व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“सुवर्ण नगरी” म्यानमार

“सुवर्ण नगरी” म्यानमार

“सुवर्ण नगरी” म्यानमार

म्यानमारच्या सावध राहा! लेखकाकडून

पर्वतरांगांच्या कुशीत वसलेली व नैसर्गिक सीमेमुळे शेजारच्या आशियाई राष्ट्रांपासून विलग अशी ही “सुवर्ण नगरी.” हिच्या नैऋत्येस बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र आहे; हिला, जवळजवळ २,००० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. हिच्या पश्‍चिमेस बांगलादेश व भारत आहे; उत्तरेस चीन आहे आणि पूर्वेस लाओस व थायलंड. ती मादागास्करपेक्षा किंचित मोठी व टेक्सासच्या उत्तर अमेरिकन राज्यापेक्षा किंचित लहान आहे. हिचे नाव काय आहे? तिचे नाव आहे म्यानमार; तिचे पूर्वीचे नाव बर्मा होते.

इथल्या पूर्वीच्या रहिवाश्‍यांनी म्यानमारला सुवर्ण नगरी असे नाव दिले. येथे तेल, नैसर्गिक वायू, तांबे, कथिल, चांदी, टंगस्टन आणि इतर खनिज पदार्थ तसेच इंद्रनील मणी, पाचू, माणिक आणि मर्गझ यांसारखी मौल्यवान रत्ने आढळतात. शिवाय, सागवान, रोझवूड आणि पदौक यांसारखी दुर्मिळ वृक्षसंपदा देखील येथील उष्णकटिबंधीय पर्जन्यवनात आढळते. माकडे, वाघ, अस्वल, गवा, हत्ती इत्यादी प्राणीविशेष देखील येथील जंगलात आढळतात. परंतु या सर्वांपेक्षा, सुवर्ण नगरीचे रहिवासी खरे तर सर्वात मौल्यवान आहेत.

म्यानमारचे रहिवासी

पारंपरिकपणे सौम्य व शांत स्वभावाचे म्यानमारचे रहिवासी, सभ्य व आदरातिथ्य दाखवणारे आहेत. घरी आलेल्या पाहुण्यांना ते आदराने व अदबीने वागवतात. मुले सहसा वडीलधाऱ्‍या पुरूषांना अंकल व स्त्रियांना अंटी असे संबोधतात.

म्यानमारला भेट देऊन आलेले लोक सहसा तेथील वयस्कर लोकांच्या मऊ कांतीचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाहीत. उतारवयातही तरुण दिसणाऱ्‍या कांतीमागचे रहस्य म्हणजे, तनक्का नावाचे सोनेरी रंगाचे सौंदर्यप्रसाधन; इथल्या स्त्रिया सांगतात, की हा लेप तनक्का नावाच्या झाडापासून तयार केला जातो. थनाका झाडाच्या फांदीचा तुकडा सहाण्यावर उगाळून तेथील स्त्रिया हा लेप तयार करतात व कलापूर्णरीतीने आपल्या चेहऱ्‍यावर तो लावतात. तनक्काचा हा लेप स्तंभक व थंडावा देणारा आहेच शिवाय चेहऱ्‍याच्या त्वचेचे उष्ण व कडक उन्हापासून देखील संरक्षण करतो.

म्यानमारमधील पुरूषांचा व स्त्रियांचा वेश साधारण सारखाच, म्हणजे लुंगी आहे. ही लुंगी जवळजवळ दोन मीटर लांबीचे विणलेले कापड असते आणि तिची दोन्ही टोके एकत्र बांधून ती नेसली जाते. स्त्रिया आपल्या कमरेभोवती लुंगी नेसून तिचे दुसरे टोक कमरेला खोचतात त्यामुळे ती घागऱ्‍यासारखी दिसते. आणि पुरुष, समोरच्या बाजूला लुंगीच्या दोन्ही टोकांची कमरेवर सैल गाठ बांधतात. सभ्य आणि पायघोळ लुंगी उष्णप्रदेशासाठी अगदी उत्तम आहे.

बाजारात एक फेरफटका मारल्यावर आपल्याला दिसून येईल, की म्यानमारमधील लोक, रेशीम विणण्यात, हाताने दागदागिने बनवण्यात व लाकडावर कोरीव काम करण्यात किती माहीर आहेत. सागवान, पदौक आणि इतर लाकडांपासून मानवांच्या, वाघांच्या, घोड्यांच्या, गव्यांच्या आणि हत्तींच्या सुबक मूर्ती बनवल्या जातात. मेजपृष्ठ, पार्टिशन, खुर्च्या यांसारख्या दररोजच्या वापरातील वस्तुंवरसुद्धा कोरीव काम केलेले आढळते. यांपैकी काही विकत घेण्याची तुमची इच्छा असेल तर घासाघीस करून मगच घ्या, नाहीतर कदाचित तुम्हाला ती वस्तू बरीच महाग पडू शकते!

