व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

वेदनारहित हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत तीव्र वेदना. आणि बरेच लोक हे लक्षण ओळखतात व सतर्क राहतात. पण टाईम मासिकातील वृत्तानुसार फार कमी लोकांना हे माहीत आहे की “एकूण रुग्णांपैकी एक तृत्यांश रुग्णांना हार्ट अटॅक आल्यावर छातीत जराही वेदना होत नाही.” म्हणूनच कदाचित, द जर्नल ऑफ दी अमेरिकन मेडिकल असोसिएशन यात प्रकाशित केलेल्या एका लेखानुसार “हार्ट अटॅकला बळी पडणाऱ्‍यांपैकी ज्यांना छातीत वेदना होत नाहीत ते सहसा दवाखान्यात जायला जवळजवळ दोन तास उशीर लावतात.” पण जीवनदायक उपचार मिळवण्यास थोडाही उशीर लावणे धोकेदायक ठरू शकते. मग इतर कोणत्या लक्षणाबद्दल रुग्ण सावध राहू शकतात? टाईम उत्तर देते, “वेदनेव्यतिरिक्‍त सर्वात सहज ओळखू येणारे लक्षण म्हणजे खूप दम लागणे.” त्याच लेखात पुढे असे म्हटले आहे की मळमळ होणे, खूप घाम येणे, “जळजळ होणे व चालल्या फिरल्यामुळे किंवा इतर शारीरिक काम केल्यामुळे ती वाढणे” ही सर्व संभाव्य लक्षणे समजावीत.

(g०१ १/२२)

चिकटणारी पावले

पाल काचेसारख्या गुळगुळीत छतावरूनही अगदी सहज सरपटत जाते. पालींना हे कसे करता येते? या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा कित्येक दशकांपासून प्रयत्न करत आलेल्या वैज्ञानिकांना शेवटी याचे उत्तर सापडले आहे असे त्यांना वाटते. सायन्स न्यूझ नियतकालिकातील वृत्तानुसार, वैज्ञानिक व इंजिनियर्स यांचा एक गट या निष्कर्षावर आला आहे की “पालीच्या पावलांवरील बारीक केस किंवा सीटे कोणत्याही पृष्ठभागाला लागताच त्यांस चिकटण्यास मदत करणारी अतिशय आश्‍चर्यकारक अशी यंत्रणा तयार होते. प्रत्येक सीटा म्हणजेच केसातून आणखी बारीक स्पॅटूला म्हटलेले लव उभे राहतात. पालीने छतावर पाऊल ठेवताच तिच्या पावलांवर अगदी जवळजवळ असलेले कोट्यवधी स्पॅटूला . . . कदाचित आंतररेणवीय शक्‍तीमुळे त्या पृष्ठभागाला अगदी घट्टपणे धरून ठेवतात.” संशोधकांना हे देखील दिसून आले आहे की पाली एका विशिष्ट प्रकारे पाऊल ठेवतात, म्हणजे पाऊल ठेवताना “पावलांवरील केसांना छताच्या पृष्ठभागावर दाबतात आणि त्याच वेळी त्यांना जोराने ओढतात देखील.” या क्रियेमुळे “फक्‍त दाबण्याच्या तुलनेत, प्रत्येक केसाची पकड १० पटीने वाढते,” असे त्या नियतकालिकात म्हटले होते.

(g०१ १/२२)

ब्रिटनची जनता टीव्ही पाहण्यात अग्रेसर

लंडनचे दैनिक दी इंडिपेंडंट यात प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, “ब्रिटनच्या जनतेपैकी जवळजवळ एक चर्तुर्थांश लोक साधारण एका आठवड्यात कामाच्या ठिकाणी जितका वेळ खर्च करतात तितकाच टीव्ही पाहण्यातही खर्च करतात.” संशोधकांच्या मते सर्वसामान्य ब्रिटिश नागरिक दर आठवडी टीव्ही पाहण्यात २५ तास खर्च करतो तर २१ टक्के नागरिक ३६ पेक्षाही जास्त तास टीव्हीसमोर बसतात. सदर वृत्तानुसार “सामान्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहणाऱ्‍यांत केवळ तरुणांचा समावेश नाही. अभ्यासानुसार असे दिसून आले की यात स्त्रीपुरुषांचा आणि वयस्कांचाही समावेश आहे.” दर आठवडी जवळजवळ ३० तास टीव्ही पाहणाऱ्‍या एका कुटुंबाने असे सांगितले की टीव्हीसमोर बसून त्यांना निदान थोडावेळ आपल्या “काळज्या विसरायला” मदत होते. पण टीव्हीसमोर इतका वेळ घालवण्याच्या सवयीचे साहजिकच अनेक दुष्परिणाम आहेत. लंडनच्या द गार्डियन वीकली या नियतकालिकानुसार २० देशांत घेण्यात आलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले की टीव्ही पाहणाऱ्‍यांच्या यादीत ब्रिटनने “सहज पहिला नंबर पटकावला.” पण दुसरीकडे पाहता, देशातील “साक्षरतेचे प्रमाण निश्‍चित करणाऱ्‍या तीन मुख्य सर्वेक्षणांत मात्र ब्रिटनचा नंबर यादीच्या उत्तरार्धात येतो.”

