व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

द्वेषाचे चक्र मोडून काढणे

द्वेषाचे चक्र मोडून काढणे

द्वेषाचे चक्र मोडून काढणे

“आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा.”मत्तय ५:४४.

कित्येक दिवसांपर्यंत दोन शत्रू राष्ट्रांच्या पुढाऱ्‍यांमध्ये शांती करारासंबंधी गंभीर चर्चा होत राहिली. एका शक्‍तिशाली औद्योगिक राष्ट्राचे राष्ट्रपती या चर्चासत्रांना जातीने उपस्थित राहिले. आपल्या प्रभावाने व राजकीय कौशल्याने त्यांनी या दोन्ही पुढाऱ्‍यांमध्ये एकमत आणण्याचा बराच प्रयत्न केला. पण हे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. दोन आठवड्यांच्या आत न्यूझवीक मासिकानुसार या दोन्ही राष्ट्रांमध्ये “दोन दशकांमध्ये झाला नव्हता असा हिंसक संघर्ष” झाला.

संपूर्ण जगभरात अशीच स्थिती आहे. राष्ट्रीय पुढाऱ्‍यांनी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा विविध जातीय आणि राष्ट्रीय गटांमधील द्वेष आणि शत्रुत्वाची भावना काही केल्या शमत नाही. अज्ञान, कलुषितपणा आणि अफवा यांमुळे द्वेषाचे चक्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजकालचे नेते नवनवीन उपाय काढण्याचा व्यर्थ प्रयत्न करतात. पण सर्वात उत्तम उपाय हा जुनाच आहे—डोंगरावरील प्रवचनाइतका जुना, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्या प्रवचनात येशू ख्रिस्ताने आपल्या श्रोत्यांना देवाच्या मार्गांच्या अधीन होण्याचे उत्तेजन दिले होते. त्या संदर्भात त्याने वर उद्धृत केलेले विधान केले: “आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा.” हा उपाय, द्वेष आणि कलुषितपणा यांवरील सर्वात परिणामकारक उपायच नाही तर तोच एकमेव उपाय आहे!

शत्रुंवर प्रेम करण्याची कल्पना निव्वळ आदर्शवादी आणि अव्यावहारिक आहे असे टीकाकार म्हणतात. पण, द्वेषभाव जर आत्मसात करता येतो तर मग तो विसरताही येऊ शकतो हे तर्कशुद्ध वाटत नाही का? येशूच्या शब्दांतून मानवजातीला खरी आशा मिळते. त्यांवरून हे स्पष्ट होते की, जुने वैमनस्य देखील मिटवणे शक्य आहे.

येशूच्या काळातील त्याच्या यहुदी श्रोत्यांमधील स्थितीचा विचार करा. त्यांचे शत्रू फार दूर नव्हते. रोमन सैन्याचे त्या प्रदेशावर वर्चस्व होते आणि यहुद्यांकडून अवाढव्य करवसुली केली जात होती, त्यांना आपल्या धाकात ठेवले जात होते, गैरवागणूक दिली जात होती, त्यांची पिळवणूक केली जात होती. (मत्तय ५:३९-४२) काही यहुदी एकमेकांना शत्रू मानू लागले होते कारण आपापसांतल्या लहानसहान तंट्यांमुळे त्यांच्यात वैमनस्य वाढले होते. (मत्तय ५:२१-२४) तर मग, खरोखरच, जाचजुलूम करणाऱ्‍यांवर प्रेम करण्याची अपेक्षा येशूने आपल्या श्रोत्यांकडून केली असेल का?

“प्रीति” याचा अर्थ

प्रथम हे लक्षात घेऊ या की, येशूने “प्रीति” म्हटले तेव्हा जवळच्या मित्रांमधील जिव्हाळ्याची तो गोष्ट करत नव्हता. मत्तय ५:४४ येथे प्रीती यासाठी वापरलेला ग्रीक शब्द, अगापे या शब्दातून बनला आहे. या शब्दामध्ये, तत्त्वांवर आधारित असलेल्या प्रेमाचा अर्थ आहे. त्यामध्ये जिव्हाळा असतोच असे नाही. ही प्रीती तत्त्वांवर आधारित असल्यामुळे इतरांचा स्वभाव कसाही असला तरीही त्यांचे भले करण्याचा ती प्रयत्न करते. त्यामुळे अगापे प्रीती व्यक्‍तिगत वैमनस्याच्या पलीकडे जाऊ शकते. खुद्द येशूने अशाप्रकारचे प्रेम दाखवले; त्याला खांबावर खिळणाऱ्‍या रोमन सैनिकांना त्याने काहीतरी शाप देण्याऐवजी अशी प्रार्थना केली: “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करितात हे त्यांना समजत नाही.”—लूक २३:३४.

