नर्सेसची महत्त्वपूर्ण भूमिका
नर्सेसची महत्त्वपूर्ण भूमिका
“नर्स ती असते जी रुग्णाला तळहातावरच्या फोडासारखं जपते—आजाऱ्यांची, जखमी झालेल्यांची आणि वयोवृद्धांची काळजी घेण्यास झटते.”—नर्सिंग इन टुडेस वर्ल्ड—चॅलेंजेस, इश्यूस ॲण्ड ट्रेन्ड्स.
एक कुशल आणि कार्यक्षम नर्स बनण्यासाठी केवळ निःस्वार्थ सेवेची भावना असून चालत नाही. पुरेशा प्रशिक्षणाची आणि अनुभवाची देखील गरज असते. ट्रेन्ड नर्स बनण्यासाठी एक ते चार वर्षांपर्यंत किंवा त्याहूनही अधिक वर्षांपर्यंत त्या विषयाचा कसून अभ्यास करावा लागतो आणि त्यासोबतच प्रॅक्टिकल ट्रेनिंगसुद्धा घ्यावे लागते. परंतु, एका उत्तम नर्समध्ये कोण-कोणते गुण असणे अत्यंत जरूरीचे आहे? सावध राहा! मासिकाने घेतलेल्या मुलाखतीत काही अनुभवी नर्सेसनी दिलेली उत्तरे आपण पाहू या.
“हे खरे की डॉक्टर पेशंटला बरे करतो, पण, नर्स त्याची काळजी घेते. अनेकदा, पेशंटच्या शारीरिक जखमांवरच मलमपट्टी करून भागत नाही. त्याच्या भावनिक जखमांवर देखील फुंकर घालावी लागते. उदाहरणार्थ, पेशंटला क्रॉनिक (असाध्य) रोग जडला आहे किंवा लवकरच त्याला मृत्यू गाठणार आहे हे त्याला सांगितले जाते तेव्हा तो भावनिकरित्या उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. अशा वेळी एका नर्सला आईसारखी त्याची काळजी घ्यावी लागते.”—कार्मेन कीलमार्टीन, स्पेन.
“पेशंटच्या यातना आणि मनोवेदना समजून घेणे आणि त्याला मदत करण्याची मनस्वी इच्छा असणे फार जरूरीचे आहे. पेशंटशी व्यवहार करताना दयाळूपणा आणि सहनशीलता दाखवणे आवश्यक आहे. आणि नर्सिंगविषयी तसेच औषधोपचाराविषयी अधिकाधिक शिकत राहण्याची इच्छा देखील असली पाहिजे.”—तादाशी हातानो, जपान.
“अलीकडे, नर्सेसना आपल्या पेशेसंबंधी जास्त ज्ञान घेण्याची गरज भासली आहे. त्यामुळे, त्यांच्यात शिकण्याची हौस आणि समजून घेण्याची क्षमता असली पाहिजे. तसेच, काही वेळा आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यावर पटकन निर्णय घेण्याची आणि तातडीने पावले उचलण्याची गरज असते.”—केको कावाने, जपान.
“एक नर्स या नात्याने तुम्हाला पेशंटविषयी कळकळ वाटायला हवी. तसेच, सहनशील आणि सहानुभूतीशीलही असावे लागते.”—आरासेली गारसीया, पादीया, मेक्सिको.
“एक चांगली नर्स अभ्यासू, सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणारी आणि आपल्या कामात अतिशय तरबेज व कुशल असली पाहिजे. ती स्वार्थत्यागी, सेवाभावी वृत्तीची नसेल,
किंवा वरिष्ठांनी दिलेल्या सूचना जर तिला आवडत नसतील तर ती पेशंटसाठी आणि हॉस्पिटलसाठी काही कामाची नाही.”—रोझांजेला सान्टॉस, ब्राझील.“एक उत्तम नर्स बनण्यासाठी अनेक गुणांची गरज असते. जसे की वेगवेगळ्या परिस्थितीशी व लोकांशी जुळवून घेण्याची क्षमता, क्षमाशीलता आणि सहनशीलता. तसेच, संकुचित मनाचे असून चालत नाही. आपल्या सहकर्मचाऱ्यांशी तसेच अधिकाऱ्यांशी मिळूनमिसळून राहण्याची क्षमताही आवश्यक आहे. आणि आपली कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी तिने नवनवीन गोष्टी आत्मसात करण्यास तत्पर असले पाहिजे.”—मार्क कोयलर, फ्रान्स.
