व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नर्सेस आपल्याला त्यांची गरज का आहे?

नर्सेस आपल्याला त्यांची गरज का आहे?

नर्सेस आपल्याला त्यांची गरज का आहे?

“नर्सिंग हा खूप अवघड पेशा आहे. किंबहुना, ती एक कला आहे. एक यशस्वी नर्स बनण्यासाठी केवळ दयेची भावना असून चालत नाहीत. त्याकरता नर्सिंगचे पूर्ण ज्ञान असणेही जरूरीचे आहे.”—मेरी ॲडलेड नर्ट्टिंग, १९२५, जगातली नर्सिंगची पहिली प्रोफेसर.

नर्सिंगचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. किंबहुना, बायबलमध्येसुद्धा त्याचा उल्लेख आढळतो. (१ राजे १:२-४) आजवर अनेक नामांकित स्त्रियांनी आजाऱ्‍यांची सेवा केली याला इतिहास साक्ष आहे. उदाहरणार्थ, हंगेरीच्या राजघराण्यातली एलिजाबेथ. (१२०७-३१) अँड्रू दुसरा या राजाची ती कन्या होती. सन १२२६ मध्ये दुष्काळ पडला तेव्हा तिने अन्‍न-वाटपाची मोहीम राबवली. त्यानंतर तिने अनेक हॉस्पिटल्स बांधले. आणि तिथे कुष्ठरोग्यांची निगा राखली. एलिजाबेथचा मृत्यू झाला तेव्हा ती अवघ्या २४ वर्षांची होती. पण, या लहानशा आयुष्यातील जास्तीतजास्त वर्षे तिने रोग्यांची सेवा करण्यात खर्च केली.

नर्सिंगच्या इतिहासाविषयी बोलताना चटकन लक्षात येते ते फ्लॉरेंस नाईटिंगेल या स्त्रीचे नाव. फ्लॉरेंस नाईटिंगेल एक निर्भीड व धाडसी इंग्रज स्त्री होती. सन १८५३-५६ च्या क्रिमयन युद्धात तिने केवळ ३८ नर्सेसना हाताशी धरून कॉन्स्टँटिनोपल शहराजवळच्या स्कूटेरी उपनगरातील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये अनेक सुधारणा केल्या आणि त्याचा चेहरामोहराच बदलून टाकला. ती पहिल्यांदा त्या हॉस्पिटलमध्ये आली होती तेव्हा पेशंट्‌सच्या मृत्यूचे प्रमाण जवळजवळ ६० टक्के होते. पण, १८५६ साली तिने हॉस्पिटल सोडले तेव्हा ते दोन टक्क्यांहून कमी झाले होते.—पृष्ठ ६ वरील चौकट पाहा.

क्रिमियात जाण्याआधी फ्लॉरेंसने जर्मनीतील कायजर्सवर्थ शहरातील इन्स्टिट्यूट ऑफ प्रॉटेस्टंट डीकननीसस या संस्थेमधून नर्सिंगचे ट्रेनिंग घेतले होते. नर्सिंगच्या क्षेत्रावर या संस्थेचा देखील जबरदस्त प्रभाव होता. नंतरच्या काळात अशा अनेक संस्था निर्माण झाल्या. त्यांपैकी प्रोफेशनल ऑर्गनायजेशन फॉर जर्मन नर्सेस ही एक संस्था होती. सन १९०३ मध्ये ॲग्नेस कार्ल या स्त्रीने या संस्थेची स्थापना केली होती.

आज आरोग्य-निगा क्षेत्रात अनेक पेशेवाईक लोकांचा भरणा असला तरी यात नर्सेसची संख्या सगळ्यात जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, सध्या जगभरात १४१ देशांत ९०,००,००० हून अधिक नर्सेस व सुईणी सेवा करत आहेत. यांची ही सेवा खरोखरच एक जीवन-दायी सेवा आहे! दी ॲटलान्टिक मंथली मासिकानुसार “रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी काळजी, सुजाणता, आणि भरवसा या तिन्ही गोष्टींची अत्यंत गरज असते. नर्स या तिन्ही गोष्टींची सुरेख सांगड घालते.” खरोखरच, नर्सच्या कामाला पर्याय नाही.

रुग्णाला पुन्हा आरोग्य मिळवून देण्यात नर्सचे योगदान

एक एन्सायक्लोपिडिया नर्सिंगची व्याख्या अशाप्रकारे करते: “पेशंटला त्याच्या आजारातून अथवा दुखापतीतून बरे होण्यास आणि पुन्हा एकदा स्वावलंबी होण्याकरता दिली जाणारी मदत.”

हे सर्व करण्यासाठी अर्थातच नर्सला खूप मेहनत करावी लागते. पल्स आणि ब्लड प्रेशर तपासणे या नेहमीच्या गोष्टींशिवाय तिला आणखीन बरेच काही करावे लागते. पेशंट बरा होण्यात नर्सचे महत्त्वाचे योगदान असते. दी अमेरिकन मेडिकल असोसिएशन एन्सायक्लोपिडिया ऑफ मेडिसिननुसार, “एका कुशल नर्सला पेशंटच्या आजाराचीच फक्‍त चिंता नसते. तर त्याच्या भावनांची देखील ती मनस्वी कदर करते. पेशंटच्या मानसिक आणि शारीरिक वेदना कमी करण्याचा ती आटोकाट प्रयत्न करते. तसेच, काही कॉमप्लिकेशन्स (गुंतागुंतीची स्थिती) निर्माण होऊ नये म्हणून ती जीव ओतून प्रयत्न करते. पेशंटच्या गरजांकडे ती जातीने लक्ष देते. पेशंट आपल्या आजाराविषयी चिंता व भीती व्यक्‍त करतो तेव्हा ती लक्षपूर्वक ऐकते आणि त्याचे सांत्वन करते. पेशंट अगदी शेवटच्या स्थितीत असतो तेव्हा देखील ती त्याला कमीत कमी वेदना होतील याकरता प्रयत्नशील असते आणि त्याच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही याचीही ती काळजी घेते.”

पण, अशा अनेक नर्सेस आहेत ज्या केवळ आपली ड्यूटी करून बाजूला होत नाहीत; तर आपल्या आवाक्याबाहेर जाऊन बरेच काही करतात. न्यूयॉर्कच्या मॉन्टीफिओर मेडिकल सेंटरमध्ये एकेकाळी नर्स म्हणून काम करणाऱ्‍या एलिन डी बेरने या इस्पितळातील सेवेचे आपले अनुभव लिहिले आहेत. दररोज सकाळी सर्जरी टीमसह काम करत असताना ती यांत्रिकपणे हे काम उरकून टाकत नसे. ती लिहिते: “पेशंट्‌सबरोबर जास्त वेळ राहायला मला फार आवडायचे. श्‍वसन व्यायाम करण्यात, चालण्या-फिरण्यात मी त्यांची मदत करायचे, त्यांची व्यवस्थित ड्रेसिंग करायचे; तसेच, त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यायचे, आजाराविषयी खुलासा करायचे आणि त्यांना धीर द्यायचे. पेशंट्‌सचा सहवास मला खरोखरच फार सुखावह आणि हवाहवासा वाटायचा.”

तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये गेला असाल तर सहानुभूती दाखवणारी निःस्वार्थ नर्स तुम्हाला नक्कीच भेटली असेल. पण, एक कुशल नर्स बनण्यासाठी काय करावे लागते?

(g०० ११/८)

[३ पानांवरील चित्र]

फ्लॉरेंस नाईटिंगेल

[चित्राचे श्रेय]

Courtesy National Library of Medicine