येशूच्या शिकवणींचा सगळे लोक स्वीकार करून एकमेकांवर प्रीती करू लागतील अशी अपेक्षा करणे वाजवी आहे का? नाही, कारण बायबल दाखवते की, हे जग संकटाकडेच वाटचाल करीत जाईल. “दुष्ट व भोंदू माणसे . . . दुष्टपणात अधिक सरसावतील,” असे २ तीमथ्य ३:१३ येथे भाकीत करण्यात आले आहे. तथापि, बायबलचा अभ्यास करण्याद्वारे नीतिमान तत्त्वे पूर्णपणे आत्मसात करून प्रत्येक व्यक्‍ती द्वेषाचे चक्र मोडू शकते. पुराव्यांवरून हे स्पष्ट दिसून येते, की अनेकजण आपल्या भोवतालच्या द्वेषपूर्ण वातावरणाचा प्रतिकार करायला शिकले आहेत. काही सत्य घटना पाहा.

प्रीती करायला शिकणे

एका अतिरेकी गटाचा सदस्य असल्यामुळे होसे १३ वर्षांचा असल्यापासून गनिमी युद्धात सामील होता. * आपल्या भोवती दिसणाऱ्‍या अन्यायाला कारणीभूत असलेल्या लोकांचा द्वेष करायला त्याला शिकवण्यात आले होते. शक्य असल्यास, त्यांना पूर्णपणे मिटवणे हा त्याचा हेतू होता. आपले अनेक साथीदार मरण पावल्याचे पाहून होसेच्या मनात कटुत्व आणि बदल्याची भावना निर्माण झाली. हातगोळे तयार करताना त्याच्या मनात सारखा हा प्रश्‍न येत असे, ‘इतकं दुःख का आहे? देव आहे तर मग त्याला हे सगळं दिसत नाही का?’ पुष्कळदा तो रडायचा; तो गोंधळून गेला होता आणि दुःखी होता.

शेवटी, होसे, यहोवाच्या साक्षीदारांच्या एका स्थानिक मंडळीच्या संपर्कात आला. त्या मंडळीच्या सभेत तो पहिल्यांदाच गेला तेव्हा तिथले प्रेमळ वातावरण त्याच्या चटकन लक्षात आले. सगळेजण प्रेमाने त्याच्याशी बोलले. त्यानंतर, “देव दुष्टाईला अनुमती का देतो?” या विषयावर चर्चा झाल्यावर, त्याच्या मनात नेमके जे प्रश्‍न होते त्यांचीच उत्तरे त्याला मिळाली. *

कालांतराने, बायबलबद्दलचे त्याचे ज्ञान वाढल्यावर होसेने आपल्या जीवनात आणि विचारशैलीत बदल केले. त्याला कळाले की, “जो प्रीति करीत नाही तो मरणात राहतो. जो कोणी . . . द्वेष करितो तो नरहिंसक आहे; आणि कोणाहि नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही.”—१ योहान ३:१४, १५.

पण आपल्या अतिरेकी साथीदारांशी संबंध तोडणे त्याला खूप जड गेले. यहोवाच्या साक्षीदारांच्या सभागृहाला जाताना प्रत्येक वेळी त्याचा पाठलाग केला जात असे. काही साथीदार तर एक-दोन सभांना उपस्थित देखील राहिले; कारण होसेत असा बदल कशाप्रकारे झाला हे त्यांना समजून घ्यायचे होते. तो गद्दार नाही आणि त्याच्याकडून त्यांना कसलाही धोका नाही अशी त्यांना खात्री पटल्यावर त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचे सोडले. १७ वर्षांचा असताना, होसेने यहोवाचा साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतला. लवकरच तो पूर्ण-वेळेचे प्रचारकार्य करू लागला. लोकांना ठार मारण्याची योजना करण्याऐवजी तो लोकांकडे प्रेमाचा आणि आशेचा संदेश घेऊन जातो!

