भूमध्य मंक सील्स बचावतील का?
भूमध्य मंक सील्स बचावतील का?
ग्रीस येथील सावध राहा! लेखकाकडून
कवी होमरने ओडिसी या सुप्रसिद्ध महाकाव्यात हे प्राणी ग्रीसच्या समुद्रकिनाऱ्यांवर सूर्यप्रकाशात पहुडले आहेत असे वर्णन केले. प्राचीन आशिया मायनरमधील एका शहरात या प्राण्यांचे चित्र असलेली नाणी तयार केली जायची. भूमध्य सागरात आणि काळ्या समुद्रात एकेकाळी हे मोठ्या संख्येने होते. पण आज मात्र या गरीब प्राण्यांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. हे प्राणी म्हणजे भूमध्य मंक सील.
समुद्रात राहणाऱ्या बहुतेक केसाळ सस्तन प्राण्यांप्रमाणेच १८ व्या व १९ व्या शतकांदरम्यान भूमध्य मंक सील प्राण्यांचीही मोठ्या प्रमाणात शिकार करण्यात आली. त्यांची केसाळ कातडी, तेल आणि मांसासाठी हजारो प्राण्यांची कत्तल करण्यात आली.
याचे दुष्परिणाम आज स्पष्टपणे दिसून येत आहेत. अंदाजानुसार, आज केवळ ३७९ ते ५३० भूमध्य मंक सील उरले आहेत. ते लुप्त होण्याच्याच बेतात आहेत. पण मोनॅकस गार्डियन या बातमीपत्रात सांगितल्यानुसार हे कबूल करावे लागेल की संख्येचे अंदाज करणे हे “अतिशय अविश्वासार्ह शास्त्र” आहे.
परंतु याचा अर्थ फार उशीर झाला आहे का? मंक सील प्राण्यांना बचावण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत?
कठीण संघर्ष
मंक सील हे नाव या प्राण्यांना त्यांच्या कातडीच्या विशेष रंगावरून पडले असावे. त्यांच्या कातडीच्या रंगाचे काही धार्मिक वैराग्यांच्या पोषाखाच्या रंगाशी साम्य आहे. हे प्राणी एजियन समुद्रातील अतिशय दुर्गम सुळक्यांत आणि समुद्री गुहांत राहतात. त्यांचे लहान लहान गट आफ्रिकेच्या वायव्य समुद्रकिनाऱ्यांवर आणि पोर्तुगालच्या डेसर्टास द्वीपांवरही आढळतात. सील प्रजातीत मंक सील सर्वात मोठ्या जातीचा सील आहे. त्याची लांबी ३ मीटर आणि वजन जवळजवळ २७५ किलोग्राम असते.
मंक सीलचे खास वैशिष्ट्ये म्हणजे शुभ्र चांदीसारखे केस असलेले लांबुळक्या बल्बच्या आकाराचे डोके, त्याचे काळेकुळकुळीत डोळे, मोठमोठ्या नाकपुड्या, कानाच्या ऐवजी फक्त बारीक फटी, मोठ्या लोंबकळणाऱ्या मिशा आणि हनुवटीखाली असलेल्या कित्येक मांसल घड्या. शरीरावर बारीक काळे किंवा गर्द तपकिरी रंगाचे केस आणि पोटावर फिक्या रंगाचे केस असतात. पण मंक सीलच्या नुकत्याच जन्मलेल्या पिलांना पाठीवर लांब काळे केस आणि पोटावर मोठा पांढरा ठिपका असतो.
मंक सील प्राण्यांच्या प्रजननाचे प्रमाण फार कमी आहे; यामुळे त्यांच्या अस्तित्वाची लढाई आणखीनच कठीण आहे. माद्या दर वर्षी फक्त एकच पिलाला जन्म देतात. त्यातल्या त्यात पूर्ण वाढ झालेल्या सगळ्याच माद्या दर वर्षी जन्म देत नाहीत.
पण फक्त प्रजननाचे कमी प्रमाण त्यांच्या लुप्त होत जाण्यामागचे कारण नाही. न्यू यॉर्क एक्वेरियम फॉर वाइल्डलाईफ कन्झर्व्हेशनचे व्यवस्थापक डॉ. डेनिस थोनी म्हणतात: “भूमध्य मंक सील फार धीम्या गतीने प्रजनन करत असले तरीसुद्धा त्याच प्रमाणात प्रजनन करणाऱ्या हार्बर सील प्राण्यांची संख्या कमी होत असल्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. तेव्हा निश्चितच मंक सील लुप्त होण्यामागे इतर कारणे असली पाहिजेत.”
