व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या नावाने माझे आयुष्य बदलले!

देवाच्या नावाने माझे आयुष्य बदलले!

देवाच्या नावाने माझे आयुष्य बदलले!

सँडी यासी ड्‌झोसी यांच्याद्वारे कथित

एकदा माझ्या बहिणी आणि मी हसत-खिदळत, एकमेकींना मारत खाटेखाली लपायचा प्रयत्न करत होतो. इतक्यात काही मोर्मोन पंथाच्या लोकांनी दार वाजवले. * मी, कोण आलंय ते पाहायला गेले आणि त्यांना रागारागात सांगितले की, आम्ही पारंपरिक नावाहो आहोत आणि गोऱ्‍या लोकांच्या धर्माविषयी आम्हाला काहीएक ऐकायचे नाही.

आमचे आई-बाबा काही सामानसुमान आणायला बाजारात गेले होते. ते संध्याकाळीच येणार होते. आल्यावर त्यांना कळाले की, मी दारावर आलेल्या मोर्मोन लोकांशी उद्धटपणे बोलले. त्यांनी मला रागावले आणि यापुढे कोणाशीही अनादराने वागायचे नाही असे सांगितले. लोकांशी आदराने आणि अदबीने वागायचे असे आम्हाला शिकवले जायचे. मला अजून आठवते की, एकदा आमच्या घरी एक अनपेक्षित पाहुणा आला होता. त्या दिवशी आई-बाबांनी घराबाहेर स्वयंपाक केला होता. त्यांनी आधी त्या पाहुण्याला जेवू घातले आणि मगच आम्ही सगळे जेवलो.

आरक्षित क्षेत्रातील जीवन

आम्ही होपी इंडियन आरक्षित क्षेत्रापासून वायव्येकडे १५ किलोमीटर अंतरावर अरिझोनातील हाउल मेसा येथे राहत होतो; आणि गजबजलेल्या शहरांपासून आणि नगरांपासून आमचे ठिकाण दूर होते. हे ठिकाण अमेरिकेच्या नैर्‌ऋत्येकडे असून ठिकठिकाणी लाल वाळूच्या खडकांची असामान्य रचना असलेल्या वाळवंटाचे विलोभनीय दृश्‍य येथे पाहायला मिळते. येथे पुष्कळ मेसा अर्थात उंच, उभ्या कड्याची पठारे आहेत. या ठिकाणांहून आठ किलोमीटर दूरवर चरत असलेल्या आमच्या मेंढरांवर आम्ही लक्ष देऊ शकत होतो. माझ्या देशातील, माझ्या मायदेशातील हे शांत वातावरण मला खूप आवडत होते.

माध्यमिक शाळेत असताना माझ्या मामेभावंडांशी आणि मावसभावंडांशी माझी खूप जवळीक होती; ते अमेरिकन इंडियन चळवळीचे (एआयएम) समर्थक होते. * मूळ अमेरिकन असण्याचा मला खूप गर्व होता आणि गोऱ्‍या लोकांनी आमच्यावर कित्येक दशके जुलूम केल्याचे मी गोऱ्‍या लोकांना स्पष्ट बोलून दाखवत असे; माझ्या मते या सगळ्या जाचजुलूमाला इंडियन व्यवहार कार्यालय (बीआयए) जबाबदार होता. पण माझे भावंड जसे द्वेष व्यक्‍त करत होते तसे मी उघडपणे द्वेष व्यक्‍त करत नव्हते. माझ्या भावना मी मनातल्या मनात ठेवल्या होत्या. त्यामुळे ज्या कोणाजवळ बायबल होते त्या प्रत्येकाचा मला द्वेष होता.

मी असा विचार करू लागले की, बायबलमुळेच गोऱ्‍या लोकांना आमची जमीन, आमचे हक्क आणि आमच्या धार्मिक विधी पाळण्याचे आमचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे सामर्थ्य होते! बोर्डिंगमध्ये असताना चर्चमध्ये जबरदस्तीने जावे लागायचे तेव्हा तेथील प्रोटेस्टंट आणि कॅथलिक विधी टाळण्यासाठी मी माझ्या वडिलांची बनावट सही देखील करत असे. त्यांच्या संस्कृतीत आम्ही एकरूप व्हावे आणि आमचा इंडियन वारसा विसरून जावे हा त्या शाळांचा हेतू होता. आम्हाला आमची मातृभाषा देखील बोलायची परवानगी नव्हती!

