व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला ऑस्ट्रेलियातील स्टिंगलेस बीझ पाहायच्यात का?

तुम्हाला ऑस्ट्रेलियातील स्टिंगलेस बीझ पाहायच्यात का?

तुम्हाला ऑस्ट्रेलियातील स्टिंगलेस बीझ पाहायच्यात का?

ऑस्ट्रेलियातील सावध राहा! बातमीदाराकडून

वसंत ऋतुच्या सुरवातीला, सकाळच्या कोवळ्या उन्हात प्रत्येक फुलाचे चुंबन घेत जाणाऱ्‍या मधमाश्‍यांना तुम्ही कधी पाहिले आहे का? चुंबन घेत असताना या मधमाश्‍या गुणगुणत असणाऱ्‍या गाण्याने तुम्ही कधी मंत्रमुग्ध झाला आहात का? त्यांचा हा मुक्‍त विहार किती सुखावणारा असतो! पण त्यांचा दंश—नको रे बाबा!

पण अशाही काही माश्‍या आहेत ज्या दंश करत नाहीत. ऐकून आश्‍चर्य वाटले ना? होय, दंश न करणाऱ्‍या या माश्‍यांना ऑस्ट्रेलियन स्टिंगलेस बीझ (दंश न करणाऱ्‍या माश्‍या) असे म्हटले जाते. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील अनेक भागात आपल्याला या माश्‍या पाहायला मिळतील. या माश्‍यांची लांबी फक्‍त चार मिलिमीटर असते. त्या रंगाने काळ्या असतात व त्यांच्या मुखावर व बाजूंवर दाट पांढरे केस असतात. पुष्कळ माश्‍यांच्या उदराच्या दोन्ही कडांवर लहान लहान पिवळे ठिपके असतात. उत्तरेकडील क्विन्सलँडच्या किनाऱ्‍यापासून दक्षिणेकडील न्यू साऊथ वेल्सपर्यंत आपल्याला या माश्‍यांच्या कमीतकमी दहा जाती तरी पाहायला मिळू शकतात. काही जाती तर उष्णकटिबंधीय उत्तरीय क्षेत्रातही आढळतील.

या माश्‍यांच्या पोळ्यातून मध काढणाऱ्‍या लोकांना त्यांच्या या निरुपद्रवी स्वभावाचा किती फायदा होत असतो ते पाहा. एक मधमाशीपालक म्हणतात: “दुसऱ्‍या माश्‍यांच्या मधुपेटीतून मध गोळा करण्याआधी मला कापडी जाळीचा बुरखा आणि उंच गळ्याचे स्वेटर घालावे लागते. पण या [दंश न करणाऱ्‍या] माश्‍यांच्या पोळातून मध काढताना मला त्याची गरज पडत नाही. मधुपेटी उघडून पाच मिनिटे झाल्यावरही या माश्‍या आपल्या कामात इतक्या गुंग असतात, जणू त्यांना काहीच माहीत नाही.”

इतर मधमाश्‍यांपेक्षा या माश्‍यांचे पोळे खूपच वेगळे असते. खरे तर त्यांना घरटे म्हणतात. इतर मधमाश्‍या त्यांच्या षटकोनी कोषात मध आणि पराग साठवतात. पण दंश न करणाऱ्‍या या माश्‍या एक अंडाकृती पिशवी तयार करतात व त्यात मध आणि पराग साठवतात. या पिशव्या भरल्यानंतर त्यांना बंद केले जाते आणि त्यांच्यावर किंवा अवतीभोवती इतर पिशव्या तयार करून त्याही मध आणि पराग यांनी भरल्या जातात.

घरट्यात

आपण आता या घरट्यात जरा डोकावून पाहूया. या घरट्यात सुमारे १५,००० माश्‍या राहतात. जरा सांभाळून, बरं का? या माश्‍यांना नांगी नसली तरी त्यांच्या बारीक दातांनी त्या तुम्हाला टोचा मारू शकतात.

