत. *

कॉपर कॅन्यन खूप विशाल आहे. त्यामुळे पर्यटक केवळ काही सोयीच्या ठिकाणी असलेल्या पाँईट्‌सवरच जाऊ शकतात. सर्वात नेत्रदीपक देखावे कॉपर, सिन्फोरोसा आणि युरीक कॅन्यन्सचे आहेत. पण, काहींच्या मते दिविसादेरो या पाँईटवरून सर्वात विलक्षण देखावा दिसतो. येथून कॉपर, युरीक व तारारेकुआ या तिन्ही कॅन्यन्स जुळलेल्या दिसतात.

निरनिराळ्या प्रकारचे हवामान

कॉपर कॅन्यन इतकी खोल असल्यामुळे वेगवेगळ्या उंचीवर अचानक वेगळे हवामान व वनस्पतीजीवन आढळते. मीगल ग्लीसन व त्याच्या सोबत काही जणांनी युरीक कॅन्यनवरून खाली येत असताना हे प्रत्यक्ष अनुभवले. मेहिको दसकोनोसेदो या मासिकात त्याने असे लिहिले: “आम्हाला उष्णता जाणवू लागली. पाहता पाहता शंक्वाकार वृक्षांची अरण्ये गायब झाली आणि केळी, अव्होकॅडो, संत्री इत्यादीची झाडे दिसू लागली. आम्हाला विश्‍वासच बसेना. इतक्या कमी वेळात आणि अंतरात थंड प्रदेशातील अरण्यांतून थेट उष्ण प्रदेशांत जाता येते हे मी जीवनात पहिल्यांदाच अनुभवत होतो.”

कॅन्यन्सच्या उंच पठारांवरील जंगलात १५ जातींची शंक्वाकार वृक्षे आणि २५ जातींची ओक वृक्षे आढळतात. कॉपर कॅन्यनमध्ये पॉप्लर व ज्युनिपर वृक्षे देखील आहेत. उन्हाळ्यात सबंध पर्वतरांगा निरनिराळ्या प्रकारच्या फुलांनी आच्छादलेल्या असतात. यांपैकी काही फुले येथील मूळ ताराहुमारा रहिवाशी खाद्य व औषधे म्हणून वापरतात. समुद्र पातळीपासून १,८०० मीटरच्या उंचीवर पर्वतांवरील हवामान वर्षातील अधिकांश महिने समशीतोष्ण ते थंड असे बदलत असते. हिवाळ्यात माफक प्रमाणात पाऊस आणि अधूनमधून बर्फवृष्टीही होते.

दरीतून खाली उतरताना निरनिराळ्या जातींची वृक्षे आणि काटेरी वनस्पती (कॅक्टस) दिसू लागतात. आणखी खाली गेल्यानंतर समशीतोष्ण हवामान आढळते. येथे हिवाळ्यात तापमान सरासरी १७ डिग्री सेल्सियस असते त्यामुळे वातावरण सुखावह असते. पण उन्हाळ्यात मात्र अतिशय उष्ण होते. तापमान ३५-४५ डिग्री सेल्सियसपर्यंत वाढते; पाऊसही भरपूर पडतो, त्यामुळे नद्या अगदी ओथंबून वाहत असतात.

या परिसराच्या सौंदर्यात भर घालतात ते येथे असलेले दोन विशालकाय धबधबे. पिएद्रा व्होलादा हा जगातल्या सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. येथे पाणी ४५३ मीटरहून खाली कोसळते तर बासासीची धबधब्याचे पाणी २४६ मीटर उंचावरून पडते.