आम्हाला निसर्ग आणि आमच्या परिसराबद्दल गहिरा आदर होता. दररोज सकाळी, पूर्वेकडे तोंड करून आम्ही आमच्या प्रार्थना म्हणायचो आणि आभार मानून मक्याचे पवित्र मानले जाणारे परागकण शिंपडायचो. * आमच्या नावाहो पद्धतीची ही उपासना आम्हाला शिकवली गेली होती आणि मी अभिमानाने व मनापासून ती स्वीकारली होती. ख्रिस्ती धर्मजगताच्या शिकवणीनुसार स्वर्गात जाण्याचे मला मुळीच आकर्षण नव्हते आणि नरकामध्ये अग्नीत छळ होतो यावरही माझा विश्‍वास नव्हता. मला याच पृथ्वीवर राहण्याची मनःपूर्वक इच्छा होती.

शाळेला सुट्या पडल्या की माझ्या घरच्यांसोबत वेळ घालवायला मला खूप आवडायचे. होगनची म्हणजे आमच्या नावाहो घराची साफसफाई करणे, विणकाम, मेंढ्यांची राखण करणे ही माझी दररोजची कामे होती. आम्ही नावाहो लोक शतकानुशतकांपासून मेंढपाळ आहोत. आमच्या होगनची (खालचा फोटो पाहा) साफसफाई करताना प्रत्येक वेळी मला एक लाल रंगाचे लहान पुस्तक दिसायचे; त्यात बायबलमधील स्तोत्रे हे पुस्तक आणि “नवा करार” यातील इतर पुस्तके होती. कधी कधी मी त्याला लाथाडून जायचे; त्यातील मजकूर काय आहे किंवा त्याचा काय अर्थ होतो याचा मी कधीच विचार केला नाही. पण ते पुस्तक मी फेकले नाही.

लग्न—भ्रम आणि भ्रमनिरास

माझी उच्च माध्यमिक शाळा पूर्ण केल्यावर न्यू मेक्सिकोतील अल्बुकर्क येथे एका ट्रेड स्कूलला जायचा माझा विचार होता. तेथे जाण्याआधी माझी भेट माझ्या भावी पतीशी झाली. मग मी आमच्या नावाहो आरक्षित क्षेत्रात (त्याला आम्ही रेझ म्हणतो) लग्न करायला आले. माझ्या आईवडिलांच्या लग्नाला अनेक वर्षे झाली होती. मलाही त्यांचेच अनुकरण करायचे होते, म्हणून मीसुद्धा लग्न केले. मला घरी राहून घरातले काम करायला खूप आवडायचे; शिवाय आम्हाला लायोनल नावाचा मुलगा झाला तेव्हा मला गृहिणीचे जीवन जास्तच आवडू लागले. माझे पती आणि मी अगदी सुखात नांदत होतो. पण एक दिवशी मला एक धक्केदायक बातमी ऐकायला मिळाली!

माझ्या पतीने दुसरी बाई ठेवली होती! त्याच्या अविश्‍वासूपणामुळे आमचे जीवन उद्‌ध्वस्त झाले. माझ्यावर जसे आभाळच कोसळले होते आणि मला त्याच्याविषयी तिरस्कार वाटू लागला. माझ्या मनात फक्‍त बदल्याची भावना होती! पण घटस्फोटाच्या वेळी आमच्या मुलावरून आणि पोटगीवरून जेव्हा भांडणे होऊ लागली तेव्हा मी खूप दुःखी झाले. आपली कोणालाच किंमत नाही, आता जीवनात काही आशा नाही असे मला वाटू लागले. माझे दुःख घालवण्यासाठी मी मैलोंमैल पळायचे. साध्यासाध्या गोष्टींवरून मला रडू यायचे आणि खाण्यापिण्यावरून माझे मन उठले. जगात आपले कोणीच नाही असे मला वाटू लागले.

