व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

द्वेषाचे मूळ

द्वेषाचे मूळ

द्वेषाचे मूळ

द्वेषभावना मानवी इतिहासाच्या सुरवातीलाच प्रकट झाली होती. उत्पत्ति ४:८ येथील बायबल वृत्तान्त सांगतो: “असे झाले की ते शेतात असता काइनाने आपला भाऊ हाबेल याजवर चालून जाऊन त्यास ठार केले.” “त्याने त्याचा वध कशासाठी केला?” असे बायबलचा लेखक योहान याने विचारले. “कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्यांच्या बंधूची नीतीची होती.” (१ योहान ३:१२) द्वेषाचे एक सर्वसामान्य कारण आहे ईर्ष्या. याच ईर्ष्येला हाबेल बळी पडला. “ईर्ष्या पुरुषास संतप्त करिते,” असे नीतिसूत्रे ६:३४ म्हणते. आज, समाजातील स्थान, संपत्ती, मालमत्ता आणि इतर फायद्याच्या गोष्टींवरून लोकांमध्ये फुटी निर्माण होतात.

अज्ञान आणि भीती

पण ईर्ष्या हे द्वेषाचे केवळ एक कारण झाले. पुष्कळदा, अज्ञान आणि भीती यांमुळेही द्वेषभावना निर्माण होते. जातीय भेदभाव मानणाऱ्‍या एका हिंसक गटातील तरुण सदस्याने म्हटले: “माझ्यात द्वेषभाव निर्माण होण्याआधी भीती निर्माण झाली.” अशाप्रकारची भीती सहसा अज्ञानामुळेच निर्माण होत असते. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया यानुसार, भेदभाव मानणाऱ्‍या लोकांची मते सहसा “उपलब्ध पुराव्याला न जुमानता [बाळगलेली असतात]. . . . काही गोष्टी आपल्या पूर्वस्थापित विचारांनुसार नाहीत असे वाटल्यास कलुषित व्यक्‍ती सहसा त्यांचा विपर्यास करतात, चुकीचा अर्थ लावतात किंवा त्यांकडे चक्क दुर्लक्षही करतात.”

ही मते कशी बनतात? इंटरनेटवरील एका माहिती सूत्रानुसार, “काही संस्कृतींविषयी कायमचे मत बनते त्याला इतिहास कारणीभूत आहे परंतु आपल्या अनेक कलुषित मतांना आपला व्यक्‍तिगत इतिहासच जबाबदार असतो.”

उदाहरणार्थ, अमेरिकेत, गुलामगिरीमुळे अनेक गोऱ्‍या लोकांमध्ये आणि आफ्रिकन लोकांमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाले—आणि ते अजूनही आहेत. बहुतेक वेळा, जातीय भेदभावाची भावना पालकांकडून मुलांच्यात रुजवली जाते. आफ्रिकन लोकांबद्दल भेदभाव बाळगत असल्याचे कबूल करणाऱ्‍या एकाने मान्य केले की, या कारणामुळेच “काळ्या लोकांशी काहीही संपर्क नसतानाही” त्याचे मत कलुषित झाले.

असेही काही लोक आहेत जे इतर लोकांना केवळ स्वतःपेक्षा ते वेगळे असल्यामुळे कमी लेखतात. ही भावना, वेगळ्या जातीच्या किंवा संस्कृतीच्या व्यक्‍तीशी केवळ एकदाच काहीतरी वाईट अनुभव आल्यामुळे निर्माण होऊ शकते. आणि मग, एका विशिष्ट जातीचे किंवा संस्कृतीचे सर्वच लोक वाईट आहेत असा ते निष्कर्ष काढतात.

व्यक्‍तिगत पातळीवरील तर असा हा दुराग्रह अत्यंत तिरस्करणीय आहेच, पण जर तो संपूर्ण राष्ट्रात किंवा जातीत पसरला तर विनाशकारी स्वरूप धारण करू शकतो. विशिष्ट राष्ट्राचे, वर्णाचे, संस्कृतीचे किंवा भाषेचे लोक दुसऱ्‍यांपेक्षा श्रेष्ठ आहेत या मतामुळे फाजील अभिमान आणि परकीय भीतीगंड (परकीय माणसांची किंवा गोष्टींची कमालीची नावड) निर्माण होऊ शकते. २० व्या शतकादरम्यान, अशाप्रकारचा फाजील अभिमान बहुतेककरून हिंसक मार्गांनी व्यक्‍त करण्यात आला.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, द्वेषभाव आणि फाजील अभिमान फक्‍त वर्ण किंवा स्वदेशाभिमानामुळेच निर्माण होतो असे नाही. पेनसिल्व्हानिया विद्यापीठातील संशोधक क्लार्क मकॉली लिहितात की, “नाणे फेकून जरी एका जमावाचे दोन गट पाडले तरी प्रत्येक गटातील लोकांना आपल्याच गटाबद्दल श्रेष्ठपणा वाटू लागतो.” तिसरीच्या एका वर्ग-शिक्षिकेने हे सिद्ध करून दाखवले; एका प्रसिद्ध प्रयोगासाठी तिने आपल्या वर्गाचे दोन गट केले—निळ्या डोळ्यांच्या मुलांचा एक गट तर तपकिरी डोळ्यांच्या मुलांचा दुसरा गट केला. काही काळातच, या दोन्ही गटांमध्ये शत्रुत्व निर्माण झाले. एखादा विशिष्ट क्रीडा गट आवडण्यासारख्या क्षुल्लक कारणांवरून देखील दोन गटांत हिंसक भांडणे होऊ शकतात.