जातीय अडथळे दूर करणे

वेगवेगळ्या जातीय गटातील सदस्य फूट पाडणाऱ्‍या द्वेषाचे अडथळे दूर करू शकतात का? इंग्लंडमधील लंडन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या ॲमहॅरिक भाषेच्या गटाचे उदाहरण घ्या. त्या गटात सुमारे ३५ जण आहेत—त्यांपैकी २० इथियोपियन आहेत तर १५ एरीट्रियन. अलीकडेच आफ्रिकेत एरीट्रियन आणि इथियोपियन लोकांमध्ये भीषण युद्ध झाले असतानाही हे यहोवाचे साक्षीदार मात्र शांतीने आणि ऐक्याने उपासना करत आहेत.

एका इथियोपियन साक्षीदाराला त्याच्या कुटुंबाने म्हटले होते: ‘एरीट्रियन लोकांवर कधीच विश्‍वास करू नकोस!’ पण आता, एरीट्रियन सह-ख्रिश्‍चनांवर त्याचा फक्‍त विश्‍वासच नाही तर तो चक्क त्यांना बंधू-बहिणी म्हणतो! या एरीट्रियन लोकांची भाषा टिग्रिन्या असली तरी आपल्या इथोपियन बांधवांसोबत बायबलचा अभ्यास करता यावा म्हणून त्यांनी त्यांची ॲमहॅरिक भाषा शिकून घेतली. “पूर्णता करणारे बंधन” या नात्याने ईश्‍वरी प्रीतीच्या सामर्थ्याचा हा किती अद्‌भुत पुरावा!—कलस्सैकर ३:१४.

गतकाळ इतिहासजमा करणे

पण एखाद्याला फार क्रूर वागणूक दिली गेली असल्यास काय? आपला छळ करणाऱ्‍यांविषयी मनात द्वेष वाटणे स्वाभाविकच नाही का? जर्मनीतील एक साक्षीदार, मॅन्फ्रेड यांचे उदाहरण पाहा. केवळ यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे त्यांना सहा वर्षे कम्युनिस्ट तुरुंगात काढावी लागली. आपला छळ करणाऱ्‍यांचा द्वेष किंवा बदला घ्यावासा त्यांना कधी वाटला का? “कधीच नाही,” असे ते म्हणाले. सारब्रुकर त्सायटुंग या जर्मन बातमीपत्रानुसार, मॅन्फ्रेड म्हणाले: “अन्याय करणे किंवा अन्यायाची परतफेड करणे म्हणजे . . . एक चक्र सुरू करणे ज्यात पुनःपुन्हा वेगळा अन्याय होत राहतो.” मॅन्फ्रेड यांनी स्पष्टपणे बायबलमधील शब्द लागू केले की, “वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. . . . शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.”—रोमकर १२:१७, १८.

द्वेषहीन जग!

यहोवाचे साक्षीदार याबाबतीत एकदम परिपूर्ण असल्याचा दावा करत नाहीत. उलट जुने वैमनस्य आणि द्वेष दूर करणे तितके सोपे नाही असेच त्यांनाही वाटते. जीवनात बायबलची तत्त्वे लागू करायला एकसारखा प्रयत्न करावा लागतो, मेहनत घ्यावी लागते. पण एकंदरीत पाहिल्यास, द्वेषाचे चक्र मोडून काढण्यास बायबल सामर्थ्यशाली आहे याचा यहोवाचे साक्षीदार जिवंत पुरावा आहेत. गृह बायबल अभ्यास चालवण्याच्या कार्यक्रमाद्वारे, साक्षीदार, दरवर्षी हजारो लोकांना जातीयवाद आणि कलुषितपणाच्या बंधनांतून मुक्‍त होण्यास मदत करतात. * (“बायबलचा सल्ला द्वेष दूर करण्यास सहायक” असे शीर्षक असलेली पेटी पाहा.) त्यांना मिळालेले यश, लवकरच एका जगव्याप्त शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे द्वेष आणि त्याची मूळ कारणे पूर्णपणे कशी नाहीशी केली जातील याची एक पूर्वझलक आहे. भविष्यातील हा शैक्षणिक कार्यक्रम देवाच्या राज्याच्या किंवा जागतिक सरकाराच्या देखरेखीखाली राबवला जाईल. प्रभुच्या प्रार्थनेत येशूने “तुझे राज्य येवो” असे म्हटले तेव्हा त्या राज्याविषयी आपल्याला प्रार्थना करायला त्याने शिकवले.—मत्तय ६:९, १०.

