व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गुटेन बर्ग यांनी जगाला दिलेले वरदान!

गुटेन बर्ग यांनी जगाला दिलेले वरदान!

गुटेन बर्ग यांनी जगाला दिलेले वरदान!

जर्मनी येथील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

मागील हजार वर्षांत झालेल्या कोणत्या नव्या शोधाने तुमच्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव पाडला आहे? दूरध्वनी, दूरदर्शन किंवा मोटरकार? कदाचित यांपैकी एकही नाही. बऱ्‍याच तज्ज्ञांच्या मते मनुष्याच्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव पाडणारा शोध म्हणजे मुद्रणकला. या क्षेत्रातील सर्वात पहिली व्यवहार्य पद्धत शोधून काढण्याचे श्रेय (योहानस गुटेनबर्ग या नावाने अधिक प्रसिद्ध असलेल्या) योहॅनस गेन्सफ्लीश त्सूर लाडन यांना दिले जाते. ते उमरावांच्या घराण्यातून होते आणि त्यामुळे त्यांना शिकाऊ उमेदवारी करावी लागली नाही.

गुटेनबर्ग यांनी लावलेल्या या शोधाला, “मानव संस्कृतीला जर्मनीने दिलेले महान योगदान” असे संबोधण्यात आले आहे. त्यांची सर्वोत्कृष्ट मुद्रणकृती अर्थात ४२ ओळींचे बायबल म्हटलेले गुटेनबर्ग बायबल याच्या आजपर्यंत टिकलेल्या प्रतींपैकी प्रत्येक प्रत लाखमोलाची आहे.

सुवर्णनगरी मेन्झ

गुटेनबर्ग यांचा जन्म १३९७ साली किंवा त्याच्या आसपास मेन्झ येथे झाला. ऱ्‍हाईन नदीच्या काठी वसलेल्या मेन्झ नगराची त्याकाळी ६,००० इतकी लोकसंख्या होती. मेन्झला सुवर्णनगरी म्हटले जायचे आणि हे नगर काही प्रमुख नगरांपैकी एक होते. मेन्झ नगरातील आर्चबिशप पवित्र रोमी साम्राज्याचा सम्राट निवडण्यात सहभागी होत असत. मेन्झ खासकरून सुवर्णव्यापाराकरता सुविख्यात होते. योहानस यांनी लहान वयातच धातुखोदकामात प्राविण्य मिळवले, तसेच धातूवर उठावदार अक्षरात लिहिण्याची कला देखील त्यांनी आत्मसात केली होती. राजकीय खटक्यांमुळे त्यांना काही वर्षे स्ट्रासबर्ग येथे हद्दपार करण्यात आले; येथे ते रत्नांना पैलू पाडण्याचा व्यवसाय करत होते व हे कौशल्य शिकवत देखील होते. पण त्यांचा सर्वात जास्त वेळ, एका नवीन शोधावर ते करत असलेल्या गुप्त प्रयोगांत जात होता. ते यंत्रांच्या साहाय्याने मुद्रण करण्याच्या कलेवर प्रभुत्व मिळवण्याच्या प्रयत्नात होते.

गुटेनबर्ग यांचे कौशल आणि फूस्ट यांचे अर्थसाहाय्य

मेन्झला परतल्यावर गुटेनबर्ग यांनी आपले प्रयोग चालू ठेवले. अर्थसाहाय्याकरता त्यांनी योहान फूस्ट यांची मदत घेतली; फूस्ट यांनी त्यांना १,६०० गुल्डेन्सचे कर्ज दिले. त्याकाळात एका कुशल कारागिराला वर्षाला केवळ ३० गुल्डेन मिळायचे, त्यामानाने फूस्ट यांनी दिलेली रक्कम राजाला शोभणारी होती. फूस्ट हे अतिशय धूर्त उद्योगपती होते आणि या प्रकल्पात नफाच नफा आहे हे त्यांनी अचूक ताडले. गुटेनबर्ग यांनी कोणता धाडसी प्रकल्प हाती घेतला होता?

