मी त्याला नाही कसे म्हणू?
तरुण लोक विचारतात . . .
मी त्याला नाही कसे म्हणू?
“या उन्हाळ्यात आमच्या मंडळीतला एका मुलगा माझ्या प्रेमात पडला. मला काही तो खास आवडत नव्हता. पण त्याच्या भावना न दुखवता त्याला नाही कसं म्हणावं हेच मला समजत नव्हतं.”—एलिझाबेथ. *
“माझ्याशी मैत्री करशील?” कधी कोणा तरुणाने तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे का? हा प्रश्न ऐकून कोणत्याही तरुण मुलीप्रमाणे * तुमचा चेहरा आनंदाने खुलला असेल आणि कोणीतरी आपल्याला पसंत करतं या भावनेनं तुम्ही मनोमन सुखावल्या असाल! किंवा, कदाचित तुम्ही इतक्या गोंधळल्या असाल की काय उत्तर द्यावं हेच तुम्हाला सुचलं नसेल.
कोणी तुमच्याविषयी प्रेम व्यक्त करतं तेव्हा तुमच्या मनात अचानक असंख्य भावनांचं काहूर माजतं. खासकरून तुमचं लग्नाचं वय असेल आणि तुमच्याशी मैत्री करू इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या भावनांना प्रतिसाद देण्याच्या स्थितीत तुम्ही असाल तर तुम्ही आणखीनच गोंधळता. * पण तुमचं उत्तर बऱ्याच प्रमाणात, प्रश्न कोणी विचारला आहे यावर अवलंबून असतं. जर ही व्यक्ती भावनिकरित्या प्रगल्भ असेल आणि तुम्हाला तिच्याविषयी आकर्षण वाटत असेल तर साहजिकच उत्तर द्यायला तुम्हाला फार जड जाणार नाही. पण तुमच्यासाठी योग्य साथीदाराची भूमिका बजावण्याकरता या व्यक्तीकडे आवश्यक गुण नाहीत हे स्पष्टपणे दिसत असल्यास तुम्ही काय कराल? किंवा चांगले गुण असूनही तुम्हाला जर या व्यक्तीशी लग्न करावेसे वाटतच नसेल तर?
तसेच, अशा तरुणीबद्दल विचार करा जिने काही काळ एखाद्या तरुणाशी मैत्री केली पण आता तिला जाणीव झाली आहे की तिला त्याच्यासोबत आपले उर्वरित आयुष्य घालवायचे नाही. पण त्या तरुणासोबत संबंध तोडून टाकण्याऐवजी ती त्याच्यासोबत भेटीगाठी सुरूच ठेवते. तिला प्रश्न पडला आहे, की “मी त्याला नाही कसे म्हणू?”
तुम्ही त्याच्याशी लग्न करू इच्छित नाही तेव्हा
बायबलच्या काळात सहसा आईवडीलांनी निवडलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याची पद्धत होती. (उत्पत्ति २४:२-४, ८) आज पाश्चात्त्य देशांत ख्रिस्ती सहसा स्वतःच्या पसंतीनुसार लग्न करतात. या संदर्भात बायबलमध्ये एक कायदा आहे—ख्रिस्ती व्यक्तीने “केवळ प्रभूमध्ये” विवाह करावा.—१ करिंथकर ७:३९.
पण याचा अर्थ सहविश्वासू बांधवांपैकी तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या कोणाशीही तुम्ही लग्न करावे गीतरत्न २:७, NW) ही तरुणी सुज्ञ होती; इतरांच्या दबावामुळे भावनेच्या भरात येऊन तिला कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता. शलमोनाविषयी तिच्या मनात प्रेम नव्हते, कारण एका गरीब मेंढपाळावर तिचे प्रेम होते.
