व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोंबडी लोकप्रिय आणि विपुल प्रमाणात उपलब्ध

कोंबडी लोकप्रिय आणि विपुल प्रमाणात उपलब्ध

कोंबडी लोकप्रिय आणि विपुल प्रमाणात उपलब्ध

केनियातील सावध राहा! लेखकाकडून

कोंबडी, कदाचित पृथ्वीवरील सर्वात जास्त प्रमाणात असलेला पक्षी आहे. अंदाजानुसार, १,३०० कोटींपेक्षा अधिक कोंबड्या आहेत! त्याचे मांस इतके लोकप्रिय आहे की दरवर्षी ३,३०० कोटी किलोग्रॅम मांसाचे सेवन केले जाते. शिवाय, जगभरात दरवर्षी कोंबड्यांपासून सुमारे ६०,००० कोटी अंडी मिळतात.

पाश्‍चात्त्य देशांमध्ये, कोंबड्या भरपूर मात्रेत आणि स्वस्त आहेत. काही दशकांआधी, एका विशिष्ट व्यक्‍तीला निवडून दिल्यास घराघरात कोंबडी शिजेल असे आश्‍वासन देण्यात आले होते. पण आज, कोंबडीचे मांस पूर्वीइतके महाग नाही किंवा ते थोडक्यांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. हा उल्लेखनीय पक्षी इतका लोकप्रिय आणि विपुल प्रमाणात उपलब्ध कसा झाला? गरीब देशांविषयी काय? त्यांना या विपुलतेतला काही वाटा मिळण्याची शक्यता आहे का?

पक्ष्याची माहिती

आशियातील लाल जंगली कुक्कुट हेच आधुनिक कुक्कुटाचे पूर्वज आहे. कोंबडी पाळली जाऊ शकते हे मानवाच्या लगेच लक्षात आले. सुमारे २,००० वर्षांआधी येशू ख्रिस्ताने कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते असा उल्लेख केला होता. (मत्तय २३:३७; २६:३४) या दृष्टान्तावरून कळून येते की, सर्वसाधारण लोकांना या पक्ष्याची चांगली ओळख होती. परंतु, कुक्कुट आणि अंड्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याचा व्यापार १९ व्या शतकातच सुरू झाला.

आज, कोंबडीचे मांस सर्वात लोकप्रिय आहे. घरगुती उपयोगासाठी आणि व्यापारासाठी कोट्यवधी लोकांच्या घरांमध्ये कोंबड्या पाळल्या जातात. शहरांमधले लोकही कोंबड्या पाळतात. खरे म्हणजे, इतर कोणत्याही पाळीव प्राण्यांपेक्षा कोंबड्या कोठेही पाळता येतात. अनेक देशांनी आपापल्या हवामानाला व गरजांना अनुकूल ठरणाऱ्‍या विशिष्ट जाती निर्माण केल्या आहेत. यांमध्ये ऑस्ट्रेलियातील ऑस्ट्रलॉर्प; मूळची भूमध्य येथील परंतु अमेरिकेत लोकप्रिय असलेली सुप्रसिद्ध लेगहॉर्न; अमेरिकेत निर्माण केलेल्या न्यू हॅम्पशर, प्लिमथ रॉक, ऱ्‍होड आयलंड रॉक, वायनडॉट; इंग्लंडच्या कॉर्निश, ऑरपिंग्टन, ससेक्स या जातींचा समावेश होतो.