गुटेनबर्ग यांची जिज्ञासू वृत्ती होती. त्यांनी एकसारख्या दिसणाऱ्‍या वस्तूंचे मोठ्या संख्येने उत्पादन करणे शक्य आहे असे निरीक्षण केले होते. उदाहरणार्थ, धातूपासून नाणी पाडली जायची तसेच काडतुसे बनवली जायची. मग लेखन केलेली शेकडो पाने मुद्रित करून व संख्येनुसार ती क्रमवार संकलित करून एकसारखी दिसणारी अनेक पुस्तके तयार करता येणार नाहीत का? पण कोणती पुस्तके? गुटेनबर्गच्या मनात बायबलचा विचार आला; हे पुस्तक अतिशय मौल्यवान होते आणि त्याची प्रत बाळगण्याची फार थोडक्या लोकांची ऐपत होती. त्यामुळे, एकसारख्या दिसणाऱ्‍या बायबलच्या मोठ्या प्रमाणात प्रती तयार करून, हस्तलिखित पुस्तकांपेक्षा बरीच स्वस्त पण तितकीच सुंदर पुस्तके तयार करण्याचे गुटेनबर्ग यांचे ध्येय होते. हे कसे केले जाणार होते?

त्याकाळी बहुतेक पुस्तके हाताने नक्कल करून तयार केली जायची; अर्थातच हे काम अतिशय मेहनतीचे आणि वेळखाऊ होते. हाताने कोरलेल्या लाकडी ठोकळ्यांच्या साहाय्याने, एकेका ठोकळ्यावर एका पानाचा मजकूर कोरून मुद्रण करण्याचा प्रयत्न याआधी करण्यात आल होता. बी शंग नावाच्या एका चिनी माणसाने मुद्रणाकरता उपयोगात आणण्यासाठी चिनीमातीपासून प्रत्येक अक्षर देखील तयार केले होते. कोरियात तांब्यापासून अक्षरे तयार करून सरकारी मुद्रणाकरता उपयोगात आणली जात होती. पण चल खिळ्यांच्या साहाय्याने—अर्थात प्रत्येक नवीन पानावर शब्द व ओळी जुळवण्याकरता प्रत्येक अक्षराच्या सुट्या खिळ्यांच्या साहाय्याने मुद्रण करण्याकरता मोठ्या प्रमाणात हे खिळे उपलब्ध असणे आवश्‍यक होते, आणि अद्याप कोणीही त्यांचे उत्पादन करण्याची पद्धत शोधून काढलेली नव्हती. हा बहुमान गुटेनबर्ग यांच्यासाठीच जणू राखून ठेवण्यात आला होता.

धातुखोदकामात अनुभव असल्यामुळे त्यांना हे ओळखता आले की मुद्रणाकरता अक्षरांचे सुटे खिळे चिनिमाती किंवा लाकडापासून बनवण्याऐवजी धातूपासून बनवणेच सर्वात उत्तम ठरेल. हे खिळे कोरीवकाम करण्याऐवजी किंवा भट्टीत भाजण्याऐवजी साच्यात तयार करता येतील. वर्णमालेतील सर्व २६ अक्षरे—लोअरकेस व कॅपिटल—शिवाय, जोडाक्षरे, विरामचिन्हे, इतर सूचक चिन्हे आणि आकडे या सर्वांकरता गुटेनबर्ग यांना साच्यांची आवश्‍यकता होती. एकूण २९० वेगवेगळ्या अक्षरांकरता साचे व प्रत्येकाच्या कित्येक प्रतिकृती लागतील असा गुटेनबर्ग यांनी अंदाज बांधला.

