व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चेरापुंजी—पृथ्वीवरील सर्वात आर्द्र ठिकाणांपैकी एक

चेरापुंजी—पृथ्वीवरील सर्वात आर्द्र ठिकाणांपैकी एक

चेरापुंजी—पृथ्वीवरील सर्वात आर्द्र ठिकाणांपैकी एक

भारतातील सावध राहा! नियतकालिकाच्या लेखकाद्वारे

पृथ्वीवरील सर्वात आर्द्र ठिकाणांपैकी एक? कसे शक्य आहे? भारतात तर पाण्याच्या टंचाईची समस्या सर्रास आढळते आणि पुष्कळदा तर छत्रीचीही गरज भासत नाही! आपण कोणत्या कुतूहलजनक ठिकाणाची चर्चा करत आहोत? चेरापुंजी—बांगलादेशच्या सीमेजवळ भारताच्या ईशान्येकडील मेघालय राज्यातील एक शहर. मेघालयाचे सौंदर्य इतके दिपवून टाकणारे आहे की त्याला “पूर्वेकडील स्कॉटलंड” असे म्हटले जाते. मेघालय या नावाचाच अर्थ “मेघांचे निवासस्थान” असा होतो. पण, चेरापुंजी हे पृथ्वीवरील सर्वात आर्द्र ठिकाणांपैकी एक का आहे? चला आपण या कुतूहलजनक अद्‌भुत ठिकाणी एक फेरी मारून येऊ या. *

मेघालय राज्याचे राजधानी शहर शिलाँग येथून आपण आपल्या प्रवासाला सुरवात करू या. एका टुरिस्ट बसमध्ये बसून आम्ही दक्षिणेला जात आहोत. पर्वतराजी आणि मोकळी गवताळ मैदाने पार करून गेल्यावर आमच्यासमोर ढग आहेत; हे पाहून चटकन लक्षात येते की, मेघालय हे नाव किती साजेसे आहे.

आमचा रस्ता, दाट वनराई असलेल्या डोंगर दरीच्या कडेने डोंगराला वळसे घेत वर जात आहे. उंचावरून धबधबे दरीत कोसळत असल्यामुळे दरीतली नदी ओसंडून वाहत आहे. आमची बस माउडोक येथे थांबल्यावर अगदी खालून डोंगरांवरून प्रवास करणारे ढग पाहायला मिळत आहेत. या ढगांमुळे अचानक आमच्यासमोरचे दृश्‍य दिसेनासे होते आणि लगेचच ढग पुढे सरकल्यावर पुन्हा सगळेकाही स्पष्ट दिसू लागते. क्षणभरासाठी आम्ही देखील पांढऱ्‍या शुभ्र ढगांच्या मऊमऊ दुलईत लपून जातो. बघता बघता, आमच्यावरील दुलई दूर सरते आणि सूर्याच्या प्रकाशात भान हरपून टाकणाऱ्‍या निसर्गाचे दर्शन घडते.

चेरापुंजी हे शहर समुद्र पातळीपासून ४,००० फूट उंचीवर आहे. तेथे पोचल्यावर, निरभ्र आकाश दिसते आणि कोणाच्या हातात छत्री देखील दिसत नाही. फक्‍त आम्ही पर्यटक तेवढेच छत्र्या घेऊन चालत आहोत! मग पाऊस केव्हा होतो?

सागराच्या उष्ण भागांतील बऱ्‍याचशा पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन होते तेव्हा उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस पडत असतो. हिंद महासागरावरील आर्द्रतायुक्‍त वाऱ्‍यांचे तडाखे हिमालय पर्वतांच्या दक्षिण उतारांवर बसून ते वर उचलले जातात तेव्हा मुसळधार पावसाच्या रूपात ते आपला बोजा हलका करतात. मेघालयच्या पठाराला या पावसांचा सर्वात जास्त मारा बसतो. शिवाय, या उंच ठिकाणी दिवसा उष्णकटिबंधीय सूर्याची सर्वात जास्त झळ लागत असल्यामुळे पावसाळी ढग वर चढून संध्याकाळी वातावरण थंड होईपर्यंत पठारावर घुटमळत राहत असावेत. त्यामुळे, बहुतांश पाऊस रात्रीच्या वेळी का पडतो ते समजून येते.

