व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

झेब्रा—आफ्रिकेचा रानटी घोडा

झेब्रा—आफ्रिकेचा रानटी घोडा

झेब्रा—आफ्रिकेचा रानटी घोडा

आफ्रिकेच्या सावध राहा! लेखकाकडून

आफ्रिकेच्या गवताळ मैदानात हजारो झेब्रा मोकाट दौडताना दिसतात. दौडताना त्यांच्या पट्टेदार बाजू खाली वर होतात आणि आयाळाचे केसही त्याच लयात डौलत असतात. शुष्क जमिनीवरील त्यांच्या टापांचा आवाज मैदानात गडगडत जातो. त्यांच्यामागे कित्येक किलोमीटरपर्यंत धुळीचा जणू लाल ढग निर्माण होतो. कसल्याही बंधनाविना ते बेफाम, मोकाट धावतात.

अचानक कुणी खुणावल्यासारखे ते मंदावतात आणि थांबतात. आणि आपल्या मजबूत, जाड दातांनी शुष्क गवत चरू लागतात. कळप नेहमी सतर्क असतो, अधूनमधून वर पाहून, आवाज ऐकत असतो, हवेतून वास घेत असतो. दूरहून गर्जणा करणाऱ्‍या सिंहाची ढरकाळी वाऱ्‍याच्या प्रवाहातून त्यांच्या कानावर पडते आणि ते ताठ होतात. हा आवाज त्यांना चांगला ठाऊक आहे. तोंडातले गवत तसेच धरून कान उंच उभे करून ते कण्हत असल्यासारखा आवाज जेथून येतो त्या दिशेने पाहू लागतात. पण आपल्याला काही धोका नाही हे कळताच ते पुन्हा गवतात तोंड खुपसून चरू लागतात.

सूर्याची ऊष्णता वाढू लागल्यावर ते पुन्हा दुसऱ्‍या ठिकाणी जायला निघतात. या वेळी या रानटी घोड्यांना पाण्याच्या गंधाने एका नदीकडे आणले आहे. उंचावरील काठावर थांबून फुरफुरत, जमिनीवर खूर आपटत खालच्या नदीच्या संथ तपकिरी प्रवाहाकडे ते पाहतात. पण पुढे जायला कोणी धजत नाही; नदीच्या वरवरून शांत दिसणाऱ्‍या पृष्ठभागाखाली धोका दडलेला असू शकतो याची त्यांना जाणीव असते. पण तहान आवरता येत नसल्यामुळे ते ढकलाढकली करू लागतात. अखेरीस पुढे मागे न पाहता, ते नदीकाठी धावत जातात. एक-एक करून पोटभर पाणी प्यायल्यावर ते मागे फिरून पुन्हा एकदा मैदानाकडे वळतात.

सायंकाळी त्यांचे कळप उंच गवतातून हळूहळू चालत असतात. अस्ताला जाणाऱ्‍या लालबूंद सूर्याच्या संधिप्रकाशात आणि आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशाच्या सौंदर्यात त्यांच्या काळ्या आकृत्या उठावदार दिसतात.

पट्टेदार आणि समाजप्रिय

झेब्र्यांचे दररोजचे जीवन सारखेच असते. अन्‍न आणि पाण्याच्या सतत शोधात असल्यामुळे ते एका ठिकाणी राहत नाहीत. मोकळ्या मैदानात चरणारे झेब्रा स्वच्छ आणि पुष्ट दिसतात; त्यांची पट्टेदार कातडी त्यांच्या धष्टपुष्ट शरीरावर जणू काय ताणलेली असते. झेब्र्यांच्या शरीरावरील पट्ट्यांची रचना वेगवेगळी असते; या रचना कधीच सारख्या नसतात. मैदानातील इतर प्राण्यांमध्ये त्यांचे उठून दिसणारे पांढरे आणि काळे पट्टे विचित्रच वाटतात. तरीपण, ते देखणे आणि आफ्रिकेच्या रानटी वातावरणाला अगदी शोभून दिसतात.