धोक्यात आलेले प्राणी
तुमच्या घराला आग लागली तर किती भयंकर नुकसान होईल याची कल्पना करा. तुमच्या मालकीच्या सर्व वस्तू, म्हणजे फर्निचर, कपडालत्ता, तुमच्या मोलवान वस्तू, आठवणीदाखल जपून ठेवलेल्या कित्येक वस्तू पाहता पाहता बेचिराख होतील. तुमचे जीवनच पार बदलून जाईल. भूमध्य मंक सीलच्या राहत्या परिसराची आज हीच दशा झाली आहे. प्रदूषण, पर्यटन, कारखाने आणि मनुष्याच्या इतर हालचालींमुळे मंक सीलच्या नैसर्गिक निवासस्थानाचा बऱ्याच प्रमाणात नाश झाला आहे.
इतकेच नाही तर, मोठ्या प्रमाणात मासेमारी केल्यामुळे मंक सीलचा खाद्य पुरवठा देखील त्यांच्यापासून हिरावला गेला आहे. प्राणीविज्ञानशास्त्रज्ञ डॉ. सुझॅना केनेडी-स्टोसकॉफ म्हणतात: “सीलला त्याचे खाद्य मिळत नाही तेव्हा त्याला खाद्य शोधण्यासाठी जास्त शक्ती खर्च करावी लागते.” अशारितीने मंक सील प्राण्यांच्या राहत्या परिसरावर अतिक्रमण झालेच आहे पण त्यासोबत त्यांना फक्त जिवंत राहण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे!
जास्त मासेमारी केल्यामुळे होणारा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे बऱ्याचदा हे सील मच्छिमारांच्या जाळ्यांत अडकून बुडून मरतात. आणि बऱ्याचदा तर मच्छिमार स्वतःच त्यांना मारून टाकतात. का? कारण खाद्य मिळत नसल्यामुळे आता हे सील मच्छिमारांच्या जाळ्यांतून आपले खाद्य चोरून खाण्यास शिकले आहेत. असे करताना अर्थातच ते जाळ्यांचे नुकसान करतात. अशारितीने, दुर्मिळ होत चाललेल्या माशांसाठी माणूस प्राण्यांशी हातघाईवर आला आहे. आणि अर्थातच मनुष्य जास्त शक्तिशाली असल्यामुळे मंक सील लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
अन्न साखळीत मंक सील अगदी वरती असल्यामुळे काही वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की हे सस्तन प्राणी “सूचक जातीचे” प्राणी आहेत. याचा अर्थ, जर त्यांची परिस्थिती चांगली नाही म्हणजेच अन्न साखळीतील बाकीच्या प्राण्यांचीही स्थिती चांगली नाही. हे खरे असल्यास, भूमध्यातील परिस्थितीकीच्या संरक्षणासंबंधी ही धोक्याची पूर्वसूचनाच म्हणावी लागेल कारण मंक सील हे युरोपात लुप्त होण्याचा सर्वात जास्त धोका असलेले प्राणी आहेत.
बचावतील का?
विशेष म्हणजे, भूमध्य मंक सील्सचे सर्वात मोठे शत्रू आणि सर्वात मोठे समर्थकही मानवच आहेत. या सील्सचे संरक्षण करण्यासाठी खासगी आणि सरकारी संस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी खास सुरक्षा क्षेत्रे राखून ठेवण्यात आली आहेत. या शानदार प्राण्यांना मदत करण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या राहत्या परिसरातच कितीतरी अभ्यास हाती घेण्यात आले आहेत.
भूमध्य मंक सीलच्या अभ्यासाकरता व संरक्षणाकरता १९८८ साली हेलेनिक संस्था निर्माण (MOm) करण्यात आली. या संस्थेचे संशोधक मंक सील्सच्या संख्येवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणाकरता उपयोगी पडेल अशी इतर माहिती मिळवण्यासाठी नियमितपणे या प्राण्यांच्या राहत्या परिसरात जातात.
सुरक्षा क्षेत्रात वेगवान बोटींतून पहारा ठेवणारे दल सतत पाळत ठेवून असतात. हे दल उत्तर स्पोरॅडीस बेटांवर, अलॉनिसॉस येथे असलेल्या ग्रीसच्या नॅशनल मरीन पार्कला भेट देणाऱ्या पर्यटकांना आणि मच्छिमारांना माहिती आणि सूचना देखील देतात. आजारी किंवा दुखापत झालेले सील्स आढळल्यास हे दल आवश्यक उपचार करतात आणि MOm संस्थेच्या पुनर्वसन केंद्रात या प्राण्यांना नेतात.
