व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सूड घेण्यात काय चूक आहे?

सूड घेण्यात काय चूक आहे?

तरुण लोक विचारतात . . .

सूड घेण्यात काय चूक आहे?

“त्यानं माझा अपमान केला.”—कॉनील, वय १५, खून केल्याबद्दल आता तुरूंगात आहे.

ॲन्ड्रू, वय १४, शाळेत नाचण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी एका शिक्षिकेचा खून केला; शिक्षक आणि पालकांबद्दल त्याला खूप चीड होती आणि मुली त्याला झिडकारत असल्यामुळे त्यांचाही त्याला राग होता.

“अतिशय घातक नमुना,” अशा शब्दांत टाईम मासिकाने वरील कृत्यांचे वर्णन केले. एक संतप्त तरुण शाळेत चोरून बंदूक आणतो आणि आपल्या शाळासोबत्यांवर व शिक्षकांवर बेछूट गोळीबार करतो. अशाप्रकारच्या दुर्दैवी घटना अमेरिकेत इतक्या सर्वसामान्य होऊ लागल्या आहेत, की एका टीव्ही बातमी केंद्राने वारंवार घडणाऱ्‍या या घटनांचे वर्णन, “हिंसाचाराचा उद्रेक” असे केले.

शाळेत होणाऱ्‍या गोळीबाराच्या घटना अद्यापतरी क्वचितच घडतात. तरीपण, रागाच्या भरात केलेल्या गुन्ह्यांवरून आपल्याला या तरुणांची किती पाशवी प्रवृत्ती आहे हे दिसून येते. पण कोणकोणत्या कारणांमुळे या संतापाचा उद्रेक होत असावा? अधिकार पदावर असलेल्यांच्या हातून झालेल्या कसल्यातरी प्रकारच्या अन्यायामुळे किंवा अधिकार पदावर असलेल्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्यामुळे या तरुणांपैकी काही जणांच्या मनात त्यांच्याविषयीचा राग खदखदत होता. इतर काही जणांचा राग अनावर झाला कारण त्यांच्या वयाची मुले त्यांना सतत चिडवत होती. १२ वर्षांच्या एका मुलाने त्याच्या वर्गातील एकावर गोळी झाडली आणि मग स्वतःवर झाडली; कारण त्याच्या लठ्ठपणाबद्दल त्याला सारखे हिणवले जात असे.

कबूल आहे, की बहुतेक युवक कदाचित अशाप्रकारची घोर हिंसा करण्याचा गंभीर विचार करणार नाहीत. परंतु तरीसुद्धा, तुम्ही जातीभेद, धाकदपटशा, क्रूर टिंगल यांचे बळी पडता तेव्हा तुम्हाला सहन कराव्या लागणाऱ्‍या मानसिक पीडांचा आणि यातनांचा सामना करणे इतके सोपे नसते. आपल्या शालेय दिवसांची आठवण करताना बेन म्हणाला: “माझ्या वयाच्या बहुतेक सर्व मुलांमध्ये नेहमी मी बुटका दिसायचो. शिवाय माझ्या डोक्यावरचे केस नेहमी बारीक कापलेले असल्यामुळे इतर मुलं येताजाता मला चिडवायचे आणि डोक्यावर चापटी मारायचे. मला त्यांचा राग यायचा. पण मला जास्त कशाचा राग यायचा माहीत आहे? जेव्हा मी मदतीसाठी कोणा मोठ्या लोकांकडे जायचो तेव्हा ते चक्क माझ्याकडे दुर्लक्ष करायचे; तेव्हा तर मी खूपच भणकायचो. माझ्या हातात तेव्हा फक्‍त बंदूक असती, तर मी या लोकांना केव्हाच खलास केलं असतं.”

जशास तसे करणाऱ्‍या तरुणांबद्दल तुम्हाला कसे वाटले पाहिजे? आणि तुम्हालाच जर कोणी त्रास देत असेल तर तुम्ही काय केले पाहिजे? देवाचे वचन या प्रश्‍नांची काय उत्तरे देते ते आपण पाहू या.

आत्मसंयम—शौर्याचे एक चिन्ह!

गैरवागणूक आणि अन्याय या काही नवीन गोष्टी नव्हेत. एका बायबल लेखकाने हा सल्ला दिला: “राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ति होते.” (स्तोत्र ३७:८) बहुतेकदा राग अनावर होतो तेव्हा परिणामांचा कसलाही विचार न करता तो व्यक्‍त केला जातो. ‘क्रोधाविष्ट’ झाल्याने मनात खदखदणारा राग एक ना एक दिवस बाहेर पडतो. आणि याचा परिणाम काय होऊ शकतो?

बायबलमधील काईन व हाबेलच्या उदाहरणाचा विचार करा. हाबेलवर “काइन संतापला.” त्यामुळे “ते शेतात असता काइनाने आपला भाऊ हाबेल याजवर चालून जाऊन त्यास ठार केले.” (उत्पत्ति ४:५,) अनियंत्रित रागाचे आणखी एक उदाहरण शौल राजाचे आहे. तरुण दावीदाने मिळवलेल्या लष्करी विजयांबद्दल हेवा वाटून त्याने फक्‍त दावीदालाच नव्हे तर आपल्या पोटच्या पोराला अर्थात योनाथानाला देखील ठार मारायचा प्रयत्न केला!—१ शमुवेल १८:११; १९:१०; २०:३०-३४.

