व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव माझ्या प्रार्थना ऐकेल का?

देव माझ्या प्रार्थना ऐकेल का?

तरुण लोक विचारतात . . .

देव माझ्या प्रार्थना ऐकेल का?

“मी सर्व गोष्टींविषयी प्रार्थना करते कारण यहोवा मला जवळच्या मित्रासारखा वाटतो आणि माझ्यापुढे समस्या असल्यास तो मला जरूर मदत करेल हे मला माहीत आहे.”—अँड्रिया.

अँड्रिया नावाच्या या तरुण मुलीला खात्री आहे की देव तिच्या प्रार्थना ऐकतो. पण बऱ्‍याच तरुणांना अशी खात्री वाटत नाही. काहींना वाटते की देव आपल्यापासून खूप दूर आहे आणि त्यामुळे त्याला प्रार्थना करण्यास ते कचरतात. देवाला खरोखर आपली काळजी आहे का, त्याला प्रार्थना करण्यात काही अर्थ आहे का अशीही काहींना शंका वाटण्याची शक्यता आहे.

पण प्रार्थनेमागचे गुपित काय आहे? अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर देवासोबत खऱ्‍या अर्थाने मैत्री असणे हेच प्रार्थनेमागचे गुपित आहे. स्तोत्रकर्त्याने एकदा प्रार्थनेत म्हटले: “ज्यांस तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवितील.” (स्तोत्र ९:१०) तुमच्याविषयी काय? देवाला पूर्ण भरवशाने प्रार्थना करण्याइतपत तुम्हाला त्याची ओळख झाली आहे का? पुढे वाचण्याआधी “तुम्ही देवाला कितपत ओळखता?” या पेटीतील प्रश्‍नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्‍नांपैकी किती प्रश्‍नांची उत्तरे तुम्ही देऊ शकता?

तुम्ही देवाला कितपत ओळखता? उत्तरे पृष्ठ १३ वर

१. देवाचे नाव काय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे?

२. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे देवाचे चार मुख्य गुण कोणते?

३. मानवांवर देवाला असलेल्या प्रीतीचा सर्वात मोठा पुरावा कोणता?

४. आपण देवाच्या मैत्रीचा आनंद कसा अनुभवू शकतो?

५. प्रार्थना करताना आपली मनोवृत्ती कशी असावी?

निदान काही प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला हा पूर्ण लेख वाचण्याआधी देता आली का? मग बहुतेक लोकांपेक्षा तुम्हाला देवाविषयी बऱ्‍यापैकी ज्ञान आहे असे म्हणता येईल. पण कदाचित या प्रश्‍नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करताना तुमच्या लक्षात आले असेल की तुम्हाला त्याच्याविषयी अधिक ज्ञान घेण्याची, त्याला अधिक जवळून ओळखण्याची गरज आहे. (योहान १७:३) हे करण्यासाठी, ‘जो प्रार्थना ऐकतो’ त्या देवाविषयी बायबल आपल्याला काय शिकवते ते पाहू या.—स्तोत्र ६५:२.

देव वास्तविक व्यक्‍ती आहे

पहिले म्हणजे देव केवळ एक व्यक्‍तिभावरहित शक्‍ती नाही हे समजून घेण्यास बायबल आपल्याला मदत करते. त्याला व्यक्‍तिमत्त्व आहे आणि त्याचे नाव यहोवा आहे. (स्तोत्र ८३:१८) इब्री भाषेत या नावाचा अर्थ, “तो बनायला लावतो” असा आहे. आपल्या उद्देशांच्या पूर्तीकरता त्याला जे काही बनावे लागेल ते तो बनू शकतो. व्यक्‍तिभावरहित शक्‍ती असे करू शकत नाही! तेव्हा प्रार्थना करताना, तुम्ही याची खात्री बाळगू शकता की तुम्ही कोणत्या अमूर्त शक्‍तीशी किंवा नुसतेच हवेत बोलत नसता. तुम्ही एका वास्तविक व्यक्‍तीशी बोलत असता जी तुमचे ऐकू शकते आणि तुमच्या प्रार्थनांचे उत्तर देऊ शकते.—इफिसकर ३:२०.

