व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही राशिचक्र पाहावे का?

तुम्ही राशिचक्र पाहावे का?

बायबलचा दृष्टिकोन

तुम्ही राशिचक्र पाहावे का?

“असंख्य तरुणतरुणी ताऱ्‍यांद्वारे आपले भविष्य पाहतात.”—पोप जॉन पॉल दुसरे.

एका सर्वेक्षणानुसार, दर ४ अमेरिकनांपैकी १ जण जीवनातले कोणतेही निर्णय घेताना ज्योतिष पाहतो. ज्योतिष पाहण्याची ही प्रथा जगाच्या कोणत्याही एकाच भागात आहे असे नाही. पैशांचा व्यवहार करण्याआधी, प्रवासाला निघण्याआधी, जीवनात कोणते करियर निवडायचे, लग्नाची कोणती तारीख ठरवायची व सैनिकी डावपेच या सर्व बाबतीत संपूर्ण जगभरातच ज्योतिष पाहिले जाते. असे म्हटले जाते, की कुंडलीवरून भावी वैवाहिक सोबती एकमेकांना अनुरूप आहेत किंवा नाही हे देखील सांगता येते. पूर्वेपासून पश्‍चिमेपर्यंत लाखो लोक ज्योतिषशास्त्रावर विश्‍वास ठेवतात. पण या राशिचक्राचा उगम झाला तरी कोठून?

ऐतिहासिक पार्श्‍वभूमी

राशिचक्राच्या विविध प्रकारांची मुळे सर्वात प्राचीन संस्कृतीत सापडतात. बायबलमध्ये देखील ‘राशिचक्राचा’ उल्लेख आढळतो. (२ राजे २३:५) प्राचीन काळी, हिंदू, चिनी, मिसरी, ग्रीक आणि इतर लोक राशिचक्र पाहत असल्याचा पुरावा आहे. परंतु राशिचक्रासंबंधी सर्वात जुना अहवाल आपल्याला प्राचीन बॅबिलोनचा पाहायला मिळतो.

भविष्यकाळाच्या जिज्ञासेपोटी बॅबिलोनी लोकांनी ज्योतिषशास्त्र शोधून काढले. ते ग्रहताऱ्‍यांच्या हालचालींवरून गुंतागुंतीची माहिती असलेल्या आकृत्या व तक्‍ते तयार करायचे. आणि मग त्यावरून मानवी व्यवहारांबाबत आणि पृथ्वीवरील घटनांबाबत भाकीते केली जायची. पुष्कळदा, ज्योतिषांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही राजकीय अथवा सैनिकी निर्णय घेतला जात नसे. अशाप्रकारे, खास बुद्धी व अलौकिक शक्‍ती असल्याचा दावा करणाऱ्‍या पुरोहितांच्या वर्गाचा लोकांवर चांगलाच पगडा होता. खरे तर, बॅबिलोनमधील सर्व मोठमोठ्या मंदिरांमध्ये एक ग्रह-नक्षत्रादी दर्शनस्थान होते.

आधुनिक दिवसांतही अनेक लोक आपल्या जीवनात ज्योतिषशास्त्राला महत्त्वाचे स्थान देतात. जन्मकुंडलीवर आपला विश्‍वास नाही असा दावा करणारे लोकही कधी कधी मजा म्हणून किंवा जिज्ञासेपोटी ती पाहतात. काही वेळा ज्योतिषांनी केलेली भाकीते खरी ठरली आहेत. पण मग याचा अर्थ आपण ज्योतिष पाहावे असा होतो का? ज्योतिषशास्त्राची आवड धरणाऱ्‍या लोकांबद्दल देवाच्या प्राचीन काळच्या सेवकांचे काय मत होते?

प्रत्यक्ष दिसून न येणारे धोके

बॅबिलोनच्या लोकांप्रमाणे विश्‍वासू यहुदी लोक मात्र कधीही ज्योतिष पाहत नसत. कारण देवाने त्यांना स्पष्टपणे ताकीद दिली होती: “चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छांछूं करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. कारण जो कोणी असली कृत्ये करितो त्याचा परमेश्‍वराला वीट आहे.” * (तिरपे वळण आमचे.)—अनुवाद १८:१०-१२.

