व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जादूटोण्यामध्ये वरवर उत्सुकता दाखवण्यात काय हरकत आहे?

जादूटोण्यामध्ये वरवर उत्सुकता दाखवण्यात काय हरकत आहे?

तरुण लोक विचारतात . . .

जादूटोण्यामध्ये वरवर उत्सुकता दाखवण्यात काय हरकत आहे?

किशोरवयीनांना जादूटोण्यात खरोखर रस असतो का? संशोधकांचा एक गट, ११५ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्व्हे घ्यायला निघाला. त्यांच्या सर्व्हेत पुढील आश्‍चर्यकारक माहिती मिळाली: सर्व्हे केलेल्यांमधील निम्म्या विद्यार्थ्यांनी (५४ टक्के) म्हटले की आपल्याला जादूटोणा आणि अलौकिक गोष्टींमध्ये रस आहे तर एक चतुर्थांश (२६ टक्के) विद्यार्थी म्हणाले की, त्यांना या गोष्टींची “खूप जास्त आवड” आहे.

अँकोरेज येथील अलास्का विद्यापीठातील संशोधक लिहितात: “सैतानी पंथांच्या कार्यहालचालीच्या तथाकथित स्फोटाविषयी माहिती देणाऱ्‍या बातमीपत्रातील व मासिकांतील लेखांचा . . . प्रसार अलीकडील वर्षांमध्ये खूपच वाढला आहे.” तरुणांमध्ये पसरलेल्या सैतानवादाच्या दाव्यांना खरे ठरवण्यासाठी फार कमी ठोस पुरावा आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. तरीपण, सैतानवाद आणि जादूटोण्यासारख्या गोष्टींमध्ये अनेक तरुणांना वरवरची का असेना पण उस्तुकता आहे यात कसलाच वाद नाही.

त्यामुळे काही तरुण म्हणतील, ‘जादूटोण्यामध्ये वरवर उत्सुकता दाखवण्यात काय हरकत आहे?’ सर्वात आधी आपण हे पाहू या की, मुळात हे तरुण लोक जादूटोण्यासारख्या गोष्टींमध्ये गोवले कसे जातात.

जादुई दुनियेचे आकर्षण

यु. एस. न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट यातील एक लेख असे निरीक्षण करतो की, “लहान मुलांना आणि किशोरवयीनांना आज इतक्या धक्केदायक—आणि सहसा मनाला अस्वस्थ करणाऱ्‍या—प्रमाणात चित्रे व माहिती उपलब्ध आहेत की २० वर्षांपूर्वी ही कल्पनासुद्धा करता आली नसती.” जिज्ञासेमुळे अनेक तरुण जादूटोण्याविषयी माहिती देणारी पुस्तके आणि पत्रिका वाचतात, व्हिडिओ पाहतात किंवा इंटरनेटवरील वेबसाईट्‌स पाहतात.

बीबीसी न्यूज ऑनलाईननुसार, चेटकिणी आणि भूतांविषयी असलेल्या टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रमांमुळे “लहान मुलांना जादूटोण्याविषयी आवड निर्माण करायला प्रोत्साहन मिळते असे म्हटले जाते.” काही हेवी-मेटल संगीताचेही हिंसक किंवा सैतानी विषय असतात. स्तंभलेखक टॉम हार्पर यांनी द संडे स्टार या टोरोंटोच्या वृत्तपत्रात असे लिहिले: “[संगीतामध्ये] जे घडत आहे त्याविषयी अगदी सर्वात तीव्र शब्दांत मी इशारा दिला पाहिजे. . . . इतक्या खालच्या दर्जाचे संगीत मी आजपर्यंत कधीही ऐकलेले नाही. ही गाणी, वेडेपणा, ताबा मिळवणे, भुते, रक्‍तपात, शिवीगाळ, बलात्कार, आत्म-घातकी वर्तन, खून, आत्महत्या तसेच हर तऱ्‍हेची हिंसा यांविषयीच असतात. मृत्यू आणि नाश, विनाशाच्या भविष्यवाण्या, चांगल्या गोष्टींचा त्याग आणि वाईट व दुष्ट गोष्टींचा स्वीकार—हेच त्यांचे विषय असतात.”

हे संगीत नाशकारक वर्तणुकीला खरोखरच पोषक ठरते का? निदान एका बाबतीत तरी असे घडल्याचा पुरावा मिळतो. अमेरिकेतील एका १४ वर्षांच्या तरुणाने आधी आपल्या आईला भोसकून ठार मारले आणि नंतर स्वतःलाही ठार केले. त्याच्या खोलीतल्या भिंतींवर हेवी-मेटल रॉक संगीतकारांचे पोस्टर लावलेले होते. त्याच्या पित्याने नंतर कळकळीने असे म्हटले: “आपली मुले कोणते संगीत ऐकतात त्याकडे लक्ष द्यायला पालकांना सांगा.” त्यांनी म्हटले की, त्यांचा मुलगा, आपल्या आईला ठार मारण्याच्या आदल्या आठवडी “खून आणि आईला ठार मारण्याविषयीचे” एक रॉक गीत सतत गात होता.