काही दिवसांनी माझ्यासारख्याच वैवाहिक समस्या असलेल्या एका माणसाबरोबर माझी ओळख वाढू लागली. आम्ही समदुःखी होतो. त्याने मला सहानुभूती दाखवली आणि मला हवा असलेला भावनिक आधार दिला. जीवनाबद्दल माझे अगदी मनातले विचार आणि भावना मी त्याच्याजवळ व्यक्‍त केल्या. तो माझे बोलणे लक्ष देऊन ऐकायचा त्यामुळे त्याला माझी काळजी वाटते हे दिसत होते. आम्ही लग्न करायचा विचार केला.

मग मला कळाले की, तो देखील विश्‍वासघातकी होता! मी जड अंतःकरणाने त्याच्याशीसुद्धा संबंध तोडले. मला झिडकारल्यासारखे वाटू लागले; मी खूप दुःखी झाले, रागाने आणि द्वेषाने मी जळफळून उठले. आत्महत्येचा विचार माझ्या मनात घोळू लागला; मी दोनदा तसा प्रयत्नही केला. मला जगण्याची इच्छाच उरली नव्हती.

खऱ्‍या देवाबद्दल प्रथमच मिळालेले थोडेफार ज्ञान

मला ठाऊक नसलेल्या देवाला प्रार्थना करताना मी खूप रडायचे. तरीही मला सहसा असे वाटायचे की एक सर्वशक्‍तिमान देव आहे ज्याने या अद्‌भुत विश्‍वाची निर्मिती केली. नयनरम्य सूर्यास्त पाहून मला कुतूहल वाटायचे आणि मनात विचार यायचा की आम्हाला या सुंदर गोष्टींचा आनंद लुटू देणारी ती व्यक्‍ती किती चांगली असेल. मला ठाऊक नसलेल्या त्या व्यक्‍तीवर माझे प्रेम वाढू लागले. मी त्याला म्हणू लागले: “देवा, तू खरोखर अस्तित्वात असशील, तर मला मदत कर, मला मार्गदर्शन दे आणि मला पुन्हा आनंदी कर.”

दरम्यान, माझ्या कुटुंबाला माझी खूप चिंता वाटत होती, विशेषतः माझ्या बाबांना. मी बरी व्हावी म्हणून माझ्या आईबाबांनी एका मांत्रिकाला बोलावले. माझे बाबा म्हणायचे की, चांगला मांत्रिक कधीही पैसे मागणार नाही आणि जे काही तो शिकवतो तेच आचरणातही आणतो. माझ्या आईबाबांना खूष करण्यासाठी मी पुष्कळदा नावाहो ब्लेसिंग वे धार्मिक विधी पार पाडले.

मी कित्येक दिवस एकटीच होगनमध्ये राहायचे; माझ्या खाटेजवळ फक्‍त एक रेडियो ठेवला होता. एकदा, एक पाळक येशूचा स्वीकार न करणाऱ्‍या लोकांचा धिक्कार करत होता आणि मला ते ऐकून खूप तिरस्कार वाटत होता कारण येशूला मी कधीच मानले नव्हते. मला त्यांचा तिटकारा वाटत होता! गोऱ्‍या लोकांचा धर्म आणि माझा धर्मसुद्धा मला नकोसा झाला होता! मी देवाचा शोध माझ्या पद्धतीने घ्यायचे ठरवले.

होगनमध्ये मी एकटी राहत असे तेव्हा ते लाल रंगाचे लहान पुस्तक मला पुन्हा दिसले. ते पुस्तक बायबलचा एक भाग आहे हे मला कळाले. स्तोत्रसंहितेचे पुस्तक वाचून दावीद राजाला किती सोसावे लागले आणि तो किती दुःखी झाला याविषयी मला कळाले आणि मला त्यातून सांत्वन मिळाले. (स्तोत्र ३८:१-२२; ५१:१-१९) पण माझ्या अभिमानामुळे मी वाचलेले सर्वकाही पटकन मनातून काढून टाकले. गोऱ्‍या लोकांचा धर्म मला नकोच होता.