“एका उत्तम नर्सला लोकांवर मनस्वी प्रेम असले पाहिजे आणि इतरांना मदत करण्याची प्रांजळ इच्छा असली पाहिजे. नर्सिंगमध्ये थोडीशी जरी चूक झाली किंवा हयगय केली तर ती पेशंटच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे नर्सिंगच्या कामात तणाव असणारच. तसेच, सहकर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीत आपल्या सेवेत कसलीही तडजोड न करता त्यांचे काम तिला करता आले पाहिजे.”—क्लाउड्या रेकर-बाकर, नेदरलँड्स.
काळजीवाहू नर्स
नर्सिंग इन टुडेज वर्ल्ड यानुसार “नर्सिंगचा अर्थ आरोग्याशी संबंधित असलेल्या निरनिराळ्या परिस्थितींत रुग्णाची काळजी घेणे. त्यामुळे, पेशंटला बरे करण्यासाठी औषधोपचार, तर पेशंटची काळजी घेण्यासाठी नर्स असे चित्र चटकन डोळ्यांसमोर येते.”
म्हणूनच नर्सला शुश्रूषा करणारी किंवा काळजी घेणारी म्हटले जाते. साहजिकच मग तिने पेशंटची काळजी घेतली पाहिजे. काही वर्षांपूर्वी १,२०० रेजिस्टर्ड नर्सेसना हा प्रश्न विचारला होता, की “नर्स या नात्याने कोणते काम तुम्हाला सगळ्यात
महत्त्वाचे वाटते?” ‘रुग्णाची उत्तम काळजी घेणे’ असे ९८ टक्के नर्सेसनी उत्तर दिले.कधी-कधी, नर्सेसना वाटते की, पेशंट्सची मदत करण्यात त्या कमी पडत आहेत. आधी उल्लेख केलेल्या कार्मेन कीलमार्टीन (यांना नर्सिंगच्या क्षेत्रात १२ वर्षांचा अनुभव आहे) यांनी सावध राहा! मासिकाला असे सांगितले: “एकदा मी माझ्या मैत्रिणीला म्हणाले की, रुग्णांची केली पाहिजे तितकी सेवा मी करत नाही. त्यांच्यासाठी मी केवळ एक ‘बँड-एड’ आहे. त्यावर माझी मैत्रीण म्हणाली, ‘होय, पण साधेसुधे नव्हे तर एक अनमोल “बँड-एड” आहेस तू, कारण आजारी माणसाला तुझ्यासारखी सहानुभूतीशील नर्सच हवी असते.’”
दररोज दहा किंवा त्याहून जास्त तास काम करणाऱ्या नर्सवर खूप ताण पडतो हे वेगळे सांगायला नको! तरीसुद्धा, निःस्वार्थ भावनेने रुग्ण-सेवा करण्याची प्रेरणा नर्सेसना कशामुळे मिळते?
नर्स बनण्याचे कारण
सावध राहा! नियतकालिकाने घेतलेल्या विविध देशांतील नर्सेसच्या मुलाखतीत असा एक प्रश्न विचारला होता: “तुम्हाला नर्स बनण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली?” त्यावर काहींनी दिलेली उत्तरे आपण पाहू.
टेरी वेथरसन यांना नर्सिंगच्या क्षेत्रात ४७ वर्षांचा अनुभव आहे. त्या सध्या इंग्लंडच्या मँचेस्टर शहरातील एका हॉस्पिटलच्या युरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये क्लिनिकल नर्स स्पेशिएलिस्ट म्हणून काम करतात. त्या म्हणतात, “मी कॅथलिक धर्मातच लहानाची मोठी झाले. शिवाय, मी ज्या शाळेत शिकले ती देखील एक कॅथलिक बोर्डिंग शाळा होती. तेव्हाच मी ठरवले, मोठे होऊन एकतर नन बनायचे किंवा नर्स बनायचे. इतरांची सेवा करण्याची मला मनस्वी इच्छा होती. माझे मन सांगत होते की मी अशाच प्रकारचा पेशा निवडावा आणि त्यामुळे मी नर्सिंग निवडले.”