कुक्कुटपालनाच्या प्रगत वैज्ञानिक पद्धतींमुळे कोंबड्यांची जोपासना करणे हा सर्वात यशस्वी कृषी उद्योगांपैकी एक बनला आहे. अमेरिकेतील शेतकरी, खाद्य देण्याच्या आणि पिंजऱ्‍यात ठेवण्याच्या तसेच वैज्ञानिकरित्या रोग नियंत्रणाच्या काळजीपूर्वक पद्धतींचा वापर करतात. मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची ही तंत्रे पक्ष्यांवर क्रूरता आहे असे अनेकांचे मत आहे. पण यामुळे, शेतकऱ्‍यांनी या पक्ष्यांची निर्मिती करण्याचे परिणामकारक मार्ग शोधून काढायचे थांबवलेले नाही. आधुनिक तंत्रांमुळे २५,००० ते ५०,००० कोंबड्यांची देखरेख फक्‍त एका व्यक्‍तीला करता येते. बाजारात विकण्याजोग्या योग्य वजनाचे पक्षी व्हायला केवळ तीन महिने लागतात. *

कोंबडीचे मांस

तुम्ही कोणत्याही हॉटेल, रेस्टॉरंट किंवा एखाद्या गावठी भोजनालयात गेलात तर या पाळीव पक्ष्याच्या मटणाचे प्रकार मेन्यूमध्ये तुम्हाला निश्‍चितच दिसतील. जगभरात अनेक फास्ट फूड रेस्टॉरंट्‌समध्येही चिकनचे विशिष्ट पदार्थ मिळतात. अनेक समाजांमध्ये आजही खास प्रसंगी चिकनच पसंत करतात. काही देशांमध्ये, जसे की भारतात, विविध पद्धतींनी चिकन बनवले जाते. लाल मुर्गी, कर्गी मुर्गी, अद्रक मुर्गी यांसारखे प्रकार अत्यंत चविष्ट आहेत!

चिकन इतके लोकप्रिय का आहे? त्याचे एक कारण म्हणजे, चिकन विविध पद्धतींनी तयार करता येते तसे इतर बरेच पदार्थ करता येत नाहीत. तुम्हाला चिकन कोणत्या पद्धतीने आवडते? तळलेले, भाजलेले, कबाब, सुके की उकडलेले चिकन? कोणत्याही पाककृतीच्या पुस्तकात चविष्ट चिकन तयार करण्याच्या अनेक पद्धती दिलेल्या असतात.

चिकन अनेक देशांमध्ये उपलब्ध असल्यामुळे ते तुलनात्मकरित्या स्वस्तही आहे. आहारतज्ज्ञ देखील चिकन पसंत करतात कारण शरीराला आवश्‍यक असलेली प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिज त्यात असते. आणि तरीसुद्धा, कॅलरींचे, सॅच्यूरेटेड फॅट आणि इतर मेदांचे प्रमाण त्यात कमी असते.

विकसनशील देशांना पुरवठा

अर्थात, सर्वच देशांमध्ये कोंबडीचे मांस किंवा अंडी मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत. कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंडळासाठी एका गटाने तयार केलेल्या वृत्तानुसार हे महत्त्वाचे आहे; त्यात असे म्हटले होते: “सन २०२० पर्यंत जागतिक लोकसंख्या ७.७ अब्ज वाढणार असल्याचा अंदाज आहे . . . परंतु, लोकसंख्येतील बहुतांश (९५ टक्के) वाढ विकसनशील देशांमध्ये होणार असल्याचे सांगितले जाते.” सुमारे ८० कोटी लोक आधीच कुपोषित आहेत हे लक्षात घेतल्यास या वाक्याचे गांभीर्य वाढते!

तथापि, अनेक तज्ज्ञांना वाटते की, या उपाशी लोकांची पोटे भरण्यासाठी आणि शेतकऱ्‍यांना आवश्‍यक मिळकत पुरवण्यासाठी कुक्कुटपालन महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकते. पण समस्या ही आहे की, मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन करणे ही गरीब शेतकऱ्‍यांसाठी मोठे आव्हान असू शकते. एकतर, गरीब राष्ट्रांमध्ये कुक्कुटपालन सहसा गावांतील लहान शेतांवर किंवा अंगणात केले जाते. शिवाय, अशा देशांमध्ये कोंबड्यांच्या वाड्या सुरक्षित नसतात. दिवसा कोंबड्या मोकळ्या सोडल्या जातात, त्या स्वतःचे अन्‍न शोधून खातात आणि रात्री घरी परततात किंवा काही वेळा झाडांवर झोपतात नाहीतर लोखंडी पिंजऱ्‍यांमध्ये राहतात.

म्हणूनच, अशा पद्धतीने जोपासलेल्या कोंबड्या न्यूकॅसल रोगाला बळी पडतात किंवा प्राणी आणि मानवांद्वारे ठार मारल्या जातात. बहुतेक शतकऱ्‍यांना कुक्कुटपालनाविषयी फारशी माहिती नसते तसेच भरपूर खाद्य, चांगल्या वाड्या किंवा रोगांपासून संरक्षण करण्याकरता त्यांची ऐपतही नसते. यामुळे, विकसनशील देशांमधील शेतकऱ्‍यांना माहिती देण्यासाठी कार्यक्रम राबवले जात आहेत. उदाहरणार्थ, संयुक्‍त राष्ट्रे अन्‍न आणि कृषी संघटनेने, “कुक्कुटपालनाचे उत्पादन अधिक वाढवून आफ्रिकेच्या गावांमधील गरिबांना मदत करण्यासाठी” पाच वर्षांचा प्रकल्प अलीकडेच सुरू केला आहे.

चांगला हेतू बाळगून केलेल्या अशा मदतींचा काय परिणाम होईल हे अद्याप दिसून यायचे आहे. त्यामुळे, चिकनचा एक तुकडासुद्धा जगातील बहुतांश लोकांना परवडत नाही ही वस्तुस्थिती श्रीमंत राष्ट्रांतील लोकांच्या आकलनापलीकडची आहे. अशा लोकांकरता, ‘प्रत्येकाच्या घरात कोंबडी शिजेल’ ही कल्पना तर फार दूरचे स्वप्न असेल. (g०१ १०/८)

[तळटीप]

^ कुक्कुटपालन अंडी मिळवण्यासाठी केले जात असले तरी, अमेरिकेत ९० टक्के कुक्कुटपालन मांसासाठी केले जाते.

[२५ पानांवरील चौकट/चित्रे]

कच्चे चिकन हाताळण्याची सुरक्षित पद्धत

“कच्च्या चिकनमध्ये सालमोनेला सूक्ष्मजंतूंसारखे हानीकारक जीवजंतू असू शकतात त्यामुळे चिकन तयार करताना काळजी घेतली पाहिजे. नेहमी, चिकन हाताळण्याआधी आणि नंतर साबणाच्या कोमट पाण्याने हात, चॉपिंग बोर्ड, चाकू आणि कातरी धुवा. जर चॉपिंग बोर्ड एकदम गरम पाण्यात धुता येत असेल . . . आणि चिकन कापण्यासाठी वेगळे चॉपिंग बोर्ड ठेवता येत असेल तर अगदी उत्तम. बर्फातून काढलेले चिकन शिजवण्याआधी बर्फ पूर्णपणे वितळू द्यावा.”—द कुक्स किचन बायबल.

[२३ पानांवरील चित्रे]

कोंबड्यांच्या काही जाती आहेत व्हाईट लेगहॉर्न, राखी जंगली कुक्कुट, ऑरपिंग्टन, पोलिश आणि स्पेकल्ड ससेक्स

[चित्राचे श्रेय]

व्हाईट लेगहॉर्न वगळता सर्व: © Barry Koffler/www.feathersite.com

[२४ पानांवरील चित्रे]

विकसनशील देशांमधील शेतकऱ्‍यांना कुक्कुटपालन वाढवण्यासाठी मदत करण्याचे प्रयत्न चालू आहेत

[२४ पानांवरील चित्र]

अमेरिकेत ९० टक्के कुक्कुटपालन मांसाकरता केले जाते