हिंसेचे काय कारण?

शत्रुत्व सहसा हिंसक कृत्यांद्वारे का प्रकट केले जाते? संशोधकांनी या विषयांवर पुष्कळ संशोधन केले आहे; पण त्यांना फक्‍त सिद्धान्त मांडता आले आहेत. क्लार्क मकॉली यांनी मानवी हिंसा आणि आक्रमक वृत्ती याविषयावर संशोधन केलेल्या लिखाणाची सविस्तर यादी तयार केली. त्यांनी एका अभ्यासाचा उल्लेख केला आहे ज्यामध्ये असे दाखवले आहे की, “हिंसक गुन्हेगारीचा संबंध लढाई करण्याशी आणि लढाई जिंकण्याशी आहे.” संशोधकांना असे दिसून आले की, “पहिल्या आणि दुसऱ्‍या महायुद्धांमध्ये भाग घेतलेल्या राष्ट्रांमध्ये, विशेषतः, या लढायांमध्ये विजय मिळवलेल्या राष्ट्रांमध्ये लढाई संपल्यावर घातपाताच्या घटना बऱ्‍याच वाढल्या.” बायबलनुसार, आपण लढायांच्या युगात राहत आहोत. (मत्तय २४:६) या युद्धांमुळे इतर प्रकारच्या हिंसेला चालना मिळाली आहे असे म्हणता येईल का?

मानवांमधील आक्रमक वृत्तीसाठी इतर संशोधक जैविक कारण देण्याचा प्रयत्न करतात. एका संशोधनात आक्रमक वृत्तीच्या काही प्रकारांचा संबंध “मेंदूतील सिरोटोनिनचे कमी प्रमाण” याच्याशी लावण्याचा प्रयत्न केला होता. आक्रमक वृत्ती ही आपल्या जनुकांमध्ये असते हा आणखी एक लोकप्रिय सिद्धान्त आहे. राज्यशास्त्राच्या विषयावरील एका तज्ज्ञाने म्हटले, “बहुतांशी [द्वेषभावना] आनुवांशिक कारणांमुळेही असू शकते.”

बायबलही म्हणते, की अपरिपूर्ण मानवांमध्ये जन्मतःच दुर्गुण व दोष असतात. (उत्पत्ति ६:५; अनुवाद ३२:५) अर्थात, ही गोष्ट सर्व मानवांना लागू होते. पण सर्वच मानवांना इतरांविषयी अवास्तव द्वेष वाटत नाही. हा द्वेषभाव आत्मसात केला जातो. त्यामुळे, सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ गॉर्डन डब्ल्यू. ऑल्पोर्ट यांनी असे निरीक्षण केले की, बालकांमध्ये “विनाशकारक प्रवृत्तींची लक्षणे . . . मुळीच दिसून येत नाहीत. . . . बालक आशावादी असते, कोणत्याही प्रकारच्या उद्दीपनाकडे, व्यक्‍तीकडे ते जाते.” या निरीक्षणांवरून पुरावा मिळतो की, आक्रमक प्रवृत्ती, कलुषितपणा आणि द्वेषभाव यांसारखे वर्तन आत्मसात केले जाते! आणि मानवांमधील या क्षमतेचा, द्वेषभाव शिकवणारे लोक खूप गैरफायदा उचलत आहेत.

मनात विष कालवणे

मन कलुषित करण्यामध्ये, द्वेषभावना बाळगणाऱ्‍या गटांचे पुढारी अग्रस्थानी आहेत. जसे की, डोक्यावर बारीक केस ठेवणारे निओ-नात्सी तरूण आणि कू क्लक्स क्लॅन. हे गट सहसा, समस्याग्रस्त कुटुंबातील युवकांना शोधतात ज्यांच्यावर सहजगत्या प्रभाव पाडला जाऊ शकतो. ज्या युवकांना असुरक्षितपणा वाटतो किंवा न्यूनगंड असतो त्यांना या द्वेषभावना बाळगणाऱ्‍या गटांकडून आपलेपणा मिळाल्यासारखा वाटतो.