(g०१ १/२२)

मनुष्याचा सर्वात विश्‍वासू मित्र?

मेक्सिको सिटीच्या एल युनिव्हर्साल दैनिकातील एका वृत्तानुसार लहान मुलांना कुत्र्यासोबत एकटे सोडल्यास त्यांना कुत्रे चावण्याची भीती आहे. सदर वृत्तात म्हटले आहे की “सहसा मुलांनी कुत्र्याची काहीतरी खोडी केल्यामुळेच, स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात ती मुलांना चावतात.” एका मेक्सिकन इस्पितळात मागच्या पाच वर्षांत कुत्री चावल्यामुळे ४२६ बालकांवर उपचार करण्यात आला. यांपैकी १२ टक्के मुलांना कायमची दुखापत किंवा विद्रूपता आली. सदर वृत्तात आईवडिलांना असा सल्ला देण्यात आला की त्यांनी आपल्या मुलांना कुत्र्यांसंबंधी काही महत्त्वाचे नियम पाळायला शिकवावेत: त्यांची खेळणी, घर किंवा खाण्याच्या भांड्यांपासून दूरच राहावे; कुत्रा खात असेल किंवा झोपला असेल तर त्याच्याजवळ जाऊ नये; त्याची शेपटी ओढण्याचा किंवा त्याच्यावर बसण्याचा प्रयत्न करू नये.

(g०१ ३/८)

पुरेशी झोप

ब्रिटिश कोलंबिया मानसशास्त्रज्ञ स्टॅनली कोरेन म्हणतात, “आपला समाज झोपेच्या बाबतीत अतिशय हलगर्जी आहे आणि हे धोकेदायक आहे.” थ्री माइल आयलंड येथील आण्विक दुर्घटना आणि एक्सन वाल्डेज  तेल गळतीची दुर्घटना काही अंशी पुरेशी झोप न मिळाल्यामुळेच झाली होती. कॅनडाच्या मॅक्लीन्स मासिकानुसार, पेंगत गाडी चालवण्यामुळे दर वर्षी उत्तर अमेरिकेत १,००,००० कार दुर्घटना होतात. स्टॅन्फोर्ड विद्यापीठाचे निद्रा रोग विशेषज्ञ डॉ. विलियम डिमेन्ट सांगतात की “आपल्याला किती झोपेची आवश्‍यकता आहे हे सहसा लोकांना समजत नाही.” संशोधक असा सल्ला देतात की चांगली झोप लागण्यासाठी: संध्याकाळचे जेवण झोपण्याआधी निदान तीन तास आधी आटपा. दररोज त्याच वेळी झोपा व उठा. झोपण्याच्या खोलीत टीव्ही किंवा कम्प्युटर ठेवू नका. कॅफेन, अल्कोहोल आणि तंबाखू असलेले पदार्थ टाळा. पाय गरम राहावेत म्हणून मोजे घाला. झोपण्याआधी गरम पाण्याने अंघोळ करा. दररोज व्यायाम करा—पण व्यायाम करून लगेच झोपू नका. शेवटी मॅक्लीन्स मासिकात असे म्हटले आहे: “झोप येत नसेल तर उठून काहीतरी करा. थोडा थकवा जाणवल्यावरच पुन्हा झोपायला जा आणि मग तुमच्या नेहमीच्या वेळी उठा.”

(g०१ ३/८)

स्वयंपाकघराची स्वच्छता

कॅनडाच्या व्हँकूव्हर सन  दैनिकात सांगितल्याप्रमाणे, स्वयंपाकघरात लपून बसलेल्या रोगजन्य जंतूंविरुद्ध “सर्वात उत्तम संरक्षक म्हणजे [सर्वसामान्य] ब्लीच.” या वृत्तात पुढील सूचना दिल्या आहेत: दररोज ४ लिटर कोमट (गरम नाही) पाण्यात ३० मिलिलिटर ब्लीच या प्रमाणानुसार मिश्रण तयार करून ठेवा. पाणी गरम असल्यामुळे ब्लीचचे बाष्पीकरण होते. या मिश्रणाचा उपयोग करून स्वच्छ कापडाने स्वयंपाकघरातील टेबल, ओटा इत्यादी पुसावे व हवेत सुकू द्यावे. कोणतीही वस्तू जितका जास्त वेळ ब्लीचच्या संपर्कात राहील तितक्याच अधिक जंतूंचा नाश होईल. ताटे इत्यादी गरम साबणाच्या पाण्यात धुवावीत आणि मग ती ब्लीचच्या मिश्रणात थोड्या वेळ ठेवून निर्जंतूक करावीत. सुकल्यानंतर त्यांवर कोणत्या रासायनिक पदार्थांचा अंश राहणार नाही. दररोज स्वयंपाकघरात वापरायचे स्पंज, भांडी पुसण्याचे कापड आणि घासण्याचे ब्रश इत्यादी धुवावेत व काहीवेळ ब्लीचमध्ये बुडवून ठेवावेत. आणि खाण्याचे पदार्थ तुमच्या हातांनी दूषित होऊ नयेत म्हणून तुमचे हात देखील चांगल्याप्रकारे, खासकरून नखांखालची घाण काढून नीट धुवावेत.