मला मानसिक दुःख असतानाही माझ्या मुलाची मी बऱ्‍यापैकी काळजी घेतली. त्याच्यामुळेच मला प्रोत्साहन मिळत असे. मग मी टीव्हीवर धार्मिक कार्यक्रम पाहू लागले ज्यात प्रार्थना केल्या जायच्या. एकदा, खूप हताश होऊन मी फोन उचलला आणि ८०० हा नंबर दाबला. पण मला सांगण्यात आले की मला ५० किंवा १०० डॉलरची देणगी देण्याचे वचन द्यावे लागेल; हे ऐकून मी धाडकन फोन खाली ठेवला.

आमचा घटस्फोटाचा खटला कोर्टात चालला होता तेव्हा मी अधिकच दुःखी झाले, कारण माझा पती जमातीच्या पंचासमोर खोटे बोलत होता. आमच्या मुलाचा ताबा कोणाजवळ जाईल या प्रश्‍नावरून आमचा घटस्फोट खूप लांबला. पण शेवटी मी जिंकले. माझ्या बाबांनी निमूटपणे या संपूर्ण खटल्यामध्ये मला आधार दिला. मला किती तीव्र दुःख झाले होते हे त्यांनी पाहिले होते.

साक्षीदारांसोबत पहिल्यांदा संपर्क

त्यानंतर मी ठरवले की, फक्‍त आल्या दिवसापुरता विचार करून जगायचे. एकदा, एक नावाहो कुटुंब आमच्या शेजाऱ्‍यांशी बोलत असलेले मी पाहिले. मी लपून त्यांच्यावर नजर ठेवली. हे लोक प्रत्येक घरी जाऊन काहीतरी सांगत होते. मग ते आमच्या घरीसुद्धा आले. नावाहो असलेली सँड्रा हिने स्वतःची ओळख यहोवाची साक्षीदार अशी केली. यहोवा हे नाव एकदम माझ्या लक्षात आले; बाकी काहीही मला कळाले नाही. मी म्हणाले: “हा यहोवा कोण आहे? तुमचा नवीन धर्म आहे का? चर्चमध्ये मला देवाचं नाव का शिकवलं गेलं नाही?”

तिने बायबलमधून स्तोत्र ८३:१८ [पं.र.भा.] हे वचन काढले. त्यात लिहिले आहे: “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.” देवाला एक व्यक्‍तिगत नाव आहे आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त याने त्याच्याविषयी साक्ष दिली असे तिने समजावून सांगितले. ती मला यहोवा आणि येशूबद्दल शिकवेल असे सांगून तिने सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते हे पुस्तक मला दिले. * मला खूप आनंद झाला; मी म्हणाले: “हो जरूर. हा नवीन धर्म मला शिकायला आवडेल!”

ते पुस्तक मी एका रात्रीत वाचून काढले. त्यातल्या गोष्टी एकदम नवीन आणि वेगळ्याच होत्या. जीवनाला उद्देश आहे असे त्यात म्हटले होते. बस्स, जीवनाबद्दल स्वारस्य निर्माण करायला मला हेच हवे होते. मी बायबलचा अभ्यास करू लागले, आणि माझ्या अनेक प्रश्‍नांची मला उत्तरे मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला. मी जे काही शिकत होते त्यावर विश्‍वास करू लागले. मला ते सर्व पटत होते. हेच सत्य असावे असे मला वाटू लागले!

लायोनल सहा वर्षांचा असताना मी त्याला बायबलमधील सत्य शिकवू लागले. आम्ही दोघे मिळून प्रार्थना करायचो. यहोवाला आपली काळजी आहे आणि आपण त्याच्यावर भरवसा ठेवला पाहिजे असे म्हणून आम्ही दोघे एकमेकांना उत्तेजन द्यायचो. काही वेळा मला अगदी असह्‍य होत असे. पण, मला सांत्वन देण्याच्या प्रयत्नात तो त्याचे चिमुकले हात माझ्या गळ्याभोवती घालून, “आई, तू रडू नको, यहोवा आपली काळजी घेईल” असे आत्मविश्‍वासाने म्हणायचा तेव्हा माझे दुःख कुठल्या कुठे पळून जायचे! त्याच्यामुळे मला खूप दिलासा मिळायचा आणि बायबल अभ्यास करत राहण्याचा माझा निश्‍चय आणखी पक्का होत असे! मला मार्गदर्शन द्यावे अशी मी निरंतर प्रार्थना करत राहायचे.