झेब्रा अत्यंत समाजप्रिय प्राणी असतात. काही प्राण्यांमधील अतूट बंधन अगदी मरेपर्यंत राहते. एका मोठ्या कळपात हजारो प्राणी असले तरी हा कळप लहान लहान कुटुंबांचा बनलेला असतो ज्यामध्ये एक नर आणि त्याच्या माद्या असतात. प्रत्येक कुटुंबात प्रत्येक सदस्याचे स्थान ठरलेले असते. एक प्रमुख मादी, कुटुंबाने कोठे जावे हे ठरवत असते. ती सर्वांच्या पुढे असते, तिच्या मागोमाग इतर माद्या आणि त्यांची शिंगरे प्रत्येकाच्या ठरलेल्या स्थानाप्रमाणे एकाच ओळीत चालत असतात. परंतु, शेवटी नराचा त्या सर्वांवर ताबा असतो. कुटुंबाने दिशा बदलावी असे त्याला वाटल्यास तो प्रमुख मादीकडे जातो आणि हळूच ढोसणा मारून तिला नवीन दिशा दाखवतो.

झेब्र्यांना एकमेकांना स्वच्छ करायला खूप आवडते; एकमेकांना अंग घासण्याची, एकमेकांच्या बाजू, खांदे आणि पाठी कुरतडण्याची त्यांच्यात प्रथाच आहे. एकमेकांना अशाप्रकारे स्वच्छ केल्यामुळे त्यांच्यातले बंधन अधिक मजबूत होते आणि ही पद्धत शिंगरे काही दिवसांची असतात तेव्हापासूनच सुरू होते. पण समजा कुटुंबातला कोणीही कुरतडायला नसल्यास, अंगावर खाज सुटलेले हे झेब्रा मातीत लोळून किंवा झाडावर, वाळव्यांच्या वारूळावर किंवा इतर कोणत्याही स्थिर वस्तूवर अंग घासून मनाची शांती करून घेतात.

जगण्यासाठी संघर्ष

झेब्र्यांचे जीवन धोक्यांपासून मुक्‍त नसते. सिंह, जंगली कुत्री, तरस, चित्ते, मगरी सगळेच या २५० किलोग्रॅम वजनाच्या प्राण्यावर टपून असतात. झेब्रा ताशी ५५ किलोमीटर वेगाने धावू शकतो पण काही वेळा लपून आणि चोरून शिकार करणारे प्राणी त्याच्यावर अचानक झडप घालतात. सिंह दबा धरून बसतात, मगरी गढूळ पाण्यात दडलेल्या असतात आणि चित्ते रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतात.

कळपाचा सतर्कपणा आणि सर्वांची सामूहिक हालचाल यावर त्यांचा प्रतिकार अवलंबून असतो. बहुतेक झेब्रा रात्रीच्या वेळी झोप घेतात, परंतु काहीजण जागे राहून आवाजाचा वेध घेऊन पाळत ठेवत असतात. झेब्राला शिकारी प्राणी दिसताच तो लगेच फुरफुरून कळपातील इतरांना सावध करतो. कुटुंबातला एखादा सदस्य आजारपणामुळे किंवा म्हातारपणामुळे कळपाच्या बरोबरीने राहू शकत नसल्यास, कळपातले इतर सदस्य अशक्‍त सदस्य बरा होईपर्यंत मंद गतीने चालतात. धोका असतो तेव्हा, नर निडरतेने शिकारी प्राण्याच्या व माद्यांच्या मधे येऊन, शत्रूला चावतो आणि लाथा मारतो आणि त्यादरम्यान कळपाला पळून जायला वेळ मिळतो.

