व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वेदना घालवणारा अनेस्थेशिया

वेदना घालवणारा अनेस्थेशिया

वेदना घालवणारा अनेस्थेशिया

अठराशे चाळीसच्या दशकाआधी, शस्त्रक्रियेच्या कक्षात जायचे म्हटल्यावरच रुग्णाची भीतीने गाळण उडायची. का? कारण तेव्हा अनेस्थेशिया अर्थात भूल देण्याच्या तंत्राचा अद्याप शोध लागला नव्हता. वेदनेवर विजय (इंग्रजी) या पुस्तकात डेनिस फ्रेडिन म्हणतात: “ऑपरेशन कक्षात जाताना डॉक्टर दोन दोन व्हिस्कीच्या बाटल्या घेऊन जायचे. एक पेशन्टसाठी आणि पेशन्टचा आरडाओरडा सहन करता यावा म्हणून एक स्वतःसाठी!”

रुग्णांना नशेचे पदार्थ देण्याची प्रथा

शस्त्रक्रियेच्या वेदना सुसह्‍य करण्यासाठी त्याकाळी डॉक्टर, दंतवैद्य आणि रुग्ण बरेच निरनिराळे प्रयोग करायचे. चीनी व भारतीय डॉक्टर भांग आणि हाशिश वापरायचे. तर जगाच्या इतर भागांत अफू आणि मद्याचा वापर केला जायचा. “अनेस्थेशिया” हा शब्द पहिल्यांदा ग्रीक डॉक्टर डियोस्कोरिडीस याने वापरला होता. त्याने मॅन्ड्रेक नावाच्या फळापासून आणि द्राक्षारसापासून तयार केलेली काही औषधे भूल देण्यासाठी उपयोगी असल्याचे सांगितले होते. काही काळानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेच्या वेदना कमी करण्यासाठी संमोहनविद्येचाही वापर करून पाहिला.

पण वेदना काही कमी झाल्या नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर व दंतवैद्य शक्य तितक्या लवकर शस्त्रक्रिया संपवण्याचा प्रयत्न करायचे. कमीतकमी वेळात शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर सर्वात चांगला असा लोकांचा ग्रह झाला. पण, कितीही लवकर करण्याचा प्रयत्न केला तरी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला असह्‍य वेदना व्हायच्याच. त्यामुळे लोक शस्त्रक्रियेच्या नावानेही दूर पळायचे. ट्यूमर असो नाहीतर सगळे दात किडलेले असोत, पण शस्त्रक्रियेच्या किंवा दंतवैद्याकडे जाण्याच्या भीतीमुळे ही सर्व दुखणी सहन करायला ते तयार असायचे.

स्वीट व्हिट्रिऑल आणि लाफिंग गॅस

स्पॅनिश डॉक्टर रेमंड ल्युलस याने १२७५ साली रासायनिक प्रयोग करताना एक बाष्पकारी व ज्वलनशील द्रवपदार्थ तयार केला. त्याचे नाव त्याने स्वीट व्हिट्रिऑल ठेवले. मग १६ व्या शतकात पॅरासेल्सस नावाच्या एका स्विस डॉक्टरने कोंबड्यांवर स्वीट व्हिट्रिऑलचा प्रयोग केला. श्‍वासाद्वारे हा पदार्थ घेतल्यावर कोंबड्या झोपी गेल्या आणि त्यांना वेदनाही जाणवल्या नाहीत. पण ल्युलसप्रमाणेच पॅरासेल्ससने देखील मनुष्यांवर स्वीट व्हिट्रिऑलचा प्रयोग केला नाही. १७३० साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रोबेनियस याने या पदार्थाला ईथर नाव दिले जे आजही वापरले जाते. ग्रीक भाषेत ईथरचा अर्थ “स्वर्गीय” असा होतो. पण भूल देण्याकरता ईथर किती परिणामकारक आहे हे पूर्णपणे समजायला तब्बल ११२ वर्षे लागली.

