नजरबंदी करणारा वृक्ष
नजरबंदी करणारा वृक्ष
एक्वाडोर येथील सावध राहा! लेखकाकडून
डिसेंबर महिना अर्धा उलटून गेला होता, पण एक्वाडोर समुद्रतटावरील मैदानी प्रदेशात अजून पाऊस पडला नव्हता. डोंगरांवरील उतार धुळीने झाकलेले होते, त्यामुळे झाडेझुडपे काहीशी भकास दिसत होती. त्यात आभाळ भरून आलेले. अशा या निरुत्साही वातावरणात, पश्चिमेकडे प्रशांत महासागराच्या दिशेने एका हायवेवरून निघालेल्या प्रवाशांचा एक गट आज जरा सुस्तच होता. एवढ्यात, सर्वांची नजर रस्त्याच्या कडेला एका वृक्षावर खिळली. कार अचानक थांबली. सर्वांचे लक्ष वेधून घेणारा हा कोणता वृक्ष होता?
हा आहे पूर्ण बहरलेला गायकन वृक्ष! क्षणभर त्या वृक्षाकडे स्तब्ध होऊन पाहात राहिल्यावर कोणीतरी म्हणाले: “काय देखणा वृक्ष आहे! आणि काय सुरेख रंग! गुलबक्षी, जांभळा, शेंदरी, नारंगी कितीतरी रंगांच्या फुलांचे बहर पाहिलेयत, पण या रंगवैभवापुढे ते सगळेच फिके!”
त्या सुवर्णकांती वृक्षाचे सौंदर्य डोळ्यात साठवून गाडी पुढे निघाली. पण ही केवळ सुरवात होती याची मात्र त्यांना कल्पना नव्हती. थोडे अंतर पुढे गेल्यावर आणखी एक सोनेरी फुलांनी डवरलेला गायकन वृक्ष लागला, आणखी पुढे गेल्यावर तोच प्रकार. जणू सगळी डोंगरे प्रखर सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेली! गायकन वृक्षाचा हा वार्षिक हंगाम. या सुमारास एरवी निस्तेज दिसणाऱ्या वनराईत जणू एकाएकी नेत्रदीपक रंगाची उधळण होते.
पण या रूपवान वृक्षाचे सुवर्णवैभव काही एकाच देशाचे भूषण नाही. दक्षिण व मध्य अमेरिकेतील कितीतरी भागांत हा वृक्ष सर्रास आढळतो. याला अनेक नावे आहेत जशी ॲरागायने, गायकन अमारिलो, आणि याच्या फुलांच्या तुतारीच्या आकाराच्या सोनेरी फुलांवरून गोल्डन ट्रम्पेट, आणि ट्रम्पेट ट्री ही नावे देखील पडली आहेत. या वृक्षाचे शास्त्रीय नाव आहे टॅबेबिया क्रिसँथा.
कित्येक वर्षांपासून गायकन वृक्षाच्या लाकडापासून उच्च प्रतीचे फर्निचर तयार केले जाते. पण यामुळे हा वृक्ष दुर्मिळ होत चालला आहे आणि पर्यायाने काही देशांनी प्रतिबंधक कायदे देखील लागू केले आहेत. निदान यामुळे वर्षातून एकदाच आणि काही दिवसांपुरतेच का होईना पण इथल्या रहिवाशांना आणि पर्यटकांना या असामान्य वृक्षाच्या फुलोऱ्याचे निखालस सौंदर्य मनभरून पाहणे शक्य होईल.
गायकन वृक्ष खरे तर सर्वश्रेष्ठ कलाकाराच्या म्हणजे आपल्या महान सृष्टीकर्त्याच्या, अर्थात या अद्भुत पृथ्वीच्या रचनाकाराच्या अजोड सौंदर्यदृष्टीचा जिवंत पुरावा आहे.
(g०१ ३/८)