व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रेम का आटते?

प्रेम का आटते?

प्रेम का आटते?

“प्रेमात पडणे फार सोपे आहे परंतु ते प्रेम टिकवून ठेवणे तितके सोपे नाही.”—डॉ. कॅरेन कायझर.

प्रेमहीन विवाहांची संख्या वाढत आहे हे एका दृष्टीने अपेक्षितच आहे. कारण विवाहबंधन हे मानवांच्या जटिल नातेसंबंधांपैकी एक आहे आणि पुष्कळजण वैवाहिक जीवनात पुरेशा तयारीविनाच पाऊल ठेवतात. डॉ. डीन एस. इडल म्हणतात, “वाहन चालकाचा परवाना मिळवायला आपली निपुणता सिद्ध करावी लागते, पण विवाहाचा परवाना मिळवायला फक्‍त सही करावी लागते.”

म्हणूनच, बरेच विवाह जरी आनंदी आणि समाधानी असले तरी पुष्कळ विवाह तणावग्रस्त आहेत. कदाचित एका विवाहसोबत्याला किंवा दोघांनाही लग्न करताना अनेक अपेक्षा असतील पण प्रदीर्घ नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेली कौशल्ये मात्र त्यांच्याजवळ नसतील. डॉ. हॅरी राईस म्हणतात, “सुरवातीला दोन व्यक्‍तींमधील जवळीक वाढते तेव्हा त्यांना एकमेकांकडून पुष्कळ आश्‍वासन मिळते.” त्यांना वाटते की, “अख्ख्या जगात त्यांच्या सोबत्याशिवाय त्यांच्यासारखा विचार दुसरा कोणीच करत नाही. पण काही काळानंतर त्यांचा हा गैरसमज दूर होतो आणि हे घडते तेव्हा विवाहावर त्याचा जबरदस्त परिणाम होतो.”

पुष्कळसे विवाह त्या टोकाला जात नाहीत ही आनंदाची गोष्ट आहे. पण काहींच्या बाबतीत असे का घडते याची काही कारणे आता आपण पाहूया.

भ्रमनिरास—“मला ही अपेक्षा नव्हती”

रोझ म्हणते, “माझा विवाह जिमशी झाला तेव्हा मला वाटलं की आम्ही दोघं परिकथेतल्या राजकुमार आणि राजकुमारीसारखेच असू; आमच्या दोघांमध्ये सतत प्रेम आणि जिव्हाळा असेल, एकमेकांबद्दल कदर असेल.” पण कालांतराने रोझचा “राजकुमार” तिच्या नजरेतून हळूहळू उतरू लागला. ती म्हणते, “त्याने माझी घोर निराशा केली.”

पुष्कळशा चित्रपटांमध्ये, पुस्तकांमध्ये आणि लोकप्रिय गीतांमध्ये प्रेमाचे अवास्तविक चित्रण केले जाते. त्यामुळे, लग्नापूर्वी एकमेकांच्या सोबतीने सुखावलेल्या जोडप्याला वाटते की ‘आपण स्वप्न तर पाहात नाही ना.’ पण लग्नाच्या काही वर्षांतच त्यांना खात्री पटते की खरोखर ते स्वप्नच होते! त्यांना ती राजकुमार-राजकुमारीची प्रेम-कहाणीच हवी असते; थोडा जरी अपेक्षाभंग झाला तरी त्या लहानमोठ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपला विवाह अयशस्वी ठरला असे त्यांना वाटू लागण्याची शक्यता आहे.

अर्थात, विवाहामध्ये काही अपेक्षा बाळगणे गैर नाही. उदाहरणार्थ, आपल्या सोबत्याने आपल्यावर प्रेम करावे, आपल्याकडे लक्ष द्यावे आणि सुखदुःखात साथ द्यावी अशी अपेक्षा करणे योग्यच आहे. पण, काही वेळा या अपेक्षा देखील पूर्ण होत नाहीत. भारतातील एक तरुण वधू, मीना म्हणते: “माझं लग्न झालंय असं मला वाटतंच नाही. मला खूप एकटेपणा जाणवतो आणि माझी कोणालाच काळजी नाही असं वाटतं.”

अनुरूपता नसणे—“आम्हा दोघांत काहीच सारखं नाही”

एक स्त्री म्हणते, “माझे पती आणि मी जवळजवळ प्रत्येक बाबतीत वेगळे आहोत. मला त्यांच्याशी लग्न केल्याचा पस्तावा होत नाही असा अक्षरशः एकही दिवस जात नाही. आम्ही पूर्णपणे विजोड आहोत.”