दरम्यान, १७७२ साली इंग्रज शास्त्रज्ञ जोसेफ प्रीस्टली याने नायट्रस ऑक्साइड नावाच्या वायूचा शोध लावला. हा वायू अगदी थोड्या प्रमाणात घेतला तरी विषारी असतो असा सुरवातीला लोकांचा ग्रह झाला. पण १७९९ साली ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आणि शोधक हंफ्री डेव्ही याने नायट्रस ऑक्साइडचा स्वतःवरच प्रयोग करायचे ठरवले. हा प्रयोग फारच गंमतीशीर ठरला, कारण या वायूच्या संपर्कात येणारी व्यक्‍ती हसू लागते असे डेव्हीच्या लक्षात आले. म्हणून त्याने या वायूचे नाव लाफिंग गॅस (हसवणारा वायू) ठेवले. नायट्रस ऑक्साइड संवेदनाहरण करण्यासाठी कशाप्रकारे प्रभावशाली आहे याविषयी डेव्हीने बरेच लेखन केले, पण त्या वेळी कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही.

ईथर आणि लाफिंग गॅसची लोकप्रियता

लाफिंग गॅस श्‍वासाद्वारे शरीरात घेतल्यानंतर डेव्ही माकडचेष्टा करू लागायचा; हळूहळू तो सुप्रसिद्ध होऊ लागला. काही काळ तर त्याला या गॅसचे व्यसनच लागले होते असे म्हणतात. लोक केवळ मौजेखातर हा गॅस घेऊ लागले. ठिकठिकाणी जाऊन मनोरंजनाचे खेळ करणारे, आपल्या कार्यक्रमांत प्रेक्षकांपैकी एखाद्याला स्टेजवर बोलावून नायट्रस ऑक्साईड श्‍वासाद्वारे शरीरात घ्यायला लावायचे. या गॅसच्या प्रभावाखाली, व्यक्‍ती सगळा संकोच विसरून अफलातून चेष्टा करी आणि प्रेक्षकांना पोटभर हसायला मिळे.

जवळजवळ याच दरम्यान, ईथरचाही अशाचप्रकारे मौजेखातर उपयोग होऊ लागला. एकदा क्रॉफड डब्ल्यु. लाँग या तरुण अमेरिकन डॉक्टरच्या लक्षात आले की ईथरच्या प्रभावाखाली असताना त्याचे मित्र अडखळून खाली पडायचे आणि त्यांना मार लागायचा तरीसुद्धा त्यांना वेदना होत नव्हत्या. शस्त्रक्रिया करताना ईथरचा प्रयोग केला तर, असा लगेच त्याच्या मनात विचार आला. योगायोगाने ‘ईथर घेऊन मौज’ करणाऱ्‍यांपैकी जेम्स वेनबल या विद्यार्थ्याला बऱ्‍याच काळापासून दोन लहान ट्यूमर झाले होते व तो ते काढून टाकू इच्छित होता. पण शस्त्रक्रियेच्या भीतीने तो टाळाटाळ करत होता. लाँगने ईथर घेऊन शस्त्रक्रिया करून पाहण्याचे सुचवले; वेनबल तयार झाला आणि मार्च ३०, १८४२ रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान त्याला मुळीच वेदना झाल्या नाहीत. पण १८४९ सालापर्यंत लाँगने आपला हा नवा शोध जाहीर केला नाही.

दंतवैद्यांना देखील अनेस्थेसियाचा शोध लागतो

अमेरिकेत हॉरस वेल्स नावाचा दंतवैद्य १८४४ साली डिसेंबर महिन्यात एका मनोरंजनाच्या कार्यक्रमाला गेला होता. तेथे गार्डनर कोल्टन याने नायट्रस ऑक्साईडचा प्रयोग करून दाखवला. वेल्स याने स्टेजवर जाऊन गॅस श्‍वासाद्वारे शरीरात ओढला. पण त्या स्थितीतही त्याला लक्षात आले की गॅस घेतलेला आणखी एकजण एका बेंचवर जाऊन आदळला, त्याच्या पायातून रक्‍तही येऊ लागले, पण त्याला वेदना जाणवली नाही. त्याच रात्री वेल्सने ठरवले की दंतोपचार करताना या नायट्रस ऑक्साईडचा उपयोग करावा. पण पहिल्यांदा त्याने स्वतःवरच प्रयोग करायचे ठरवले. त्याची एक अक्कलदाढ दुखत होती. त्यामुळे जॉन रिग्स या आपल्या सोबतच्या एका दंतवैद्याला त्याने ही दाढ काढायला सांगितले. एकीकडून कोल्टन त्याला नायट्रस ऑक्साईड देत होता. दात काढताना त्याला जराही वेदना जाणवली नाही.

