व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्तविरोधक कोण आहे?

ख्रिस्तविरोधक कोण आहे?

बायबलचा दृष्टिकोन

ख्रिस्तविरोधक कोण आहे?

‘ख्रिस्तविरोधक येणार असे तुम्ही ऐकले आहे.’—१ योहान २:१८.

एका भयानक गुन्हेगाराला तुमच्या राहत्या परिसराकडे येताना पाहण्यात आले आहे असे तुम्हाला सूचित करण्यात आल्यास तुम्ही काय कराल? साहजिकच तो कसा दिसतो, कोणत्याप्रकारचे गुन्हे करतो याविषयी तुम्ही सविस्तर माहिती मिळवण्याचा प्रयत्न कराल. आणि नक्कीच तुम्ही सतर्क राहाल.

आज अशाचप्रकारची परिस्थिती आहे. प्रेषित योहानाच्या पुढील शब्दांतून आपल्याला सूचित करण्यात आले आहे: “जो जो आत्मा [“प्रेरित वचन,” NW] येशूला कबूल करीत नाही, तो तो देवापासून नाही. हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे; तो येणार हे तुम्ही ऐकले आहे आणि तो जगात आताहि आहे.” (१ योहान ४:३) अशाप्रकारचा कोणी ख्रिस्तविरोधक, देवाचा शत्रू आणि माणसांना फसवणारा आज सर्व मानवजातीला भेडसावत आहे का?

योहानाने आपल्या पत्रांपैकी दोन पत्रांत “ख्रिस्तविरोधक” ही संज्ञा वापरली. ख्रिस्तविरोधक म्हणजे जो येशू ख्रिस्ताविषयी बायबलच्या शिकवणुकींचा विरोध करतो; यात स्वतःला ख्रिस्त म्हणवणाऱ्‍या किंवा ख्रिस्ताद्वारे पाठवलेले असल्याचा दावा करणाऱ्‍यांचाही समावेश होतो. ख्रिस्तविरोधकाबद्दल बायबल विश्‍वासार्ह माहिती देते. पण सहसा अपराध्यांबद्दल खऱ्‍या वस्तुस्थितीपेक्षा खोट्या अफवांनाच प्रसिद्धी मिळते, त्याचप्रमाणे ख्रिस्तविरोधकाबद्दलही निराधार वृत्तेच अधिक प्रचलित झाली आहेत.

चुकीची ओळख

प्रेषित योहानाच्या काळापासून बऱ्‍याच जणांनी असा दावा केला आहे की ख्रिस्तविरोधकाविषयी योहानाने जे म्हटले होते ते एका विशिष्ट व्यक्‍तीच्या संदर्भात आहे. त्यांनी निरनिराळ्या व्यक्‍तींना ख्रिस्तविरोधक ठरवले आहे. कित्येक शतकांआधी बऱ्‍याच जणांची अशी समजूत होती की सम्राट नीरो ख्रिस्तविरोधक होता. नंतर अडॉल्फ हिटलरच्या राज्यात द्वेषपूर्ण दहशतीची लाट उसळली तेव्हा बऱ्‍याचजणांना खात्री पटली की तोच ख्रिस्तविरोधक होता. जर्मन तत्त्ववेत्ता फ्रीड्रीख नीत्शे याला देखील ख्रिस्तविरोधक संबोधण्यात आले. काहींचे असे म्हणणे आहे की ख्रिस्तविरोधक अद्याप यायचा आहे आणि तो जगावर प्रभुत्व करण्याची मनसा असलेल्या एका धूर्त, क्रूर राजकीय नेत्याच्या रूपात प्रकट होईल. त्यांना असे वाटते की प्रकटीकरणातील १३ व्या अध्यायातील जंगली श्‍वापद, योहानाने उल्लेख केलेल्या ख्रिस्तविरोधकाशी थेटपणे संबंधित आहे. ते म्हणतात की या श्‍वापदाचे चिन्ह असलेली ६६६ ही संख्या, भविष्यात प्रकट होणार असलेल्या व दुष्टतेचा प्रवर्तक असलेल्या ख्रिस्तविरोधकाची ओळख पटवून देईल.

वरील कल्पनांचा प्रचार करणाऱ्‍यांनी असे गृहीत धरले आहे, की योहानाने केवळ एका व्यक्‍तीला ख्रिस्तविरोधक म्हटले. पण त्याच्या शब्दांवरून काय दिसून येते? १ योहान २:१८ येथील शब्दांवर विचार करा: “ख्रिस्तविरोधक येणार असे तुम्ही ऐकले त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत.” होय, पहिल्या शतकातील आध्यात्मिक समस्येला एक नव्हे तर “पुष्कळ ख्रिस्तविरोधक” कारणीभूत होते. आज देखील, एक नव्हे तर पुष्कळ ख्रिस्तविरोधक मिळून एक ख्रिस्तविरोधक गट बनला आहे. त्यांनी सामूहिकरित्या मानवजातीचा आध्यात्मिक नाश केला आहे. (२ तीमथ्य ३:१-५, १३) पण ख्रिस्तविरोधकात कोणाकोणाचा समावेश होतो?