डायना नावाची एक लहान मुलगी म्हणते: “मी कुठेही असले तरीही यहोवा माझे बोलणे ऐकू शकतो हे मला माहीत आहे.” इतका भरवसा असण्याकरता, देव आपल्याकरता एक वास्तविक व्यक्‍ती असली पाहिजे! बायबल म्हणते की, “देवाजवळ जाणाऱ्‍याने असा विश्‍वास ठेवला पाहिजे की, तो आहे.”—इब्री लोकांस ११:६.

बुद्धी आणि सामर्थ्याचा उगम

देव खरोखरच आपली मदत करू शकतो कारण त्याच्याजवळ आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतके सामर्थ्य आहे. भौतिक विश्‍वातील विशाल व गुंतागुंतीच्या सृष्टीकडे पाहिल्यावर त्याचे अमर्याद सामर्थ्य स्पष्टपणे दिसून येते. विश्‍वात अब्जावधी तारे आहेत, पण बायबल म्हणते की यहोवाला प्रत्येक ताऱ्‍याचे नाव माहीत आहे! आणि या सर्व ताऱ्‍यांतून निर्माण होणाऱ्‍या ऊर्जेचा तोच उगम आहे. (यशया ४०:२५, २६) हे खरोखरच आश्‍चर्यकारक नाही का? आणि तरीसुद्धा बायबल म्हणते की, “त्याच्या सामर्थ्याची ही नुसती चुणूक आहे”!—ईयोब २६:१४, टुडेज इंग्लिश व्हर्शन.

यहोवाच्या अथाह बुद्धीचाही विचार करा. बायबल म्हणते की त्याचे विचार “फार गहन आहेत.” (स्तोत्र ९२:५) मानवांना बनवणारा तोच असल्यामुळे, आपण स्वतःविषयी जितके जाणत नाही तितके तो जाणतो. (स्तोत्र १००:३) तो “पिढ्यान्‌पिढ्या” अस्तित्वात असल्यामुळे त्याला अमर्याद अनुभव आहे. (स्तोत्र ९०:१, २) त्याच्या बुद्धीपलीकडे असे काहीही नाही.—यशया ४०:१३, १४.

यहोवा आपल्या असीम सामर्थ्याचा आणि बुद्धीचा कसा उपयोग करतो? २ इतिहास १६:९ म्हणते: “परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो.” अशी कोणतीच समस्या नाही की, जी एकतर सोडवण्यास किंवा मग सहन करण्यास यहोवा तुम्हाला मदत करू शकत नाही. केला नावाची एक मुलगी सांगते: “अलीकडेच आमच्या कुटुंबासमोर एक कठीण समस्या आली. मी यहोवाला प्रार्थना केली आणि मला वाटतं की त्यानं खरोखरच आम्हाला त्या कठीण परिस्थितीला, समस्यांना आणि भावनांना तोंड द्यायला मदत केली कारण त्याच्या मदतीशिवाय आम्ही त्या संकटाला तोंड देऊच शकलो नसतो.” तुम्ही देवाला प्रार्थना करता तेव्हा तुम्ही बुद्धीचा उगम असलेल्या व्यक्‍तीशी बोलत असता. त्याच्यापेक्षा अधिक चांगले मार्गदर्शन कोण देऊ शकते?

न्याय व प्रीतीचा देव

पण देव तुम्हाला मदत करू इच्छितो हे कशावरून म्हणता येईल? कारण, यहोवाने स्वतःची ओळख एक सामर्थ्यशाली देव म्हणून किंवा अगाध बुद्धी असलेला देव म्हणून किंवा न्यायप्रिय देव म्हणून केली नाही. तर प्रीती हा त्याचा सर्वात प्रमुख गुण असल्याचे त्याने प्रगट केले. १ योहान ४:८ म्हणते, “देव प्रीति आहे.” (तिरपे वळण आमचे.) आणि त्याच्या या महान प्रीतिमुळेच प्रार्थनेत सामर्थ्य आहे. त्याच्या प्रीतीचा सर्वात मोठा पुरावा हा आहे की आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.—योहान ३:१६; १ योहान ४:९, १०.