आईपासून विलग झालेल्या, आजारी किंवा दुखापत झालेल्या पिलांना उपचाराकरता सील उपचार आणि पुनर्वसन केंद्रात ठेवण्याची व्यवस्था आहे. ते स्वतःहून निभावण्याइतपत सामान्य होईपर्यंत येथे त्यांच्यावर उपचार केला जातो व त्यांची काळजी घेतली जाते. या सर्व प्रयत्नांचे आतापर्यंत चांगले फळ मिळाले आहे. बरीच वर्षे मंक सील्सच्या संख्येत झपाट्याने घट झाल्यानंतर उत्तर स्पोरॅडिसमध्ये आता त्यांच्या संख्येत पहिल्यांदा वाढ होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
हे प्रयत्न पुढेही यशस्वी ठरतील का? हे तर येणारा काळच सांगेल. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, की या धोक्यात आलेल्या प्राण्यांना बचावण्यासाठी अजून बरेच काम करणे बाकी आहे. स्मिथ्सोनियन संस्थेचे डॉ. डेव्हिड वाइल्ड यांनी सावध राहाला! सांगितले की: “समुद्रातील सगळ्याच प्राणीजगताला अवकळा आली आहे. समस्या अशी आहे की समुद्रातील सर्व जिवांबद्दल आम्हाला पुरेशी माहिती नाही आणि निश्चितच त्यांचे संरक्षण कसे करायचे याबद्दलही आम्हाला अद्याप माहिती नाही.”
(g०१ ३/८)
[१७ पानांवरील चौकट]
भाऊबंदही संकटात!
मंक सील जगातल्या इतर भागांतील समुद्रांतही आढळतात पण हे सील्स देखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नॅशनल जियोग्रॅफिक मासिकानुसार कॅरिबियन किंवा वेस्ट इंडियन मंक सील “नव्या जगात कोलंबसला आढळलेला पहिला सील होता. या प्राण्यांना समुद्रकिनारा प्रिय आहे, पण त्यांचा गैरफायदा घेणेही सोपे आहे. त्यामुळे लवकरच या प्राण्यांच्या सबंध कळपांची कत्तल करण्यात आली. . . . शेवटचा कॅरिबियन मंक सील १९५२ साली पाहण्यात आला होता.”
हवाईयन बेटांवरील राष्ट्रीय वन्यजीवन संरक्षण संस्थेतील फ्रेंच फ्रायगेट शोल्स हे हवाईयन किंवा लेसन मंक सील्सकरता शेवटले सुरक्षित स्थान असू शकते. पण यांच्या संरक्षणाकरता अनेक प्रयत्न करूनही या जातीचे जवळजवळ १,३०० उरलेले सील्स “अनेक समस्यांनी पीडित” आहेत.
पश्चिम आफ्रिकेच्या मॉरिटानियाच्या समुद्रतटावर उरलेल्या २७० भूमध्य मंक सील्सपैकी १९९७ सालच्या उन्हाळ्यापासून जवळजवळ तीन चतुर्थांश सील्स एका संसर्गजन्य रोगामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. सायन्स न्यूज यातील एका वृत्तानुसार तपासण्यात आलेल्या बऱ्याच सील्सच्या शरीरांत “एक प्रकारचा डॉल्फिन मॉर्बिलिव्हायरस आढळला. कुत्री ज्यामुळे पिसाळतात त्याच प्रकारचा हा जिवाणू आहे.”
[१६ पानांवरील चित्रे]
मंक सीलच्या अनेक विशेषता आहेत, उदाहरणार्थ लांबुळके बल्बच्या आकाराचे डोके आणि मोठमोठ्या नाकपुड्या
सील्सच्या संरक्षणाकरता अनेक संस्था निर्माण करण्यात आल्या आहेत
[चित्राचे श्रेय]
Panos Dendrinos/HSSPMS
[१७ पानांवरील चित्रे]
बरीच वर्षे मंक सील्सच्या संख्येत झपाट्याने घट झाल्यानंतर उत्तर स्पोरॅडिसमध्ये आता त्यांच्या संख्येत पहिल्यांदा वाढ होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत
[Credit Lines
P. Dendrinos/MOm
D. Kanellos/MOm
[१७ पानांवरील चित्र]
हवाईयन मंक सील
[१५ पानांवरील चित्राचे श्रेय]
Panos Dendrinos/HSSPMS