वेल्स याने हा नवा शोध जाहीर करण्यासाठी आपल्या सोबत्यांसमोर नायट्रस ऑक्साईड देऊन शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक करायचे ठरवले. पण हे प्रात्यक्षिक करताना तो अतिशय घाबरला होता आणि रुग्णाला चुकून कमी गॅस देण्यात आला. त्यामुळे दात ओढून काढताना रुग्णाने किंकाळी फोडली. पाहणारे सर्वजण वेल्सची टर उडवू लागले. पण त्यांनी खरे तर त्या रुग्णाची प्रतिक्रिया ऐकली नव्हती कारण नंतर त्याने वेल्सला सांगितले की तो ओरडला खरा पण त्याला फार काही वेदना जाणवली नव्हती.

सप्टेंबर ३०, १८४६ रोजी विल्यम मॉर्टन या अमेरिकन दंतवैद्याने एका पेशन्टला ईथर देऊन त्याचा दात काढला; रुग्णाला कसलीही वेदना जाणवली नाही. याच ईथरचा प्रयोग १८४२ साली लाँग याने देखील केला होता. मॉर्टनने चार्ल्स टॉमस जॅक्सन या रसायनशास्त्रज्ञाच्या मदतीने ईथर तयार केले होते. लाँगप्रमाणे आपला शोध गुप्त ठेवण्याऐवजी मॉर्टनने ईथरच्या संवेदनाहारक गुणधर्मांचे सर्वांसमोर प्रात्यक्षिक करायची व्यवस्था केली. मॅसच्युसेट्‌स राज्यातील बॉस्टन शहरात ऑक्टोबर १६, १८४६ रोजी मॉर्टनने एका रुग्णाला भूल दिली. मग डॉ. वॉरन नावाच्या एका सर्जनने या रुग्णाच्या जबड्याखालील ट्यूमरवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरली. कारण लगेच सबंध अमेरिकेत आणि युरोपात ही बातमी पसरली.

आणखी शोध

या रोमांचकारी शोधांमुळे अनेकांना वेगवेगळ्या गॅसेसचा उपयोग करून अशाचप्रकारचे प्रयोग करण्याचे प्रोत्साहन मिळाले. १८३१ साली क्लोरोफॉर्मचा शोध लावण्यात आला आणि १८४७ साली त्याचा यशस्वीपणे उपयोग केला गेला. काही ठिकाणी डॉक्टर इतर संवेदनाहारकांपेक्षा क्लोरोफॉर्म देणे पसंत करू लागले. लवकरच, बाळंतपणाच्या वेळी स्त्रियांना देखील क्लोरोफॉर्म दिला जाऊ लागला. १८५३ साली इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीलाही बाळंतपणाच्या वेळी क्लोरोफॉर्म देण्यात आला होता.

पण अनेस्थेशियाचा इतिहास तितका स्पष्ट नाही. लाँग, वेल्स, मॉर्टन, किंवा मॉर्टन यांना मदत करणारा प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ जॅक्सन यांच्यापैकी नेमक्या कोणाला जनरल अनेस्थेशियाचा (भूल देण्यासाठी वापरले जाणारे रासायनिक पदार्थ नव्हे) शोध लावण्याचे श्रेय दिले जावे याविषयी मोठा वाद उपस्थित झाला. आजपर्यंत हा वाद मिटलेला नाही. पण काहीजण या चौघांचेही योगदान मोलवान असल्याचे कबूल करतात.

यादरम्यान लोकल म्हणजे स्थानिक अनेस्थेशियाच्या क्षेत्रातही प्रगती केली जात होती. या प्रक्रियेत रुग्णाला बेशुद्ध केले जात नाही, पण विशिष्ट औषधे देऊन शरीराचा एखादा भागच केवळ बधीर केला जातो. आजकाल दंतवैद्य दातांवर आणि हिरड्यांवर उपचार करताना सहसा स्थानिक अनेस्थेशियाच्या तंत्राचा वापर करतात. तसेच, किरकोळ शस्त्रक्रियांसाठी किंवा शस्त्रक्रियेनंतरच्या जखमांवर उपचार करताना या तंत्राचा वापर केला जातो. बाळंतपणाच्यावेळी स्त्रियांना सहसा लोकल अनेस्थेशियाच दिला जातो.