देव प्रीती आहे, त्यामुळे तो तुमच्याकडे दुर्लक्ष करेल किंवा तुमच्यावर अन्याय करेल अशी भीती कधीही वाटू देऊ नका. अनुवाद ३२:४ म्हणते, “त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत.” देवाचे तुमच्यावर प्रेम असल्यामुळे तुम्ही खात्री बाळगू शकता, की तो तुमच्या प्रार्थना जरूर ऐकेल. तसेच, यामुळे आपल्याला आपले सर्वात गुप्त विचार आणि भावना देखील त्याच्याजवळ व्यक्‍त करण्याचे धैर्य मिळते.—फिलिप्पैकर ४:६, ७.

देवासोबत मैत्री

खरे पाहता यहोवा स्वतः आपल्याला त्याच्याशी बोलण्याचे आमंत्रण देतो. तो आपल्यापासून परका राहू इच्छित नाही. उलट सबंध मानवी इतिहासात यहोवाने मानवांना त्याच्याशी मैत्रीसंबंध प्रस्थापित करण्याचे आमंत्रण दिले आहे. अनेक स्त्री पुरुष, अबालवृद्धांनी देवाच्या मैत्रीचा आस्वाद घेतला व ते देवाच्या मनासारखे लोक होते असे त्यांच्याविषयी म्हणण्यात आले. अब्राहाम, राजा दावीद आणि येशूची आई मरीया, ही या लोकांपैकी काही उदाहरणे.—यशया ४१:८; लूक १:२६-३८; प्रेषितांची कृत्ये १३:२२.

तुम्ही देखील यहोवाच्या मित्रांपैकी असू शकता. पण देवाशी मैत्री असण्याचा अर्थ, आपण देवाला एखाद्या जिनसारखे समजू नये. म्हणजे, आपल्याला काहीतरी पाहिजे असते किंवा आपल्यासमोर एखादी समस्या येते फक्‍त तेव्हाच आपण त्याला प्रार्थना करावी असे आपण समजू नये. आपल्या प्रार्थना केवळ आपल्याच गरजांपुरत्या नसाव्यात. देवाशी मैत्री असावी असे जर आपल्याला वाटते तर आपण स्वतःच्याच नाही तर त्याच्या इच्छेचाही विचार केला पाहिजे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे आपण वागले पाहिजे. (मत्तय ७:२१) म्हणूनच येशूने आपल्या शिष्यांना शिकवले, की प्रार्थना करताना त्यांनी देवाच्या नजरेत महत्त्वाच्या असणाऱ्‍या गोष्टींना प्राधान्य द्यावे. त्याने म्हटले: “ह्‍यास्तव तुम्ही ह्‍या प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:९, १०) तसेच आपल्या प्रार्थनांमध्ये आपण देवाची भरभरून उपकारस्तुती केली पाहिजे.—स्तोत्र ५६:१२; १५०:६.

पण आपल्या गरजा किंवा चिंता अगदी क्षुल्लक आहेत असे समजून त्यांविषयी प्रार्थना करण्यास आपण कधीही कचरू नये. स्टीव्ह म्हणतो, “मी त्याच्याशी अगदी मनातले बोलण्याचा प्रयत्न करतो, पण कधीकधी मला वाटते की क्षुल्लक गोष्टी कशाला उगाच त्याला सांगायच्या?” तुम्हाला कधी असे वाटल्यास, येशूने आपल्या शिष्यांना काय शिकवले ते आठवा: “पाच चिमण्या दोन दमड्यांस विकतात की नाही? तरी त्यांपैकी एकीचाहि देवाला विसर पडत नाही. . . . भिऊ नका; तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहा.” (लूक १२:६, ७) हा खरोखरच दिलासा देणारा विचार नाही का?

