व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चीनी औषधालयाला एक भेट

चीनी औषधालयाला एक भेट

चीनी औषधालयाला एक भेट

ग्वौझी बऱ्‍याच दिवसांपासून आजारी आहे. म्हणून तो डॉक्टरांकडे जायचे ठरवतो. तो चीनी असल्यामुळे त्याला पारंपरिक चीनी औषधांच्या डॉक्टरकडेच जायला आवडते. त्याच्या एका मित्राला जवळच असलेला एक चीनी डॉक्टर ठाऊक आहे. या डॉक्टरांचे वनौषधींचे एक दुकान आहे. ग्वौ झीचा मित्र त्याला सांगतो, ‘ते डॉक्टर तुला औषधी वनस्पतींचा काढा करून देतील आणि त्याने तू लगेच बरा होशील.’

चीनमध्ये, डॉक्टरांकडे जाणे एक वेगळाच अनुभव आहे. पाश्‍चात्त्य देशांमधील डॉक्टरांच्या दवाखान्यात जाण्यासारखे ते नाही. आग्नेय आशियाच्या अनेक भागांमध्ये असेच डॉक्टर दिसून येतात. पाश्‍चात्त्य देशांमध्ये डॉक्टरांकडे जाणे म्हणजे, आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते, मग दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी लागते आणि मग औषधाची यादी दिली जाते. त्यानंतर, रुग्णाला औषधालयात जाऊन औषधाची यादी दाखवून औषध घ्यावे लागते. पण चीनी डॉक्टरांकडे जाण्यासाठी इतकी कटकट करावी लागत नाही. फक्‍त एका औषधी वनस्पतीच्या दुकानात गेले की पुरे. तिथला दुकानदारच चीनी औषधांचा वैद्य असतो. तो तुमची तपासणी करतो, काय झाले ते सांगतो, औषध देतो आणि कसे घ्यायचे ते सांगतो. सगळे काही एकाच ठिकाणी केले जाते. *

औषधी वनस्पती?

पाश्‍चात्त्य देशांतील पुष्कळशा लोकांना गोळ्या, कॅप्सूल आणि इंजेक्शन घ्यायची सवय असते. पण ही औषधे अगदी अलीकडे तयार करण्यात आली आहेत. हजारो वर्षांपासून औषधोपचारात नैसर्गिक उपाय वापरले जात. उदाहरणार्थ, बायबलच्या काळात इब्री वैद्य तेल, मलम आणि द्राक्षारसांचा उपयोग करत होते. (यशया १:६; यिर्मया ४६:११; लूक १०:३४) बहुतेकदा, वाळलेल्या अंजिरांपासून तयार केलेला लेप गळवांसाठी वापरला जात होता.—२ राजे २०:७.

प्रत्येक राष्ट्राने किंवा जातीच्या लोकांनी कधी न कधी औषधोपचारासाठी जडीबुटींचा आणि नैसर्गिक पदार्थांचा उपयोग केला आहे. आजकाल स्वयंपाकात वापरले जाणारे मसाले देखील त्या वेळी औषधे म्हणून वापरली जात होती. या पद्धती नेहमीच गुणकारी ठरल्या अशातला भाग नाही. उलट, पुष्कळ वेळा त्यांचा संबंध अंधविश्‍वास आणि अज्ञानता यांच्याशी होता. परंतु, वर्षानुवर्षांपासून औषधोपचाराच्या या पद्धती रूढ आहेत. हल्लीची काही सर्वसामान्य औषधेही वनस्पतींनी तयार केली जातात.

चीनी औषधशास्त्र आणि उपयोग

वनौषधींनी औषधोपचार करण्याची पद्धत चीनी इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. परंपरेनुसार असे म्हटले जाते की, ह्वांग डि (पीत सम्राट) या चीनी सम्राटाने ने जिंग हा वैद्यकीय ग्रंथ लिहिला. चीनमधील वैद्य अजूनही त्या ग्रंथाचा उपयोग करतात. * या ग्रंथामध्ये (ज्याच्या लिखाणाची तारीख अजूनही वादग्रस्त आहे), त्या बहुतेक विषयांची चर्चा केली आहे जे पाश्‍चात्त्य वैद्यकीय पुस्तकात सापडतात. त्यामध्ये फक्‍त रोगांचे निदान, लक्षणे, कारणे, उपचार आणि प्रतिबंध एवढेच नव्हे तर शरीरशास्त्र आणि शरीराची विविध कार्ये यांचाही समावेश आहे.

