व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती लोकांनी चर्चला जावे का?

ख्रिस्ती लोकांनी चर्चला जावे का?

बायबलचा दृष्टिकोन

ख्रिस्ती लोकांनी चर्चला जावे का?

“मी पूर्वी चर्चला जायचो, पण आता मी जायचे सोडून दिले आहे.” “माझ्या मते देवाची उपासना कोठेही करता येते, त्याच्यासाठी चर्चमध्येच जाण्याची गरज नाही.” “मी देवाला मानतो, बायबलही मानतो, पण चर्चला जाणे आवश्‍यक आहे असे मी मानत नाही.” असे म्हणणाऱ्‍या लोकांना तुम्ही कधी भेटला आहात का? स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍या लोकांपैकी असे म्हणणाऱ्‍यांची संख्या अलीकडे वाढत चालली आहे, खासकरून पाश्‍चात्त्य देशांत. जे लोक पूर्वी चर्चला जात होते त्यांना आता त्याची आवश्‍यकता वाटत नाही. चर्चला जाण्याविषयी बायबल काय सांगते? परमेश्‍वराने उपासना मान्य करावी म्हणून ख्रिस्ती लोकांनी कोणत्या खास ठिकाणी जाऊन उपासना करणे आवश्‍यक आहे का?

इस्राएल राष्ट्रातील उपासना

मोशेच्या नियमशास्त्रानुसार सर्व यहुदी पुरुषांना तीन वार्षिक उत्सवांकरता एका विशिष्ट ठिकाणी उपस्थित राहण्याची आज्ञा देण्यात आली होती. बऱ्‍याच स्त्रिया व लहान मुले देखील याप्रसंगी उपस्थित राहायची. (अनुवाद १६:१६; लूक २:४१-४४) काही प्रसंगी याजक व लेवी एकत्र येणाऱ्‍या या लोकांना देवाच्या नियमशास्त्रातून वाचून दाखवायचे व त्यातून बोध करायचे. ते देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ ‘स्पष्टीकरणासह वाचून दाखवायचे.’ (नहेम्या ८:८) शब्बाथ वर्षांकरता देवाने असे मार्गदर्शन दिले होते: “सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके आणि तुझ्या नगरातला उपरी ह्‍यांना जमव म्हणजे ते ऐकून शिकतील आणि तुमचा देव परमेश्‍वर ह्‍याचे भय धरतील आणि ह्‍या नियमशास्त्रातली सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील.”—अनुवाद ३१:१२.

केवळ जेरुसलेममधील मंदिरातच एक व्यक्‍ती देवाला बलिदाने अर्पण करू शकत होती आणि तेथेच लोकांना याजकांकडून दिले जाणारे मार्गदर्शन मिळू शकत होते. (अनुवाद १२:५-७; २ इतिहास ७:१२) कालांतराने, इस्राएलमध्ये उपासनेकरता इतर इमारती, अर्थात सभास्थाने बांधण्यात आली. या इमारती शास्त्रवचनांच्या वाचनाकरता व प्रार्थनेकरता होत्या. तरीसुद्धा, जेरुसलेममधील मंदिरच उपासनेचे मुख्य केंद्र होते. बायबलमधील लेखक लूक याने लिहिलेल्या एका वृत्तान्तावरून हे लक्षात येते. तो हन्‍ना नावाच्या एका वयस्क स्त्रीचा उल्लेख करतो. ही स्त्री “मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे.” (लूक २:३६, ३७) देवाला विश्‍वासू असणाऱ्‍या इतरांसोबत खऱ्‍या उपासनेत सहभागी होणे हे हन्‍नाच्या जीवनात सर्वात महत्त्वाचे होते. इतर देवभीरू यहुद्यांचीही अशीच मनोवृत्ती होती.

ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर खरी उपासना

येशूच्या मृत्यूनंतर त्याचे अनुयायी मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करण्यास बांधील नव्हते, आणि मंदिरात जाऊन उपासना करण्याचीही त्यांच्यावर सक्‍ती नव्हती. (गलतीकर ३:२३-२५) पण प्रार्थना व देवाच्या वचनाच्या अभ्यासाकरता एकत्र येण्याचे मात्र त्यांनी सोडले नाही. यासाठी त्यांच्याजवळ प्रशस्त इमारती नव्हत्या, तर विश्‍वासू जनांच्या घरांत व सार्वजनिक ठिकाणी ते एकत्र येत असत. (प्रेषितांची कृत्ये २:१, २; १२:१२; १९:१९; रोमकर १६:४, ५) पहिल्या शतकातील त्या ख्रिस्ती सभांचा साधेपणा वाखाणण्याजोगा होता; कोणत्याही प्रकारचे कर्मकांड किंवा दिखावटीपणा या सभांमध्ये नव्हता.

रोमन साम्राज्यातील त्याकाळची नैतिक स्थिती अत्यंत निराशाजनक होती, पण या सभांमध्ये शिकवली जाणारी बायबलची तत्त्वे त्या अंधकारमय परिस्थितीत चमकणाऱ्‍या हिऱ्‍यांप्रमाणे होती. सत्य न मानणाऱ्‍यांपैकी काहीजण जेव्हा पहिल्यांदा या सभांना यायचे तेव्हा ते विस्मित होऊन म्हणायचे: “तुम्हामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे.” (१ करिंथकर १४:२४, २५) होय, देव खरोखर त्यांच्यामध्ये होता. “ह्‍यावरून मंडळ्या [“चर्चेस,” आरएस, जेबी] विश्‍वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली.”—प्रेषितांची कृत्ये १६:५.

त्या काळात राहणाऱ्‍या एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीने विदेश्‍यांच्या मंदिरात किंवा एकएकट्याने उपासना केली असती तर त्या व्यक्‍तीची उपासना देवाने स्वीकारली असती का? बायबल या विषयावर स्पष्ट मार्गदर्शन देते: देवाच्या स्वीकृतीसाठी एकच खऱ्‍या चर्चचा, अर्थात मंडळीचा म्हणजेच खऱ्‍या उपासकांच्या ‘एकच शरीराचा’ भाग बनणे अनिवार्य होते. हे एकच शरीर म्हणजे ख्रिस्ती म्हटले जाणारे येशूचे शिष्य होते.—इफिसकर ४:४, ५; प्रेषितांची कृत्ये ११:२६.

आजच्याबाबतीत कसे?

बायबल आपल्याला चर्चमध्ये उपासना करण्याचे प्रोत्साहन देण्याऐवजी चर्चसोबत, अर्थात ‘जिवंत देवाच्या मंडळीसोबत’ किंवा ‘आत्म्याने व खरेपणाने उपासना’ करणाऱ्‍यांसोबत उपासना करण्याचे प्रोत्साहन देते. (१ तीमथ्य ३:१५; योहान ४:२४) देवाची स्वीकृती असलेल्या धार्मिक सभांमध्ये लोकांना ‘पवित्र वर्तणूक व सुभक्‍ती’ यांविषयी मार्गदर्शन मिळाले पाहिजे. (२ पेत्र ३:११) या सभांनी उपस्थित राहणाऱ्‍यांना प्रगल्भ मनोवृत्तीचे ख्रिस्ती बनण्यास म्हणजे ‘चांगले आणि वाईट समजण्यास’ मदत केली पाहिजे.—इब्री लोकांस ५:१४.

यहोवाचे साक्षीदार पहिल्या शतकातील ख्रिस्ती जनांनी मांडलेल्या आदर्शाचे पालन करण्याचा प्रयत्न करतात. जगभरात त्यांच्या ९१,४०० पेक्षा जास्त मंडळ्या नियमितपणे बायबलचा अभ्यास करण्याकरता व एकमेकांना उत्तेजन देण्याकरता एकत्र येतात. ते राज्य सभागृहांत, बांधवांच्या घरांत किंवा इतर ठिकाणी एकत्र येतात. हे प्रेषित पौलाच्या शब्दांच्या अनुरूप आहे: ‘आपण आपले एकत्र मिळणे न सोडता, प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ.’—इब्री लोकांस १०:२४, २५.

(g०१ ३/८)