सहसा लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच पती-पत्नीला हे कळून येते की, प्रणयराधनेच्या वेळी आपल्याला वाटत होते त्याप्रमाणे आपल्या आवडीनिवडी सारख्या नाहीत. डॉ. नीना एस. फील्ड्‌स लिहितात: “लग्नाआधी स्वतःपासूनच लपलेले गुण सहसा नंतर सामोरे येऊ लागतात.”

त्यामुळे, विवाहानंतर काही जोडपी असा निष्कर्ष काढतात की ते दोघे एकमेकांना अजिबात अनुरूप नाहीत. “बहुतांश लोक लग्न करतात तेव्हा त्यांच्या आवडीनिवडीत आणि व्यक्‍तिमत्त्वात थोडेफार साम्य असते, पण त्यांच्या वागण्याबोलण्याची पद्धत, सवयी आणि मनोवृत्ती यांत पुष्कळ तफावत असते,” असे डॉ. एरन टी. बेक म्हणतात. बरीच जोडपी परस्परांशी जुळवून घेण्यात अयशस्वी ठरतात.

मतभेद—“आमच्यात सारखे खटके उडतात”

सिंडी आपल्या विवाहानंतरच्या सुरवातीच्या दिवसांची आठवण काढून सांगते की, “नेहमीची भांडणं, एकमेकांवर खेकसणं आणि कित्येक दिवसांपर्यंत अबोला धरणं अगदी सामान्य झालं होतं. आमचं आम्हालाच आश्‍चर्य वाटायचं.”

भांड्याला भांडं लागणे, विवाहात पती-पत्नींमध्ये मतभेद होणे हे साहजिक आहे. पण ते कसे हाताळले जातात? डॉ. डॅनिएल गोलमन लिहितात: “सुदृढ विवाहात पती-पत्नी मनमोकळेपणाने एकमेकांजवळ आपल्या भावना व्यक्‍त करतात. पण अधिकांश पतीपत्नी या तक्रारी योग्यप्रकारे न सांगता रागाच्या भरात एकमेकांवर ताशेरे ओढतात, एकमेकांच्या व्यक्‍तिमत्त्वावर हल्ला करतात.”

हे घडते तेव्हा, संभाषण युद्धाचे रूप घेते. कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या मतांचा बचाव करण्यासाठी पतीपत्नी शब्दांचा संवादाकरता उपयोग करण्याऐवजी हत्यारांसारखा उपयोग करतात व निष्ठूरपणे एकमेकांवर वार करतात. एका तज्ज्ञमंडळाचे असे म्हणणे आहे की, “अलीकडे हाताबाहेर जाऊ लागलेल्या, पतीपत्नींच्या संतप्त वादविवादांत ते एकमेकांना असे काहीतरी बोलून बसतात ज्यामुळे विवाहाचा पायाच खिळखिळा होतो.”

उदासीन मनोवृत्ती—“आम्ही आशाच सोडून दिली आहे”

पाच वर्षे विवाहित असलेल्या एका स्त्रीने असे म्हटले, “आता मी प्रयत्न करायचंच सोडून दिलंय. आमचा विवाह कधीच सुखी होऊ शकणार नाही. मला फक्‍त मुलांची काळजी आहे, बस्स.”

कोणीतरी म्हटले आहे की प्रेमाच्या विरुद्ध द्वेष नसून खरे तर उदासीनता आहे. भांडणतंट्यामुळे विवाहाला जितके नुकसान पोहंचू शकते तितकेच उदासीनतेमुळेही पोहंचते.

पण दुःखाची गोष्ट अशी आहे की, काही पती-पत्नींना प्रेमहीन वैवाहिक जीवनाची इतकी सवय होऊन जाते की ते यात काही परिवर्तन होण्याची पूर्णपणे आशाच सोडून देतात. उदाहरणार्थ, एका पतीने आपले २३ वर्षांचे वैवाहिक जीवन “आवडत नसलेली नोकरी करण्यासारखे आहे” असे म्हटले. ते पुढे म्हणतात: “आहे त्या परिस्थितीत आपल्या परीनं होईल तसं भागवायचं, आणखी काय.” सात वर्षांपासून विवाहित असलेल्या वेन्डी नावाच्या एका स्त्रीने देखील आपल्या पतीबद्दल आशा सोडून दिली आहे. ती म्हणते, “मी खूपदा प्रयत्न करून पाहिला पण त्यांनी मला नेहमी निराश केलं. हे सगळं इतकं टोकाला गेलं की मला डिप्रेशन आलं. मला पुन्हा त्यातून जायचं नाहीये. उगाच आशा वाढवल्या तर मलाच त्रास होईल. त्याऐवजी काही आशाच न करणं बरं. अर्थात माझी परिस्थिती सुधारणार नाही हे कबूल आहे, पण निदान ते डिप्रेशन तर पुन्हा सहन करावं लागणार नाही.”