चीनी औषधशास्त्र आणि उपयोग यांवर यीन-यांग सिद्धान्ताचा बराच प्रभाव पडला आहे; आग्नेय आशियातील अनेक शास्त्रांवरही याचा प्रभाव झालेला आहे. यीन थंड गुणधर्माचे तर यांग उष्ण गुणधर्माचे सूचक आहे. त्याचप्रमाणे, यीन-यांग सिद्धान्त इतरही अनेक विरोधात्मक गुणधर्मांचे सूचक आहे. * तसेच रोगांचे निदान आणि उपचार करताना ॲक्युपंक्चरशी संबंधित असलेल्या शरीरावरील बिंदूंकडेही लक्ष दिले जाते. रुग्णामधील यीन-यांग असंतुलनाचा प्रतिरोध करण्यासाठी थंड किंवा उष्ण समजल्या जाणाऱ्‍या जडीबुटी किंवा अन्‍नपदार्थ दिले जातात.

उदाहरणार्थ, ताप असलेल्या रुग्णाला उष्ण मानले जाते आणि त्याला थंडावा देणाऱ्‍या वनौषधी दिल्या जातात. आजकाल यीन-यांग या शब्दांचा उच्चार केला जात नसला तरी याच तत्त्वाच्या आधारे उपचार केला जातो. पण चीनी डॉक्टराला रोगाचे निदान कसे कळते? आणि वनौषधींचे दुकान नेमके कसे असते? ते पाहण्यासाठी आपण ग्वौ झीच्या मित्राने सांगितलेल्या दुकानात त्याच्यासोबत जाऊ या.

असामान्य वनौषधींचे दुकान

आज मात्र ग्वौ झीला थोडा वेळ थांबावे लागेल. फ्लू किंवा थंडीतापाची साथ असल्यामुळे त्याच्याआधी दोन रुग्ण आहेत. तोपर्यंत दुकानात काय काय आहे ते पाहू या.

दुकानाच्या आत पाऊल ठेवताच समोर वाळलेले मशरूम, शिंपले, गोगलगाई, अंजिर, कवच-फले आणि इतर खाद्य पदार्थांच्या शिगेने भरलेल्या टोपल्या आमच्या नजरेस पडल्या. येथे खाद्य पदार्थसुद्धा ठेवले जातात. यांतले काही पदार्थ औषध म्हणून वापरले जातात.

त्या अरुंद दुकानाच्या दोन्ही बाजूला काचेची कपाटे होती. त्याच्या कप्प्यांमध्ये दुर्मिळ किंवा खास वनौषधी, खनिज आणि प्राण्यांचे वाळवलेले अवयव ठेवलेले होते. हे सगळे फार महाग असते. निरखून पाहिल्यावर आम्हाला हरणाची शिंगे, मोती तसेच वाळवलेल्या पाली, समुद्रघोडे आणि इतरही असामान्य गोष्टी दिसल्या. काही वर्षांपूर्वी, गेंड्याचे शिंग, अस्वलांचे पित्ताशय आणि प्राण्यांचे असेच काही अवयव या कप्प्यांमध्ये पाहायला मिळत होते. परंतु आता त्यांच्यावर बंदी आहे.

दुकानाच्या आणखी एका कोपऱ्‍यात सर्दी, पोट खराब होणे यांसारख्या क्षुल्लक व्याधींसाठी मिश्र वनौषधींची पाकीटे तसेच चीनी वनौषधी बाटल्यांचा साठा दिसत होता. तुम्हाला काय होत आहे ते फक्‍त दुकानदाराच्या साहाय्यकाला किंवा क्लार्कला सांगितल्यावर तो तुम्हाला एखादी बाटली किंवा मिश्र वनौषधींचे पाकीट देईल आणि ते कसे घ्यायचे ते सांगेल.

