व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पुरुष स्त्रियांवर हात का उचलतात?

पुरुष स्त्रियांवर हात का उचलतात?

पुरुष स्त्रियांवर हात का उचलतात?

काही तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की इतर सर्व गुन्हेगारांपेक्षा, स्त्रिया आपल्या पुरुष साथीदारांकडूनच ठार मारल्या जाण्याची अधिक शक्यता आहे. वैवाहिक दुर्व्यवहाराचा वाढता प्रघात थांबवण्याच्या प्रयत्नात बरेच संशोधन करण्यात आले आहे. कोणत्या प्रकारचा पुरुष आपल्या बायकोवर हात उगारतो? त्याचे बालपणीचे अनुभव काय होते? लग्नाआधी तो आपल्या भावी पत्नीला हिंसक वागणूक द्यायचा का? मारहाण करणारा हा पुरुष उपचाराला कसा प्रतिसाद देतो?

तज्ज्ञांना एका गोष्टीची खात्री पटली आहे आणि ती म्हणजे मारहाण करणारे सगळे पुरुष सारखे नसतात. एका टोकाला क्वचितच हात उचलणारा पुरुष आढळतो. तो सहसा कोणतेही शस्त्र वापरत नाही आणि त्याला आपल्या बायकोशी दुर्व्यवहार करण्याची सवय नसते. कधीतरी परिस्थितीमुळे आपले नियंत्रण गमावून तो हात उचलतो, पण ही तुरळक घटना असते. दुसऱ्‍या टोकाला असा पुरुष आहे, ज्याला मारहाण करण्याची जणू सवयच लागलेली आहे. तो सतत आपल्या पत्नीशी दुर्व्यवहार करत असतो आणि याबद्दल त्याला जराही पस्तावा होत नाही.

पण, मारहाण करणारे पुरुष वेगवेगळ्या प्रकारचे असतात याचा अर्थ मारहाणीचे काही प्रकार चालण्यासारखे आहेत असे मुळीच नाही. किंबहुना, कोणत्याही प्रकारच्या शारीरिक दुर्व्यवहारामुळे इजा होऊ शकते आणि कधीकधी तर मृत्यूही संभावू शकतो. त्याअर्थी, इतरांच्या तुलनेत एखादा पुरुष अधूनमधूनच मारतो किंवा तितक्या हिंसकपणे वागत नाही याचा अर्थ त्याची वागणूक खपवून घेण्याजोगी आहे असे म्हणता येणार नाही. साध्या शब्दांत सांगायचे झाल्यास, कोणत्याही प्रकारची मारहाण “चालण्यासारखी” नाही. पण जिला अर्धांगिनी म्हणून स्वीकारले आणि आयुष्यभर जिचा संभाळ करण्याची शपथ घेतली तिला शारीरिक वेदना देण्यास पुरुषाला कोणती कारणे प्रवृत्त करतात?

कौटुंबिक संस्कार

मारहाण करणारे बरेच पुरुष अशाच घरांत लहानाचे मोठे झालेले असतात जेथे हा प्रकार त्यांनी उठताबसता पाहिलेला असतो. वैवाहिक दुर्व्यवहाराविषयी दोन दशकांपेक्षा अधिक काळ अभ्यास करणारे मायकल ग्रोएच लिहितात, “मारहाण करणारे बहुतेक पुरुष, अक्षरशः ‘लढाईचे मैदान’ म्हणता येईल अशा घरांत वाढलेले असतात. अगदी बालपणापासून ते प्रेमाचा ओलावा नसलेल्या वातावरणात वावरलेले असतात, जेथे भावनिक आणि शारीरिक हिंसा ‘नेहमीचीच’ वाटू लागली असते.” एका तज्ज्ञाच्या मते अशा वातावरणात वाढलेला पुरुष “अगदी लहानपणीच आपल्या पित्याला स्त्रियांप्रती असलेला तिरस्कार आत्मसात करतो. पुरुषाने नेहमी स्त्रीला धाकात ठेवले पाहिजे आणि त्यांना धाकात ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना धमक्या देणे, मारणे आणि सतत त्यांना खालच्या पायरीवर ठेवणे हे समीकरण त्या मुलाच्या मनात पक्के बसलेले असते. शिवाय त्याला हे देखील कळून चुकलेले असते की आपल्या पित्याची मर्जी संपादन करण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्याच्यासारखेच वागणे.”

