व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

तणावग्रस्त विद्यार्थी

मुंबईच्या एशियन एज बातमीपत्रानुसार, भारतामध्ये वार्षिक परीक्षा जवळ आली की मुले तणावाने व्याकूळ होतात. परीक्षा अगदी तोंडावर आल्यावर मग शाळेमध्ये उजळणीला सुरवात करणे आणि चांगले मार्क मिळवण्याचा दबाव काहींना सहन होत नाही. त्यामुळे, परीक्षेच्या दरम्यान मनोरोग तज्ज्ञांकडे जाणाऱ्‍या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट होते. काही पालक, आपल्या मुलांनी चांगले मार्क मिळवावेत म्हणून मुलांचे मनोरंजनही पूर्णपणे बंद करून टाकतात. “पालक मुलांवर जास्त तणाव आणतात. तसेच विद्यार्थ्यांमध्येही जबरदस्त स्पर्धेची भावना असते,” असे मनोरोग तज्ज्ञ व्ही. के. मुंदडा म्हणतात. ते असेही म्हणतात की, पुष्कळ पालकांना “हे कळत नाही की, मुलांना थोडा विरंगुळा मिळाल्याने त्यांचे मन ताजे होते आणि अधिक चांगला अभ्यास करता येतो.” डॉ. हरिश शेट्टी म्हणतात की, परीक्षेचा तणाव आता “पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनाही जाणवू लागला आहे.”

(g०० ११/२२)

रानडुक्कर निघाले शहरात

जंगलांमधून सहसा बाहेर न निघणाऱ्‍या रानडुक्करांना आता कळाले आहे की, शहरांमध्ये अन्‍न मिळते आणि शिकाऱ्‍यांपासून संरक्षणही होते, असे डाय वोचे हे जर्मन साप्ताहिक म्हणते. एवढेच नव्हे तर रानडुक्करांनी बर्लिन शहरात पिलांना जन्म देखील दिला आहे. भुकेने व्याकूळ झालेले हे प्राणी फक्‍त झाडी असलेल्या भागांमध्ये किंवा सार्वजनिक बागांमध्येच जात नाहीत. तर लोकांच्या बागांमध्ये घुसून फुलझाडांचे कंद खाऊन पुष्कळ नासधूस करतात. ३५० किलोग्रॅम वजनाच्या या रानडुक्करांनी तर लोकांनाही घाबरून टाकले आहे; काही लोकांना झाडांवर किंवा टेलिफोन बुथमध्ये आश्रय घ्यावा लागला. त्यांच्यामुळे कित्येक वाहन अपघात देखील झाले आहेत. कामावरून घरी आल्यावर अनेकांना हे केसाळ प्राणी दिसले आहेत. एक इसम म्हणाला: “मी घरात कसा जाणार? माझ्या कारच्या आणि घराच्या मध्येच २० रानडुक्करे उभी होती.”

(g०० ११/२२)

नवीन जातींना तुमचे नाव

सायन्स पत्रिकेत म्हटले होते, “तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्‍तीला एखादे बक्षीस द्यायचे आहे. पण त्या व्यक्‍तीकडे सगळेकाही असल्यामुळे काय द्यावे याचा प्रश्‍न तुम्हाला पडला आहे का? मग चिंता करू नका. बायोडायव्हर्सिटी रिसर्चला देणगी दिल्यावर तुम्ही ऑर्किड, मच्छर किंवा सागरी स्लगच्या पूर्वी अज्ञात असलेल्या एखाद्या जातीला त्यांचे नाव देऊन विज्ञान साहित्यात त्याची कायम नोंद करू शकता.” तुम्ही स्वतःचेही नाव देऊ शकता! अलीकडील संशोधन दाखवते की, आज अस्तित्वात असलेल्या जातींमध्ये केवळ एक दशांश किंवा त्याहून कमी जातींचे वर्णन विज्ञान साहित्यात आढळते. संग्रहालयांच्या कपाटांमध्ये, गोळा करून ठेवलेल्या अशा हजारो जाती आहेत ज्या अजूनही निनावी आहेत. किंवा त्यांची नोंद विज्ञानाच्या पुस्तकात झालेली नाही. आता वेबसाईटवर जाऊन लोक नावरहित जातींची चित्रे पाहू शकतात. तेथेच, त्यांचे वर्णनही दिलेले असते जे प्रकाशनासाठी तयार असते. मग, २,८०० डॉलर किंवा त्याहून अधिक रक्कम देणगी देऊन स्वतःच्या निवडीच्या जातीला एखादे लॅटिन नाव देता येते. अशाप्रकारे, बायोपॅट ही संस्था वर्गीकरणविज्ञान आणि नवीन जातींचे संरक्षण करण्यासाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे.

