व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रेमहीन विवाहात अडकलेले

प्रेमहीन विवाहात अडकलेले

प्रेमहीन विवाहात अडकलेले

“ज्या समाजांत घटस्फोटांचे प्रमाण जास्त आहे तेथे सुखी नसलेल्या कुटुंबांमध्ये घटस्फोट होण्याची व अधिकाधिक विवाहांमध्ये समस्या निर्माण होण्याची जास्त शक्यता असते.”—अमेरिकेतील कौटुंबिक मंडळ.

जीवनातला आनंद आणि दुःख बऱ्‍याच प्रमाणात एका गोष्टीवर अवलंबून असते असे म्हटले जाते. ती गोष्ट म्हणजे विवाह. होय, तुमच्या वैवाहिक जीवनातून तुम्हाला जितका आनंद किंवा दुःख होऊ शकते तितके फार कमी गोष्टींमुळे होते. पण, बाजूच्या पेटीत दाखवल्याप्रमाणे, पुष्कळांच्या वाट्याला दुःखच येत आहे.

पण, फक्‍त घटस्फोटांच्या प्रमाणावरून पूर्ण समस्या लक्षात येत नाही. मोडणाऱ्‍या प्रत्येक विवाहामागे असंख्य असेही विवाह आहेत जे टिकून राहतात. पण, समस्यांनी जखडलेल्या अवस्थेत. ३० पेक्षा अधिक वर्षांपासून विवाहित असलेली एक स्त्री म्हणते, “आमचं कुटुंब एकेकाळी सुखी कुटुंब होतं. मात्र गेली १२ वर्षं अगदी असह्‍य होती. माझ्या पतीला माझ्या भावनांची काही कदरच राहिलेली नाही. भावनिक पातळीवर तो माझा सर्वात मोठा शत्रू बनला आहे.” अशाचप्रकारे, सुमारे २५ वर्षे विवाहित असलेल्या एका पतीने असा खेद व्यक्‍त केला: “माझ्या पत्नीने तर मला साफ सांगून टाकलंय की तिला माझ्यावर आता प्रेमच नाही. तिच्या मते, फक्‍त नावापुरतं एकत्र राहून दोघांच्याही दिशा वेगवेगळ्या ठेवल्या तरच कदाचित जमू शकेल.”

अर्थात, ज्यांची परिस्थिती या टोकाला गेली आहे त्यांतील काहीजण घटस्फोट घेतात. पण पुष्कळजण घटस्फोट घेऊ शकत नाहीत. का? डॉ. कॅरेन कायझर यांच्या मते पती-पत्नींमध्ये प्रेम नसले तरी मुले, समाजाची भीती, आर्थिक परिस्थिती, मित्रमंडळी, नातेवाईक आणि धार्मिक विश्‍वास या कारणांमुळे ते एकत्र राहतात. त्या पुढे म्हणतात, “कायदेशीर घटस्फोट घेऊ न शकणारे हे पती-पत्नी भावनिकरित्या घटस्फोटित सोबत्याबरोबर राहण्याचे ठरवतात.”

विवाहातील आनंद गमावलेल्या पती-पत्नींना असमाधानी जीवन जगण्याशिवाय पर्याय नाही का? आणि घटस्फोट घेता येत नसेल तर प्रेमहीन विवाह हाच एक पर्याय आहे का? अनुभवावरून दिसून येते की अनेक समस्याग्रस्त विवाहांकरता आशा आहे. फक्‍त घटस्फोटाच्या दुःखातूनच नव्हे तर प्रेमहीनतेच्या यातनामय स्थितीतूनही त्यांना वाचवले जाऊ शकते.

(g०१ १/८)

[३ पानांवरील चौकट]

जगभरातील घटस्फोटांचे प्रमाण

ऑस्ट्रेलिया: १९६० च्या दशकाच्या सुरवातीपासून घटस्फोटांचे प्रमाण जवळजवळ चौपट झाले आहे.

ब्रिटन: अंदाजांनुसार, १० पैकी ४ विवाहांचा घटस्फोट होईल.

कॅनडा आणि जपान: जवळजवळ एक-तृतीयांश विवाहांचा शेवट घटस्फोटात होतो.

संयुक्‍त संस्थाने: १९७० पासून, एकूण विवाहित जोडप्यांपैकी केवळ ५० टक्के एकत्र राहण्याची शक्यता उरली आहे.

झिम्बाब्वे: ५ पैकी २ विवाहांचा शेवट घटस्फोटात होतो.