तुमच्या केसांचे जवळून परीक्षण
तुमच्या केसांचे जवळून परीक्षण
“प्रत्येक वयाच्या आणि संस्कृतीच्या लोकांमध्ये, केस हे व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहेत.” म्हणूनच, पुष्कळजण आपले केस निरोगी आणि आकर्षक ठेवण्यासाठी खूप काळजी घेतात.
सावध राहा! मासिकाने चार अनुभवी हेअरस्टायलिस्ट्सना केसांची रचना आणि त्यांची काळजी घेण्याविषयी नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न विचारले. त्यांच्या उत्तरांवरून हे स्पष्ट होते की, केस दिसतात तितके साधेसुधे नाहीत.
केसांची वाढ आणि केस गळणे
प्र: केस कशाचे बनलेले असतात?
उ: केस, केराटिन नावाच्या तंतूमय प्रथिन पदार्थांनी बनलेले असतात. प्रत्येक केस डोक्याच्या त्वचेतील केसपुटक नावाच्या खोलगट भागातून वाढतो. प्रत्येक केसपुटकाच्या तळाशी पिंडिका असते ज्यामध्ये रक्ताचा भरपूर पुरवठा होत असतो. या पिंडिकेत केसाच्या कोशिका तयार होऊन केसपुटकातून वर सरकतात व कठीण होऊन त्यांचाच केस बनतो.
प्र: केस कापले की भरभर वाढतात असा पुष्कळांचा समज आहे. तो खरा आहे का?
उ: नाही, हे खरे नाही. काहींना असे वाटते की, एखाद्या झाडाच्या फांद्यांना जसे पोषण मिळते तसेच केसांनाही शरीरातून पोषण
मिळते. पण केस एकदा त्वचेच्या बाहेर आल्यावर, तो निर्जीव पदार्थ असतो. त्यामुळे, केस कापल्याने त्याच्या वाढीवर काही परिणाम होत नाही.प्र: केस पांढरे का होतात?
उ: केसाच्या आतील थरात असलेल्या रंजकद्रव्यामुळे केसांना रंग येतो. रंजककोशिका कमी होऊ लागल्यामुळे केस पांढरे होतात; हा म्हातारपणाचा भाग आहे. केस अकाली पांढरे होण्याला आनुवंशिकता किंवा आजारपण कारणीभूत ठरू शकते. परंतु, एका रात्रीत केस पांढरे होतात हे सत्य नाही. रंजकद्रव्य अगदी त्वचेच्या बुडाशी असते. त्यामुळे, पांढरे केस वाढायला (दर महिन्याला अर्धा इंच) आणि त्वचेच्या बाहेर अर्थात डोक्यावर यायला वेळ लागतो.
प्र: केस कशामुळे गळतात?
उ: केस गळणे हे नैसर्गिक केशचक्राचा भाग आहे. सरासरी, प्रत्येकाचे दररोज ५० ते ८० केस गळतात. परंतु, पुरुषांमध्ये टक्कल पडणे याला आनुवंशिक कारण आहे; हार्मोनच्या असंतुलनाचा तो परिणाम *
असावा ज्यामुळे केस कायमचे गळतात. केसांच्या अनैसर्गिक गळण्याला चाई लागणे म्हणतात.प्र: काहीजण म्हणतात की, केस हे एखाद्याच्या आरोग्याचे प्रतिबिंब असतात. तुमचेही हेच मत आहे का?
उ:होय. डोक्याच्या कातडीच्या खालोखाल केसांना रक्ताचा पुरवठा मिळतो. म्हणूनच, सुंदर केसांवरून रक्ताचा चांगला पुरवठा मिळत आहे हे दिसून येऊ शकते. चांगला आहार न घेणाऱ्या किंवा अति मद्य प्राशन करणाऱ्या व्यक्तीचे केस एकदम निर्जीव आणि पातळ असतात कारण त्याच्या रक्ताच्या पुरवठ्याने त्याच्या केसांचे योग्य प्रमाणात पोषण होत नसते. केस गळणे किंवा पातळ केस आजारपणाचे किंवा गरोदरपणाचे लक्षणही असू शकते.
डोक्याची त्वचा आणि केस निरोगी ठेवणे
प्र: केसांना आणि डोक्याला शॅम्पू कसा करावा?