जपानच्या सायतामा येथील चिवा माटसूनागा या गेल्या आठ वर्षांपासून स्वतःचे एक क्लिनिक चालवतात. त्या म्हणतात: “माझे वडील नेहमी म्हणायचे, ‘माणसाने असे एखादे कौशल्य शिकावे की, मरेपर्यंत तो ते काम करू शकेल.’ आणि म्हणून मी नर्सिंग करण्याचे ठरवले.”
जपानच्या टोकियो शहरात राहणाऱ्या एत्सको कोटेनी एक हेड नर्स आहेत आणि या क्षेत्रात त्यांना तब्बल ३८ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी म्हटले: “मी शाळेत असताना माझे वडील एकदा अचानक चक्कर येऊन पडले आणि त्यांचे खूप रक्त वाहून गेले. हॉस्पिटलमध्ये वडिलांची ती केविलवाणी अवस्था पाहूनच मी निर्णय घेतला की मोठे होऊन नर्स बनायचे आणि आजाऱ्यांची शुश्रूषा करायची.”
काहींना स्वतःच्या आजारपणामुळे नर्स बनण्याची प्रेरणा मिळाली. मेक्सिकोमधील एनेडा बिएरा नामक नर्सने म्हटले: “मी सहा वर्षांची असताना मला ब्राँकायटिस झाला होता. त्यामुळे मला दोन आठवडे दवाखान्यात राहावे लागले होते. त्याच वेळी मी नर्स बनायचे ठरवले.”
होय, नर्स बनण्यासाठी जीवनात अनेक त्याग करावे लागतात. आता या उदात्त सेवेतील आव्हानांचे आणि आशीर्वादांचे आपण परीक्षण करू या.
नर्स बनण्यातला आनंद
नर्सिंग केल्याने एखाद्याला कोणता आनंद मिळतो? या प्रश्नाचे उत्तर, नर्सिंग कोणत्या क्षेत्रात केले जाते त्यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, बाळंतपण यशस्वीपणे पार पडल्यानंतर सुईणींना किती आनंद आणि समाधान वाटते ते पाहा. नेदरलँड्समधली एक सुईण म्हणते, “बाळंतपण पार पाडल्यावर गोंडस, सुदृढ
बाळाला पाहून खूप आनंद होतो कारण ते बाळ पोटात असते तेव्हापासूनच तुम्ही त्याची वाढ पाहिलेली असते. नेदरलँड्सची आणखीन एक सुईण योलांडा कीलन-फान होफ्ट म्हणते: “बाळंतपण हा एका दांपत्यासाठी आणि सुईणीसाठी सगळ्यात सुंदर अनुभव आहे. बाळाचा जन्म हा खरोखरच एक चमत्कार आहे!”फ्रान्सच्या द्री येथील राशित असाम (चाळीशीत असलेले) हे सरकारी सर्टिफिकेट असलेले नर्स अनेस्थेटिस्ट आहेत. त्यांना नर्सिंग का आवडते असे विचारल्यावर ते म्हणाले, “एखादे ऑपरेशन यशस्वी ठरण्यामध्ये माझे योगदान असते याचे मला समाधान वाटते. तसेच नर्सिंग असा एक अद्भुत पेशा आहे ज्यात सतत प्रगती होत राहते.” फ्रान्स येथील आणखी एक गृहस्थ आयझक बांगिली म्हणतात: “पेशंट जीवन-मृत्यूशी संघर्ष करत असताना त्याला मृत्यूच्या जबड्यातून यशस्वीपणे
परत आणल्यानंतर पेशंटकडून आणि त्याच्या कुटुंबियांकडून कृतज्ञता व्यक्त केली जाते तेव्हा मी अगदी भारावून जातो.”आधी उल्लेखिलेल्या टेरी वेथरसन यांना एकदा एका विधवेकडून असेच एक आभाराचे पत्र मिळाले. त्यात लिहिले होते: “चार्ल्सच्या आजारपणात तुमच्या शांत, आश्वासक उपस्थितीने कशाप्रकारे आमचे मनोधैर्य उंचावले आणि आम्हाला साहाय्य केले याचा जितक्यांदा मी विचार करते तितक्यांदा माझे अंतःकरण तुमच्याविषयी कृतज्ञ भावनेने दाटून येते. तुम्ही दाखवलेल्या प्रेमाच्या लख्ख प्रकाशाने आमच्या अंधाऱ्या जीवनातला काळोख नाहीसा केला. आमच्यासाठी तुमचे हे प्रेम एखाद्या खडकाप्रमाणे इतके मजबूत होते की या खडतर प्रसंगाचा आम्ही मोठ्या हिंमतीने सामना करू शकलो.”