बायबल अगदी स्पष्टपणे दाखवते की पालकांच्या वागणुकीचा मुलांवर मोठा प्रभाव पडू शकतो, एकतर चांगला नाहीतर वाईट. (नीतिसूत्रे २२:६; कलस्सैकर ३:२१) अर्थात, कौटुंबिक पार्श्‍वभूमी ही काही मारझोड करण्याची सबब नाही, पण हिंसक स्वभावाची बिजे केव्हा व कशी पेरली जातात याची यावरून एक झलक मिळते.

सांस्कृतिक प्रभाव

काही देशांत स्त्रीला मारणे चालण्यासारखे आहे असे समजले जाते, इतकेच काय तर हे सर्वसामान्य आहे असे मानले जाते. संयुक्‍त राष्ट्रांच्या एका अहवालात असे म्हटले आहे की “पत्नीला मारण्याचा किंवा तिला मारण्याची धमकी देऊन धाकात ठेवण्याचा पतीला हक्क आहे असे कित्येक समाजांत ठामपणे मानले जाते.”

ज्या देशांत असा दुर्व्यवहार अयोग्य समजला जातो तेथे देखील कित्येक लोक हिंसक वागणुकीचे समर्थन करतात. याबाबतीत काही पुरुषांची अतर्क्य विचारसरणी पाहून धक्का बसतो. वीकली मेल ॲन्ड गार्डियन या दक्षिण आफ्रिकेच्या एका साप्ताहिकानुसार केप पेनिन्सुला येथे घेण्यात आलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले की आपण पत्नीला मारहाण करत नाही असा दावा करणाऱ्‍या पुरुषांपैकी कित्येकांच्या मते स्त्रियांना मारण्यात काही गैर नाही आणि हे अत्याचारात मोडत नाही.

असा हा विकृत दृष्टिकोन बनण्याची सुरवात लहानपणीच होते असे दिसते. उदाहरणार्थ, ब्रिटनमध्ये घेतलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले की ११ व १२ वर्षे वयाच्या मुलांपैकी ७५ टक्के मुलांना असे वाटते की पुरुषाला चिडवल्यास त्याने स्त्रीवर हात उचलण्यात काही गैर नाही.

मारहाण कोणत्याही परिस्थितीत अक्षम्य

वरील कारणांवरून वैवाहिक दुर्व्यवहार का घडतो हे समजण्यास मदत होते पण या मारहाण करण्याच्या सबबी मुळीच नाहीत. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, आपल्या विवाह साथीदाराला मारणे हे देवाच्या नजरेत गंभीर पाप आहे. त्याचे वचन बायबल यात आपण असे वाचतो: “पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी जो आपल्या पत्नीवर प्रीति करितो तो स्वतःवरच प्रीति करितो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करितो, जसे ख्रिस्तहि मंडळीचे पालनपोषण करितो तसे तो करितो.”—इफिसकर ५:२८, २९.

बायबलमध्ये फार आधी असे भाकीत करण्यात आले होते की या व्यवस्थीकरणाच्या “शेवटल्या काळी” बहुतेक लोक “ममताहीन,” आणि “क्रूर” असतील. (२ तीमथ्य ३:१-३) वैवाहिक दुर्व्यवहाराचे प्रचलन, या भविष्यवाणीत सांगितलेल्या काळातच आपण आज जगत आहोत याचे केवळ आणखी एक चिन्ह आहे. पण मारहाण सहन करणाऱ्‍यांना साहाय्य करण्याकरता काय केले जाऊ शकते? मारहाण करणारे आपल्या वागणुकीत बदल करण्याची काही आशा आहे का? (g०१ ११/८)

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

“आपल्या पत्नीवर हात उचलणारा पुरुष हा एखाद्या अनोळखी माणसाला ठोसा मारणाऱ्‍या गुन्हेगारापेक्षा कमी नाही.”—पुरुष स्त्रियांना मारतात तेव्हा

[६ पानांवरील चौकट]

पतीकडून होणारी मारहाणएक जागतिक समस्या

स्त्रियांशी दुर्व्यवहार करण्याची वृत्ती असणाऱ्‍या ‘अहंकारी पुरुषांची समस्या सबंध जगात आहे. पुढील वृत्तांवरून या गोष्टीची खात्री पटते.

ईजिप्त: ॲलेक्झांड्रिया येथे घेण्यात आलेल्या तीन महिन्यांच्या एका अभ्यासातून असे दिसून आले की स्त्रियांना होणाऱ्‍या दुखापतींचे मुख्य कारण घरातील मारहाणच असते. स्थानिक अपघात केंद्रांत, २७.९ टक्के स्त्रिया याच कारणामुळे येतात.—रेस्यूमे ५ ऑफ द फोर्थ वर्ल्ड कॉन्फरन्स ऑफ विमेन.