मग, असेही काही खेळ आहेत ज्यामध्ये खेळात भाग घेणारे, जादूगार किंवा जादू करणाऱ्‍या इतर व्यक्‍ती बनतात. यांतील अनेक खेळांमध्ये सैतानी हिंसा दाखवली जाते. *

परंतु, मिडियास्कोप या संशोधन संघटनेच्या वृत्तानुसार, “अभ्यासांतून हे निष्पन्‍न झाले आहे की, हेवी मेटल संगीत जास्त पसंत करणे हे एकटे राहणे, अंमली पदार्थांचे सेवन, मानसिक विकृती, आत्महत्या करण्याचा धोका . . . किंवा किशोरावस्थेत जोखीम पत्करणारे वर्तन यांचे प्रमुख लक्षण असू शकते, परंतु या वर्तनाला संगीत कारणीभूत नाही. असे गृहीत धरले जाते की, अशा समस्यांशी आधीपासूनच झुंजत असलेले किशोरवयीन हेवी मेटल संगीताकडे आकर्षित होत असावेत कारण त्या संगीताच्या शब्दांमधून त्यांचीच व्यथा व्यक्‍त होत असते.”

सैतानी संगीत ऐकण्यामध्ये धोके आहेत यावर सर्वच संशोधकांचे एकमत होणार नाही. पण, हिंसा किंवा आत्म-घातकी प्रवृत्तीवर जास्त जोर देणारे व्हिडिओ, संगीत, किंवा गेम्स हानीकारक नसतील असे कधी होऊ शकते का? तथापि, जादूटोण्यात वरवर उत्सुकता दाखवणे, ख्रिश्‍चनांकरता अधिक धोकेदायक असू शकते.

जादूटोण्याविषयी देवाचा दृष्टिकोन

पहिले करिंथकर १०:२० येथे, प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना ताकीद दिली: “तुम्ही भुतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही.” ही भुते कोण आहेत आणि त्यांचे सहभागी होण्यात इतका धोका का आहे? सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ही भुते म्हणजे आधीचे देवदूत आहेत जे दियाबल सैतानाचे शिष्य बनले. सैतान म्हणजे “विरोधक” आणि दियाबल म्हणजे “निंदक.” बायबलनुसार, आधी देवाचे पुत्र असलेल्या या देवदूताने देवाविरुद्ध बंड करून स्वतःला विरोधक आणि निंदक बनवले. कालांतराने, त्याने आपल्या बंडाळीत इतर देवदूतांनाही सामील होण्यास भुरळ घातली. अशाप्रकारे त्याचे हे सहभागी भुते बनली.—उत्पत्ति ३:१-१५; ६:१-४; यहूदा ६.

येशूने सैतानाला “जगाचा अधिकारी” म्हटले. (योहान १२:३१) सैतान आणि त्याचे दुरात्मे त्यांच्यावर येणाऱ्‍या नाशामुळे “अतिशय संतप्त” आहेत. (प्रकटीकरण १२:९-१२) म्हणूनच, ही भुते हिंसक असल्याचे त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्‍या लोकांना प्रत्यय आला आहे. एका स्त्रीच्या घरात लहानपणापासून जादूटोणा चालत होता; दुरात्मे “आपल्याला साथ न देणाऱ्‍या बळींना कशा यातना देतात” हे तिने स्वतः पाहिले आहे. * त्यामुळे, या क्रूर आत्मिक प्राण्यांशी कसलाही संबंध ठेवणे अत्यंत धोक्याचे आहे!

या कारणास्तव, देवाने त्याच्या प्राचीन लोकांना अर्थात इस्राएलांना सर्व प्रकारच्या जादूटोण्यापासून दूर राहण्याची आज्ञा दिली. अनुवाद १८:१०-१२ मध्ये असा इशारा दिला होता की, “जो कोणी असली कृत्ये करितो त्याचा परमेश्‍वराला वीट आहे.” ख्रिश्‍चनांनाही अशाचप्रकारे ताकीद देण्यात आली आहे की, जे “चेटकी” आहेत त्यांचा देव नाश करील. (प्रकटीकरण २१:८) जादूटोण्यामध्ये वरवर उत्सुकता दाखवण्याचीही बायबलमध्ये निंदा केली आहे. बायबल अशी आज्ञा करते की, “जे अशुद्ध त्याला शिवू नका.”—२ करिंथकर ६:१७.