आव्हानांचा सामना करणे
पण नर्सिंगच्या या अमाप आशीर्वादांसोबतच निरनिराळ्या आव्हानांचा देखील सामना करावा लागतो. नर्सिंग असे एक काम आहे ज्यात हलगर्जीपणाला थारा नाही! औषधे देताना, रक्त घेताना, कोणतेही उपकरण शरीरात घालताना किंवा रुग्णाला एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवतानासुद्धा नर्सला फार काळजीपूर्वक सर्वकाही करावे लागते. ज्या देशांत कोर्ट-कचेरीच्या भानगडी जास्त होतात अशा देशांत नर्सेसना जास्तच जपून आपले काम करावे लागते. पण काही वेळा, नर्सेस कोंडीत सापडतात. उदाहरणार्थ, डॉक्टरांनी दिलेले औषध चुकीचे आहे किंवा डॉक्टरांनी रुग्णाला असे काही करायला सांगितले आहे जे रुग्णासाठी हितकारक नाही असे नर्सेसना वाटू शकते. अशा वेळी नर्सने काय करावे? डॉक्टरांना आव्हान द्यावे? असे करण्यासाठी धैर्याची, चातुर्याची आणि व्यवहार-कुशलतेची गरज असते. आणि यात नर्सेसला आपली नोकरी गमावण्याचाही धोका असतो. दुःखाची गोष्ट म्हणजे, नर्सेस आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत असे समजून काही डॉक्टर नर्सने दिलेला सल्ला स्वीकारण्यास इतक्या सहजासहजी तयार होत नाहीत.
या बाबतीत काही नर्सेसना काय वाटते? अमेरिकेच्या विस्कनसिन येथील बार्बरा रायनेक यांचे उदाहरण विचारात घ्या. गेल्या ३४ वर्षांपासून एक रेजिस्टर्ड नर्स म्हणून त्या
काम करत आहेत. सावध राहा! नियतकालिकाशी बोलताना त्यांनी म्हटले: “नर्स धीट असली पाहिजे. कारण रुग्णाला ती जी औषधे किंवा उपचार देते त्यासाठी आणि त्या औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांसाठी ती कायदेशीरपणे जबाबदार असते. तेव्हा, डॉक्टरांनी असे एखादे काम करण्यास नर्सला सांगितले जे तिच्या अधिकारात नाही किंवा ते चुकीचे आहे असे नर्सला वाटते तेव्हा ‘नाही’ म्हणायचे धैर्य तिच्यात असले पाहिजे. फ्लोरेन्स नाईटिंगेलच्या दिवसांतले किंवा ५० वर्षांपूर्वीचे नर्सिंग आणि आधुनिक काळातले नर्सिंग यात जमीनास्मानाचा फरक आहे. डॉक्टरांना केव्हा ‘नाही’ म्हणायचे आणि अगदी मध्यरात्र असेल तरी पेशंटला पाहण्याचा आग्रह डॉक्टरांना केव्हा करायचा हे नर्सेसना माहीत असले पाहिजे. आणि चूक आपलीच असेल तर डॉक्टरांचे टोचणारे शब्द मनाला लावून न घेण्याची तयारी असली पाहिजे.”नर्सेसना आणखी एका समस्येचा म्हणजे कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर होणाऱ्या हिंसेचा सामना करावा लागतो. दक्षिण आफ्रिकेच्या एका वृत्तानुसार, नर्सेसना “हॉस्पिटलमध्ये दुर्व्यवहाराचा आणि हिंसेचा अधिक धोका असतो. तुरुंगाचे गार्ड किंवा पोलिस अधिकाऱ्यांपेक्षा नर्सेसवर हिंसाचार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ७२ टक्के नर्सेसना हॉस्पिटलमध्ये सुरक्षित वाटत नाही.” इंग्लंडची स्थिती यापेक्षा काही वेगळी नाही. एका सर्वेक्षणात दिसून आले, की तेथील ९७ टक्के नर्सेसना एक तरी अशी नर्स माहीत होती जी आधीच्या वर्षात शारीरिक हिंसेची शिकार झाली होती. पण त्यांच्यावर असा हल्ला का होतो? सहसा, ड्रग्सचे सेवन करणारे, दारू पिणारे, तणावात असलेले किंवा अत्यंत दुःखी असलेल्या पेशंटकडून नर्सेसवर असा हल्ला होण्याची शक्यता असते.