हे खरे आहे, की काही वेळा राग करणे उचित आहे. पण अशावेळीसुद्धा, रागावर नियंत्रण न ठेवल्यास पाप घडू शकते. जसे की, शिमोन व लेवी यांना शखेमवर राग आला तो उचित होता कारण त्याने त्यांची बहीण दीना हिला भ्रष्ट केले होते. “त्यांनी आमच्या बहिणीशी वेश्‍येप्रमाणे व्यवहार करावा की काय?” या त्यांच्या नंतरच्या शब्दांवरून आपल्याला समजून येते, की शांत राहण्याऐवजी ते अत्यंत क्रोधित झाले. (उत्पत्ति ३४:३१) त्यांच्या रागाचा बांध फुटला तेव्हा त्यांनी “आपआपली तरवार हाती घेऊन” शखेमच्या “नगरावर अवचित छापा घातला आणि तेथल्या सर्व पुरुषांची कत्तल केली.” आणि याकोबाच्या फक्‍त या दोघा मुलांनीच नव्हे तर “याकोबाच्या [इतर] मुलांनी” देखील या खुनी हल्ल्यात भाग घेतला. (उत्पत्ति ३४:२५-२७) या घटनेला अनेक वर्षे झाली तरीसुद्धा, शिमोन व लेवीचा पिता याकोब याने त्यांच्या अनियंत्रित रागाचा निषेध केला.—उत्पत्ति ४९:५-७.

यावरून आपण एक महत्त्वाचा मुद्दा शिकतो: अनियंत्रित राग शौर्याचे नव्हे तर दुबळेपणाचे चिन्ह आहे. नीतिसूत्रे १६:३२ म्हणते: “ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्‍यांपेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयमन करणारा नगर जिंकणाऱ्‍यांपेक्षा श्रेष्ठ होय.” (तिरपे वळण आमचे.)

सूड उगवण्याचा मूर्खपणा

म्हणूनच शास्त्रवचनांत आपल्याला अशाप्रकारचा सल्ला दिलेला आढळतो: “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. . . . सूड उगवू नका.” (रोमकर १२:१७, १९) सूड उगवणे—मग ते हिंसक कार्यांद्वारे असो अथवा क्रूर शब्दांद्वारे असो—ख्रिस्ती व्यक्‍तीला शोभत नाही. शिवाय, ते अनुचित व मूर्खपणाचे आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे: हिंसा सहसा आगीत तेल ओतण्याचे काम करते. (मत्तय २६:५२) आणि क्रूर शब्द हे सरपणासारखे आहेत ज्याने आग विझण्याऐवजी वाढतच जाते. शिवाय, राग नेहमी अनुचित असतो. उदाहरणार्थ, ज्या व्यक्‍तीने तुमचे मन दुखवले त्या व्यक्‍तीच्या मनात खरोखरच तुमच्या मनात राग होता हे तुम्हाला नक्की माहीत आहे का? असे होऊ शकते का की ती व्यक्‍ती कदाचित फक्‍त त्या प्रसंगी तुमच्याशी अविचारीपणे किंवा उद्धटपणे वागली असेल? तुमच्याबद्दल तिच्या मनात खरोखरच मत्सर असला तरी, बदला घेणे उचित ठरू शकते का?

बायबलमधील उपदेशक ७:२१, २२ मधील शब्दांचा विचार करा: “बोललेल्या सर्व शब्दांकडे लक्ष देऊ नको, देशील तर कदाचित तुझा चाकर तुला शिव्याशाप देताना ऐकशील; कारण तूहि इतरांस वारंवार शिव्याशाप दिले हे तुझ्या मनास ठाऊक आहे.” लोकांनी तुमच्याबद्दल बरेवाईट बोलणे हे उचित नाही हे खरे आहे. परंतु बायबलसुद्धा सांगते की हीच वस्तुस्थिती आहे. तुम्हीसुद्धा कधीतरी इतरांबद्दल असे काही म्हणाला असाल जे म्हणायची तशी गरज नव्हती, हो ना? मग, इतर तुमच्याबद्दल काही बरेवाईट बोलतात तेव्हा तुम्ही त्यांचे बोलणे इतके मनावर का घ्यावे बरे? पुष्कळदा, लोक आपल्याला चिडवतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सर्वात उत्तम उपाय आहे.