का? किंवा अशा व्यक्तीशी केवळ काही काळ भेटीगाठी केल्यानंतर तुम्ही लग्न करावे असा याचा अर्थ होतो का? बायबलमध्ये दिलेल्या मध्यपूर्वेतील शुनेम नावाच्या खेड्यात राहणाऱ्या एका तरुणीचे उदाहरण पाहा. शलमोन राजाने तिला पाहिले आणि तो तिच्या प्रेमात पडला. पण जेव्हा तो तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा तिने नकार दिला; इतकेच नाही तर तिने राजाच्या दासींना अशी विनंती केली की: “माझ्यामध्ये प्रेमभावना आत्मस्फुर्तीने जागृत होत नाही तोपर्यंत त्यांस उठवू नका किंवा जागृतही करू नका.” (लग्नाच्या विचारात असलेल्या तरुणतरुणींसाठी यात एक महत्त्वाचा धडा आहे: वाटेल त्या व्यक्तीबद्दल प्रेम काही आपोआप वाटत नसते. त्यामुळे, काही काळ एखाद्या व्यक्तीसोबत गाठीभेटी केल्यानंतर कदाचित एखाद्या तरुणीला ही जाणीव होऊ शकते की तिला त्या व्यक्तीबद्दल प्रणय भावना नाहीत. कदाचित त्या व्यक्तीमध्ये एखादा अवगुण आढळल्यामुळे तिला असे वाटत असेल. किंवा तिला त्याच्याबद्दल आकर्षणच वाटत नसेल. अशा भावनांकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. कारण फक्त दुर्लक्ष केल्यामुळे काही या भावना निघून जाणार नाहीत. * तमारा नावाची एक तरुणी काही काळापासून एका तरुणाला भेटत होती; पण ती म्हणते, “माझ्या मनात त्याच्याविषयी कितीतरी शंका होत्या. आणि केवळ क्षुल्लक बाबतीत नाही, तर मला अस्वस्थ करण्याइतपत त्या गंभीर होत्या. त्याच्यासोबत असताना मी नेहमी एका दडपणाखाली वावरायचे.” तिला नंतर जाणीव झाली की या शंकांमुळे त्या व्यक्तीशी संबंध तोडून टाकणेच योग्य ठरेल.
नाही म्हणणे कठीण का जाते
हे सर्व खरे असूनही, एखाद्या तरुणाला नाही म्हणणे वाटते तितके सोपे नसते. सुरवातीला उल्लेख केलेल्या एलिझाबेथप्रमाणे तुम्हाला कदाचित त्याच्या भावना दुखावण्याची भीती असेल. बायबल ख्रिस्ती लोकांना ‘करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करण्याचे’ आणि इतरांनी आपल्याशी जसे वागावे असे वाटते तसेच त्यांच्याशी वागण्याचे प्रोत्साहन देते. (कलस्सैकर ३:१२; मत्तय ७:१२) पण याचा अर्थ, केवळ त्या व्यक्तीला निराश करण्याच्या किंवा तिच्या भावना दुखावण्याच्या भीतीने तुम्ही दिखाऊपणा करावा का? आज न उद्या त्याला तुमच्या खऱ्या भावना कळून येतील यात शंका नाही आणि त्या क्षणापर्यंत तुम्ही त्याच्याशी अप्रामाणिक राहिल्यामुळे त्याला आणखीनच दुःख होईल. त्या तरुणाची दया येत असल्यामुळे त्याच्याशी लग्न करणे तर त्याहूनही वाईट. कारण दयेच्या आधारावर काही यशस्वी वैवाहिक जीवन उभारता येत नाही.
पण कदाचित तुमच्या मनात राहून राहून हा विचार येत असेल, की ‘मी याला नाही म्हटले तर कदाचित पुन्हा संधी येणार नाही.’ टीन मासिकातल्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे मुलीला कदाचित असे वाटू शकते की “हा माझ्या ‘मनासारखा’ नसेल पण निदान कोणीतरी आहे ना—उभे आयुष्य एकटे राहावेसे कोणालाही वाटत नाही.” साथीदाराची ओढ तीव्र असते यात शंका नाही. पण ही इच्छा योग्यप्रकारे पूर्ण करण्यासाठी कोणाचाही हात धरून चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला अशी व्यक्ती भेटली पाहिजे जिच्यावर तुम्ही खरे प्रेम करू शकता आणि जी विवाहासंबंधी बायबलमध्ये सांगितलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकेल. (इफिसकर ५:३३) तेव्हा जोडीदार निवडण्याच्या बाबतीत घाईगडबडीत निर्णय घेऊ नका! बऱ्याचजणांना घाईत लग्न केल्यामुळे नंतर पस्तावण्याची पाळी आली.
शेवटी काहीजणी अशाही असतात ज्या एखाद्या तरुणात गंभीर स्वरूपाचे अवगुण स्पष्ट दिसत असूनही त्याच्यासोबत भेटीगाठी करतच राहतात. ‘पुढे तो बदलेल, थोडा वेळ जाऊ देण्याची आवश्यकता आहे,’ असे म्हणून त्या स्वतःची समजूत घालतात. पण असा विचार करणे शहाणपणाचे ठरेल का? कारण काही झाले तरी, वाईट सवयी आणि स्वभाव व्यक्तीत इतके खोलवर रुजलेले असतात की ते बदलणे अतिशय कठीण असते. आणि जरी त्या व्यक्तीने अचानक आपल्या वागण्यात बदल केला तरीसुद्धा ती व्यक्ती तात्पुरता आव
आणत नसेल हे कशावरून? अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवली तेव्हा कॅरन नावाच्या तरुणीने योग्य निर्णय घेतला. एका तरुणासोबत मैत्री केल्यावर जेव्हा तिला लक्षात आले की जीवनात त्याची ध्येये वेगळी आहेत तेव्हा तिने त्याच्यासोबत संबंध तोडून टाकला. अर्थात ती कबूल करते की “हे सोपं नव्हतं, कारण मी त्याच्याकडे आकर्षित झाले होते. पण असं करणंच योग्य ठरेल हे मला माहीत होतं.”जरा जपून
कोणाला नाही म्हणणे सोपे नसते. एखादी काचेची वस्तू जशी आपण जपून हाताळतो त्याचप्रमाणे हे कामही अतिशय जपून करण्याची गरज आहे. या संदर्भात खाली सांगितलेल्या काही गोष्टी कदाचित सहायक ठरतील.