दुकानदाराचा साहाय्यक जेथे बसला होता त्या मागच्या संपूर्ण भिंतीवरील कपाटात उंच काचेच्या बरण्या ओळीने ठेवल्या होत्या. त्यांच्यामध्ये वाळलेली मुळे, पाने आणि कांड्या ठेवल्या होत्या. नेहमीच्या गिऱ्‍हाईकांना या जडीबुटी चांगल्या ठाऊक असतात. त्यांच्यापासून ते स्वतः औषध तयार करतात किंवा त्यांचा स्वयंपाकात वापर करतात. दुकानाच्या दुसऱ्‍या बाजूला वरपासून खालपर्यंत लहान लहान कप्प्यांचे एक मोठे कपाट आहे. त्याला बायजिगुई अर्थात “शंभर मुलांचे कपाट” म्हणतात. कारण अशा कपाटांमध्ये सहसा शंभर किंवा त्याहून जास्त कप्पे असतात. या कप्प्यांमधून औषधे पटकन काढून देता येतात. सर्वात जास्त लागणारी औषधे सुलभ ठिकाणी ठेवली जातात. सहसा या कप्प्यांना नावे देखील दिलेली नसतात. कारण दुकानदाराच्या साहाय्यकांना अनुभवानिशी कोणत्या कप्प्यात काय ठेवले आहे हे अगदी तोंडपाठ असते.

तो कसा पटापट वनौषधी तोलून त्या बाईला देतोय ते पाहा. त्याच्या हातात एक नाजूक पण अचूक मोजमाप दाखवणारा आशियाई काटा आहे. काट्याच्या एका बाजूला तीन धाग्यांवर लटकणारी एक ताटली आहे आणि दुसऱ्‍या बाजूला एक हलते वजन आहे. काही औषधांचे प्रमाण जास्त झाल्यास ती घातक ठरू शकतात हे त्याला ठाऊक असल्यामुळे तो सर्वकाही काळजीपूर्वक तोलून देतो. पण सगळीच औषधे तोलून दिली जात नाहीत. वेगवेगळ्या कप्प्यांमधून तो अर्ध्या हातात मावेल इतकी औषधे काढतो आणि ती सगळी एका पुड्यात बांधतो. होय, त्यासोबत त्याने सिकाडा किड्यांचे कवच देखील दिले आहेत. पुडी बांधताना तो त्या स्त्रीला याचे औषध कसे बनवायचे ते समजावून सांगतो.

जडीबुटींची औषधे वेगवेगळ्या पद्धतींनी तयार केली जातात. आणि ही औषधे घेण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. काहींची पूड करून ती गरम पाण्यातून घेतली जाते. काहींना पातळ वाटून, मधात मिसळून किंवा काही विशिष्ट प्रकारच्या अल्कोहोलच्या मिश्रणात घेतले जाते. परंतु, या स्त्रीला त्याचा काढा करायला सांगितले आहे. ही सर्वात सामान्य पद्धत आहे. त्यासाठी तिला मातीच्या भांड्यात एका तासापर्यंत या सर्व जडीबुटी उकळाव्या लागतील. मग थोड्या थोड्या वेळाने तिला तो काढा प्यावा लागेल. तिचे औषध संपल्यावर तिला फक्‍त दुकानात जाऊन आणखीन औषध आणावे लागेल.

शेवटी, ग्वौ झीचा नंबर येतो. डॉक्टर त्याचे ब्लड प्रेशर पाहत नाहीत की हृदयाचे ठोके ऐकत नाहीत. पण ते ग्वौ झीला काय होतेय ते विचारतात. चांगली झोप लागते का? अन्‍नाचे पचन होते का, भूक लागते का, पोट चांगले साफ होते का, ताप आहे का, त्वचा कशी दिसते, त्वचेचा रंग बदललाय का हे सगळे ते त्याला विचारतात. मग डॉक्टर त्याचे डोळे आणि जीभेचे काही भाग निरखून पाहतात. आता ते वेगवेगळ्या पद्धतींनी आणि विविध दबावांखाली त्याच्या दोन्ही हातांच्या नाड्या तपासतात. नाडीवरून विविध अवयवांची आणि शरीराच्या भागांची स्थिती कळते असे मानले जाते. एवढेच नव्हे तर, काही असामान्य वास येतात का हेसुद्धा डॉक्टर पाहतात! आणि मग ते ग्वौ झीला सांगतात की त्याला फ्लू झाला आहे. त्याला पूर्ण आराम घ्यायला, भरपूर पातळ पदार्थांचे सेवन करायला आणि दिलेल्या औषधांचा काढा करून प्यायला सांगतात. या कडवट काढ्याने त्याला आराम मिळेल. मग, काय पथ्य पाळावेत हे सांगून झाल्यावर डॉक्टर त्याला गोड पाकात मुरवलेले आलुबुखार देतात आणि औषध घेतल्यावर ते खायला सांगतात. औषधाचा कडवटपणा घालवण्यासाठी डॉक्टरांनी त्याला ते दिले आहे.