तसेच, लोक तुमच्याशी चांगले वागत नाहीत तेव्हा बदला घेणे उचित नाही. डेवीड नावाचा एक किशोरवयीन एक घटना आठवून सांगतो, की एकदा तो काही ख्रिश्‍चन बांधवांबरोबर बास्केटबॉल खेळत होता. “तेव्हा दुसऱ्‍या टीममध्ये कुणीतरी मला खूप जोरात बॉल फेकून मारला,” असे डेवीड म्हणाला. त्याने मला नक्कीच मुद्दामहून बॉल फेकून मारला असा ग्रह करून डेवीडनेही जोराने त्याच्या दिशेने बॉल फेकला. डेवीड कबूल करतो: “माझं तेव्हा डोकंच फिरलं होतं.” पण आणखी पुढे काही व्हायच्या आत डेवीडने यहोवाला प्रार्थना केली. तो स्वतःलाच म्हणाला, ‘मी हे काय करतोय, माझ्या ख्रिस्ती बांधवाशी मी भांडतोय?’ नंतर, त्या दोघांनी एकमेकांची क्षमा मागितली.

अशा वेळी येशू ख्रिस्ताच्या उदाहरणाची आठवण करणे उचित आहे. “त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही.” (१ पेत्र २:२३) होय, तणावाखाली असताना रागाच्या भरात काहीतरी करण्याऐवजी आत्मसंयम बाळगण्यास तुम्ही मदतीसाठी देवाला प्रार्थना करा. “जे मागतात त्यास तो . . . पवित्र आत्मा” उदारपणे देईल. (लूक ११:१३) ज्या व्यक्‍तीने तुमचे मन दुखवले आहे त्या व्यक्‍तीचा बदला घेण्यापेक्षा तिच्याशी जाऊन बोला. (मत्तय ५:२३, २४) किंवा, शाळेत गुंडगिरी करणाऱ्‍या एखाद्याकडून तुमचा सतत छळ होत असेल तर हिंसक मार्गाचे अवलंबन करू नका. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्हाला कदाचित काही व्यावहारिक पावले उचलावी लागतील. *

आपल्या रागावर ताबा मिळवलेली युवती

अनेक युवकांनी या बायबल तत्त्वांचा आपल्या जीवनात अवलंब केला आणि त्यांना याचे चांगले परिणाम दिसले. केटरिनाचे उदाहरण घ्या. लहान असताना तिला दत्तक म्हणून देण्यात आले होते. ती म्हणते: “माझ्या जन्मदात्या आईनं मला दत्तक म्हणून का दिलं याचं कारण मला माहीत नसल्यामुळे मला अतिशय राग यायचा. मग, दत्तक घेणाऱ्‍या आईवर मी माझा राग काढायचे. लहानसहान कारणांसाठी तिला दुखवलं म्हणजे माझ्या खऱ्‍या आईचा मी सूड घेते असं मला वाटायचं. त्यामुळे मी सर्व काही करायचे—वाईट-वाईट बोलायचे, जोरजोरात पाय आपटायचे, चिडून घर डोक्यावर घ्यायचे. जोरानं दार आपटायला तर मला खूप मजा यायची. ‘मला तू मुळीच आवडत नाहीस’ असंही मी म्हणायचे—हे सर्व मी करायचे कारण मला मनात राग होता. आता मी जेव्हा त्या गोष्टींचा विचार करते तेव्हा, मी अशा मूर्ख गोष्टी करत होते याचं मला खूप आश्‍चर्य वाटतं.”

कोणत्या गोष्टीने केटरिनाला रागावर ताबा मिळवायला मदत केली? ती म्हणते: “बायबल वाचन! बायबल वाचन अतिशय महत्त्वपूर्ण आहे; कारण यहोवाला आपल्या भावना कळतात.” केटरिना आणि तिच्या कुटुंबातील सदस्य, तिच्या कौटुंबिक परिस्थितीशी निगडीत असलेल्या सावध राहा! मासिकातले विशिष्ट लेख वाचायचे तेव्हा त्यांद्वारेही तिला बरेच सांत्वन मिळाले. * ती आठवून सांगते: “आम्ही सगळे एकत्र बसून एकमेकांच्या भावना समजू शकलो.”

तुम्ही देखील रागावर नियंत्रण ठेवायला शिकू शकता. तुम्हाला चिडवले जात असताना, तुमच्यावर दादागिरी केली जात असताना किंवा तुमच्याशी दुर्व्यवहार होत असताना बायबलमधील स्तोत्र ४:४, [ईझी टू रीड भाषांतर] मधील शब्दांची आठवण करा. तिथे म्हटले आहे: “तुम्ही रागवा, पण पाप करू नका.” (तिरपे वळण आमचे.) हे शब्द तुम्हाला, हानीकारक परिणाम उत्पन्‍न करणाऱ्‍या रागापासून परावृत्त करतील. (g०१ १०/२२)

[तळटीपा]

^ अन्यायीपणे वागणारे शिक्षक, शाळेतील गुंड आणि छळ करणाऱ्‍या इतरांशी कसा व्यवहार करायचा त्याबद्दलच्या व्यावहारिक सल्ल्यासाठी तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे या पुस्तकातील १९ आणि २० अध्याय तसेच सावध राहा! चा (इंग्रजी) ऑगस्ट ८, १९८९ अंक पाहा.

^ “दत्तक घेणे—आनंद आणि आव्हाने” ही सावध राहा! मे ८, १९९६ च्या (इंग्रजी) अंकात आलेली मालिका पाहा.

[१५ पानांवरील चित्र]

बहुतेकदा, लोक आपल्याला चिडवतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सर्वात उत्तम उपाय आहे