उ: असे प्रत्ययास आले आहे की, कोरड्या त्वचेचा त्रास होणारे बहुतेक लोक खूपदा केस धुतात. केसांमधील तेलकटपणामुळे घाण आणि त्वचेवरील मळ साचून केसपुटकाकडे जाणारी तेलाची छिद्रे बंद होऊ शकतात हे खरे आहे. त्यामुळे, नियमाने केस धुणे आवश्यक आहे. पण या नैसर्गिक तेलांमुळे हानीकारक सूक्ष्मजंतूंपासून त्वचेचे संरक्षण होत असते आणि आवश्यक आर्द्रता राखली जाते. वारंवार केस धुतल्याने हा संरक्षक थर काढून टाकला जातो आणि त्यामुळे त्वचा कोरडी पडते. अनेक तज्ज्ञांच्या मते, डोक्याची त्वचा किंवा केस घाण झाल्यावरच ते धुवावेत. तेलकट केस असलेल्यांनी, सर्वसाधारण किंवा कोरडे केस असलेल्यांपेक्षा जास्त वेळा केस धुवावेत.
केस धुताना, डोक्याची मालीश करा. यामुळे त्वचेवरील मृत पेशी काढल्या जाऊन रक्ताचे अभिसरण वाढते ज्यामुळे केसांना पोषण मिळते. पण पाण्याने केस स्वच्छ धुवायला विसरू नका! साबणाने हात धुताना साबण पूर्णपणे निघाला नाही तर त्वचा कोरडी पडून फाटू लागते. त्याचप्रमाणे, केसांमधला शॅम्पू नीट धुऊन काढला नाही तर डोक्याची त्वचा कोरडी पडून तिचे पापुद्रे निघतात.
प्र: कोरड्या त्वचेवर काय उपाय आहे?
उ: भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घेत जा. यामुळे त्वचेला पाण्याचा योग्य प्रमाणात पुरवठा होत राहतो आणि रक्त पुरवठाही वाढतो. सौम्य शॅम्पूचा उपयोग करा आणि नियमितपणे डोक्याची मालीश करत जा. काही लोक, त्वचा कोरडी पडू नये म्हणून केसांवर राहू देण्याचे कंडिशनर लावतात किंवा लोशन लावतात.
केशभूषा
प्र: हेअरस्टायलिस्टकडे जाताना एखाद्याने काय लक्षात ठेवावे?
उ: तुम्हाला आपल्या केसांची स्टाईल बदलायची असल्यास, कोणती स्टाईल हवी आहे आणि कोणती नको आहे त्यांचे चित्र सोबत न्या. तुम्हाला काय वाटते आणि केसांची काळजी घ्यायला तुम्ही दररोज किती वेळ देऊ शकता ते मनमोकळेपणाने सांगा कारण केसांच्या काही स्टाईल्ससाठी जास्त काळजी घ्यावी लागते. हेसुद्धा लक्षात असू द्या की, एखाद्या हेअरस्टायलिस्टला दोन-तीन भेटींनंतरच तुमचे केस कसे आहेत ते माहीत पडेल आणि तुमच्यासोबतही त्यांचा चांगला परिचय होईल. म्हणून, एकाच भेटीत आपली हेअरस्टायलिस्ट चांगली नाही असा विचार करू नका.
केस कशाचे प्रतिबिंब
केसांची निगा आणि केशभूषा स्वतःच्या भावना प्रकट करण्याचा एक मार्ग आहेत. वेगवेगळ्या फॅशननुसार, धार्मिक विश्वासांनुसार आणि सामाजिक व राजकीय कल्पनांनुसारही लोकांनी केस कापले, वाढवले, सरळ केले, कुरळे केले, रंगवले किंवा विविध पद्धतींनी बसवले आहेत. आपल्या केसांचे परीक्षण करा. ते तुमच्याविषयी काय दाखवतात? साजेशा केशभूषेमुळे कोणत्याही व्यक्तीची शोभा वाढते आणि इतरांकडून प्रशंसा मिळते. (g०१ ४/८)
[तळटीप]
^ अधिक माहितीकरता, सावध राहा! (इंग्रजी) एप्रिल २२, १९९१ च्या अंकातील “ॲलोपिसिया—लिव्हिंग इन सायलन्स वीथ हेअर लॉस” हा लेख पाहा.
[२४ पानांवरील चित्रे]
पौष्टिक आहार घेतल्याने आणि भरपूर पाणी प्यायल्याने डोक्याच्या त्वचेचा कोरडेपणा दूर होतो
[२४ पानांवरील चित्र]
केस पांढरे होणे हे म्हातारपणाच्या नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे
[२४ पानांवरील चित्र]
वारंवार शॅम्पू केल्याने त्वचेला संरक्षक तेल मिळत नाही