कामाला सुरवात

गुटेनबर्ग यांनी आपल्या पुस्तकाकरता लॅटिन भाषेतील गॉथिक लिपी वापरण्याचे ठरवले; मठवासी जोगी देखील बायबलची नक्कल उतरवण्याकरता याच लिपीचा उपयोग करत होते. धातुखोदकामातील आपल्या अनुभवाचा उपयोग करून गुटेनबर्ग यांनी स्टीलच्या लहानशा ठोकळ्यावर प्रत्येक अक्षराचे व चिन्हाचे उठावदार दर्पण प्रतिबिंब कोरले. (चित्र क्र. १) ही स्टीलची मुद्रा तांबे किंवा पितळ यासारख्या मऊ धातूच्या लहानशा पाट्यावर दाबण्यात आली. यामुळे त्या विशिष्ट अक्षराचा सुलट आकार त्या नरम धातूच्या ठोकळ्यात कोरला गेला. या पाट्याला मातृका म्हणण्यात आले.

पुढील टप्प्यात अक्षरांच्या प्रतिकृती तयार करण्याकरता एका खास ओतीव धातूच्या साच्याचा उपयोग केला जायचा. हा आगळावेगळा साचा गुटेनबर्गच्या कल्पकतेचा आविष्कार होता. मुठीच्या आकाराचा हा साचा वरून व खालून उघडा होता. कोणत्याही अक्षराची मातृका साच्याच्या खालच्या बाजूला बसवली जायची आणि मग वरून त्यात वितळलेले धातूचे मिश्रण ओतले जायचे. (चित्र क्र. २) टिन, शिसे, ॲन्टीमनी आणि बिस्मथ यांचे मिश्रण लगेच थंड होऊन कठीण व्हायचे.

साच्यातून काढलेल्या त्या मिश्रधातूवर एकाबाजूला अक्षराचे उठावदार दर्पण प्रतिबिंब उमटलेले असायचे. हा एक तयार सुटे अक्षर होता. या प्रकारे त्या विशिष्ट अक्षराचे हवे तितके सुटे खिळे तयार केले जायचे. मग मातृका साच्यातून काढून त्याठिकाणी दुसऱ्‍या अक्षराची मातृका टाकली जायची. अशाप्रकारे प्रत्येक अक्षराचे व चिन्हाचे हवे तितके खिळे कमी वेळात तयार करणे शक्य झाले. गुटेनबर्ग यांच्या आवश्‍यकतेनुसार सर्व खिळे एकाच आकाराचे होते.

आता मुद्रणाला सुरवात करणे शक्य होते. गुटेनबर्गने बायबलमधील एक उतारा निवडला. अक्षरजुळणीची पट्टी (स्टिक) हातात घेऊन त्यांनी सुट्या अक्षरांच्या साहाय्याने शब्द, व शब्दांच्या साहाय्याने मजकुरातील वाक्ये जुळवली. (चित्र क्र. ३) प्रत्येक ओळीतील शब्दांमधील अंतर व त्यांची लांबी सारखी करण्यात आली. या मजकुरातील वाक्यांची रकान्यांत जुळवणी करून प्रत्येक पानावर दोन रकाने याप्रमाणे एका साच्यात त्यांनी हे पान कंपोज केले. (चित्र क्र. ४)

पान हलणार नाही याप्रकारे प्रेसवर एका सपाट पाट्यावर बसवून त्यावर शाई लावण्यात आली. (चित्र क्र. ५) वाईन तयार करण्याच्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्‍या प्रेसप्रमाणेच असलेल्या या प्रेसमध्ये सुट्या अक्षरांवरील शाई कागदावर उमटते. अशारितीने मजकूर कागदावर मुद्रित केला जातो. आणखी शाई व कागद वापरून याच प्रक्रियेने आवश्‍यक तितक्या प्रती मुद्रित केल्या गेल्या. अक्षरांचे खिळे हलवता येत असल्यामुळे त्यांचाच वापर करून दुसरे पान देखील कंपोज केले जात होते.