म्यानमारमधील लोक, लाखेची सुंदर नक्षीदार भांडी, ताटं, झाकणाचे डबे देखील बनवण्यात पटाईत आहेत. या फ्री-फॉर्म नक्षीकामांमुळे आणि कोरलेल्या चित्रांमुळेच खरे तर त्यांची ही भांडी एकमेव ठरतात. पहिल्यांदा, चांगल्याप्रतीच्या बांबूच्या सालींपासून, हवे त्या आकाराचे एक जाळे विणले जाते. (उच्च प्रतीच्या वस्तू बनवण्यासाठी बांबू आणि घोड्याचे केस एकत्र विणले जातात.) मग, कारागीर या जाळ्यावर, थीटसेचे तेल आणि प्राण्यांच्या हाडांची जाळून केलेली राख कालवून तयार केलेल्या लाखेचे एकावर एक असे जवळजवळ सात थर लावतो.

ही लाख वाळल्यावर मग कारागीर त्यावर, स्टीलच्या एका सुईने नक्षी कोरतो. मग, थोडेसे रंगकाम व पॉलिश करून एक कलाकृती बनवतो जी फक्‍त शोभेसाठीच नव्हे तर घरातही वापरता येते.

धर्माचा पगडा

म्यानमारमधील ८५ टक्के लोक बौद्ध धर्मीय आहेत. आणि उरलेले इस्लाम धर्मीय व ख्रिस्ती आहेत. आग्नेय आशियाप्रमाणेच म्यानमारमध्येसुद्धा धर्म लोकांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतो. परंतु, काही विशिष्ट धार्मिक रीतीरिवाज, तेथे भेट देणाऱ्‍यांना माहीत नसतील.

उदाहरणार्थ, बौद्ध धर्मगुरू स्त्रियांना स्पर्श न करण्याची शपथ घेतात. त्यामुळे या धर्मगुरूंबद्दल आदर म्हणून स्त्रिया या धर्मगुरूंच्या जवळ न जाण्याची खबरदारी घेतात. बस प्रवासावरसुद्धा धार्मिक विश्‍वासांचा प्रभाव पडला आहे. पाश्‍चिमात्य देशातून आलेली व्यक्‍ती बसमधून प्रवास करत असताना, “आपण परत किती वाजता पोचणार आहोत हे कृपया चालकाला विचारू नये,” असे बसमध्ये लिहिलेले वाक्य वाचून कदाचित गोंधळून जाईल. चालकांना प्रवाश्‍यांच्या प्रश्‍नांना उत्तरे द्यायचा कंटाळा येतो म्हणून हे वाक्य लिहिलेले आहे का? नाही. बौद्ध लोकांचा असा विश्‍वास आहे, की नत (म्हणजे, आत्मे) यांना या प्रश्‍नामुळे राग येऊ शकतो व ते बसला उशीर करू शकतात!

म्यानमारचा इतिहास

म्यानमारच्या अतिप्राचीन इतिहासाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही; परंतु असे दिसते, की अनेक जमाती आणि जवळपासच्या देशांतले लोक तेथे स्थायिक झाले. मोन जमातीने त्या देशाला थुवान्‍नभूमी म्हणजे “सुवर्ण नगरी” असे नाव दिले. तिबेटी-बर्मन लोक, पूर्व हिमालयातून आले आणि आज ज्याला नैऋत्य चीन म्हटले जाते तेथून थाई लोक आले. म्यानमारच्या उंचसखल प्रदेशामुळे अनेक जमाती वेगवेगळ्या राहिल्या—त्यामुळेच आज तेथे अनेक जमातींचे व भाषिकांचे गट आहेत.

१९ व्या शतकाच्या सुरवातीला, नव्याने वसाहतीकरण झालेल्या भारतातून ब्रिटिश लोक येऊ लागले. ते पहिल्यांदा दक्षिणेकडे स्थायिक झाले आणि हळूहळू मग त्यांची वस्ती संपूर्ण देशभर पसरली. १८८६ पर्यंत, बर्मा या नावाने संबोधल्या जाणाऱ्‍या म्यानमारला ब्रिटिश-हिंदुस्थानाने आपल्या ताब्यात घेतले.

दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी हा देश अतिशय कटू युद्धाचे केंद्र बनला; आणि काही महिन्यांतच म्हणजे १९४२ साली जपानी सैन्यांनी ब्रिटिशांना हाकलून लावले. त्यानंतर, तेथे “डेथ रेलरोड” नावाने ओळखला जाणारा कुविख्यात लोहमार्ग बांधण्यात आला. बर्मातील थानफ्युझयात आणि थायलंडमधील नाँग प्लाडूक यांना जोडणारा हा ४०० किलोमीटरचा लोहमार्ग दाट जंगलातून व पर्वतांमधून जाणारा होता. धातू कमी पडल्यामुळे, मध्य मलाया (आता मलेशिया) येथून काढून आणलेल्या रूळपट्ट्या वापरण्यात आल्या. या प्रकल्पाचा एक लहानसा भाग म्हणजे, क्वाय नदीवर बांधण्यात आलेला पूल; नंतर, याच पूलावर आधारित एक लोकप्रिय चित्रपट काढण्यात आला.

४०० हत्तींच्या साहाय्याने, ३,००,००० पेक्षा अधिक लोकांनी—युद्धाचे कैदी व भारतीय आणि ब्रम्ही (बर्मी) नागरिकांनी—हा लोहमार्ग बांधला होता. हे काम करताना हजारो लोकांना आपल्या जिवाला मुकावे लागले. मित्र राष्ट्रांकडून होणाऱ्‍या सतत बाँम्बमाऱ्‍यामुळे या लोहमार्गाचा फार कमी उपयोग होत असे आणि कालांतराने तर तो बंदच पडला. नंतर, त्या लोहमार्गाच्या बहुतेक रूळपट्ट्या काढून इतरत्र वापरण्यात आल्या.

कालांतराने, ब्रिटिशांनी पुन्हा एकदा युद्ध करून १९४५ साली तो देश जपानकडून आपल्या ताब्यात घेतला. परंतु ब्रिटिशांचा हा अंमल जास्त दिवस टिकला नाही; कारण, जानेवारी ४, १९४८ रोजी ब्रम्हदेश अर्थात बर्मा स्वतंत्र झाला. जून २२, १९८९ रोजी संयुक्‍त राष्ट्राने म्यानमार हे नवे नाव मान्य केले.

सुवर्ण राजधानींची नगरी

अनेक शतकांपासून म्यानमारच्या अनेक राजधान्या होत्या. उदाहरणार्थ, म्यानमारच्या अगदी मध्यभागी, सुवर्ण शहर या नावाने प्रसिद्ध असलेले मंडाले वसले आहे. नवे-जुने असे शेकडो पॅगोडे व ५,००,००० लोकसंख्या असलेले हे शहर ब्रिटिशांनी कब्जा करण्याआधीची शेवटची राजधानी होते. १८५७ साली मिंडोन राजाने, स्वतःसाठी आणि आपल्या राण्यांसाठी एक भव्य राजमहाल बांधून मंडालेला राजेशाही सन्मान मिळवून दिला. या जुन्या शहराचा ४ चौरस किलोमीटरचा तुकडा आजही ८ मीटर उंचीच्या भिंतीत चिरेबंद आहे; त्याचा तळ ३ मीटर जाडीचा आहे. भिंतींना लागूनच ७० मीटर रुंदीचा खंदक आहे.

१८८५ साली मिंडोनचा वारस, राजा थिबा याला ब्रिटिशांनी कैदी म्हणून भारतात स्थानबद्ध केले; परंतु त्याच्या राजमहालाला मुळीच हात लावला नाही. परंतु दुसऱ्‍या महायुद्धात त्या राजमहालाची राखरांगोळी झाली. म्यानमारच्या लोकांनी हार मानली नाही; त्यांनी पूर्वीच्याच जागी लाल व सोनेरी लाकडांच्या राजमहालाची एक सर्वोत्कृष्ट प्रतिकृती बांधली. ती आज पर्यटकांसाठी खुली आहे.

मंडालेपासून दोनशे किलोमीटरच्या अंतरावर पगान आहे. एकेकाळी राजधानी असलेल्या पगानची स्थापना सामान्य युगाच्या पहिल्या हजार वर्षांदरम्यान करण्यात आली होती. ११ व्या शतकापर्यंत त्याचे वैभव सर्वदूर पसरले; २०० वर्षांनंतर मात्र त्याचे वैभव नाहीसे झाले. परंतु, तेथील काही लहान लहान गावांमध्ये भग्नावस्थेतील शेकडो मंदिरे व पॅगोडे आजही त्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देतात.

आज, यंगून (१९८९ पर्यंत याला अधिकृतपणे रंगून असे संबोधले जायचे) ही म्यानमारची राजधानी आहे; कार, बसेस व बाजूला खुल्या असलेल्या टॅक्सींची वर्दळ असलेल्या या शहराची ३० लाखापेक्षा अधिक लोकसंख्या आहे. विस्तृत व सदाहरित यंगूनमध्ये ब्रिटिशांच्या काळातल्या अनेक जुन्या इमारती मूकपणे आपले अस्तित्व जपून आहेत; त्यांच्याबरोबर आता शहरात आधुनिक दिवसांतील गगनचुंबी हॉटेलांच्या व कार्यांलयांच्या इमारती देखील आहेत.