नर्सेसना तणावामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक शिणवट्याशी (बर्नआउट) देखील संघर्ष करावा लागतो. याचे एक कारण म्हणजे स्टाफची कमी. नर्सेस कमी असल्यामुळे कामाचा भार वाढतो. अशा वेळी एका मेहनती नर्सला पेशंटकडे जास्त लक्ष देता येत नाही. साहजिकच मग तणाव वाढतो. ही समस्या सोडवण्यासाठी ती ब्रेकच्या वेळी काम करते; आणि तेही कमी म्हणून ओव्हरटाईमही करते. पण, यामुळे ती अधिकच वैफल्यग्रस्त होते.
जगभरात असे अनेक हॉस्पिटल आहेत जिथे पुरेसा स्टाफ नाही. उदाहरणार्थ, मॅड्रिड येथील मुंडो सेनिटेऱ्योमधील वृत्ताने म्हटले. “आमच्या हॉस्पिटलमध्ये फारच कमी नर्सेस आहेत. ज्यांना आजारपणात काळजी घेणाऱ्या व्यक्तीची गरज भासते त्यांना नर्सचे महत्त्व ठाऊक असते.” पुरेशा नर्सेस नसण्यामागचे कारण काय असेल? पैशांची बचत! त्याच वृत्तामध्ये असे म्हटले होते की, याचा परिणाम असा झाला आहे, की मॅड्रिडच्या हॉस्पिटलमध्ये चक्क १३,००० नर्सेसची कमी आहे!
तणावाचे दुसरे एक कारण म्हणजे जास्त वेळ कराव्या लागणाऱ्या,
पण कमी पगार देणाऱ्या शिफ्ट ड्यूटी. द स्कॉस्टमन यात म्हटले होते: “युनिसन या सार्वजनिक सेवा युनियनच्या मते, ब्रिटनमध्ये दर पाच नर्सेसपैकी एकपेक्षा जास्त नर्स आणि एक चतुर्थांश नर्सिंग असिस्टंट यांना आपले खर्च भागवण्यासाठी दुसरी नोकरी करावी लागते.” चारपैकी तीन नर्सेसचे म्हणणे आहे की, त्यांना फार कमी पगार मिळतो. परिणामस्वरूप, पुष्कळांनी हा पेशा सोडून द्यायचा विचार केला आहे.नर्सेसचा तणाव वाढवणारी याशिवाय आणखी बरीच कारणे आहेत. सावध राहा! नियतकालिकाने घेतलेल्या जगभरातील नर्सेसच्या मुलाखतींवरून लक्षात येते की, पेशंटच्या मृत्यूमुळे नर्स फार दुःखी होते. मग्दा स्वांग मूळच्या ईजिप्त येथील आहेत. परंतु त्या न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन येथे काम करतात. त्यांच्या कामातली सर्वात कठीण गोष्ट कोणती असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या: “दहा वर्षांच्या काळात असाध्य रोग जडलेल्या ३० पेशंटना मी माझ्यासमोर मरताना पाहिले. त्यांची मी रात्रंदिवस काळजी घेतली होती. म्हणूनच मला ते सहन होत नाही.” एका माहिती सूत्राने देखील हेच म्हटले: “मरणाला टेकलेल्या रुग्णांची जीवाचा आटापिटा करून सतत काळजी घेणे हा असा एक कटू अनुभव आहे जो काळजी घेणाऱ्या व्यक्तीला शारीरिक आणि मानसिकरित्या कमजोर करू शकतो.”
नर्सेसचे भविष्य
टेक्नॉलॉजीच्या विकासामुळे आणि प्रभावामुळे नर्सिंगच्या क्षेत्रातला दबाव अधिकाधिक वाढत आहे. कारण टेक्नॉलॉजी आणि माणुसकी (रुग्णांशी सौम्यतेने वागणे) यांचा मेळ बसवणे खरोखरच मोठे आव्हान आहे. नर्सला एखाद्या पेशंटबद्दल जी प्रेमळ काळजी आणि दया वाटते त्याची जागा कोणतेही यंत्र घेऊ शकत नाही.