उत्कृष्ट कृती

गुटेनबर्ग यांच्या कार्यशाळेत १५-२० लोक कामाला होते. त्यांच्या या मुद्रणालयातून १४५५ साली पहिले मुद्रित बायबल तयार झाले. या बायबलच्या जवळजवळ १८० प्रती तयार करण्यात आल्या. प्रत्येक बायबलमध्ये १,२८२ पाने होती आणि प्रत्येक पानावर दोन रकान्यांत ४२ ओळी जुळवलेल्या होत्या. प्रत्येक बायबल दोन खंडांत उपलब्ध होते. या पुस्तकांचे बाईंडिंग, त्यावरील मथळ्यांचे आणि प्रत्येक अध्यायाच्या पहिल्या अक्षराचे हाताने केलेले नक्षीदार पेंटिंग इत्यादी नंतर बाहेरून करून घेण्यात आले.

बायबलचे मुद्रण करण्याकरता एकूण किती अक्षरांचे खिळे वापरावे लागले असतील? प्रत्येक पानावर जवळजवळ २,६०० अक्षरे आहेत. गुटेनबर्ग यांच्याकडे अक्षर जुळवणी करणारे सहा जण होते आणि ते एकावेळी तीन पानांवर काम करायचे असे गृहित धरल्यास त्यांना कमीतकमी ४६,००० सुट्या खिळ्यांची गरज पडली असेल. गुटेनबर्ग यांच्या ओतीव धातूच्या साच्यामुळेच अक्षरांच्या सुट्या खिळ्यांच्या साहाय्याने मुद्रण करणे शक्य झाले.

मुद्रित झालेल्या बायबलच्या प्रतींची एकमेकांशी तुलना केल्यावर लोकांना आश्‍चर्य वाटले. प्रत्येक बायबलमध्ये विशिष्ट शब्द त्याच ठिकाणी होता. हाताने लिहिलेल्या बायबलमध्ये हे शक्यच नव्हते. ग्वेनटर एस. वेगनर असे लिहितात की ४२ ओळींचे बायबल “इतके एकसारखे व प्रमाणबद्ध, इतके सुव्यवस्थित व सुंदर होते की आजपर्यंत मुद्रकांना या उत्कृष्ट कृतीचे विलक्षण कौतुक वाटते.”

आर्थिक नुकसान

फूस्ट यांना मात्र हे उत्कृष्ट बायबल निर्माण करण्यात कमी आणि पैसा कमवण्यात जास्त रस होता. आपल्या गुंतवणुकीपासून अपेक्षेप्रमाणे लवकर नफा मिळत नसल्याचे त्यांना दिसले. यावरून दोन्ही भागीदारांत खटके उडू लागले आणि १४५५ साली—बायबलचे मुद्रण जवळजवळ पूर्ण होत आले असता, फूस्ट यांनी कर्ज देण्याचे बंद केले. गुटेनबर्ग पैसा परत करण्यास असमर्थ होते आणि या वादामुळे झालेली कोर्ट केस ते हारले. त्यांना बळजबरीने फूस्ट यांना आपल्या मुद्रण साहित्यापैकी काही आणि बायबलकरता तयार केलेले अक्षरांचे खिळे देऊन टाकावे लागले. फूस्ट यांनी पीटर शोफर या गुटेनबर्ग यांच्या कुशल कर्मचाऱ्‍यासोबत मिळून स्वतःचे मुद्रणालय सुरू केले. गुटेनबर्ग यांनी कमवलेल्या प्रसिद्धीचा फूस्ट ॲन्ड शोफर नावाच्या कंपनीला फायदा झाला आणि ते जगातले पहिले यशस्वी व्यावसायिक मुद्रणालय ठरले.