प्रकटीकरणाच्या १३ व्या अध्यायातील जंगली श्‍वापद ख्रिस्तविरोधक आहे असे गृहीत धरूया. प्रेषित योहानाने लिहिले: “जे श्‍वापद मी पाहिले ते चित्त्यासारखे होते, त्याचे पाय अस्वलाच्या पायांसारखे होते व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते.” (तिरपे वळण आमचे.) (प्रकटीकरण १३:२) या गुणलक्षणांवरून काय सूचित होते?

बायबलचा अभ्यास करणारे विद्वान, प्रकटीकरणाचा १३ वा अध्याय व दानीएल पुस्तकातील ७ वा अध्याय एकमेकांशी संबंधित आहेत असे सांगतात. देवाने दानीएलला काही लाक्षणिक श्‍वापदांचा दृष्टान्त दिला, ज्यात एक चित्ता, एक अस्वल व एक सिंह होता. (दानीएल ७:२-६) देवाच्या संदेष्ट्याने या श्‍वापदांचा अर्थ कशाप्रकारे स्पष्ट केला? त्याने लिहिले की हे हिंस्र पशू पृथ्वीवरील राजे किंवा सरकार यांना सूचित करतात. (दानीएल ७:१७) त्याअर्थी, प्रकटीकरणातील श्‍वापद देखील मानवी सरकारांना सूचित करते असा निष्कर्ष काढणे तर्कशुद्ध ठरेल. ही सरकारे देवाच्या राज्याचा विरोध करत असल्यामुळे, ख्रिस्तविरोधकांमध्ये त्यांचाही समावेश होतो.

ख्रिस्तविरोधकात आणखी कोणाचा समावेश आहे?

देवाचा पुत्र, ख्रिस्त या पृथ्वीवर होता तेव्हा त्याचे अनेक शत्रू होते. आज त्याला शारीरिक हानी करणे जरी कोणाला शक्य नसले तरीसुद्धा या आधुनिक काळातही त्याचे अनेक विरोधक आहेत. यांत कोणाचा समावेश आहे याकडे लक्ष द्या.

प्रेषित योहानाने म्हटले: “येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे.” (१ योहान २:२२) धर्मत्यागी व खोट्या धर्माचे नेते येशूच्या सुस्पष्ट शिकवणुकींचा विपर्यास करतात आणि त्यांत पथभ्रष्ट करणाऱ्‍या खोट्या धार्मिक शिकवणुकींची भेसळ करतात. हे लोक बायबलमधील सत्याकडे पाठ फिरवून देवाच्या व ख्रिस्ताच्या नावाने खोटेपणा पसरवतात. त्रैक्याच्या शिकवणुकीद्वारे ते पित्याच्या व पुत्राच्या खऱ्‍या संबंधाला खोटे ठरवतात. त्यामुळे, ते देखील ख्रिस्तविरोधकात सामील आहेत.

लूक २१:१२ याता येशूने आपल्या शिष्यांना ही पूर्वसूचना दिली होती: “ते [माझ्या नावासाठी] तुमच्यावर हात टाकतील व तुमचा छळ करतील; तुम्हाला सभास्थाने व तुरुंग ह्‍यांच्या स्वाधीन करतील.” पहिल्या शतकापासून खऱ्‍या ख्रिस्ती लोकांना अमानुष छळ सोसावा लागला आहे. (२ तीमथ्य ३:१२) अशाप्रकारच्या छळाचे प्रवर्तक ख्रिस्ताच्या विरोधात कार्य करतात. हे देखील ख्रिस्तविरोधकात सामील आहेत.

“जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे; आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उधळतो.” (लूक ११:२३) येथे येशूने स्पष्ट केले की त्याचा विरोध करणारे आणि तो समर्थन करत असलेल्या दैवी उद्देशांचा विरोध करणारे सर्वजण ख्रिस्तविरोधकच आहेत. यांचा शेवट काय असेल?

ख्रिस्तविरोधकांचा शेवट काय असेल?

स्तोत्र ५:६ येथे म्हटले आहे, “असत्य भाषण करणाऱ्‍याचा तू [देव] नाश करितोस. खुनी व कपटी मनुष्याचा परमेश्‍वराला वीट येतो.” हे ख्रिस्तविरोधकांच्या बाबतीत खरे आहे का? होय. प्रेषित योहानाने लिहिले: “फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्‍याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे.” (२ योहान ७) अशाप्रकारे फसवणूक व कपटीपणा केल्यामुळे सर्वसमर्थ देव ख्रिस्तविरोधकांचा नाश करेल.

त्यांना हा दंड देण्याची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी खऱ्‍या ख्रिस्ती लोकांनी त्यांच्या, खासकरून धर्मत्यागी लोकांच्या ख्रिस्तविरोधी फसवणुकीला व दबावाला बळी पडून आपला विश्‍वास कमकुवत न होऊ देण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. योहानाने दिलेली ताकीद अत्यंत निकडीची आहे: “आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे म्हणून खबरदारी घ्या.”—२ योहान ८. (g०१ ८/८)

[२० पानांवरील चित्राचे श्रेय]

पृष्ठ २० वर नीरो: Courtesy of the Visitors of the Ashmolean Museum, Oxford