किती गुंग आहेत या माश्‍या आपल्या कामात! कामाच्या बाबतीत या माश्‍यांमध्ये खूप एकी असते. प्रत्येक माशीला, आपल्याला नेमके काय काम करायचे आहे आणि कोठे करायचे आहे हे माहीत असते. ती चिमुकली माशी दिसते का तुम्हाला? एका नवीन बनवलेल्या पिशवीला ती पॉलिश करत आहे. तिचे काम तिने किती सफाईदारपणे केले; असे वाटते, की तिने ब्लूप्रिंट पाहून ही पिशवी तयार केली असावी. तिच्याच शेजारी त्या आणखी चार माश्‍या पाहा. मधाने भरलेल्या पिशवीचे तोंड त्या बंद करत आहेत. या मधाच्या पिशव्या, एका मोठ्या त्रिमितीय जाळीवर बसवल्या जातात. ही जाळी इतकी मजबूत असते की ती, मधाने भरलेल्या पिशव्यांचा भार पेलू शकते!

आता आपण घरट्यातील दुसरी बाजू पाहू या. इथे तुम्हाला इतर माश्‍यांपेक्षा जरा मोठी माशी दिसते का? ती आहे राणी माशी. ती कशी तोऱ्‍यात फिरत आहे ते पाहा! तिच्या काळ्या झरझरीत झग्यामुळे व तिच्या उदराभोवती असलेल्या सोनेरी पट्ट्यांमुळे ती इतर माश्‍यांमध्ये अगदी उठून दिसते! आता ही राणी तिच्यासाठी बनवण्यात आलेल्या ६० कोषांमध्ये अंडी घालण्यास सुरवात करते. ती किती सांभाळून अंडी घालत आहे ते तरी पाहा. तिला पाहिल्यावर आई आपल्या बाळाला पाळण्यात किती अलगदपणे ठेवते त्याची आठवण आपल्याला होते. आणि राणी माशीने अंडी घातल्याबरोबर कामकरी माश्‍या कशा लगबगीने तो कोष झाकून टाकतात तेही पाहा. हे काम काही मिनिटांतच फत्ते होते!

अंड्यांतून डिंभ बाहेर पडतात

अंड्यांतून बाहेर पडलेला डिंभ, कोषात त्याच्यासाठी जमवलेल्या अन्‍नावर वाढतो. मेणाच्या कोषापेक्षा त्याचा आकारमान वाढतो तेव्हा हा डिंभ आपल्या शरीराभोवती एक रेशमी संरक्षक कवच बांधतो. अंड्यांतून डिंभ बाहेर आल्यावर तो भोवती ‘कोकून’ म्हणजे संरक्षक कवच असलेल्या अवस्थेत (कोशावस्थेत) जातो. कोकून मधून बाहेर निघाल्यावर, आयाचे काम करणाऱ्‍या काही कामकरी माश्‍या या डिंभांना खाऊ घालून त्यांचे लाड पुरवतात आणि मग हा डिंभही कामाला लागतो. मग त्या मेणाच्या कोषांचे काय होते? कामकरी माश्‍या हे रिकामे कोश लगेच गोळा करून त्यावर प्रक्रिया करतात व ते पुन्हा वापरण्याजोगे असतात. माश्‍या कोकूनमधून बाहेर पडल्यानंतर त्या कोकूनचा काहीच उपयोग नसतो. ते तसेच ठेवले तर उगाच घरट्यात गर्दी होते. म्हणून काही कामकरी माश्‍या लगेच हे कोकून बाहेर टाकून देतात.

दंश न करणाऱ्‍या माश्‍यांच्या अनेक जाती केरूमन नावाचे द्रव्य तयार करतात. हे द्रव्य, माश्‍यांच्या शरीरातून स्रावणारा मेण, आणि वनस्पतींपासून त्यांनी मिळवलेला मेण व रेझिन यांचे मिश्रण असते. या केरूमन द्रव्याने त्या जाळी बनवतात. जाळीचा प्रत्येक सांधा याच द्रव्याने एकमेकांना चिकटवलेला असतो. मग जाळीवरच मध साठवण्यासाठी पिशव्या बनवल्या जातात. काही माश्‍या या पिशव्यांच्या आत जातात व केरूमन दाबून दाबून त्यांना आकार देतात. मग या पिशव्यांमध्ये मध भरून त्यांच्यावर आवरण लावले जाते. प्रत्येक ऋतूतील वनस्पतींच्या मूल्याची आणि प्रत्येक ऋतूच्या दुष्परिणामाची या माश्‍यांना उपजत जाण असते. अन्‍न गोळा करून ते साठवून ठेवले तरच त्या जिवंत राहू शकतात हे या माश्‍यांना चांगल्याप्रकारे माहीत असावे असे वाटते.