तुमच्या आईवडिलांशी किंवा मंडळीतल्या एखाद्या प्रौढ व्यक्तीशी याविषयी चर्चा करा. तुमच्या अपेक्षा थोड्या अवाजवी असल्यास ते ही गोष्ट कदाचित तुमच्या लक्षात आणून देऊ शकतील.
स्पष्ट आणि सरळसरळ सांगा. तुमच्या भावनांविषयी त्याच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका राहायला नको. सहसा “नाही, थँक्स” म्हटल्याने काम भागेल. पण आवश्यक असल्यास तुम्ही आणखी थोडे स्पष्टपणे सांगू शकता, जसे, “सॉरी, पण मला खरंच इच्छा नाही.” अजून थोडा प्रयत्न केल्यास तुम्ही विचार बदलाल असे त्या तरुणाला वाटता कामा नये. म्हणून, तसे भासवू नका. त्याच्याबद्दल तुम्हाला प्रेम वाटत नाही हे स्पष्ट करा. यामुळे कोणतीही अनिश्चितता राहणार नाही आणि झालेल्या निराशेवर मात करणेही त्याला सोपे जाईल.
स्पष्टपणे पण अविचारीपणे नाही. नीतिसूत्रे १२:१८ म्हणते: “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो.” स्पष्टपणे बोलणे महत्त्वाचे असले तरीसुद्धा बायबल आपल्याला सांगते की आपले बोलणे “सर्वदा कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे.”—कलस्सैकर ४:६.
आपल्या निर्णयाला जडून राहा. तुमच्या निर्णयामागची कारणे ज्यांना माहीत नाहीत असे तुमचे हितचिंतक कदाचित तुमचा विचार बदलण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. पण तुमच्या निर्णयाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील—तुमच्या हितचिंतकांना नाही.
जे बोलला त्याप्रमाणे वागा. पूर्वी कदाचित तुमच्या दोघांत चांगली मैत्री असेल, आणि आपला संबंध पूर्वीसारखाच राहावा असे वाटणे स्वाभाविक आहे. पण व्यवहारात असे घडत नाही, ते शक्यही नाही. त्याला तुमच्याविषयी आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे, त्याने आपल्या भावनांकडे दुर्लक्ष करून जणू काही घडलेच नाही असे वागावे अशी अपेक्षा करणे खरोखर रास्त ठरेल का? तेव्हा, एकमेकांशी सर्वसामान्य शिष्टाचारानुसार चांगले वागा. पण फोनवर नियमितपणे बोलणे किंवा इतर वेळी एकमेकांसोबत खूप वेळ घालवणे जखमेवर मीठ चोळण्यासारखे ठरेल. असे केल्यामुळे तुम्ही निर्दयपणे त्याच्या भावनांशी खेळत असाल.
प्रेषित पौलाने ख्रिस्ती जनांना एकमेकांसोबत “खरे बोला” असे आर्जवले. (इफिसकर ४:२५) असे करणे कदाचित जड जाईल पण असे केल्यास घडलेले विसरून आपले जीवन पुढे सुरू ठेवण्यास तुम्हा दोघांनाही मदत होईल.
(g०१ ३/२२)
[तळटीपा]
^ काही नावे बदलण्यात आली आहेत.
^ हा लेख तरुण मुलींना उद्देशून लिहिला असला तरीसुद्धा यातील तत्त्व तरुण मुलांसाठीही उपयुक्त आहेत.
^ कमी वयात मुलामुलींनी भेटीगाठी करण्यात कोणते धोके आहेत याविषयी आमच्या जानेवारी २२, २००१ च्या इंग्रजी अंकात चर्चा करण्यात आली होती.
^ “तरुण लोक विचारतात . . . आम्ही संबंध तोडून टाकावेत का?” हा सावध राहा! जुलै २२, १९८८ (इंग्रजी) अंकातील लेख पाहा.
[१९ पानांवरील संक्षिप्त आशय]
वाटेल त्या व्यक्तीबद्दल प्रेम काही आपोआप वाटत नसते
[२० पानांवरील चित्र]
आपल्या भावना स्पष्टपणे, सरळसरळ सांगा