निसर्ग अभ्यासक, ह्‍यूको वान लाव्हिक यांनी आफ्रिकेतील सेरेंगेटी मैदानात पाहिलेल्या एका प्रसंगावरून कुटुंबातील अशा एकतेचे दर्शन घडते. ते म्हणाले, काही जंगली कुत्री एका कळपाचा पाठलाग करू लागली आणि त्यांनी एक मादी, तिचे शिंगरू व एक वर्षाचे एक पिल्लू यांना कळपापासून वेगळे करण्यात यश मिळवले. कळपातले इतर सगळे पळून गेल्यावर मादी आणि एक वर्षाचे ते पिल्लू कुत्र्यांचा दटून सामना करू लागले. पण कुत्री जास्तच चवताळल्यावर मादी आणि एक वर्षाचे पिल्लू थकू लागले. त्यांचा शेवट अगदी निश्‍चित वाटत होता. वान लाव्हिक तो प्रसंग आठवून सांगतात: “अचानक जमीन हादरू लागली, मी मागे वळून पाहतो तो दहा झेब्रा वेगाने दौडत येत होते. क्षणार्धात त्यांनी मादी आणि तिच्या दोन शिंगरांना घेरले, मग ते सगळे मागे फिरले आणि ते दहा झेब्रे जेथून आले होते त्या दिशेने धावू लागले; सगळेजण एकमेकांच्या एकदम जवळ राहून पळत होते. कुत्री जवळजवळ ५० मीटर अंतरापर्यंत त्यांचा पिच्छा करत होती पण त्या कळपात त्यांना शिरता आले नाही आणि लवकरच त्यांनी पिच्छा सोडून दिला.”

कुटुंबाचे पालन

मादी झेब्रा आपल्या नवीन जन्मलेल्या शिंगराचे खूप संरक्षण करते आणि सुरवातीला ती आपल्या शिंगराला कळपातल्या इतरांपासून वेगळेच ठेवत असते. या काळात पिल्लाची आईसोबत जवळीक निर्माण होते. पिल्लाला आईच्या काळ्या-पांढऱ्‍या वैशिष्ठ्यपूर्ण पट्टेदार रचनेची ओळख होते. त्यानंतर त्या पिल्लाला आपल्या आईची हाक, वास आणि पट्टेदार रचना ओळखू येते आणि ते इतर कोणत्याही मादीला स्वीकारत नाही.

पिल्लांवरील पट्टे त्यांच्या पालकांप्रमाणे एकदम काळे आणि पांढरे नसतात. त्यांचे पट्टे जरासे तपकिरी असतात आणि वयाप्रमाणे ते काळे होत जातात. एका मोठ्या कळपात, वेगवेगळ्या कुटुंबातली शिंगरे एकत्र मिळून खेळतात. ते लाथा मारीत, एकमेकांचा पाठलाग करत प्रौढांमध्ये धावत सुटतात आणि कधीकधी प्रौढसुद्धा त्यांच्या खेळात सामील होतात. बारीक पायांवर धावणारी ही पिल्ले पक्ष्यांचा किंवा इतर लहान प्राण्यांचा पाठलाग करत असतात. लांब, बारीक पाय, मोठे काळेभार डोळे आणि चमकदार मऊ लव असलेली ही पिल्ले अतिशय गोजिरवाणी दिसतात आणि त्यांना पाहायलाही खूप मजा येते.

रानटी आणि सुंदर

आज, आफ्रिकेच्या मोठ्या सोनेरी गवताळ प्रदेशांवर झेब्र्यांचे मोठमोठे कळप अजूनही मोकाट धावताना दिसतात. ते नेत्र दिपवून टाकणारे दृश्‍य असते.

काळ्या-पांढऱ्‍या पट्ट्यांची अतुलनीय रचना असलेले, कुटुंबाला एकनिष्ठ राहणारे, रानटी व स्वच्छंदी असलेले झेब्रा दिमाखदार आणि देखणे प्राणी आहेत यात शंकाच नाही. अशा प्राण्याची माहिती मिळवल्यावर, “झेब्र्याला कोणी स्वैर फिरू दिले?” या हजारो वर्षांपूर्वी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर मिळते. (ईयोब ३९:५, NW) उत्तर स्पष्टच आहे. सर्व प्राणीमात्रांचा रचनाकार, यहोवा देव. (g०२ १/२२)

[१८ पानांवरील चौकट]

झेब्र्याच्या अंगावर पट्टे का असतात?