गुटेनबर्ग यांनी दुसरे मुद्रणालय सुरू करून आपले काम चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. १५ व्या शतकातील इतर काही छापील साहित्याचे श्रेय विद्वानांनी गुटेनबर्ग यांना दिले आहे. पण ४२ ओळींच्या बायबलचे सौंदर्य व शान औरच होती! १४६२ हे वर्ष पुन्हा एकदा दुर्दैवी ठरले. कॅथलिक धर्मनेत्यांमधील सत्तासंघर्षातून मेन्झ शहरात लूटमार आणि जाळपोळ झाली. गुटेनबर्ग यांची कार्यशाळा दुसऱ्‍यांदा त्यांच्या हातून गेली. सहा वर्षांनंतर १४६८ साली फेब्रुवारीत त्यांचा मृत्यू झाला.

गुटेनबर्ग यांचा वारसा

गुटेनबर्ग यांच्या शोधाचा बघता बघता सगळीकडे प्रचार झाला. सन १५०० पर्यंत जर्मनीतल्या ६० गावांत आणि इतर १२ युरोपियन देशांत मुद्रणालये सुरू करण्यात आली. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका यात असे सांगितले आहे, की “मुद्रणाच्या प्रक्रियेत झालेल्या प्रगतीमुळे संदेशवहनाच्या क्षेत्रात जणू क्रांती झाली. पुढील वर्षांमध्ये, मुद्रणतंत्रात अनेक सुधारणा झाल्या खऱ्‍या, पण सुरवातीची मूलभूत प्रक्रिया आजपर्यंत फारशी बदलेली नाही.”

मुद्रणामुळे युरोपियन लोकांचे जीवनच पालटले कारण आता ज्ञानार्जन केवळ श्रीमंतांचा हक्क राहिला नाही. चालू घडामोडींविषयी बातम्या आणि माहिती सामान्य माणसापर्यंत पोचू लागली आणि तो आपल्या अवतीभवती होणाऱ्‍या घटनांविषयी अधिक जागृत झाला. मुद्रणामुळे, सर्व राष्ट्रीय भाषांना सर्वांना समजण्याजोगे लिखित रूप देणे आवश्‍यक बनले. त्यामुळे इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन भाषांच्या लिखित रूपाविषयी काही नियम ठरवून ते जतन करण्यात आले. वाचन साहित्याच्या मागणीत अभूतपूर्व वाढ झाली. गुटेनबर्ग यांच्या आधी युरोपात काही हजार हस्तलिखितेच होती; पण त्यांच्या मृत्यूच्या ५० वर्षांनंतर युरोपात लाखो पुस्तके बनली.

यंत्राच्या साहाय्याने मुद्रण करण्याचे तंत्र विकसित झाले नसते तर १६ व्या शतकातील धार्मिक सुधारणा साध्यच झाली नसती. बायबलचे भाषांतर चेक, डच, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोलिश आणि रशियन या भाषांतून करण्यात आले आणि मुद्रणयंत्राच्या साहाय्याने या बायबलच्या हजारो प्रती अगदी सहज प्रसिद्ध करण्यात आल्या. मार्टिन ल्यूथर यांनी आपल्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी मुद्रणतंत्राचा चांगलाच वापर केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले; पण गुटेनबर्गच्या मुद्रणयंत्राचा शोध लागण्याआधी, इतरांनी केलेले हेच प्रयत्न निष्फळ ठरले होते. म्हणूनच ल्यूथर यांनी मुद्रण यंत्राचे वर्णन “सबंध जगात खऱ्‍या धर्माचा प्रसार करण्याकरता” देवाचे माध्यम असे केले!

गुटेनबर्ग बायबलच्या आजवर टिकलेल्या प्रती

गुटेनबर्ग बायबलच्या किती प्रती आजवर टिकून राहिल्या आहेत? अलीकडेपर्यंत, या बायबलच्या ४८ प्रती युरोप व उत्तर अमेरिकेत आहेत असे म्हटले जात होते; यांपैकी काही अपूर्ण आहेत. सर्वात देखणी एक प्रत म्हणजे वॉशिंग्टन, डी.सी. येथील काँग्रेस लायब्ररीत असलेले चर्मपत्राचे बायबल. यानंतर १९९६ साली एक सनसनाटी शोध लागला: गुटेनबर्ग बायबलचा आणखी एक भाग जर्मनीत, रेन्ट्‌सबर्ग येथील एका चर्चच्या जुन्या पुस्तकांत आढळला.—सावध राहा! फेब्रुवारी ८, १९९८ अंकात पृष्ठ २९ वर पाहा.

आज बायबलची एक प्रत विकत घेणे कोणाच्याही सामर्थ्याबाहेर नाही याबद्दल आपण खरोखर किती कृतज्ञ आहोत! पण आपल्याला ४२ ओळींचे गुटेनबर्ग बायबलही घेता येईल असे समजू नका! एका प्रतीची काय किंमत असावी? मेन्झ येथील गुटेनबर्ग वस्तूसंग्रहालयाने १९७८ साली एका प्रतीचे ३.७ मिलियन ड्‌वेश मार्क मोजले होते. (आजच्या मानाने २० लाख अमेरिकन डॉलर) आजच्या तारखेला या बायबलची किंमत कितीतरी पटीने वाढली आहे.

गुटेनबर्ग बायबल इतके खास का आहे? गुटेनबर्ग म्युझियमचे भूतपूर्व संचालक हेल्मुट प्रेसर याची तीन कारणे सांगतात. पहिले म्हणजे, पाश्‍चात्य जगात अक्षरांच्या सुट्या खिळ्यांच्या साहाय्याने मुद्रित केलेले गुटेनबर्ग बायबल हे पहिले पुस्तक होते. दुसरे म्हणजे मुद्रित रूपातले हे पहिलेच बायबल आहे. आणि तिसरे असे, की ते अतिशय सुंदर आहे. प्राध्यापक प्रेसर यांनी असे लिहिले की गुटेनबर्ग बायबलमध्ये “गॉथिक लेखनशैलीचा सर्वोत्कृष्ट नमुना” पाहायला मिळतो.

सर्वच संस्कृतीचे लोक गुटेनबर्ग यांचे ऋणी आहेत. त्यांनी ओतीव धातूचा साचा, मिश्रधातू, शाई आणि मुद्रण यंत्र यांचा संयुक्‍त उपयोग केला. मुद्रणाचे तंत्र विकसित करून त्यांनी जगाला एक वरदान दिले आहे. (g९८ ११/८)

[१६, १७ पानांवरील चित्रे]

१. पोलादी मुद्रेचा उपयोग करून तांब्याच्या मातृकेवर कोणत्याही अक्षराचा आकार मुद्रित केला जायचा

२. ओतीव धातूंचे मिश्रण साच्यात ओतले जायचे. धातूंचे मिश्रण कठीण झाल्यावर त्यातून निघणाऱ्‍या अक्षराच्या सुट्या खिळ्यावर त्या अक्षराचे दर्पण प्रतिबिंब उमटलेले असायचे

३. सुट्या अक्षराच्या खिळ्यांपासून सेटिंग स्टिकमध्ये शब्द जुळवून एकेक ओळ तयार केली जायची

४. यानंतर जुळवलेल्या ओळी एका साच्यात दोन रकान्यांत कंपोज केल्या जायच्या

५. कंपोज केलेले हे पान मुद्रण यंत्राच्या सपाट तक्‍त्‌यावर (फ्लॅट बेड) ठेवले जायचे

६. पंधराशे चौऱ्‍यांशी सालचे तांब्यावर काढलेले गुटेनबर्गचे कोरीव चित्र

७. आज गुटेनबर्ग बायबलची एक प्रत मिळवायला लाखो डॉलर मोजावे लागतील

[चित्राचे श्रेय]

चित्र क्रमांक १-४, ६ व ७: Gutenberg-Museum Mainz; चित्र क्रमांक ५: Courtesy American Bible Society