ख्रिस्ती सभांचा परिणाम

यहोवाबद्दल कदर असल्यामुळे ट्यूबा सिटी येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना येण्या-जाण्यासाठी आम्ही २४० किलोमीटर प्रवास करत होतो. उन्हाळ्यात आठवड्यातल्या दोन दिवशी आम्ही जायचो तर हिवाळ्यात हवामान चांगले नसल्यामुळे रविवारी पूर्ण दिवशी असलेल्या सभांना जायचो. एकदा आमची कार खराब झाल्यामुळे आम्ही लिफ्ट घेऊन राज्य सभागृहात पोहोंचलो. इतका दूर प्रवास करायचा म्हणजे थकवा येतच असे पण एकदा लायोनल म्हणाला की, आपण एकदम मरणाला टेकलेलो असलो तरच सभा चुकवायची, नाही तर नाही. हे ऐकून, यहोवाकडून मिळणाऱ्‍या आध्यात्मिक शिक्षणाला कधीच क्षुल्लक समजू नये याचे महत्त्व मला कळाले.

सभांमध्ये, समस्यांरहित सार्वकालिक जीवनाबद्दलची राज्य गीते गाताना मला रडू आवरायचे नाही. यहोवाच्या साक्षीदारांनी मला खूप सांत्वन आणि उत्तेजन दिले. दुपारच्या जेवणासाठी किंवा अल्पोपहारासाठी त्यांच्या घरी ते आम्हाला बोलवून पाहुणचार दाखवत असत आणि आम्ही त्यांच्या कौटुंबिक बायबल अभ्यासात सामील होत असू. त्यांनी आमच्याबद्दल काळजी व्यक्‍त केली आणि आमचे ते ऐकून घेत असत. विशेषतः, मंडळीतल्या वडिलांनी आम्हाला सहानुभूती दाखवली आणि यहोवाला आमची काळजी वाटते याची पक्की खात्री पटवून दिली. पुन्हा एकदा खरे मित्र मिळाल्याचा मला खूप आनंद झाला. त्यांचा सहवास तजेला देणारा होता आणि मला असह्‍य वाटायचे तेव्हा माझ्या दुःखात दुःख मानून ते देखील माझ्यासोबत रडायचे.—मत्तय ११:२८-३०.

दोन मोठे निर्णय

यहोवाने पुरवलेल्या गोष्टींमुळे मला समाधान मिळू लागले त्याच दरम्यान माझी ज्याच्याशी जवळीक वाढली होती तो मित्र माझ्याजवळ माफी मागायला आला. मला अजूनही त्याच्यावर प्रेम होते आणि त्याच्या विनंतीला मी झिडकारू शकत नव्हते. आम्ही लग्न करायचे ठरवले. मला वाटले की, सत्यामुळे त्याच्यात बदल होतील. पण तीच माझ्या जीवनातली सर्वात मोठी चूक होती! मी बिलकूल आनंदी नव्हते. माझा विवेक मला खूप बोचत होता. त्याला सत्य नको होते हे ऐकून तर मी एकदम निराश झाले.

माझी समस्या मी मंडळीतल्या एक वडिलांना सांगितली. त्यांनी शास्त्रवचनांतून मला समजावून सांगितले आणि मी घेतलेल्या निर्णयासंबंधी माझ्यासोबत प्रार्थना केली. शेवटी, मला जाणीव झाली, यहोवा माझे मन कधीच दुखावणार नाही, पण अपरिपूर्ण लोकांवर आपण कितीही जीव तोडून प्रेम केले तरीही ते आपले मन दुखवू शकतात. उलट, एकमेकांच्या संगनमताने केलेल्या विवाहांमध्ये काहीच सुरक्षा नसते हे मला समजले. मी तेव्हाच निर्णय घेतला. पण आमच्यातला नातेसंबंध तोडणे फार कठीण होते आणि मला त्याचे खूप दुःखही वाटले. मला आर्थिक तंगी सहन करावी लागली तरीही यहोवावर पूर्णपणे विसंबून राहण्याची मला गरज होती.