थायलंड: बँकॉकच्या सर्वात मोठ्या उपनगरात ५० टक्के विवाहितांना नियमितरित्या मारहाण केली जाते.—पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर विमेन्स हेल्थ.

हाँग काँग: “जोडीदाराने मारल्याची तक्रार करणाऱ्‍या स्त्रियांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढली आहे.”—साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट, जुलै २१, २०००.

जपान: हिंसक वातावरणापासून संरक्षण मिळवू इच्छिणाऱ्‍या अबला स्त्रियांची संख्या १९९५ साली ४,८४३ पासून १९९८ मध्ये ६,३४० पर्यंत वाढली. “यांपैकी जवळजवळ एक तृतीयांश स्त्रियांनी सांगितले की पतीच्या हिंसक वागणुकीमुळे आपल्याला संरक्षण हवे आहे.”—द जपॅन टाईम्स, सप्टेंबर १०, २०००.

ब्रिटन: “दर सहा सेकंदांना ब्रिटनमध्ये कोठेतरी बलात्कार, मारहाण किंवा भोसकण्याचा प्रकार घडतो.” स्कॉटलंड यार्डच्या एका वृत्तानुसार, “पोलिसांना दररोज घरातील मारहाणीला बळी पडलेल्या व्यक्‍तींचे १,३०० दूरध्वनी संदेश येतात—म्हणजे वर्षाला ५,७०,००० जणांचे. यांपैकी ८१ टक्के, ज्यांच्यावर पुरुषांनी हल्ला केला अशा स्त्रिया असतात.”—द टाईम्स, ऑक्टोबर २५, २०००.

पेरू: पोलिसांना मिळणाऱ्‍या सर्व प्रकारच्या गुन्ह्यांच्या वृत्तांपैकी सत्तर टक्के प्रकरणांत स्त्रियांना त्यांच्या पतींनी मारहाण केलेली असते.—पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर विमेन्स हेल्थ.

रशिया: “एका वर्षात, १४,५०० रशियन स्त्रियांना त्यांच्या पतींकडून ठार मारण्यात आले आणि ५६,४०० स्त्रिया घरात झालेल्या मारहाणीमुळे एकतर अपंग झाल्या किंवा गंभीररीत्या जखमी झाल्या.”—द गार्डियन.

चीन: “ही एक नवीन समस्या आहे. आणि खासकरून शहरी भागांत ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे,” असे जिन्लुंग कुटुंब केंद्राचे संचालक प्रोफेसर छन यीयुन यांनी सांगितले. “पूर्वी निदान शेजारपाजारच्या लोकांच्या दबावामुळे मारहाणीचे प्रकार नियंत्रणात राहायचे पण आता ते देखील होत नाही.”—द गार्डियन.

निकाराग्वा: “निकाराग्वात स्त्रियांविरुद्ध हिंसाचार वाढत चालला आहे. एका सर्व्हेनुसार मागच्या एका वर्षातच ५२ टक्के निकाराग्वन स्त्रियांना आपल्या पतीकडून हिंसक वागणुकीला तोंड द्यावे लागले.”—बीबीसी न्यूज.

[७ पानांवरील चौकट]

संभाव्य लक्षणे

अमेरिकेतील ऱ्‍होड आयलंड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक रिचर्ड जे. जेल्स यांनी घेतलेल्या एका अभ्यासानुसार घरातील शारीरिक व भावनिक दुर्व्यवहाराची काही संभाव्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

१. मारहाण करणारा पुरुष पूर्वी कोणत्या न कोणत्या प्रकारे घरातील मारहाणीत सामील होता.

२. त्याला काम नाही.

३. तो बेकायदेशीर मादक पदार्थ, निदान वर्षातून एकदा वापरतो.

४. घरी असताना त्याने आपल्या वडिलांना आईला मारताना पाहिले होते.

५. तो पुरुष व ती स्त्री विवाहित नाहीत; ते फक्‍त सोबत राहत आहेत.

६. त्याला काम आहे पण पगार खूप कमी मिळतो.

७. त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलेले नाही.

८. त्याचे वय १८-३० या वयोगटातील आहे.

९. वडील किंवा आई किंवा दोघेही मुलांना मारतात.

१०.मिळकत दारिद्र्‌य रेषेच्या खाली आहे.

११.पती व पत्नी यांची सांस्कृतिक पार्श्‍वभूमी वेगवेगळी आहे.

[७ पानांवरील चित्र]

घरात केल्या जाणाऱ्‍या मारहाणीचा मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतो