व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या मुलांना मोठ्याने वाचून दाखवण्याचा काय फायदा आहे?

आपल्या मुलांना मोठ्याने वाचून दाखवण्याचा काय फायदा आहे?

आपल्या मुलांना मोठ्याने वाचून दाखवण्याचा काय फायदा आहे?

“पानं मुडपलेलं व पीनट बटरनं बरबटलेलं एक पुस्तक फरफटत माझ्याजवळ आणून, माझ्या मांडीवर चढून मला ती म्हणाली . . . ‘पप्पा, मला वाचून दाखवा ना.’” —डॉ. क्लिफर्ड शिमल्स, शिक्षण विषयावरील प्राध्यापक.

मुले—किती पटकन शिकतात. संशोधनात हे दिसून आले आहे की, तीन वर्षांहून कमी वयाच्या मुलांमध्ये मेंदूचा फार वेगाने विकास होत असतो. वाचन, गायन आणि प्रेम दाखवणे या पालकांच्या दररोजच्या कार्यहालचाली मुलाच्या विकासाला महत्त्वपूर्ण ठरतात. तथापि, एका अभ्यासानुसार, दोन ते आठ वर्षे वयोगटातील मुले असलेल्या पालकांपैकी केवळ निम्मे पालक आपल्या मुलांना दररोज काहीतरी वाचून दाखवतात. पण तुम्ही म्हणाल, ‘माझ्या मुलाला वाचून दाखवल्याचा काही फायदा आहे का?’

वाचनाची हौस निर्माण करणे

तज्ज्ञांच्या मते या प्रश्‍नाचे उत्तर होय असे आहे. “वाचन करण्यात कालांतराने यशस्वी होण्यासाठी ज्ञानवृद्धी करण्याचा एकमेव महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे मुलांना मोठ्याने वाचून दाखवणे. आणि विशेषकरून शाळेला जाऊ लागण्याआधीच्या वर्षांत हे करावे,” असे वाचकांचा राष्ट्र बनणे (इंग्रजी) यात म्हटले आहे.

एखाद्या पुस्तकातून गोष्टी वाचून दाखवत असताना मुले लहानपणीच हे शिकतात की, पानांवरील अक्षरांचा आपल्या बोली भाषेतल्या शब्दांशी संबंध आहे. त्यांना पुस्तकी भाषेचा परिचय देखील होतो. “आपण एखाद्या लहान मुलाला मोठ्याने वाचून दाखवतो त्या प्रत्येक वेळी त्याच्या मेंदूला एक ‘आनंदाचा’ संदेश पाठवला जात असतो. हे एखाद्या जाहिरातीसारखे असते, ज्यामध्ये पुस्तके आणि छापील अक्षरे यांचा संबंध आनंदाशी लावण्याची सवय त्या मुलाला लागते,” असे मोठ्याने वाचण्यासंबंधी माहिती देणाऱ्‍या एका पुस्तकात म्हटले आहे. पुस्तकांविषयी अशाप्रकारची हौस पालकांनी आपल्या मुलांमध्ये निर्माण केली तर त्या मुलांना आयुष्यभर वाचनाची आवड राहील.

सभोवतालचे जग समजण्यास मदत करणे

मोठ्याने वाचून दाखवणारे पालक आपल्या मुलांना लोकांविषयीच्या, ठिकाणांविषयीच्या व इतर गोष्टींविषयीच्या माहितीचे एक मौल्यवान बक्षीस देत असतात. कमीत कमी खर्चात पुस्तकांद्वारे ते “विश्‍वदर्शन” करू शकतात. दोन वर्षांच्या अँटनीचे उदाहरण घ्या; त्याची आई तो जन्मल्यापासून त्याला वाचून दाखवत असे. ती म्हणते: “प्राणी संग्रहालयाला तो पहिल्यांदा गेला तरीसुद्धा प्राण्यांना भेटण्याची ती त्याची पहिलीच वेळ नव्हती.” होय, अँटनी जरी पहिल्याच वेळी खरोखरचे झेब्रा, सिंह, जिराफ आणि इतर प्राणी प्रत्यक्षात पाहत होता तरीही हे प्राणी त्याच्या परिचयाचे होते.

त्याची आई पुढे म्हणते: “अँटनीने त्याच्या पहिल्या दोन वर्षांतच असंख्य लोक, प्राणी, वस्तू आणि कल्पना यांच्याशी परिचय करून घेतला आहे.” होय, लहान मुलांना मोठ्याने वाचून दाखवल्याने सभोवतालच्या जगाची समज मिळण्यात भर पडते.

नातेसंबंध मजबूत होतो

कोवळ्या वयात लहान मुलांमध्ये निर्माण झालेली मनोवृत्ती भावी काळात त्यांच्या कार्यांवर प्रभाव पाडते. त्यामुळे पालकांनी आत्मविश्‍वास, परस्परांसाठी आदरभाव आणि समजंसपणा या गुणांच्या आधारे मजबूत नातेसंबंधाचा पाया घातला पाहिजे. आणि या कामात वाचन महत्त्वपूर्ण साधन ठरू शकते.

पालक आपल्या मुलांना कुशीत घेऊन त्यांना वाचून दाखवतात तेव्हा ते जणू म्हणत असतात: “माझं तुझ्यावर प्रेम आहे.” आपल्या मुलाला (जो सध्या आठ वर्षांचा आहे) वाचून दाखवण्याविषयी कॅनडा येथे राहणारी एक आई, फीबी म्हणते: “माझ्या पतीला आणि मलाही असं वाटतं की यामुळे नेथनशी आमची जवळीक वाढायला मदत झाली. तो आमच्यापासून काहीही लपवून ठेवत नाही; त्याला काय वाटतं हे तो सहसा आम्हाला सांगतो. यामुळे आमच्यामध्ये एक खास बंधन निर्माण झालंय.”

सिंडीची मुलगी एक वर्षांची झाली व एक-दोन मिनिटे शांत बसून ऐकू लागली तेव्हापासून तिने आपल्या मुलीला मोठ्याने वाचून दाखवण्याची सवय लावली आहे. यासाठी खर्च केलेल्या वेळेचे आणि प्रयत्नांचे खरोखर सार्थक ठरले आहे का? सिंडी म्हणते: “सोबत बसून वाचण्याच्या शांत आणि प्रेमळ वातावरणामुळे अबीगेल सहसा शाळेत काय घडलं किंवा तिच्या मैत्रिणीशी झालेल्या समस्येविषयी मन मोकळं करू लागते. हे कोणत्या आईवडिलांना आवडणार नाही?” त्यामुळे, मोठ्याने वाचन केल्याने पालक आणि मूल यांच्यातला नातेसंबंध नक्कीच मजबूत होतो.

महत्त्वाची जीवनोपयोगी कौशल्ये बिंबवणे

“आज आपली मुले टीव्ही आणि इतर माध्यमांतून इतक्या निरर्थक गोष्टी मनात भरतात की, पूर्वी नव्हती इतकी त्यांना आता मनाला पोषक असणाऱ्‍या गोष्टींची, स्पष्ट विचारांची, बुद्धीची, आपल्या मूल्यांना धरून राहण्यासाठी व जीवनाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगण्यासाठी मजबूत मानसिक आधाराची गरज आहे,” असे मजबूत कुटुंबासाठी तीन पावले (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते. पालकच आपल्या मुलांवर सकारात्मक व हितकर प्रभाव पाडू शकतात.

पुस्तकांत आढळणाऱ्‍या जटिल आणि सुव्यवस्थित वाक्यरचना, एखाद्या मुलाला बोलण्यातून व लिहिण्यातून स्वतःचे विचार कसे व्यक्‍त करावेत त्याकरता उपयुक्‍त ठरू शकतात. बालकांना पुस्तकांची गरज आहे (इंग्रजी) या पुस्तकाच्या लेखिका, डॉरथी बटलर म्हणतात: “एका व्यक्‍तीची वैचारिक क्षमता तिच्या भाषेवर अवलंबून असते. शिकण्यासाठी व बुद्धिमत्तेसाठी भाषा हा आधारभूत पाया आहे.” चांगला सुसंवाद साधण्याची क्षमता चांगला नातेसंबंध राखण्यासाठी अत्यावश्‍यक आहे.

उचित पुस्तकांमधून वाचण्यामुळे चांगले चारित्र्य आणि नीतीमूल्ये देखील मजबूत होतात. जे पालक आपल्या मुलांना वाचून दाखवतात आणि त्यांच्याशी कारणमीमांसा करतात ते त्यांना समस्या सोडवण्याची कुशलता विकसित करायलाही मदत करू शकतात. सिंडी, आपली मुलगी अबीगेल हिच्यासोबत वाचायची तेव्हा काही गोष्टींमधील परिस्थितींबद्दल तिची काय प्रतिक्रिया असते हे ती टिपत असे. “आम्ही पालक यानात्याने तिच्या व्यक्‍तिमत्वात दडलेल्या प्रवृत्तींविषयी जाणू शकतो आणि कोवळ्या वयातच अनुचित विचारसरणीला आळा घालण्यास तिला मदत करू शकतो.” खरोखर, मुलांसोबत मोठ्याने वाचन केल्याने मन आणि हृदय दोघांना प्रशिक्षित केले जाऊ शकते.

वाचन सुखकारक बनवा

वाचताना, “आपल्या मुलांवर दबाव आणू नका”; वातावरण खेळीमेळीचे, अनौपचारिक आणि सुखकारक असू द्या. वाचन कधी थांबवायचे हे समंजस पालकांना पटकन कळते. लीना म्हणते: “अँड्रू दोन वर्षांचा आहे आणि तो काही वेळा थकलेला असतो तेव्हा फार काळ स्वस्त बसत नाही. तेव्हा आम्ही त्याच्या मूडनुसार वाचण्याच्या वेळात फेरबदल करतो. अँड्रूच्या मनात वाचनाबद्दल नावड निर्माण व्हावी असं आम्हाला मुळीच वाटत नाही, त्यामुळे त्याला फार काळ जमत नसलं तर आम्ही त्याच्यावर जबरदस्ती करत नाही.”

मोठ्याने वाचणे म्हणजे फक्‍त छापील अक्षर बोलून दाखवणे इतकेच नव्हे. उत्सुकता निर्माण करण्यासाठी सचित्र पुस्तकाचे पान कधी उलटावे हे लक्षात ठेवा. सुरळीत वाचा. आवाजात चढ-उतार केल्याने आणि योग्य ठिकाणी जोर दिल्यानेही गोष्टीत जिवंतपणा आणला जाऊ शकतो. तुमच्या आवाजातील कोमलतेने मुलामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली जाऊ शकते.

तुमचे मूलही सक्रियतेने वाचण्यात सहभाग घेते तेव्हा त्याचे फायदे जास्त असतात. अधूनमधून थांबून मुलांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी त्यांना योग्य प्रश्‍न विचारा. तसेच इतर कोणत्या शक्यता असू शकतात त्याविषयी सांगून आपल्या मुलांच्या उत्तरांत भर घाला.

पुस्तकांची निवड करण्यात चोखंदळ असा

परंतु, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या पुस्तकांची निवड. यासाठी जरा मेहनत घ्यावी लागते. पुस्तके तपासून घ्या, आणि केवळ सकारात्मक संदेश असलेली किंवा ज्ञानवर्धक आणि चांगला नैतिक धडा देणारी पुस्तकेच निवडा. पुस्तकाचे मुखपृष्ठ, आतील चित्रे आणि सर्वसाधारण लेखनशैली कशी आहे त्याचे नीट परीक्षण करा. दोघांनाही आवडतील अशी पुस्तके निवडा. सहसा लहान मुले एकच गोष्ट वारंवार वाचून दाखवायला सांगतात.

जगभरातील पालकांनी बायबल कथांचं माझं पुस्तक * या पुस्तकाची बरीच तारीफ केली आहे. हे पुस्तक, पालकांना मुलांसोबत वाचता यावे या दृष्टीने तयार करण्यात आले होते; यामुळे मुलांची वाचन क्षमता सुधारेलच शिवाय बायबलबद्दल त्यांची आस्थाही आणखी वाढेल.

आपल्या मुलांना मोठ्याने वाचून दाखवणारे पालक त्यांच्यामध्ये चांगल्या वाचन सवयी निर्माण करू शकतात ज्यामुळे त्यांना आयुष्यभर फायदा होईल. जोएनने आपल्या मुलीबद्दल असे निरीक्षण केले: “जेनीफरला शाळेला जाण्याआधीच लिहिता-वाचता येऊ लागले आणि वाचनाची आवडही निर्माण झाली, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला आपला महान निर्माणकर्ता, यहोवा याच्याविषयी प्रेम वाढले. आपल्या सर्व निर्णयांमध्ये त्याच्या लिखित वचनावर अर्थात बायबलवर अवलंबून राहायला ती शिकली आहे.” होय, तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही काय शिकवता यापेक्षा त्यांच्यात कशाची आवड निर्माण करता हे जास्त महत्त्वाचे असू शकते. (g०१ ११/२२)

[तळटीप]

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.

[२८ पानांवरील चौकट/चित्र]

आपल्या मुलाला वाचून दाखवताना

• तुमचे मूल बाळ असतानाच सुरवात करा.

• आपल्या मुलांना वाचनाची सवय लागायला वेळ द्या.

• तुम्हा दोघांनाही आवडतील अशा गोष्टी वाचा.

• होता होईल तितक्या अधिक वेळा आणि भावनांसहित वाचा.

• प्रश्‍न विचारून आपल्या मुलाला वाचनात सामील करा.

[२७ पानांवरील चित्राचे श्रेय]

Photograph taken at the Wildlife Conservation Society’s Bronx Zoo