देवाच्या सेवकांनी ज्योतिषशास्त्राचा कडाडून विरोध केला. उदाहरणार्थ, “जे कोणी बआल, सूर्य, चंद्र, राशिचक्र व नक्षत्रगण यांस धूप जाळीत होते ते सर्व राजाने [योशियाने] काढून टाकिले.” योशियाचे हे कृत्य ‘यहोवाच्या दृष्टीने बरे’ होते. त्यामुळे यहोवाने त्याला आशीर्वादित केले. (२ राजे २२:२; २३:५) पण आपल्या मनात हा प्रश्‍न येऊ शकतो, ‘ज्योतिषांनी केलेली निदान काही भाकीते तरी सत्य ठरली नाहीत का?’

होय, बायबलही या गोष्टीला दुजोरा देते. जसे की ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये एका मुलीचा उल्लेख आहे जी “दैवप्रश्‍न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे.” म्हणजेच, या मुलीने केलेली काही भाकीते सत्य ठरत होती. आणि तिच्या या शक्‍तीचा तिच्या धन्यांना खूप फायदा होत असे. पण या मुलीकडे भविष्य सांगण्याची जी शक्‍ती होती त्यामागे कोणाचा हात होता? बायबलमध्ये स्पष्ट सांगितले आहे, की तिला ‘भूत लागले’ होते. म्हणजेच, यामागे दुरात्म्यांचा हात होता.—प्रेषितांची कृत्ये १६:१६, पं.र.भा.

बायबलमध्ये म्हटले आहे, की “सगळे जग त्या दुष्टाला” अर्थात दियाबल सैतानाला वश झाले आहे. (१ योहान ५:१९) काही घटना घडवून त्यांच्याबद्दलची भाकीते खरी असल्याचे दाखवून सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांनी कोट्यवधी लोकांना आपल्या कह्‍यांत घेतले आहे.

पण एक साधेसुधे सत्य म्हणजे, ज्योतिषशास्त्र ‘सैतानाच्या डावपेचांतील’ एक आहे. याद्वारे तो आपला हेतू साध्य करण्यासाठी लोकांना आपल्या ताब्यात घेतो व त्यांच्यावर प्रभाव टाकतो. म्हणूनच तर बायबल खऱ्‍या ख्रिश्‍चनांना सैतानाच्या धूर्त डावपेचांविरुद्ध ‘टिकाव धरण्यास’ आर्जवते. या धूर्त डावपेचांमध्ये ज्योतिषशास्त्राचाही समावेश होतो. (इफिसकर ६:११) परंतु याचा असा अर्थ होतो का, की भविष्याच्याबाबतीत आपल्याला कोणतेही मार्गदर्शन नाही?

बायबल—विश्‍वसनीय मार्गदर्शक

कोट्यवधी लोकांना, निर्णय घेताना बायबलमध्ये विश्‍वसनीय मार्गदर्शन असल्याचे आढळून आले आहे. स्तोत्रकर्ता दावीद याने बायबलविषयी म्हटले, की “परमेश्‍वराचा निर्बंध विश्‍वसनीय आहे; तो भोळ्यांस समंजस करितो.” (स्तोत्र १९:७; ११९:१०५) अर्थात, एखाद्याने प्रत्येक प्रसंगी नेमके काय केले पाहिजे ते बायबल सविस्तरपणे सांगत नाही. देवाच्या वचनात तत्त्वे दिली आहेत. ही तत्त्वे आपल्या ज्ञानेंद्रियांना चांगल्यावाईटात भेद करण्यास व सुयोग्य निर्णय घेण्यास मदत करतात.—इब्री लोकांस ५:१४.

या उचित कारणामुळे, खरे ख्रिस्ती जन्मकुंडली पाहत नाहीत; केवळ मनोरंजन म्हणून अथवा जिज्ञासेपोटीसुद्धा नाही. तर दियाबलाच्या सर्व प्रभावांपासून आणि प्रत्यक्ष दिसून न येणाऱ्‍या प्रकारांपासून दूर राहण्याबाबत देवाच्या वचनातील इशाऱ्‍याकडे ते लक्ष देतात. राशिचक्राऐवजी, बायबलला आपल्या जीवनावर प्रभाव पाडू दिल्याने तुम्ही देवाकडून येणाऱ्‍या आशीर्वादांचा चिरकाल आनंद लुटू शकता.—स्तोत्र ३७:२९, ३८.

(g०० ११/८)

[तळटीप]

^ गूढ शक्‍तीद्वारे भविष्याच्या घटनांविषयी ज्ञान प्राप्त करण्याच्या सर्व प्रकारांचा शकून पाहण्यात समावेश होतो.

[२६ पानांवरील चित्र]

पूर्वेकडील राशिचक्र

[२६ पानांवरील चित्र]

पश्‍चिमेकडील राशिचक्र