बायबल आश्‍वासन देते की, या स्वर्गीय सरकाराच्या देखरेखीखाली, “परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यशया ११:९; ५४:१३) तेव्हा, संदेष्ट्या यशयाचे बहुतेक वेळा उद्धृत केले जाणारे शब्द जागतिक प्रमाणावर पूर्ण होतील; त्याने म्हटले आहे: “[देव] राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील, देशोदेशींच्या बहुत लोकांचा इन्साफ करील; तेव्हा ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” (यशया २:४) अशाप्रकारे, देव स्वतःच द्वेषाचे दुष्ट चक्र कायमचे मोडून काढेल. (g०१ ८/८)

[तळटीपा]

^ नाव बदलण्यात आले आहे.

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातील “देव दुःखाला अनुमती का देतो?” हा ८ वा अध्याय पाहा.

^ स्थानिक यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधून किंवा या मासिकाच्या प्रकाशकांना पत्र लिहून मोफत गृह बायबल अभ्यासाची व्यवस्था केली जाऊ शकते.

[११ पानांवरील चौकट]

बायबलचा सल्ला द्वेष दूर करण्यास सहायक

“तुम्हांमध्ये लढाया व भांडणे कशांतून उत्पन्‍न होतात? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करितात त्यांतून की नाही?” (याकोब ४:१) आपल्या स्वार्थी इच्छांवर नियंत्रण करायला शिकल्यास, इतरांसोबतचे बहुतेक मतभेद दूर करता येतात.

“तुम्ही कोणीहि आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्‍याचेहि पाहा.” (फिलिप्पैकर २:४) स्वतःच्या हितांपेक्षा दुसऱ्‍यांच्या हितांना महत्त्व देणे हा देखील अनावश्‍यक भांडणे टाळण्याचा एक मार्ग आहे.

“राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळूं नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ति होते.” (स्तोत्र ३७:८) आपण विनाशकारक प्रवृत्ती टाळू शकतो आणि ती टाळलीच पाहिजे.

“देवाने . . . एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे.” (प्रेषितांची कृत्ये १७:२४, २६) आपण दुसऱ्‍या जातीच्या लोकांपेक्षा श्रेष्ठ आहोत अशी भावना तर्कहीन आहे कारण आपण सर्वजण एकाच मानवी कुटुंबातून आलो आहोत.

“तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीहि करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना.” (फिलिप्पैकर २:३) इतरांना कमी लेखणे मूर्खपणाचे आहे—कारण सहसा इतरांकडे असे गुण किंवा क्षमता असतात ज्या आपल्याजवळ नसतात. अशी कोणतीही एक जात किंवा संस्कृती नाही जी सर्व बाबतीत श्रेष्ठ आहे.

“तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (गलतीकर ६:१०) कोणत्याही जातीच्या किंवा संस्कृतीच्या लोकांशी मिळूनमिसळून राहण्याचा आणि मदतीचा हात पुढे करण्याचा पुढाकार घेतल्याने संवाद साधण्यामधील दुरावा नाहीसा होऊन गैरसमज दूर व्हायला पुष्कळ मदत होते.

[८, ९ पानांवरील चित्रे]

इथियोपियन आणि एरीट्रियन साक्षीदार एकत्र येऊन शांतीने उपासना करतात

[१० पानांवरील चित्र]

कम्युनिस्ट तुरुंगातून बचावलेले मॅन्फ्रेड यांनी आपल्या मनात द्वेषभावना रूजू दिली नाही

[१० पानांवरील चित्र]

लोकांना विलग करणारे अडथळे बायबल दूर करू शकते