(g०० ११/८)

किशोरवयीन विवाह

राष्ट्रीय कुटुंब आरोग्याच्या एका अलीकडील सर्वेक्षणानुसार भारतामध्ये, लग्न झालेल्या किशोरवयीनांपैकी ३६ टक्के १३ आणि १६ वर्षे वयोगटातील आहेत. मुंबईच्या एशियन एज बातमीपत्रानुसार, त्या अभ्यासात असेही निष्पन्‍न झाले आहे की, १७ आणि १९ वर्षांच्या ६४ टक्के मुलींना एकतर मूल झाले आहे किंवा त्या गरोदर तरी आहेत. त्या अहवालानुसार, १५ ते १९ वयोगटातील तरुण मातांना २० ते २४ वयोगटातील मातांपेक्षा गरोदरपणाशी संबंधित कारणांनी मृत्यू संभावण्याची दुप्पट शक्यता आहे. शिवाय, गेल्या दोन-चार वर्षांत, १५ ते २४ या वयोगटातील तरुणांना होणाऱ्‍या लैंगिकरित्या संक्रमित आजारांची संख्या दोन पटींनी वाढली आहे. लैंगिक गोष्टींबद्दलचे अज्ञान, समवयस्कांकडून तसेच प्रसार माध्यमांतून मिळणारी चुकीची माहिती या कारणांमुळे ही समस्या वाढत आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(g०० ११/२२)

एका रोगाच्या बदल्यात दुसरा रोग

“तीस वर्षांआधी पाचपैकी तीन ईजिप्शियन लोकांना बिल्हार्झिया हा रोग होता. तो रुग्णाला अगदी कमजोर करणारा रोग आहे जो पाण्यातल्या गोगलगाईंमध्ये असलेल्या परजीवींमुळे होत होता,” असे द इकोनॉमिस्ट म्हणते. अत्याधुनिक औषधांचा वापर करून बिल्हार्झियाविरुद्ध काढलेल्या मोहिमांमुळे धोका बराच टळला आहे. परंतु, असे दिसून येते की, सुरवातीच्या एखाद्या मोहिमेदरम्यान “लाखो लोक हेपटायटीस-सी या घातक विषाणूच्या संपर्कात आले असावेत; बिल्हार्झिया रोगाच्या बदली आता ही ईजिप्तची सर्वात मोठी समस्या बनली आहे.” हे यासाठी झाले कारण बिल्हार्झिया असलेल्या लोकांना दिली जाणारी इंजेक्शने “वारंवार वापरली गेली आणि क्वचितच त्यांना निर्जंतुक करण्यात आले होते. . . . रक्‍तात असलेल्या या हेपटायटीस-सी विषाणुंची (एचसीव्ही) १९८८ पर्यंत वैज्ञानिकांना कल्पना देखील नव्हती,” असे ती पत्रिका म्हणते. सर्वेक्षणांतून दिसून येते की, सध्या “जगातील सर्वात जास्त हेपटायटीस-सीचे रुग्ण” ईजिप्तमध्ये आहेत. असे म्हटले जाते की, सुमारे १ कोटी १० लाख लोकांना अर्थात ६ व्यक्‍तींमधील एकाला हा रोग झाला आहे. पुढे जाऊन ७० टक्के लोकांना यामुळे यकृताचा गंभीर आजार होतो आणि ५ टक्के लोकांमध्ये तो प्राणघातक ठरतो. सदर लेखानुसार, “आजपर्यंत डॉक्टरांमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात विषाणूंचा रोग पसरल्याची ही पहिलीच घटना आहे.” त्या लेखात पुढे म्हटले होते: “पण या सामुदायिक मोहिमा हाती घेतल्या नसत्या तर आणखी पुष्कळ लोक बिल्हार्झियामुळे दगावले असते एवढा एक दिलासा मात्र मिळतो.”