एका पत्रिकेत असे म्हटले होते: “नर्सिंग कधीही न संपणारा पेशा आहे. . . . मानव अस्तित्वात असेल तोपर्यंत काळजी, दया आणि सुजाणता असलेल्या व्यक्तीची गरज असेल.” मानवाची ही गरज नर्सिंग भागवत आहे. परंतु, आरोग्य-निगेच्या बाबतीत एक उज्ज्वल आशा बाळगण्याचे आणखीन एक मोठे कारण आहे. बायबल म्हणते की लवकरच असा एक समय येईल जेव्हा “मी रोगी आहे” असे कोणीही म्हणणार नाही. (यशया ३३:२४) देवाने भाकीत केलेल्या नवीन जगात डॉक्टर, नर्स आणि हॉस्पिटलची गरज भासणार नाही.—यशया ६५:१७; २ पेत्र ३:१३.
बायबल असेही आश्वासन देते, की “देव . . . त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:३, ४) पण, ते नवीन जग येईपर्यंत पेशंट्सची काळजी घेणाऱ्या आणि त्यांच्यासाठी असीम त्याग करणाऱ्या जगातल्या कोट्यवधी नर्सेसची आपण मनस्वी कदर करत राहू. कारण त्या नसत्या तर हॉस्पिटलमधील आपले राहणे कधीच सुखावह झाले नसते. नर्सच्या कामाला खरोखरच पर्याय नाही!
(g०० ११/८)
[६ पानांवरील चौकट/चित्र]
फ्लॉरेंस नाईटिंगेल —आधुनिक नर्सिंगची जननी
फ्लॉरेंस नाईटिंगेलचा जन्म १८२० साली इटलीमध्ये एका इंग्रज घराण्यात झाला होता. सुखवस्तू कुटुंबातली असल्यामुळे ती खूप लाडात वाढली. तरुण असताना फ्लॉरेंसला कित्येकांनी लग्नाची मागणी घातली. पण, आरोग्याच्या विषयावर अधिक शिक्षण घेण्यासाठी आणि गोरगरिबांची सेवा करण्यासाठी तिने लग्न केले नाही. आईवडिलांच्या विरोधाला न जुमानता फ्लॉरेंसने जर्मनीतील कायसरवर्थ ट्रेनिंग स्कूलमधून नर्सिंगचे ट्रेनिंग घेतले. शिक्षणासाठी ती नंतर पॅरिसलाही गेली. आणि वयाच्या ३३ व्या वर्षी ती लंडनच्या महिला हॉस्पिटलमध्ये सुप्रिंटेंडन्टच्या हुद्द्यावर काम करू लागली.
पण, क्रिमयात जाऊन जखमी सैनिकांची शुश्रूषा करणे तिला फार आव्हानात्मक ठरले. केवळ ३८ नर्सेसच्या मदतीने तिला उंदरांचा सुळसुळाट असलेले हॉस्पिटल स्वच्छ करावे लागले. हे काम इतके सोपे नव्हते. कारण सुरवातीला तिथे साबण नव्हता, वॉश बेसिन्स नव्हते किंवा टॉवेल्सही नव्हते. शिवाय, तिथे पुरेसे पलंग, गाद्या किंवा बॅन्डेजसुद्धा नव्हते. फ्लॉरेंसने आणि तिच्यासोबतच्या ३८ नर्सेसने ही जोखीम पत्करली. युद्ध संपले तोपर्यंत, तिने नर्सिंगमध्ये आणि हॉस्पिटलच्या प्रशासन पद्धतीत विश्व पातळीवर क्रांतीकारी बदल घडवून आणले होते. तसेच, सन १८६० मध्ये फ्लॉरेंसने लंडनमधील सेंट थॉमस हॉस्पिटलच्या नर्सेससाठी नाईटिंगेल ट्रेनिंग स्कूलची स्थापना केली. कोणत्याही धार्मिक संस्थेशी लागेबांधे नसलेली ही पहिलीच नर्सिंगची संस्था होती. मृत्यूआधी कित्येक वर्षे ती अंथरुणाला खिळून होती. पण, अशा अवस्थेत देखील आरोग्य-निगेच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी ती पुस्तके आणि पत्रिका लिहित राहिली. शेवटी, सन १९१० मध्ये तिचा मृत्यू झाला.