यहोवावर माझे अतोनात प्रेम होते आणि त्याची सेवा करण्याचा मी निर्धार केला होता. मे १९, १९८४ साली, मी पाण्याने बाप्तिस्मा घेऊन यहोवाला माझे समर्पण चिन्हांकित केले. माझा मुलगा, लायोनल हा देखील यहोवाचा बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार आहे. माझ्या कुटुंबाने आणि माझ्या घटस्फोट दिलेल्या पतीने आम्हाला पुष्कळ त्रास दिला पण आम्ही सगळे काही यहोवावर सोपवून दिले. आणि आमची निराशा झाली नाही. ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माझ्या कुटुंबाकडून होणारा विरोध मालवला; आणि त्यांनी आमच्या नवीन जीवनपद्धतीचा स्वीकार केला आहे.

माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांनी यहोवाला जाणून घ्यावे म्हणजे तेसुद्धा आनंदी होतील एवढेच मला वाटते. मी एकदम दुःखी झाले होते आणि आत्महत्येचा विचार करत होते तेव्हा माझ्याबद्दल आशा सोडून दिलेल्या माझ्या बाबांनी धीटपणे मला पाठिंबा दिला. मला पुन्हा एकदा आनंदी पाहून त्यांना खूप समाधान मिळाले. मला हे समजले आहे की, यहोवाला प्रार्थना केल्याने, यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना गेल्याने आणि देवाच्या वचनाचे पालन केल्याने मला सावरायला बरीच मदत मिळाली.

भविष्याची आशा

सर्व प्रकारचे दुःख, अपरिपूर्णता, खोटारडेपणा आणि द्वेष पूर्णपणे नाहीसा होईल त्या काळाची मी वाट पाहत आहे. आमचा नावाहो प्रदेश हिरवागार होईल, पूर्वीसारखी तेथे सप्ताळू आणि जरदाळूची झाडे असतील; वेगवेगळ्या जातीजमातीचे लोक नद्यांच्या आणि पावसाच्या पाण्याने आपल्या ओसाड मायभूमींचे परिवर्तन सुंदर बागेत करतील; आमच्या शेजारचे होपी लोक आणि इतर जमाती अलीकडे होते त्याप्रमाणे एकमेकांसोबत वैमनस्य राखण्याऐवजी एकाच ठिकाणी खेळीमेळीने राहतील याची मी कल्पना करते. देवाचे वचन सर्व जाती, जमाती, गोत्र यांना कशाप्रकारे एकत्र आणते याचा प्रत्यय मला येऊ लागला आहे. भविष्यात कुटुंबे आणि मित्रजन, आपल्या मेलेल्या प्रिय लोकांचे पुनरुत्थान झाल्यावर त्यांना भेटतील हे मी पाहीन. तो खरोखर आनंदाचा समय असेल आणि कधीच संपणार नाही. या सुंदर भवितव्याविषयी कोणाला जाणून घ्यायला आवडणार नाही अशी मी कल्पनाच करू शकत नाही.

नावाहो प्रदेशात ईश्‍वरशासित वाढ

ट्यूबा सिटीत एक राज्य सभागृह आहे आणि नावाहो आणि होपी आरक्षित क्षेत्रांमध्ये * चार मंडळ्या—चिनली, केयंटा, ट्यूबा सिटी आणि कीम्स कॅन्यन—निर्माण झाल्या आहेत हे पाहून खरोखर आनंद होतो. १९८३ साली मी पहिल्यांदा ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत भाग घेतला तेव्हा मला असे वाटले होते की, ही प्रशाला नावाहो भाषेत व्हावी. पण आता हे फक्‍त स्वप्न उरलेले नाही. १९९८ पासून ही प्रशाला नावाहो भाषेत चालवली जाऊ लागली आहे.