(g०१ ३/८)

जंतुयुद्ध निरर्थक

युएसए टुडे यातील एका वृत्तानुसार, “अमेरिकन उपभोक्‍ते घरातील जंतुंशी अयोग्यप्रकारे लढत आहेत.” या दैनिकानुसार, टफ्ट्‌स युनिव्हर्सिटीचे डॉक्टर आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ स्टुअर्ट लीव्ही म्हणतात की “मोठ्या प्रमाणात जंतुनाशक उत्पादने वापरल्यामुळे . . . केवळ जंतुनाशक साबणांनाच प्रतिकारक असणारे नव्हे तर प्रतिजैविक औषधांनाही प्रतिकारक असणारे जंतू निर्माण होण्याची भीती आहे.” घरातील वस्तू निर्जंतूक करण्यासाठी जंतुनाशक उत्पादने वापरणे ‘हातोड्याने माशीला मारण्याचा’ प्रयत्न करण्यासारखे आहे असे लीव्ही म्हणतात. त्याउलट, ब्लीच, हायड्रोजन पेरॉक्साईड आणि गरम पाणी व साबण यांसारखी उत्पादने सफाईकरता परिणामकारक तर आहेतच, शिवाय या उत्पादनांना प्रतिकारक असलेले जंतू निर्माण होण्यास ती कारणीभूत ठरत नाहीत. लीव्ही म्हणतात “जंतू खरे तर आपले मित्र आहेत, त्यांच्याशी युद्ध करण्याऐवजी सलोखा करण्याची आवश्‍यकता आहे.”

(g०१ १/२२)

किडे पकडा आणि पैसे कमवा

भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या वन विभागाने अलीकडेच किडे मारण्याची एक अभिनव योजना राबवली आहे. २.५ सेंटीमीटर लांबीच्या हॉपलो नावाच्या किड्यांपासून ६,५०,००० साल वृक्षांच्या जंगलाचे संरक्षण करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे, असे टाइम्स ऑफ इंडिया  यातील वृत्तात सांगण्यात आले. अलीकडे या किड्यांची संख्या वाढल्यामुळे या जातीच्या झाडांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. हे किडे झाडांच्या सालीत आणि खोडात छिद्र करून त्यात राहतात ज्यामुळे झाडे सुकून मरतात. या किड्यांना पकडण्यासाठी वन विभाग “नकली झाडांचा” उपयोग करत आहे. हे किडे जेथे आढळतात तेथे ठिकठिकाणी नव्या साल वृक्षांच्या सालीचे तुकडे टाकले जातात. या तुकड्यांतून स्रवणाऱ्‍या द्रवामुळे हे किडे त्यांकडे आकर्षित होतात आणि या द्रवामुळे त्यांना गुंगी येते; यामुळे त्यांना पकडणे आणखीनच सोपे जाते. जवळपासच्या गावांत राहणाऱ्‍या मुलांना या कामाला लावण्यात आले असून प्रत्येक किड्यामागे त्यांना ७५ पैसे दिले जातात.

(g०१ ३/८)

निवृत्तीनंतरची उदासीनता

लवकर निवृत्ती घेण्याचे काही फायदे निश्‍चित आहेत, पण भावनात्मक दृष्टीने विचार केल्यावर याचे अनेक दुष्परिणाम देखील होतात. ब्राझीलच्या डिआरिओ दे पर्नामबुको  यातील वृत्तानुसार अनेक सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी, निवृत्ती घेतल्यावर त्यांना ‘असमाधान, चिडचिडी वृत्ती, असुरक्षितपणाची व स्वतःची ओळख गमवल्याची भावना, इतकेच नव्हे तर डिप्रेशन आणि सगळे काही हातून निसटत असल्याच्या भावनेने ग्रासले आहे’ अशी तक्रार करतात. जेरिॲट्रिशियन गीडो स्कॅकनिक यांच्या मते, “लवकर निवृत्ती घेणाऱ्‍या पुरुषांना पिण्याची सवय लागणे आणि स्त्रियांना औषधांवर अवलंबून राहण्याची सवय लागणे असामान्य नाही.” ग्रेसा सॅन्टोस या मानसशास्त्रज्ञा असे म्हणतात की नोकरी सोडण्याच्या विचारात असणाऱ्‍यांनी “कर्ज टाळावे, आपल्या कौशल्यांचा उपयोग करत राहण्याचा प्रयत्न करावा आणि कर्जबाजारी होण्याचे कसे टाळावे यासाठी सल्ला घ्यावा.”

(g०१ ३/८)