फ्लॉरेंस नाईटिंगेलविषयी जगभर एक निःस्वार्थ, सेवाभावी चित्र रेखाटले जाते. पण, काहींनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे, की नर्सिंगच्या क्षेत्रात मोलाचा वाटा उचलणारे फ्लॉरेंस नाईटिंगेलशिवाय आणखीन बरेच जण होते. पण, त्यांची इतकी दखल घेतली जात नाही. शिवाय, फ्लॉरेंसचे व्यक्तिमत्त्व वादळी होते असेही काहींचे मत आहे. ए हिस्ट्री ऑफ नर्सिंग या पुस्तकानुसार ती, “लहरी स्वभावाची, अरेरावी करणारी, ठाम मताची, शीघ्र कोपी आणि इतरांवर हक्क गाजवणारी होती. तर काही जण तिच्या तल्लख बुद्धीमुळे आणि मोहकतेमुळे; तसेच, तिच्या विस्मयकारक जिवंतपणामुळे आणि मुख्य म्हणजे तिच्या स्वभावातील अनेकानेक विसंगतीमुळे विलक्षण प्रभावित झाले होते.” ते काही असो. एक मात्र खरे: नर्सिंग आणि हॉस्पिटल मॅनेजमेंटमधील फ्लॉरेंस नाईटिंगेलच्या तंत्रांची मुळे आज जगभरातील अनेक देशांत पसरली आहेत. म्हणूनच, फ्लॉरेंस नाईटिंगेलला आधुनिक नर्सिंगची जननी मानले जाते.
[चित्र]
नाईटिंगेल ट्रेनिंग स्कूल फॉर नर्सेसची स्थापना झाल्यानंतरचे सेंट थॉमस हॉस्पिटल
[चित्राचे श्रेय]
Courtesy National Library of Medicine
[८ पानांवरील चौकट/चित्र]
नर्सची पात्रता
नर्स: “ज्या व्यक्तीने नर्सिंगचे मूलभूत ज्ञान आणि ट्रेनिंग घेतले आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण व वैद्यकीय कार्यक्षमता प्राप्त केलेली आहे.”
रेजिस्टर्ड नर्स: “स्टेट बोर्डची परीक्षा देऊन डिग्री प्राप्त केलेली नर्स . . . आणि जी आर.एन. (रेजिस्टर्ड नर्स) या अधिकृत नावाखाली काम करू शकते.”
क्लिनिकल नर्स स्पेशिएलिस्ट: “एक रजिस्टर्ड नर्स जिने नर्सिंगच्या एका विशिष्ट क्षेत्रात अधिक ज्ञान, कुशलता आणि कार्यक्षमता प्राप्त केली आहे.”
नर्स मिडवाईफ (सुईण): “नर्सिंग आणि बाळंतपण याविषयीचे शिक्षण घेतलेली व्यक्ती.”
प्रॅक्टिकल नर्स: “अशी व्यक्ती जिने नर्सिंगचे शिक्षण घेतले नाही किंवा त्या क्षेत्रात डिग्रीही प्राप्त केली नाही पण नर्सिंगचा तिला व्यावहारिक अनुभव आहे.”
लायसेन्स्ड प्रॅक्टिकल नर्स: “एक नर्स जिने प्रॅक्टिकल नर्सिंग स्कूलमधून ट्रेनिंग घेतले आहे . . . आणि लायसेन्स्ड प्रॅक्टिकल नर्स म्हणून ती अधिकृतपणे काम करू शकते.”
[चित्राचे श्रेय]
Dorland’s Illustrated Medical Dictionary या अमेरिकन प्रकाशनातून
UN/J. Isaac
[९ पानांवरील चौकट/चित्रे]
‘आरोग्य-निगेचा आधारस्तंभ’
सन १९९९ च्या जून महिन्यात इंटरनॅशनल काउंसिल ऑफ नर्सेसच्या शताब्दी परिषदेत जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर-जनरल डॉ. ग्रो हेर्लम ब्रुंडलंड यांनी म्हटले:
“आरोग्य-निगेच्या पेशेत नर्सेसना खूप महत्त्व आहे. त्यामुळे जगभरातल्या सर्व लोकांसाठी बरेच काही करण्याची विलक्षण क्षमता त्यांच्यात आहे. . . . बहुतेक देशांत आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षम आरोग्य सेवकांमध्ये नर्सेसची आणि सुईणींची संख्या एकूण ८० टक्के आहे. यांवरून स्पष्ट होते, की २१ व्या शतकात सर्वांना उत्तम आरोग्य मिळवून देण्याचे ध्येय गाठण्यासाठी आरोग्य-निगेच्या क्षेत्रात आवश्यक बदल घडवून आणण्याची जबरदस्त ताकद नर्सेसमध्ये आहे. निरनिराळ्या पद्धतीने आरोग्य-सेवा केल्याने आरोग्य-निगेच्या क्षेत्रात ते प्रचंड मोठ्या प्रमाणात योगदान करतात. . . . यात कोणतीही शंका नाही की आरोग्य-निगेच्या बहुतेक संघांचे त्या आधारस्तंभ आहेत.”