जादूटोण्यापासून मुक्‍त होणे

जादूटोण्यामध्ये वरवर उत्सुकता दाखवण्याची चूक तुम्ही केली आहे का? मग, पहिल्या शतकातील इफिसच्या शहरात काय घडले याचा विचार करा. तेथील अनेकजण “जादूटोणा करणाऱ्‍यांपैकी” होते. पण काहीजण प्रेषित पौलाने पवित्र आत्म्याच्या मदतीने केलेल्या शक्‍तिशाली कृत्यांमुळे प्रभावीत झाले होते. परिणाम? “जादूटोणा करणाऱ्‍यांपैकी बऱ्‍याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकिली; आणि त्यांच्या किंमतीची बेरीज केली तेव्हा ती पन्‍नास हजार रुपये झाली. ह्‍याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले.”—प्रेषितांची कृत्ये १९:११-२०.

यावरून आपल्याला काय शिकायला मिळते? ज्याला भुतांच्या तावडीतून सुटायचे आहे त्याने किंवा तिने सैतानी उपासनेशी संबंधित असलेल्या सर्व वस्तू नष्ट केल्या पाहिजेत! यामध्ये सर्व पुस्तके, मासिके, पोस्टर, कॉमिकची पुस्तके, व्हिडिओ, तावीज (“संरक्षणासाठी” घातल्या जाणाऱ्‍या वस्तू) आणि इंटरनेटहून काढलेली सैतानविषयक माहिती यांचा समावेश होतो. (अनुवाद ७:२५, २६) शकुन सांगण्यासाठी वापरल्या जाणाऱ्‍या क्रिस्टल बॉल किंवा ओजा बोर्डसारख्या वस्तू देखील नष्ट करा. तसेच, सैतानी विषयांवरील कोणतेही संगीत किंवा व्हिडिओ असल्यास ते देखील काढून टाका.

अशी धीट पावले उचलायला धैर्य आणि मनाचा निर्धार असावा लागतो. पण याचे खूप फायदे असू शकतात. जीन * नावाच्या एका ख्रिस्ती स्त्रीने एक कम्प्युटर गेम विकत आणली; सुरवातीला त्यात काहीच धोका नाही असे तिला वाटले. पण गेम खेळत असताना त्या खेळाचा थोडाफार संबंध जादूटोण्याशी आहे हे तिला कळाले. तिला रात्रीची फार भयंकर स्वप्ने पडू लागली! जीन म्हणते, “मी मध्यरात्रीच उठले आणि त्या गेमच्या सीडी नष्ट केल्या.” परिणाम? “तेव्हापासून मला काहीच त्रास झालेला नाही.”

मुक्‍त होण्याचा तुम्ही खरोखर निर्धार केल्यास तुम्हाला यश मिळेल. दियाबलाने त्याची उपासना करण्यासाठी येशूला पाशात पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा येशूने दाखवलेल्या निर्धाराचा विचार करा. “येशू त्याला म्हणाला, ‘अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, “परमेश्‍वर तुझा देव ह्‍याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.”’ मग सैतान त्याला सोडून गेला.”—मत्तय ४:८-११.

एकट्याने सामना करू नका

प्रेषित पौल आपल्याला आठवण करून देतो की, “आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर” सर्व ख्रिश्‍चनांचे ‘झगडणे आहे.’ (इफिसकर ६:१२) परंतु सैतान व त्याच्या दुरात्म्यांचा एकट्याने सामना करायचा प्रयत्न करू नका. तुमच्या देव-भीरू पालकांची व स्थानिक ख्रिस्ती मंडळीतील वडिलांची मदत घ्या. तुम्ही यामध्ये गोवलेले आहात हे कबूल करायला तुम्हाला कदाचित लाज वाटत असेल परंतु कबूल केल्याने तुम्हाला आवश्‍यक तो आधार मिळू शकतो.—याकोब ५:१४, १५.

“सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल,” असे बायबल म्हणते हेसुद्धा लक्षात ठेवा. (याकोब ४:७, ८) होय, यहोवा देव तुमच्या पाठीशी आहे! जादूटोण्याच्या पाशातून सुटका मिळवण्यास तो तुमची नक्की मदत करेल. (g०२ १/२२)

[तळटीपा]

^ सावध राहा! सप्टेंबर ८, १९९९ च्या अंकात “तरुण लोक विचारतात . . . रोल प्लेइंग गेम्स खेळण्यात काही धोका?” हा लेख पाहा.

^ यहोवाचे साक्षीदार प्रकाशित करत असलेल्या या मासिकाच्या सोबतीचे मासिक, टेहळणी बुरूज याच्या सप्टेंबर १, १९८८ च्या अंकात “भूतविद्येचे जोखड झुगारुन देणे” हा लेख पाहा.

^ नाव बदलण्यात आले आहे.

[२४ पानांवरील चित्र]

सैतानी उपासनेशी संबंधित असलेल्या सर्व वस्तू नष्ट करा

[२४ पानांवरील चित्र]

भूतविद्येला प्रोत्साहन देणाऱ्‍या सर्व वेबसाईट्‌सपासून सावध राहा