देवाचे एक व्यक्‍तिगत नाव आहे हे इतरांना सांगितल्यामुळे मला असंख्य आशीर्वाद मिळाले आहेत. भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, देव आपल्याकडून काय अपेक्षितो? आणि तुम्ही देवाचे मित्र असू शकता! या नावाहो भाषेत भाषांतर केलेल्या माहितीपत्रकांमध्ये विश्‍वासाला बळकट करणाऱ्‍या अभिव्यक्‍ती वाचताना आणि इतरांना सांगताना किती आनंद होतो ते शब्दांत व्यक्‍त करता येत नाही. सर्व राष्ट्रे, जाती, भाषा तसेच डीने अर्थात नावाहो लोकांना फायदा होण्यासाठी बायबल शिक्षणाच्या या कार्याचे नेतृत्व करण्यासाठी विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला मी कृतज्ञ आहे.—मत्तय २४:४५-४७.

माझ्या उपजीविकेसाठी मी पूर्ण-वेळेची नोकरी करते पण नियमितपणे साहाय्यक पायनियर सेवा करायला मला आनंद होतो. मी एकटी आहे हे बरे आहे असे मला वाटते आणि विकर्षणांविना यहोवाची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. “परमेश्‍वर भग्नहृदयी लोकांच्या सन्‍निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो” हे माझ्या लोकांना, इतरांना आणि विशेषकरून दुःखी असलेल्यांना सांगण्यात मला खूप समाधान मिळते आणि आनंद होतो.—स्तोत्र ३४:१८.

बायबल, गोऱ्‍या लोकांचा धर्म आहे असे मला आता मुळीच वाटत नाही. जे कोणी बायबल शिकून त्याचा अवलंब करू इच्छितात त्या सर्वांसाठी देवाचे वचन आहे. यहोवाचे साक्षीदार तुम्हाला भेटतील तेव्हा खरोखर आनंदी होण्यासाठी काय केले पाहिजे हे त्यांच्याकडून ऐकून घ्या. ते तुम्हाला देवाचे नाव, यहोवा याविषयीची सुवार्ता सांगतील; याच नावाने माझे जीवन बदलले! (g०१ ७/८)

[तळटीपा]

^ मोर्मोन धर्माविषयी सविस्तर माहितीसाठी नोव्हेंबर ८, १९९५ चे सावध राहा! (इंग्रजी) मासिक पाहा.

^ एआयएम ही एक नागरी हक्क संघटना आहे जी मूळ अमेरिकन लोकांनी १९६८ साली स्थापली. ही संघटना, १८२४ साली स्थापलेल्या बीआयएच्या विरुद्ध आहे, जी राष्ट्रातील इंडियन लोकांच्या कल्याणाला हातभार लावण्याचा दिखावा करणारी सरकारी एजेंसी आहे. बीआयए सहसा गैर-इंडियन लोकांना आरक्षित क्षेत्रातील खनिज, पाणी आणि इतर हक्क भाड्याने देत असे.—वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया.

^ परागकण पवित्र असल्याचे समजले जात होते आणि प्रार्थना व धार्मिक विधींमध्ये त्यांचा वापर केला जात असे; ते जीवन आणि नविनीकरणाचे प्रतीक होते. नावाहो लोकांचा असा विश्‍वास आहे की, परागकण शिंपडलेल्या वाटेवरून प्रवास करणारा पवित्र होतो.—दि एन्सायक्लोपिडिया ऑफ नेटिव्ह अमेरिकन रिलिजन्स.

^ हे यहोवाच्या साक्षीदारांचे प्रकाशन आहे परंतु सध्या छापले जात नाही.

^ अधिक माहितीसाठी “अमेरिकन इंडियन्स—वॉट डज देअर फ्युचर होल्ड?” ही सप्टेंबर ८, १९९६ सावध राहा! (इंग्रजी) अंकातील लेखमाला पाहा.

[२७ पानांवरील चित्र]

नावाहोंचे होगन

[२७ पानांवरील चित्र]

माझा मुलगा, लायोनल ह्‍याच्यासोबत

[२९ पानांवरील चित्र]

मॉस्कोत १९९३ साली झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात रशियन स्नेह्‍यांसोबत

[३० पानांवरील चित्र]

अरिझोनातील कायेंटा मंडळीत माझ्या आध्यात्मिक कुटुंबासोबत