या माश्‍या आपले घरटे सोडून, पोळाच्या बांधकामाकरता लागणारे साहित्य, मकरंद आणि पराग यांच्या शोधात जातात. घरट्यातून बाहेर पडल्यावर या माश्‍या उत्तम वैमानिक आणि नाविक होतात. त्यांना नेमके काय हवे आहे व ते कोठे सापडेल हे त्यांना चांगल्याप्रकारे माहीत असते.

नवीन घरटे बनवणे

जुन्या घरट्यात गर्दी व्हायला लागते तेव्हा काय होते? कुटुंबातील सर्वांना संदेश मिळतो की “आता आपल्याला दुसरे घरटे बांधावे लागेल.” बहुतेकदा एका माशीला, अशी पोकळी शोधून काढायला पाठवले जाते व ती घरट्यासाठी एक उत्तम ठिकाण शोधून काढते. त्यानंतर मग माश्‍यांचा एक मोठा समूह, “इंजिनियर्स,” त्या पोकळीचे निरीक्षण करायला जातात. या समूहात ३० ते ५० माश्‍या असतात. या माश्‍या कित्येक तास या पोकळीचे निरीक्षण करतात. असे वाटते की जणू त्या घरट्यासाठी रेघोट्या मारत आहेत आणि खुंट्या ठोकत आहेत. मग घरट्यासाठी पाया चांगला मजबूत झाला आहे याची खात्री केल्यावर या माश्‍या पुन्हा आपल्या जुन्या घरी जातात, कदाचित सविस्तर माहिती देण्यासाठी. आणि लगेच, बहुतेकदा ४८ तासांच्या आतच ‘बांधकाम करणाऱ्‍या’ माश्‍या नवीन ठिकाणी पोहंचतात. हजारोंच्या संख्येने या बांधकाम करणाऱ्‍या माश्‍या येतात—अर्थात राणी त्यांच्यात नसते. या माश्‍या लगेच कामाला लागतात, जुन्या घरट्यातून बांधकाम साहित्य आणि अन्‍न आणू लागतात.

या नवीन शिशुकोशात राणी माशी राहायला येणार आहे! आणि ती यात अंडी घालणार आहे. त्यासाठी शिशुकोशाचे तापमान २८ डिग्री सेल्सियस असावयास हवे. म्हणून कामकरी माशा या शिशुकोशाभोवती केरूमनचा थर चढवतील. त्यानंतर असे वाटेल जसे कोशाभोवती ब्लँकेट गुंडाळली आहे. अंड्यांना उष्णतेची आवश्‍यकता आहे हे या सुज्ञ माश्‍यांना कसे कळत असेल बरे! आता सर्व काही तयार आहे. कोश तयार करून झाल्यावर नवव्या दिवशी, जुन्या पोळ्यात तयार झालेल्या नवीन राणी माशीला आणले जाते. नवीन शिशुकोशात आल्याबरोबर ती अंडी घालू लागते. या अंड्यांतून तिच्या महालासाठी नवीन कामकरी माश्‍या तयार होतील.

मग कालांतराने जुन्या पोळ्यातून नवीन पोळ्यात राहायला आलेल्या कामकरी माशा मरून जातील व या नवीन कोशातील अंड्यांतून नवीन, तरुण कामकरी माश्‍या तयार होतील. या कामकरी माश्‍यांनाही कधी ना कधी तरी दुसरे पोळ बांधून त्यात राहावे लागेल. अशाप्रकारे, अद्‌भुत निर्माणकर्त्याने निर्माण केलेले हे अतुलनीय चक्र चालूच राहते!

(g०० १ १/८)

[१३ पानांवरील चित्र]

षटकोनी पोळं बनवण्याऐवजी दंश न करणाऱ्‍या माश्‍या अंडाकृती पिशव्या बनवतात

[१४ पानांवरील चित्र]

ऑस्ट्रेलियात दंश न करणाऱ्‍या माश्‍यांच्या कमीतकमी १० जाती तरी आढळतात