भ्रमनिरास, अनुरूपता नसणे, मतभेद, आणि उदासीन मनोवृत्ती ही काही कारणे आहेत ज्यांमुळे पती-पत्नीमधील प्रेम हळूहळू आटते. अर्थात, इतरही पुष्कळ कारणे आहेत; यातली काही कारणे पृष्ठ ५ वरील पेटीत दिली आहेत. कारणे कोणतीही असली तरीसुद्धा, प्रेमहीन विवाहात अडकलेल्या पती-पत्नींकरता काही आशा आहे का?

(g०१ १/८)

[५ पानांवरील चौकट/चित्र]

प्रेमहीन विवाह—काही इतर कारणे

पैसा: “पती पत्नी म्हटल्यावर एकमेकांना सहकार्य करणे, दोघांच्या साधनसंपत्तीचा दैनंदिन गरजा भागवण्यासाठी उपयोग करणे आणि दोघांच्या मेहनतीचा सोबत मिळून उपभोग घेणे हे आलेच. आणि यासाठी ते दोघे मिळून खर्चाचे नियोजन करतात तेव्हा साहजिकच त्यांचे बंधन दृढ होत जाईल असेच कोणालाही वाटेल. पण या बाबतीतही, दोघांना एकत्र आणू शकणारी ही गोष्टच सहसा त्यांच्यात फूट निर्माण करते.” —डॉ. एरन टी. बेक.

पालकत्व: “आम्हाला असे दिसून आले आहे की, पहिले मूल झाल्यावर ६७ टक्के दांपत्यांना वैवाहिक जीवनात स्वारस्य वाटत नाही आणि त्यांच्यामध्ये भांडणांचे प्रमाण आठ पटीने वाढते. याचे एक कारण म्हणजे, कौटुंबिक जबाबदाऱ्‍या पार पाडताना ते थकून जातात आणि त्यांच्याजवळ स्वतःकरताच वेळ नसतो.”—डॉ. जॉन गॉटमन.

फसवणूक: पती-पत्नीने एकमेकांना अविश्‍वासू राहणे म्हणजे त्यात फसवणूक आलीच, आणि फसवणूक म्हणजे विश्‍वासघात. यशस्वी विवाहाकरता विश्‍वासू राहणे फार महत्त्वाचे मानले जाते. तेव्हा, साहजिकच सोबत्याची फसवणूक केल्याने वैवाहिक जीवन पाहता पाहता उद्‌ध्वस्त होते.—डॉ. नीना एस. फील्ड्‌स.

शरीरसंबंध: “पती-पत्नी घटस्फोट मागतात त्याच्या कितीतरी वर्षांआधीच त्यांनी शरीरसंबंध थांबवलेले असतात ही धक्केदायक परंतु अत्यंत सामान्य गोष्ट आहे. काही विवाहांत लैंगिक संबंध कधी ठेवण्यातच आले नव्हते आणि काहीजण फक्‍त सोबत्याची शारीरिक गरज पूर्ण करण्यासाठी शरीरसंबंध ठेवत होते.”—ज्यूडिथ एस. वॉलरस्टेन, वैद्यकीय मानसोपचारतज्ज्ञ.

[६ पानांवरील चौकट/चित्र]

मुलांवर काय परिणाम होतो?

तुमच्या वैवाहिक जीवनाचा परिणाम तुमच्या मुलांवर होऊ शकतो का? सुमारे २० वर्षे विवाहित दांपत्यांचा अभ्यास केलेल्या डॉ. जॉन गॉटमन यांच्या मते या प्रश्‍नाचे उत्तर होय असे आहे. ते म्हणतात, “प्रत्येकी दहा वर्षांच्या दोन अभ्यासांमध्ये आम्हाला असे दिसून आले की, वैवाहिक बेबनाव असलेल्या पालकांच्या तान्ह्या मुलांत खेळताना हृदयाचे ठोके वाढतात असे आढळले, शिवाय ही मुले सामान्य बालकांप्रमाणे स्वतःला शांत करू शकत नाहीत. कालांतराने पती-पत्नीमधील बेबनावामुळे मुले कितीही हुशार असली तरी शाळेत चांगले मार्क मिळवत नाहीत.” याच्या उलट, डॉ. गॉटमन म्हणतात, सुखी वैवाहिक जीवन असलेल्या जोडप्यांची मुले “शाळेमध्ये आणि समाजातही चांगली प्रगती करतात कारण इतरांशी आदराने कसे वागावे आणि भावनिक मतभेद कसे हाताळावेत हे त्यांना त्यांच्या पालकांनी आपल्या आदर्शातून शिकवलेले असते.”