उत्क्रांतीवर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना झेब्र्याच्या पट्ट्यांचे स्पष्टीकरण देता येत नाही. काहींना वाटते की, यामुळे शिकार करणाऱ्‍या इतर प्राण्यांना धोक्याचा इशारा मिळतो. परंतु, सिंह आणि इतर मोठे शिकारी प्राणी मात्र या पट्ट्यांना मुळीच भीत नाहीत हे स्पष्टच आहे.

इतरांना वाटते की, हे पट्टे लैंगिक आकर्षणाला कारणीभूत ठरतात. परंतु, सर्वच झेब्र्यांना पट्टे असल्यामुळे आणि नरांचे पट्टे वेगळे किंवा माद्यांचे पट्टे वेगळे असे काही नसल्यामुळे याची शक्यता वाटत नाही.

दुसरी एक कल्पना अशी होती की, आफ्रिकेच्या सूर्याची उष्णता कमी करण्यासाठी काळ्या-पांढऱ्‍या पट्ट्यांच्या या रचनेची उत्क्रांती झाली असावी. पण मग इतर प्राण्यांवर हे पट्टे का नाहीत?

आणखी एक कल्पना अशी आहे की, परिसरात मिसळून जाण्यासाठी झेब्र्यावर पट्ट्यांची उत्क्रांती झाली. शास्त्रज्ञांना याचा शोध लागला आहे की, आफ्रिकेच्या मैदानातून वर जाणाऱ्‍या ऊष्णतेमुळे झेब्र्यांची आकृती धूसर होते आणि त्यामुळे एका झेब्र्याला दूरहून पाहणे इतके सोपे नसते. परंतु, दूरहून परिसरात मिसळून जाण्याचा फारसा फायदा होत नाही कारण झेब्र्यांचे मुख्य शत्रू अर्थात सिंह जवळूनच त्यांच्यावर हल्ला करतात.

असाही दावा केला जातो की, भीतीमुळे झेब्र्यांचे कळप धावतात तेव्हा त्यांच्या अंगावरील पट्टेदार रचनेमुळे शिकार करणारे सिंह गोंधळून जातात आणि त्यांना कोणत्याही एका प्राण्यावर नजर ठेवणे कठीण होऊन जाते. परंतु, वास्तविक पाहता, वन्यप्राण्यांच्या अभ्यासावरून हे स्पष्ट झाले आहे की, सिंह इतर प्राण्यांची शिकार करण्यात जितके यशस्वी ठरतात तितकेच झेब्र्यांची शिकार करण्यातही यशस्वी ठरतात.

उलट, गोंधळवणारी वास्तविकता अशी आहे की, काही वेळा झेब्र्याच्या पट्ट्यांमुळे हानी होऊ शकते. रात्रीच्या वेळी, मैदानावरील चंद्रप्रकाशात झेब्र्याच्या अंगावरील काळ्या-पांढऱ्‍या पट्ट्यांच्या रचनेमुळे ते एकाच रंगाच्या इतर प्राण्यांपेक्षा लवकर दिसून येतात. आणि सिंह सहसा रात्री शिकार करत असल्यामुळे, झेब्र्यांकरता हे नुकसानच ठरते.

तर मग, झेब्र्याच्या अंगावर हे पट्टे का आहेत? याचे उत्तर या साध्यासोप्या वाक्यात मिळते: “परमेश्‍वराच्या हाताने हे घडले आहे.” (ईयोब १२:९) होय, निर्माणकर्त्याने पृथ्वीवरील प्राण्यांना जीवनाकरता उपयुक्‍त ठरणारे खास गुण आणि वैशिष्ट्ये दिली आहेत पण मानवांना त्याची कारणे कदाचित पूर्णतः समजणार नाहीत. प्राणीमात्रांमधील अद्‌भुत रचनेचा आणखी एक उद्देश आहे. ते पाहून मानवांना आनंद, सुख, समाधान मिळते. इतकेच नव्हे तर, निर्मितीचे सौंदर्य पाहून आज अनेकांना बऱ्‍याच वर्षांआधी दावीदाला वाटले होते तसेच वाटते: “हे परमेश्‍वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सुज्ञतेने केली; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.”—स्तोत्र १०४:२४.