(g०० ११/२२)

बळी पडणारे बालक

“दररोज, . . . पाच वर्षांखालील ३०,५०० बालके सहज टाळता येण्यासारख्या कारणांमुळे मृत्यूमुखी पडतात.” असे संयुक्‍त राष्ट्रे बाल निधीने द स्टेट ऑफ द वल्ड्‌र्स चिल्ड्रन २००० या आपल्या अहवालात म्हटले. इंडियन एक्सप्रेस या बातमीपत्रात असे म्हटले आहे की, “गेल्या दशकात सशस्त्र झगड्यांमध्ये अंदाजे २० लाख बालकांचा मृत्यू झाला, ६० लाख बालक जखमी किंवा अपंग झाले आणि अजूनही लाखो बालक मानवी हक्कांच्या अत्याचाराला बळी पडत आहेत.” १.५ कोटी मुले निर्वासित आहेत आणि दहा लाखांहून अधिक मुले आपल्या पालकांपासून वेगळी किंवा अनाथ झाली आहेत. शिवाय, त्या वृत्तात आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या अभ्यासाचा उल्लेख केला आहे; त्या अभ्यासाद्वारे असे दिसून येते की, ५ आणि १४ वर्षांच्या वयोगटातील सुमारे २५ कोटी मुलांकडून जबरदस्तीने मजुरी करवून घेतली जाते; यांतली २० टक्के मुले अत्यंत हानीकारक परिस्थितींमध्ये काम करतात. सुमारे दहा लाख मुलांना जबरदस्तीने वेश्‍याव्यवसायात ढकलले जाते आणि दर महिन्याला २,५०,००० मुलांना एचआयव्ही विषाणूची लागण होते. तसेच, १३ कोटी मुलांनी शाळेचे तोंड पाहिलेले नाही. आणि यांत दोन-तृतीयांश मुली आहेत.

(g०० ११/८)

चीनचे चविष्ट वन्य प्राणी

डाऊन टू अर्थ पत्रिकेनुसार, चीनचे “बदलते राहणीमान आणि बदलत्या चवी” यांमुळे तेथील वन्य जीवन धोक्यात आले आहे. विशिष्ट प्रकारच्या वन्य प्राण्यांचे मांस इतर पदार्थांपेक्षा स्वास्थ्यकारी असते असा लोकांचा समज झाल्यामुळे वेगळ्या आणि असामान्य पदार्थांना जास्त मागणी आहे. सापांना सर्वात जास्त मागणी आहे. त्यातही, विषारी साप, बिन-विषारी सापांपेक्षा दुप्पट किंमतीत विकले जातात. रानडुक्कर, सिवेट मांजर, भेक, बेडूक, अजगर, पँगोलिन, टिबेटन अँटिलोप आणि काही दुर्मिळ पक्षी या सर्वांना खूप जास्त मागणी आहे आणि चीनच्या हॉटेलांमध्ये ती सर्रास मिळतात. यांतील कित्येक प्राणी निर्वंश होण्याच्या मार्गावर असल्यामुळे सरकाराकडून संरक्षण मिळण्याच्या यादीत त्यांचा समावेश आहे. इतके असूनही काही हॉटेलांमध्ये, बोर्ड लावून ग्राहकांना अशी खात्री दिली जाते की, तेथे मिळणारे वन्य प्राण्यांचे मांस बंदिवासातल्या किंवा खास पैदास केलेल्या प्राण्यांचे नसून खरोखर जंगली प्राण्यांचे आहे. चीनी लोकांच्या या नव्या शौकामुळे धोक्यात आलेल्या वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी चीनच्या सरकारने एक मोहीम हाती घेतली आहे आणि त्यांचे घोषवाक्य आहे, “वन्यप्राणी वर्ज्य करा.”