आपली औषधे घेऊन ग्वौ झी घरी जातो. डॉक्टरांची फी आणि औषधाचे पैसे मिळून त्याला फक्‍त २० डॉलर खर्च करावे लागले. स्वस्तात मस्त उपचार! या जडीबुटींनी काही चमत्कार घडत नाही पण दोन-चार दिवसांत आजार मात्र बरा झालाच पाहिजे. पण त्याने असा विचार करू नये की, जास्त औषध घेतल्यावर लवकर बरे होऊ; ही चूक पुष्कळजण करतात. काही विशिष्ट जडीबुटी जास्त प्रमाणात घेतल्याने गंभीर दुष्परिणाम झाल्याचेही ऐकायला मिळते.

काही देशांमध्ये, पारंपरिक चीनी औषधांसंबंधी किंवा ती औषधे देणाऱ्‍या डॉक्टरांसंबंधी काही विशिष्ट नियम नाहीत. यामुळे पुष्कळसे नकली डॉक्टर बनले आहेत. तसेच घातक ठरणारी मिश्रणेही औषधे म्हणून विकली जातात. म्हणूनच, पुष्कळ रुग्ण आपल्या नातेवाईकांच्या आणि जवळच्या मित्रांच्या ओळखीच्याच पारंपरिक चीनी डॉक्टरांकडे जातात.

अर्थात कोणताही औषधोपचार—मग तो जडीबुटींचा असो नाहीतर पाश्‍चात्त्य औषधांचा असो—सर्वच प्रकारच्या आजारांवर गुणकारी ठरत नाही. तरीही, चीनी औषधालय आणि पारंपरिक चीनी डॉक्टर मात्र आशियाचा अविभाज्य भाग आहेत.

(g०० ११/८)

[तळटीपा]

^ सावध राहा! नियतकालिक कोणताही विशिष्ट औषधोपचार घेण्याचा सल्ला देत नाही. प्रत्येक ख्रिश्‍चनाने, कोणताही औषधोपचार करताना तो बायबलच्या तत्त्वांच्या विरोधात नाही याची स्वतः खात्री करून घ्यावी.

^ पीत सम्राट हा काल्पनिक सम्राट असून त्याचे शासन जौ साम्राज्याच्या आधी सा.यु.पू. २६९७ ते २५९५ पर्यंत होते असे म्हटले जाते. परंतु, अनेक विद्वानांचे असे म्हणणे आहे की, ने जिंगचे लिखाण जौ साम्राज्याच्या (अंदाजे सा.यु.पू. ११०० ते २५०) शेवटापर्यंत पूर्ण झालेले नव्हते.

^ “यीन” या चीनी अक्षराचा प्रत्यक्ष अर्थ “सावली” किंवा “छाया” असा होतो आणि तो अंधकार, थंडपणा, स्त्रीत्व याचे सूचक आहे. “यांग” हा विरुद्धार्थी शब्द असून तो प्रकाश, उष्णता, पुरुषत्व याचे सूचक आहे.

[२३ पानांवरील चित्रे]

वाळलेले समुद्रघोडे, यांसारखे असामान्य प्रकार वनौषधींच्या दुकानात पाहायला मिळतात

[२४ पानांवरील चित्रे]

वाळलेली मुळे, पाने आणि कांड्या बारकाईने तोलून दिल्या जातात