तेव्हा, हे अगदीच स्पष्ट आहे की तुम्ही यहोवाबद्दल जितके जास्त जाणून घ्याल तितकेच तुम्ही त्याला प्रार्थना करण्यास प्रवृत्त व्हाल; तसेच यहोवा तुम्हाला मदत करण्यास समर्थ आहे आणि तो जरूर मदत करेल असा तुम्हाला अधिकाधिक भरवसा वाटू लागेल. मग देवाला प्रार्थना करत असताना तुम्ही कशाप्रकारची मनोवृत्ती बाळगली पाहिजे? आदरपूर्वक, विनम्र आणि निःस्वार्थ भावनेने प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्‍याला तुम्ही गर्विष्ठपणे किंवा अवमानकारक भाषेत काही मागणी केल्यास तो तुमचे ऐकेल असे तुम्हाला वाटते का? मग आपल्या प्रार्थना ऐकल्या जाव्यात असे वाटत असल्यास आपण यहोवाचा व त्याच्या दर्जांचा आदर करावा अशी त्याने आपल्याकडून अपेक्षा करणे रास्तच नाही का?—नीतिसूत्रे १५:२९.

देवाला भिणारे हजारो युवक त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलण्यास शिकले आहेत. (स्तोत्र ६२:८) ब्रेट म्हणतो, “यहोवा माझ्या प्रार्थनांचे उत्तर देतो तेव्हा मला हे जाणून प्रोत्साहन मिळते की तो अजूनही माझा मित्र आहे.” तुमच्याविषयी काय? तुम्हीही देवासोबत अशाचप्रकारची मैत्री अनुभवू शकता का? दोन ख्रिस्ती युवकांनी पुढीलप्रमाणे आपापले मत व्यक्‍त केले:

रेचल: “यहोवाशी घनिष्ट संबंध असण्याकरता त्याच्या वचनाचा सखोल अभ्यास करणे आवश्‍यक आहे याची मला जाणीव आहे आणि म्हणून मी असा अभ्यास करण्याची इच्छा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.”—१ पेत्र २:२.

जेनी: “मला वाटतं की तुम्ही त्याच्या सेवेत स्वतःला जितके जास्त झोकून देता तितकेच त्याच्या जवळ असल्याचे तुम्हाला वाटू लागते.”—याकोब ४:८.

प्रार्थना केल्यामुळे खरेच काही फायदा होईल का, असा कधी तुम्ही विचार करता का? एका ख्रिस्ती तरुणाने म्हटले: “देव माझ्याशी बोलला किंवा त्याने मला संदेश पाठवला तर मला वाटेल की माझ्यासोबत त्याचा घनिष्ट संबंध आहे.” पण आपल्याला अक्षरशः ऐकू येईल अशाप्रकारे यहोवा आपल्या प्रार्थनांचे उत्तर देत नाही; मग प्रार्थना केल्यामुळे आपल्याला कशाप्रकारे मदत मिळते? पुढच्या अंकात याविषयी चर्चा केली जाईल.

(g०१ ६/२२)

[१३ पानांवरील चौकट]

पृष्ठ ११ वरील प्रश्‍नांची उत्तरे

१. यहोवा. त्याचा अर्थ “तो बनायला लावतो.”

२. प्रीती, सामर्थ्य, न्याय आणि बुद्धी.

३. त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला, येशूला आपल्यासाठी मरावे म्हणून पृथ्वीवर पाठवले.

४. यासाठी आपण केवळ आपल्या गरजांवर जास्त भर न देता देवाच्या इच्छेविषयी आस्था बाळगून त्याच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे.

५. आपण आदरपूर्वक, नम्र आणि निःस्वार्थ भावना बाळगली पाहिजे.

[१२ पानांवरील चित्रे]

बायबलचा अभ्यास करण्याद्वारे आणि सृष्टीचे निरीक्षण करण्याद्वारे देवाला अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेण्यास तुम्हाला मदत मिळेल