वन्यप्राण्यांना निवारा

कॉपर कॅन्यन या दरीत निरनिराळ्या प्रकारच्या प्राण्यांना व पक्ष्यांना निवारा मिळतो. मेक्सिकोमध्ये असलेल्या एकूण सस्तन प्राण्यांपैकी ३० टक्के प्राणी या परिसरात राहतात असे म्हटले जाते. काळे अस्वल, प्यूमा, ऑटर, स्प्रॉकेट हरिण, मेक्सिकन लांडगा, रानडुक्कर, बॉबकॅट, रकून, बॅजर, स्ट्राईप्ड स्कंक तसेच वटवाघूळ, खार व रानससे हे त्यांपैकी काही प्राणी आहेत.

कॉपर कॅन्यन जवळजवळ ४०० जातींच्या पक्ष्यांचे वसतीस्थान आहे. यात सोनेरी गरूड आणि पेरेग्रीन फॅल्कनचा देखील समावेश आहे. कॉपर कॅन्यन उत्तर व मध्य अमेरिकेच्या मधोमध मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे स्थलांतर करणारे पक्षी हिवाळा घालवण्यासाठी येथे येतात. इतर पक्षी फक्‍त काही काळ मुक्काम करून पुढे जातात.

कॉपर कॅन्यन निसर्गातील सर्व अद्‌भुत गोष्टींचा रचनाकार यहोवा देव याची महानता सिद्ध करते. राजा दाविदाने एकदा म्हटल्याप्रमाणे: “हे परमेश्‍वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच; आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच.”—१ इतिहास २९:११.

(g०० ११/८)

[तळटीप]

^ युरीक कॅन्यन हे १,८७९ मीटर, सिन्फोरोसा कॅन्यन १,८३० मीटर तर बॅटोपायलस कॅन्यन १,८०० मीटर खोल आहे. ग्रॅन्ड कॅन्यन १,६१५ मीटर खोल आहे.

[१८ पानांवरील चौकट/चित्र]

ट्रेनमधून दिसणारे दृश्‍य

चिवावा-पॅसिफिक रेल्वे ९४१ किलोमीटर म्हणजे अमेरिका-मेक्सिको सीमेवरील ओजिनागापासून प्रशांत महासागरातील टोपोलाबॉम्पो इथपर्यंत आहे. हा रेलमार्ग कॉपर कॅन्यनमधून जातो. येथील असामान्य भूप्रदेशामुळे या लोहमार्गाचे बांधकाम अत्यंत उल्लेखनीय मानले जाते. हे सबंध अंतर पार करताना ही ट्रेन जवळजवळ ३७ मोठे पूल पार करते. यांपैकी सर्वात लांब पूल फ्वेर्ते नदीवर असून तो ५०० मीटर लांबीचा आहे. सर्वात उंच पूल चिनिपास नदीवर ९० मीटर उंचीवर बांधलेला आहे.

प्रवासादरम्यान एकूण ९९ बोगदे लागतात. सर्वात लांब बोगद्याचे नाव एल दिस्केन्सो असून त्याची लांबी १,८१० मीटर आहे. ट्रेनमधून कॉपर कॅन्यनचे अतिशय विलोभनीय दृश्‍य पाहायला मिळते.

[१५ पानांवरील नकाशे]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

अमेरिकेची संयुक्‍त संस्थाने

मेक्सिको

चिवावा

ओजिनागा

चिवावा

कॉपर कॅन्यन परिसर

ला जुन्ता

क्रील

दिविसादेरो

टोपोलोबॉम्पो

[१५ पानांवरील चित्र]

बासासीची धबधबा

[चित्राचे श्रेय]

© टॉम टिल

[१६, १७ पानांवरील चित्र]

दिविसादेरो येथून दिसणारा देखावा

[चित्राचे श्रेय]

© टॉम टिल

[१७ पानांवरील चित्र]

सबंध कॅन्यनमध्ये ताराहुमारा जमातीचे लोक राहतात

[चित्राचे श्रेय]

George Hunter/ H. Armstrong Roberts

[१७ पानांवरील चित्र]

आरारेको सरोवर

[१५ पानांवरील चित्राचे श्रेय]

George Hunter/H. Armstrong Roberts