या इमारतींमध्ये, २,५०० वर्षांचा ९८ मीटर उंचीचा व सोनेरी मुलामा चढवलेला श्‍वे डागोन पॅगोडा प्राचीन काळचे ऐश्‍वर्य आणि वास्तुशिल्पीय आविष्कार आहे. या पॅगोड्याचा मनोरा अंदाजे ७,००० हिऱ्‍यांनी व इतर मौल्यवान रत्नांनी सजवण्यात आला आहे असे म्हटले जाते. या मनोऱ्‍याचा शिरोबिंदू ७६ कॅरेट हिऱ्‍याने विभूषित आहे. म्यानमारमधील अनेक प्राचीन इमारतींप्रमाणे, श्‍वे डागोन पॅगोड्यालासुद्धा, भूकंपांचा व युद्धांचा अनेकदा धक्का बसला, त्याची पडझड झाली; परंतु त्यातील बहुतेक भाग पुन्हा बांधण्यात आले.

पण, काही जणांचा असा दावा आहे की सुवर्ण सूला पॅगोडा खरे तर यंगूनचे खरे वैशिष्ट्य आहे. शेचाळीस मीटर उंच असलेला २,००० वर्ष जुना सुवर्ण सूला पॅगोडा, शहरातील चार प्रमुख रस्त्यांचा संगम जेथे होतो त्या चौकात उभा आहे. पॅगोड्याच्या भोवती दुकानांची रांग आहे.

आध्यात्मिक सुवर्ण

सन १९१४ मध्ये, भारतातून दोन आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थी (त्या काळात यहोवाच्या साक्षीदारांना या नावाने ओळखले जात असे) उत्कृष्ट प्रतीच्या सुवर्णाच्या शोधात—अर्थात, आध्यात्मिक सुवर्णरुपी लोकांच्या शोधात येथे आले होते. १९२८ आणि १९३० साली आणखी मिशनरी आले व १९३९ पर्यंत, २८ साक्षीदार असलेल्या तीन मंडळ्या स्थापन करण्यात आल्या. म्यानमारचे शाखा दफ्तर शहराच्या मध्यवर्ती भागात अर्थात रंगूनमध्ये सुरू होईपर्यंत, मुंबईतील यहोवाच्या साक्षीदारांच्या भारतातील शाखेने १९३८ पर्यंत येथील कार्यावर देखरेख केली. तेथून पुढे १९४० पर्यंत, ऑस्ट्रेलिया शाखा दफ्तराने कार्यावर देखरेख केली. १९४७ पासून दुसऱ्‍या महायुद्धानंतर, म्यानमारमधील पहिले शाखा दफ्तर रंगून येथे उघडण्यात आले.

जानेवारी १९७८ मध्ये, शाखा दफ्तर इन्या रोडवर हलवण्यात आले. तीमजली मुख्यालय इमारतीला म्यानमार बेथेल गृह असे नाव आहे. ५२ सदस्यांचे बेथेल कुटुंब देशातील ३,००० सक्रिय साक्षीदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बरेच कष्ट करीत आहे. शाखेत चालणाऱ्‍या कामाचा अधिकांश भाग म्हणजे म्यानमारमधील अनेक आदिवासी भाषांमध्ये भाषांतर करणे. यहोवाच्या साक्षीदारांचे हे परिश्रम, सुवर्ण नगरीच्या विपुल संपत्तीत आणखी भर टाकतात. (g०१ १२/८)

[१९ पानांवरील नकाशा]

बांगलादेश

भारत

चीन

लाओस

थायलंड

म्यानमार

मंडाले

पगान

यंगून

बंगालचा उपसागर 

[चित्राचे श्रेय]

Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.

[१९ पानांवरील चित्रे]

वरून: पुरूष आणि स्त्रिया लुंगी घालतात; एक तरुण बौद्ध भिक्षू; “तनक्का” लावणाऱ्‍या स्त्रिया

[२० पानांवरील चित्र]

एका भुईमुगाच्या शेतात प्रचार करताना

[२० पानांवरील चित्र]

स्थानीय बाजारात लाकडाच्या कोरीव मूर्ती विकल्या जातात

[चित्राचे श्रेय]

chaang.com

[२० पानांवरील चित्र]

लाखेच्या मेजपृष्ठावर नक्षी कोरताना

[२० पानांवरील चित्र]

नाजूक नक्षीकाम केलेले लाखेचे पात्र

[चित्राचे श्रेय]

chaang.com

[२२ पानांवरील चित्र]

यहोवाच्या साक्षीदारांचे म्यानमार शाखा दफ्तर

[१८ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Jean Leo Dugast/Panos