व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अनावश्‍यक चिंता करण्याचे कसे टाळावे?

अनावश्‍यक चिंता करण्याचे कसे टाळावे?

तरुण लोक विचारतात . . .

अनावश्‍यक चिंता करण्याचे कसे टाळावे?

“तरुणांना सर्वात जास्त कशाची काळजी वाटत असेल तर ते आहे भविष्य. स्वतःबद्दलही काळजी वाटतेच. घर सोडून वेगळं राहावं का? पुढं आणखी शिकावं का? पूर्ण वेळेची सेवा सुरू करावी का? लग्न करावं का? मनात प्रश्‍नांचं असं मोहळ उठलं की भीती वाटू लागते.” —शेन, वय २० वर्षे.

तुम्हीही खूप चिंता करता का? बरेच तरुण वेगवेगळ्या कारणांमुळे चिंता करतात. पालकांच्या मार्गदर्शनार्थ प्रकाशित केलेल्या एका वृत्तपत्रिकेत अशी माहिती देण्यात आली: “अलीकडेच ४१ देशांतील १५-१८ वयोगटातील तरुणांवर घेण्यात आलेल्या एका जागतिक सर्व्हेवरून असे दिसून आले की आजकालच्या तरुणांना सर्वात जास्त काळजी वाटते ती चांगली नोकरी मिळण्याची.” या पाठोपाठ त्यांना आईवडिलांच्या आरोग्याची देखील काळजी वाटते. प्रिय व्यक्‍तीचा मृत्यूसुद्धा यादीत वरच्या क्रमांकावर होता.

अमेरिकेच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या एका सर्व्हेतून असे पाहण्यात आले की अमेरिकेतील बऱ्‍याच तरुणांना “चांगले गुण मिळवण्यासाठी त्यांच्यावर असलेल्या दबावाची” चिंता वाटते. याच सर्व्हेतून असेही दिसून आले की बऱ्‍याच तरुणांच्या भावना (सुरवातीला उल्लेख केलेल्या) शेनसारख्याच आहेत. ॲशली नावाचा दुसरा एक युवक म्हणतो: “मला माझ्या भविष्याची चिंता वाटते.”

काही तरुणांना त्यांच्या वैयक्‍तिक सुरक्षेची काळजी वाटते. १९९६ साली घेतलेल्या एका सर्व्हेनुसार अमेरिकेतील जवळजवळ ५० टक्के तरुणांना असे वाटते की शाळा-कॉलेजांतील वातावरण अधिकाधिक हिंसक होत चालले आहे. ८० लाखांपेक्षा अधिक (३७ टक्के) किशोरवयीन मुलामुलींनी सांगितले की ते बंदुकीच्या गोळीने जखमी झालेल्या किंवा ठार झालेल्या कोणा न कोणाला तरी ओळखत होते!

पण सर्वांनाच असे भीतीदायक विचार भेडसावत नाहीत. बऱ्‍याच तरुणांना त्यांच्या सामाजिक जीवनाबद्दल सर्वात जास्त चिंता वाटते. पालकांकरता खास प्रकाशित होणाऱ्‍या एका इंटरनेटवरील नियतकालिकात असे म्हटले होते: “किशोरवयीन मुलामुलींना बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड असण्याविषयी काळजी वाटते, आणि बऱ्‍याच तरुणांची तर विवंचना अशी आहे की त्यांना कोणीच मित्रमैत्रिणी नाहीत.” मेगन नावाच्या एका किशोरवयीन मुलीने म्हटले: “फॅशनेबल दिसण्यासाठी व वागण्यासाठी मला काय करता येईल? मला पण काही मित्र हवे आहेत.” याच संदर्भात नतानेएल नावाचा १५ वर्षांचा एक ख्रिस्ती मुलगा म्हणतो: “माझ्या शाळेतल्या मुलामुलींची सर्वात मोठी काळजी म्हणजे स्टाईल. आपण कसे चालतो, कसे बोलतो, कसे दिसतो याची त्यांना सतत चिंता असते. इतरांसमोर आपण वेडगळ दिसू याची त्यांना भीती असते.”

जीवनात समस्या येणे स्वाभाविक

आपल्याला जीवनात कशाचीच काळजी करावी लागली नसती तर किती चांगले झाले असते. पण बायबल म्हणते: “स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो.” (ईयोब १४:१) समस्या आणि त्यांमुळे साहजिकच वाटणारी काळजी जीवनात अविभाज्यपणे गोवलेली आहे. पण तुम्ही जीवनातल्या काळजीविषयी व चिंतांविषयीच सतत विचार करत राहिलात तर यामुळे तुम्ही स्वतःचे खूप नुकसान करून घ्याल. बायबल ताकीद देते: “मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करितो.”—नीतिसूत्रे १२:२५.

अनावश्‍यक काळजी टाळण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेवणे. सोळा वर्षांची आना म्हणते: “माझ्या वर्गातल्या बऱ्‍याच मुलींना गरोदर राहण्याची किंवा लैंगिक संभोगाने संक्रमित होणारा रोग जडण्याची भीती वाटते.” पण बायबलच्या नैतिक आदर्शांना जडून राहिल्यास तुम्ही अशाप्रकारच्या चिंता टाळू शकता. (गलतीकर ६:७) अर्थात, सर्वच समस्यांवर इतका स्पष्ट व सोपा उपाय असेलच असे नाही. मग तुम्ही काळजी करण्याचे कसे टाळू शकता?

“सुज्ञतेने चिंता करा”

काहीजण इतकी चिंता करतात की त्यांना दुसरे काहीच सुचत नाही. पण किशोरवयीन मुलांसाठी असलेल्या एका लेखात असा सल्ला देण्यात आला की चिंतेचे रूपांतर सकारात्मक कृतींत करण्याद्वारे ‘सुज्ञतेने चिंता करणे’ शक्य आहे! असे करण्यासाठी बायबलमधील अनेक तत्त्व सहायक ठरू शकतात. नीतिसूत्रे २१:५: “उद्योग्याचे विचार [“योजना,” NW] समृद्धि करणारे असतात. जो कोणी उतावळी करितो तो दारिद्र्‌याकडे धाव घेतो.” उदाहरणार्थ, तुम्हाला मंडळीतल्या काही मित्रांना घरी बोलवण्याची इच्छा आहे. जर तुम्ही चांगल्याप्रकारे योजना आखली तर बरीच काळजी व चिंता तुम्ही टाळू शकता. आधीच विचार करा: ‘आपण कोणाकोणाला बोलावणार? त्यांनी किती वाजता आले पाहिजे? किती वाजेपर्यंत त्यांनी परत जायला पाहिजे? त्यांना देण्याकरता काय काय आणण्याची खरोखर गरज आहे? मौजेकरता काही खेळ वगैरे खेळता येतील का?’ अशाप्रकारे आधीपासूनच सर्व गोष्टींचा विचार केल्यास तुम्ही आयोजित केलेला समारंभ व्यवस्थित पार पडेल.

पण खूप गुंतागुंतीच्या योजना केल्यामुळे तुम्ही स्वतःहून चिंता ओढवता. उत्तम पाहुणचार करण्याच्या प्रयत्नात आवश्‍यकतेपेक्षा जास्त त्रास घेणाऱ्‍या एका स्त्रीला येशू ख्रिस्ताने असा सल्ला दिला: “थोडक्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे.” (लूक १०:४२) तेव्हा, विचार करा: ‘हा समारंभ यशस्वी करण्यासाठी खरोखर काय महत्त्वाचे आहे?’ साध्या योजना केल्यामुळे तुम्ही अनावश्‍यक चिंता टाळू शकता.

किंवा कदाचित तुम्ही शाळेत स्वतःच्या सुरक्षेविषयी चिंता करत असाल. अर्थात, तेथील परिस्थितीत काही बदल करणे तुमच्या हातात नाही. पण स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही निश्‍चितच काही व्यावहारिक पावले उचलू शकता. नीतिसूत्रे २२:३ म्हणते: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानि पावतात.” असुरक्षित ठिकाणे, म्हणजे केवळ एकांत स्थानेच नव्हे तर उनाड मुलेमुली सहसा जेथे एकत्र येतात आणि जेथे त्यांच्यावर नियंत्रण करायला कोणी मोठे माणूस नसल्यास अशी ठिकाणे टाळल्यास तुम्ही धोकेदायक प्रसंग टाळू शकता.

गृहपाठ हा आणखी एक चिंतेचा विषय असू शकतो. कदाचित तुम्हाला अनेक महत्त्वाचे गृहपाठ पूर्ण करायचे असतील आणि ही सर्व कामे दिलेल्या वेळात करता येणार नाहीत या विचाराने तुम्ही चिंतीत असाल. या संदर्भात फिलिप्पैकर १:१०, [NW] येथील तत्त्व तुम्हाला सहायक ठरेल: “अधिक महत्त्वाच्या गोष्टींची खातरी करा.” होय, कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे हे शिकून घ्या. गृहपाठापैकी सर्वात महत्त्वाचे काम कोणते हे ठरवा आणि सर्वात आधी ते पूर्ण करा. मग पुढचे काम करायला घ्या. असे केल्यास तुम्हाला तुमचा गृहपाठ संपवणे जास्त कठीण जाणार नाही.

सल्ला घ्या

एरन शाळकरी वयाचा होता तेव्हा वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होण्याविषयी त्याला इतकी चिंता वाटायची की त्याला छातीत दुखायचे. तो सांगतो: “मी माझ्या आईवडिलांना माझी तक्रार सांगितली, आणि त्यांनी मला डॉक्टरकडे पाठवले. डॉक्टरच्या लगेच लक्षात आले की माझ्या हृदयात काही बिघाड झालेला नव्हता; चिंतेमुळे शरीरावर दुष्परिणाम कसा होऊ शकतो ते त्यांनी मला समजावून सांगितले. माझ्या आईवडिलांनीही माझी समजूत घातली की परीक्षेची मी माझ्या परीने चांगली तयारी केली होती आणि त्यामुळे आता त्याबद्दल काळजी करण्यापेक्षा मी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. अशाप्रकारे माझी चिंता कमी झाली, छातीचे दुखणेही गेले आणि परीक्षेतही मला चांगले गुण मिळाले.”

तुम्हालाही चिंतेने दबून गेल्यासारखे वाटत असेल तर ही समस्या आपल्या मनातच ठेवून गुपचूप सहन करू नका. नीतिसूत्रे १२:२५ हे पूर्ण वचन याप्रकारे आहे: “मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते परंतु गोड शब्द त्याला आनंदित करितो.” तुम्ही तुमच्या ‘चिंतेविषयी’ कोणाला सांगितले तरच तुम्हाला प्रोत्साहनाचे “गोड शब्द” ऐकायला मिळतील!

सर्वात आधी कदाचित तुम्ही आपल्या आईवडिलांशी बोलू शकता; ते अवश्‍य तुम्हाला काही मार्गदर्शक सूचना देतील. तसेच तुमच्या स्थानीय ख्रिस्ती मंडळीतील आध्यात्मिकरित्या परिपक्व बंधुभगिनींचाही आधार तुम्ही घेऊ शकता. जनेल नावाच्या एका पंधरा वर्षांच्या मुलीने सांगितले: “कॉलेजात प्रवेश घेताना मला खूप चिंता वाटत होती—ड्रग्स, सेक्स, हिंसा या सर्व गोष्टींना आपण कसे तोंड देऊ शकू याची मला भीती वाटत होती. मग मी मंडळीतल्या एका वडिलांशी चर्चा केली. त्यांनी मला अनेक उपयुक्‍त सूचना दिल्या. त्यांच्याशी बोलल्यावर मला हायसे वाटू लागले कारण मला, माझ्या समस्येला तोंड देण्याचा आत्मविश्‍वास मिळाला होता.”

आजचे काम उद्यावर टाकू नका

कधीकधी आपल्याला काहीतरी करायचे असते पण ते काम आपल्याला मुळात आवडत नसल्यामुळे आपण ते पुढे ढकलत राहतो. एकोणीस वर्षांच्या शवोनचा एका सहख्रिस्ती बांधवासोबत काहीतरी मतभेद झाला होता. त्याच्यासोबत प्रत्यक्ष बोलून मतभेद दूर केला पाहिजे हे तिला माहीत होते पण तरीसुद्धा हे काम ती पुढे ढकलत होती. ती कबूल करते, “एकेक दिवस जात होता तसतसे मला आणखीनच बेचैन वाटू लागले.” मग शवोनला मत्तय ५:२३, २४ येथील येशूच्या शब्दांची आठवण झाली; या वचनात येशूने ख्रिस्ती लोकांना अशाप्रकारच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे प्रोत्साहन दिले आहे. शवोन सांगते, “मी शेवटी या सल्ल्याचे पालन केले तेव्हा कोठे माझी चिंता दूर झाली.”

तुम्ही देखील, एखादे न आवडणारे काम किंवा मतभेद दूर करण्यासाठी एखाद्याशी अमोरासमोर भेटण्यास जिवावर येत असल्यामुळे ही भेट पुढे ढकलत आहात का? शक्य तितक्या लवकर ते उरकून टाका म्हणजे तुमची निदान एक चिंता नाहीशी होईल.

गंभीर समस्या

सगळ्याच समस्या अशा सहजासहजी सुटत नाहीत. अबदूर नावाच्या एका मुलाचे उदाहरण पाहा. त्याच्या आईला कर्करोग झाला आहे आणि आईसोबतच त्याच्यावर लहान भावाचीही जबाबदारी आहे. साहजिकच अबदूरला आपल्या आईच्या स्थितीविषयी काळजी वाटते. पण तो म्हणतो, “‘चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे?’ या येशूच्या शब्दांतून मी एक धडा शिकलो. चिंतेने पस्त होण्याऐवजी आपल्या परिस्थितीविषयी पूर्ण विचार करा आणि सर्वात चांगले परिणाम कोणत्या मार्गाने मिळतील हे ठरवा.”—मत्तय ६:२७.

आपल्यावर एखादे संकट आले असता शांत राहणे साहजिकच सोपे नसते. काहीजण तर इतके दुःखी होतात की ते स्वतःकडेही दुर्लक्ष करू लागतात, खाण्यापिण्याचे सोडून देतात. पण आपल्या किशोरवयीन अपत्याला तणावावर विजय मिळवण्यास साहाय्य करणे या पुस्तकात असे बजावले आहे की तुम्ही स्वतःला मूलभूत पोषक तत्त्वांपासून वंचित ठेवता तेव्हा तुम्ही “ताणतणावाला तोंड देण्यास अधिकच असमर्थ होता आणि गंभीर आरोग्य समस्या उद्‌भवण्याची शक्यताही वाढते.” तेव्हा, आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. पुरेशी विश्रांती आणि पोषक आहार घ्या.

बायबलच्या पुढील सल्ल्याचे पालन केल्यामुळे तुम्हाला सर्वाधिक साहाय्य मिळेल: “तू आपला भार परमेश्‍वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.” (स्तोत्र ५५:२२) सुरवातीला उल्लेख केलेल्या शेनला आपल्या भविष्याची काळजी वाटायची. तो सांगतो, “मी देवाच्या वचनावर आणि त्याच्या उद्देशावर अधिकाधिक मनन करू लागलो.” लवकरच त्याला जाणीव झाली की देवाची सेवा करण्याकरता आपल्या जीवनाचा उपयोग केल्यास त्याला खरा आनंद मिळेल. (प्रकटीकरण ४:११) शेन म्हणतो, “मी स्वतःबद्दल चिंता करण्याचे सोडून दिले. विचार करण्यासाठी मला अधिक महत्त्वाचे असे काहीतरी सापडले होते.”

तर मग, आपण खूपच चिंता करत आहोत असे तुम्हाला जाणवल्यास आपली समस्या सोडवण्याकरता सकारात्मक मार्ग शोधा. परिपक्व, अनुभवी व्यक्‍तींकडून सल्ला घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या सर्व चिंता यहोवाला कळवा “कारण तो तुमची काळजी घेतो.” (१ पेत्र ५:७) त्याच्या मदतीने कदाचित तुम्हाला अनावश्‍यक चिंता टाळता येतील.

(g०१ ९/२२)

[१३ पानांवरील चित्र]

आपल्या समस्येविषयी आईवडिलांशी चर्चा करा

[१४ पानांवरील चित्र]

तुम्ही जितक्या लवकर आपल्या समस्या सोडवाल तितक्याच लवकर तुम्हाला चिंतेपासून मुक्‍त होता येईल