(g०० ११/८)

धूम्रपान करणारे असो अगर नसो, प्रदूषण अटळ

मुंबईमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडमेंटल रिसर्चच्या एका वृत्तानुसार, भारतात धूम्रपान करणाऱ्‍या बहुतेक मुलांना फार लवकर ही सवय लागते. पालकांची देखरेख नसलेली रस्त्यावरील मुले आठ वर्षांची असताना धूम्रपान करू लागतात तर ज्यांना पालक आहेत ती शाळेला जाणारी मुले सर्वसाधारणपणे ११ वर्षांची असताना धूम्रपान करू लागतात. परंतु, मुंबईत घेतलेल्या एका सर्वेक्षणानुसार ज्या मुलांवर पालकांची देखरेख आहे आणि ज्यांनी कधीही धूम्रपान केलेले नाही तेसुद्धा प्रदूषणाच्या दुष्परिणामांपासून सुटलेले नाहीत. त्यांच्या शरीरात जाणारी दूषके दररोज दोन सिगारेटीची पाकीटे ओढण्याइतकी आहेत. द एशियन एज या बातमीपत्रानुसार, मुंबई आणि दिल्ली ही शहरे जगातील सर्वात जास्त प्रदूषण असलेल्या पाच शहरांपैकी आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर दररोज सुमारे ९,००,००० वाहने चालतात. शिवाय, दररोज जवळजवळ ३,००,००० वाहने शहरातून ये-जा करत असतात. त्यामुळे, एका माहितीनुसार तेथील प्रदूषणाचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या प्रमाणापेक्षा ६०० ते ८०० टक्के जास्त आहे.

(g०० ११/८)

पक्ष्यांना घातक

कॅनडातील टोरोंटोचे द ग्लोब ॲण्ड मेल म्हणते की, “उत्तर अमेरिकेतील कार्यालयांच्या इमारती आणि संदेशवाहन इमारती कित्येक पक्ष्यांचा जीव घेतात. अशा इमारतींवर आणि घरांच्या खिडक्यांवरही पक्षी आदळल्यामुळे दरवर्षी तेथे दहा कोटी पक्ष्यांचा मृत्यू होतो असे मानले जाते.” रात्रीच्या वेळी कार्यालयांमध्ये दिवे चालू ठेवल्यामुळे स्थलांतरण करणारे पक्षी गोंधळतात. हा गोंधळ नेमका कसा होतो ते मात्र अद्याप समजलेले नाही. ही समस्या सर्वत्र आढळते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पक्षी तज्ज्ञ डेव्हिड विलर्ड म्हणतात, “हे घडत नाही असे एकही ठिकाण या देशात किंवा या खंडात मला ठाऊक नाही.” टोरोंटो घातक प्रकाश जागरूकता कार्यक्रम यांसारखी मंडळे, कर्मचाऱ्‍यांना रात्रीच्या वेळी दिवे बंद करण्याचे आवाहान करत आहेत.

त्या शिवाय, “आकाशातले प्रकाशदिवे” अर्थात डिस्को किंवा इतर मनोरंजनाच्या ठिकाणी लोकांना आकर्षित करण्यासाठी आकाशात प्रकाश फेकणारे मोठे स्पॉटलाईट्‌स रात्रिंचर प्राण्यांना गोंधळवून टाकतात असे फ्रँकफर्टर अल्जेमाईन जेटुंग हे जर्मन दैनिक म्हणते. या प्रकाशदिव्यांमुळे गोंधळून गेल्याने पक्ष्यांच्या व वटवाघळांच्या अतिसंवेदनशील प्रवासी व्यवस्थेत बिघाड होतो. गोंधळल्यामुळे हे पक्षी आपली उड्डाण रचना मोडतात, दिशा बदलतात, घाबरून ओरडतात किंवा काही वेळा तर स्थलांतरण पूर्णतः थांबवतात अशी माहिती आहे. काही वेळा, वाट चुकलेले पक्षी तासन्‌तास घिरट्या मारून शेवटी थकून खाली उतरतात. कमजोर झालेल्या काही पक्ष्यांचा तर मृत्यू देखील होतो. फ्रँकफर्ट येथील पक्षी संरक्षण संस्थेने “आकाशातल्या प्रकाशदिव्यांवर” बंदी घालण्याची मागणी केली आहे.

(g०० ११/८)