१८६१ सालाच्या जुलै महिन्यादरम्यान, चेरापुंजीत चक्क ३६६ इंच पाऊस पडला! आणि ऑगस्ट १, १८६० पासून जुलै ३१, १८६१ पर्यंतच्या १२ महिन्यांमध्ये १,०४२ इंच पाऊस पडला. आज, चेरापुंजीत वर्षातील सरासरी १८० दिवस पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर दरम्यान पाऊस जोरदार असतो. पाऊस सहसा रात्रीच्या वेळी पडत असल्यामुळे पावसात न भिजता पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटता येतो.

इतका पाऊस पडत असताना या भागात पाण्याची टंचाई असावी यावर विश्‍वास बसणार नाही. पण, हिवाळ्यात येथे पाण्याची टंचाई असते. मग, पावसाळ्यातील पावसाचे पाणी जाते तरी कोठे? चेरापुंजीच्या बाहेरील भागातील जंगले मोठ्या प्रमाणात तोडल्यामुळे पावसाचे पाणी या उंच पठारावरून खाली वाहून सपाट प्रदेशातील नद्या भरल्या जातात; यांतल्या बहुतांश नद्या बांगलादेशात जातात. धरणे बांधण्याच्या आणि पाणी साठवण्याच्या योजनांवर विचार केला जात आहे. पण माउसिंराम येथील जमातीचे राजा, जी. एस. मांगयांग यांच्या मते, “पाण्याची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने कोणतेही खास प्रयत्न करण्यात आलेले नाहीत.”

चेरापुंजीला दिलेली भेट खरोखर आल्हाददायी ठरली; तसेच, आम्हाला बरेच काही शिकायलाही मिळाले. तिथला रम्य निसर्ग अगदी भान हरपून टाकणारा आहे! शिवाय, तेथे अनेक सुंदर फुले पाहायला मिळतात; त्यामध्ये, जवळजवळ ३०० जातींचे ऑर्किड आणि मासांहारी घटपर्णी वनस्पतीची आगळीवेगळी जातही पाहायला मिळते. विविध प्रकारचे वन्यप्राणी, चुनखडीच्या गुहा व प्रचंड मोठे खडक पाहायला मिळतात. या भागातील विस्तीर्ण संत्र्याच्या बागांमधून रसाळ संत्री तयार होतात आणि स्वादिष्ट संत्र्याच्या मधाचे नैसर्गिक उत्पन्‍न देखील होते. “मेघांचे निवासस्थान,” मेघालय आणि पृथ्वीवरील सर्वात आर्द्र ठिकाणांपैकी एक, चेरापुंजी येथे पर्यटकांना या गोष्टींचा आस्वाद घेता येईल. (g०१ ५/८)

[तळटीप]

^ काउआई या हवाई बेटावरील वाईआलीआली पर्वतावर आणि चेरापुंजी येथून १६ किलोमीटर अंतरावर वसलेल्या माउसिंराम गावात काही वेळा चेरापुंजीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

[२८ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

भारत

चेरापुंजी

[चित्राचे श्रेय]

Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.

[२९ पानांवरील चित्र]

मांसाहारी घटपर्णी वनस्पतीची ही जात पृथ्वीच्या या कोपऱ्‍यातच पाहायला मिळते

[२९ पानांवरील चित्र]

धबधब्यांमुळे दरीतून वाहणाऱ्‍या नद्या ओसंडून वाहतात

[चित्राचे श्रेय]

Photograph by Matthew Miller