मेक्सिकोचे राष्ट्रपती, अर्नेस्तो सेडेयो पॉनसे दे लेओन यांनी आपल्या भाषणात मेक्सिकोतील नर्सेसचे खास कौतुक करत म्हटले: “दिवसामागून दिवस तुम्ही सर्व . . . मेक्सिकन लोकांना निरोगी आणि सुदृढ बनण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करता, एकजुटीने काम करता, सेवा करता. दिवसामागून दिवस तुम्ही लोकांची फक्त सेवाच करत नाही तर प्रेमाने, समर्पित भावनेने आणि सहानुभूतीने तुम्ही लोकांचे सांत्वनही करता. . . . आपल्या आरोग्य संस्थांमध्ये तुमचा विभाग सर्वात मोठा आहे . . . वाचणारा प्रत्येक जीव, प्रत्येक बालकाला मिळणारी लस, जगात येणारे प्रत्येक बाळ, आरोग्यविषयावरील प्रत्येक भाषण, प्रत्येक उपचार, काळजी आणि आधार मिळणारा प्रत्येक रुग्ण या सर्वांमागे आपल्या नर्सेसचा हात असतो.”
[चित्राचे श्रेय]
UN/DPI Photo by Greg Kinch
UN/DPI Photo by Evan Schneider
[११ पानांवरील चौकट/चित्र]
प्रशंसा करणारा डॉक्टर
न्यूयॉर्क प्रेस्बीटेरियन हॉस्पिटलचे डॉ. संदीप जौहर उत्तम आणि कार्यक्षम नर्सेसची मनस्वी प्रशंसा करतात. ते अशा एका घटनेविषयी सांगतात जेव्हा मरणाला टेकलेल्या एका रुग्णाला जास्त मॉर्फिन देण्याची गरज आहे हे एका नर्सने त्यांना फार कुशलतेने पटवून सांगितले. त्यांनी लिहिले: “चांगल्या नर्सेसकडून डॉक्टरही पुष्कळ काही शिकू शकतात. इंटेन्सीव केअर युनिटसारख्या (अति-दक्षता विभाग) खास वॉर्डांमध्ये काम करणाऱ्या नर्सेस हॉस्पिटलमधल्या सर्वोत्कृष्ट प्रशिक्षित नर्सेस असतात. मी शिकाऊ डॉक्टर असताना कॅथिटर कसे लावायचे आणि कृत्रिम श्वास देणारे यंत्र कसे बसवायचे हे त्यांनीच मला शिकवले. कोणती औषधे टाळावीत हेसुद्धा त्यांनीच मला सांगितले.”
त्यांनी पुढे असेही म्हटले की, “रुग्णांसोबत नर्सेस जास्त वेळ असल्यामुळे रुग्णांना आवश्यक असलेला मानसिक आणि भावनिक आधार नर्सेसच देतात. . . . माझ्या भरवशातल्या कोणा नर्सने मला पेशंटला पाहण्याची घाई केली की मी लगेच तिचे ऐकतो; एरवी मी असे करत नाही.”
[७ पानांवरील चित्र]
“इतरांची सेवा करण्याची मला मनस्वी इच्छा होती.”—टेरी वेथरसन, इंग्लंड.
[७ पानांवरील चित्र]
“हॉस्पिटलमध्ये वडिलांची ती केविलवाणी अवस्था पाहूनच मी ठरवले की मोठे होऊन नर्स बनायचे आणि आजाऱ्यांची शुश्रूषा करायची.”—एत्सको कोटेनी जपान.
[७ पानांवरील चित्र]
‘बाळंतपण हा एका दांपत्यासाठी आणि सुईणीसाठी सगळ्यात सुंदर अनुभव आहे.’—योलेंडे किलन-फेन होफ्ट, नेदरलंड.
[८ पानांवरील चित्र]
सुईणींच्या मदतीने बाळ जगात येते तेव्हा सुईणींना आनंद आणि समाधान वाटते.