द्वेषभावना पसरवण्यात इंटरनेट एक प्रभावशाली साधन राहिले आहे. एका अलीकडील आकडेवारीनुसार, इंटरनेटवर द्वेषभावना चेतवणाऱ्‍या तब्बल १,००० वेबसाईट्‌स असण्याची शक्यता आहे. दि इकोनॉमिस्ट मासिकात, द्वेषभावना चेतवणाऱ्‍या एका वेबसाईटचा मालक या शब्दांत बढाई मारत होता: “इंटरनेटच्या साहाय्याने आम्हाला आमचे विचार लाखो लोकांपर्यंत पोचवण्याची संधी मिळाली आहे.” त्याच्या वेबसाईटमध्ये खास “मुलांसाठी” देखील एक सदर आहे.

किशोरवयीन जेव्हा इंटरनेटवर संगीत शोधत असतात तेव्हा द्वेषभावनेला उत्तेजन देणारे संगीत असलेल्या साईट्‌स त्यांना आढळू शकतात. अशाप्रकारचे संगीत सहसा कानठळ्या बसवणारे आणि हिंसक असते. आणि त्यातील शब्द तीव्र भेदभाव व्यक्‍त करतात. तसेच या वेबसाईट्‌सवरून द्वेषभावनेला चालना देणारे बातम्यांचे गट, चॅटरूम्स किंवा इतर वेबसाईट्‌स उघडता येतात.

द्वेषभावना चेतवणाऱ्‍या काही वेबसाईट्‌समध्ये तरुण लोकांसाठी गेम्स आणि इतर गोष्टी समाविष्ट असतात. एका निओ-नात्सी वेबसाईटने तर जातीय भेदभाव आणि यहुदी-विरोधक मतांचे समर्थन करण्यासाठी बायबलचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. या गटाने भेदभाव व्यक्‍त करणाऱ्‍या शब्दांची शब्दकोडी असलेले एक पानही तयार केले आहे. याचा काय उद्देश असावा? “गोऱ्‍या लोकांमधील तरुणांना आपला संघर्ष कशाविषयी आहे हे समजवण्यासाठी.”

पण द्वेषभावनेचे समर्थन करणारे सगळेच जण काहीसे भ्रमिष्ट असतात असे नाही. बॉल्कन राष्ट्रांमध्ये अलीकडे झालेल्या संघर्षांसंबंधी लेखन केलेल्या समाजशास्त्रज्ञाने विशिष्ट नामवंत लेखकांच्या आणि सामान्य जनतेच्या विचारांवर प्रभाव पाडणाऱ्‍या काही सुप्रसिद्ध लोकांविषयी असे म्हटले: “आपल्या देशबांधवांच्या हिणकस इच्छा तृप्त करणारी, त्यांच्यामधील तीव्र द्वेषभावनेला चेतवणारी, कोणतेही वर्तन निषिद्ध नाही असा विचार करायला उत्तेजन देऊन त्यांची निर्णयशक्‍ती नष्ट करणारी . . . , आणि वास्तविकतांचा विपर्यास करणारी शैली [ते] वापरतात हे पाहून मी थक्क झालो.”

या संदर्भात, पाळकांच्या भूमिकेकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. पवित्र द्वेष: १९९० च्या दशकातील धार्मिक संघर्ष (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात लेखक जेम्स ए. हॉट यांनी अशाप्रकारचे धक्कादायक निरीक्षण केले आहे: “१९९० च्या दशकातला सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे, ज्या धर्माने चांगुलपणा आणि मानवांबद्दल चिंता व्यक्‍त करायला हवी तोच द्वेष, युद्ध आणि अतिरेकाचे प्रमुख कारण ठरला आहे.”

अशाप्रकारे, द्वेषाची अनेकाविध क्लिष्ट कारणे आहेत. याचा अर्थ, द्वेषाने भरलेल्या इतिहासातील मूर्ख कृत्ये टाळणे मानवजातीला शक्य नाही का? द्वेषाला कारणीभूत असलेला गैरसमज, अज्ञान आणि भीती दूर करण्यासाठी प्रत्येक व्यक्‍तीला किंवा जागतिक प्रमाणावर काही पावले उचलणे शक्य आहे का? (g०१ ८/८)

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

कलुषितपणा आणि द्वेषभाव यांसारखे वर्तन आत्मसात केले जाते!

[४, ५ पानांवरील चित्र]

द्वेष आणि फाजील अभिमान . . .

. . . या उपजत नाहीत

[७ पानांवरील चित्र]

द्वेषभावनेला उत्तेजन देणारे गट इंटरनेटद्वारे तरुणांना आपल्या गटात सामील करत आहेत

[७ पानांवरील चित्र]

धर्माने सहसा संघर्षाची आग पेटवली आहे

[चित्राचे श्रेय]

AP Photo