वैद्यकीय क्षेत्रात, भूल शास्त्र हे आज एक स्वतंत्र शास्त्र मानले जाते. शस्त्रक्रियेआधी रुग्णाला तयार करण्यात अनेस्थेशियोलॉजिस्ट देखील भाग घेतात. रुग्णाला भूल देण्याकरता अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग केला जातो. याकरता वापरल्या जाणाऱ्‍या काही औषधांत अनेक रसायनिक पदार्थांचे व ऑक्सीजनचे प्रमाणशीर मिश्रण केले जाते. डॉक्टरने केव्हा भूल देणाऱ्‍या गॅसचा उपयोग केला हे बऱ्‍याच रुग्णांना कळत देखील नाही कारण हे सहसा शीरेतून सुरवातीचा अनेस्थेशिया दिल्यानंतर केले जाते. शस्त्रक्रियेनंतरही वेदना कमी ठेवण्यासाठी रुग्ण काही काळ अनेस्थेशियोलॉजिस्टच्या देखरेखीखाली असतो.

तुम्हाला कधी शस्त्रक्रिया करण्याची गरज पडल्यास, फार घाबरू नका. दोन शतकांआधी, शस्त्रक्रियेच्या टेबलवर आपण झोपलो आहोत आणि सर्जन दार उघडून हातात दोन व्हिस्कीच्या बाटल्या घेऊन आत येतोय अशी कल्पना करा. मग तुम्हाला ऑपरेशन थिएटरमधील अनेस्थेशियोलॉजिस्टच्या आधुनिक उपकरणांची मुळीच भीती वाटणार नाही.

(g०० ११/२२)

[२० पानांवरील चौकट]

ॲक्यूपंक्चर—वेदनेपासून मुक्‍त होण्याची पौर्वात्य पद्धत

ॲक्युपंक्चर ही वेदना शमवणारी एक प्राचीन चीनी उपचारपद्धत आहे. या पद्धतीने उपचार करताना शरीरातील विशिष्ट बिंदूंवर सुया टोचल्या जातात. ज्या अवयवाचा उपचार करायचा आहे त्यावर नाही तर शरीराच्या इतर भागांवर सुया टोचल्या जातात. सुया टोचल्यानंतर त्या एकतर फिरवल्या जातात किंवा कमी व्होल्टेजची करंट त्यातून सोडली जाते. एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिका यात सांगितल्यानुसार “चीनमध्ये शस्त्रक्रिया करताना भूल देण्याकरता [ॲक्युपंक्चर पद्धतीचा] सर्रास वापर केला जातो. कित्येक पाश्‍चात्त्य पाहुण्यांनी, पूर्णपणे शुद्धीवर असलेल्या चीनी रुग्णांवर मोठमोठ्या (वेदनामय समजल्या जाणाऱ्‍या) शस्त्रक्रिया केल्या जात असताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. या शस्त्रक्रियांदरम्यान ॲक्युपंक्चरने केवळ स्थानिक भूल देण्यात आली होती आणि रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर होते.”

ॲक्युपंक्चर हे फक्‍त प्रशिक्षित तज्ज्ञानेच केले पाहिजे. एन्सायक्लोपिडिया अमेरिकानानुसार “कधीकधी ॲक्युपंक्चरच्या सुया चुकून हृदयात किंवा फुफ्फुसात जातात; तसेच योग्यप्रकारे निर्जंतुक न केलेल्या सुया वापरल्यामुळे यकृताचा दाह, संसर्गदोष किंवा इतर समस्या निर्माण होतात.” अर्थात जनरल अनेस्थेशियासाठी कोणत्याही प्रकारची औषधे वापरली जावोत, हे धोक्यांपासून पूर्णपणे मुक्‍त नाही. पण हे तर शस्त्रक्रियांविषयीही म्हणता येईल.

[२१ पानांवरील चित्र]

वैद्यकीय क्षेत्रात, भूल शास्त्र हे आज एक स्वतंत्र शास्त्र मानले जाते

[चित्राचे श्रेय]

Courtesy of Departments of Anesthesia and Bloodless Medicine and Surgery, Bridgeport Hospital - CT

[१९ पानांवरील चित्राचे श्रेय]

पृष्ठे २ व १९: Reproduced from Medicine and the Artist (Ars Medica) by permission of the Philadelphia Museum of Art/Carl Zigrosser/ Dover Publications, Inc.