दोषभावना—नेहमीच हानीकारक असते का?
बायबलचा दृष्टिकोन
दोषभावना—नेहमीच हानीकारक असते का?
आज अनेक लोकांना दोषी वाटणे चांगले नाही असे वाटते. त्यांना जर्मन तत्त्वज्ञानी फ्रेड्रिक नित्शे याच्यासारखे वाटते ज्याने म्हटले: “माणसाला ग्रासून टाकणाऱ्या दोषभावनेचा आजार सर्वात भयंकर आहे.”
परंतु काही संशोधकांचे मत आता बदलत आहे. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या उपचारतज्ज्ञा आणि लेखिका सूझन फॉर्वर्ड, (पी.एच.डी) म्हणतात की, “संवेदनशील व जबाबदार व्यक्ती असण्याकरता दोषी वाटणे आवश्यक आहे. विवेकाचे ते एक साधन आहे.” तर मग, सर्वच दोषभावना वाईट असतात का? दोषी वाटण्याचा फायदा होऊ शकतो अशा काही परिस्थिती आहेत का?
दोषभावना म्हणजे काय?
आपण कोणा प्रिय व्यक्तीचे मन दुखावले आहे किंवा योग्य दर्जांनुरूप राहिलो नाही तर आपल्याला दोषी वाटू शकते. एका संदर्भानुसार, “चूक, अपराध, गुन्हा किंवा पाप यासाठी जबाबदार असल्यामुळे ऋणी असल्याची भावना” याच्याशी दोषीपणाचा संबंध आहे.
इब्री शास्त्रवचनांमध्ये, दोषभावनेचा संबंध देवाच्या नियमशास्त्राचे पालन करण्यात उणे पडण्याशी होता—याचे बहुतेक संदर्भ लेवीय आणि गणना या बायबलच्या पुस्तकांत आहेत. लक्षवेधक गोष्ट म्हणजे, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये हा शब्द मुळीच नाही. आणि फार कमी वेळा तो आला असला तरी देवाविरुद्ध केलेल्या गंभीर पापांच्या संदर्भात तो वापरण्यात आला आहे.—मार्क ३:२९; १ करिंथकर ११:२७.
पण काही वेळा असेही होऊ शकते की, दोषी वाटण्याचे काही खरे कारण नसतानाही आपल्याला दोषी वाटू शकते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती अगदी परिपूर्णतेची अपेक्षा करत असेल आणि तिने स्वतःकरता अवाजवी ध्येये ठेवली असतील तर प्रत्येक वेळी निराशा झाल्यामुळे तिला दोषी वाटू शकते. (उपदेशक ७:१६) एखादी चूक केल्यावर किंवा अपराध केल्यावर जो दोषीपणा वाटतो तो योग्यच असतो परंतु जास्तच मनाला लावून घेतल्यामुळे आपल्याला लाज वाटू लागते आणि शेवटी अनावश्यकपणे आपण स्वतःलाच शिक्षा देऊ शकतो. पण मग, दोषीपणामुळे काय चांगले साध्य होऊ शकते?
दोषीपणा चांगला असू शकतो
दोषी वाटणे तीन गोष्टींसाठी तरी चांगले असू शकते. पहिली गोष्ट, आपल्याला स्वीकार्य दर्जांची जाणीव असल्याचे त्यावरून कळते. शिवाय, आपला विवेक कार्य करत आहे याचे ते सूचक आहे. (रोमकर २:१५) अमेरिकन मानसोपचार संघटनेने प्रकाशित केलेल्या एका पुस्तकात असेही म्हटले आहे की, दोषीपणाची भावना नसणे समाजिकरित्या घातक वर्तनाला कारणीभूत ठरू शकते. भ्रष्ट किंवा निब्बर विवेकाच्या लोकांना योग्य-अयोग्य यातला फरक कळत नाही आणि हे हानीकारक असू शकते.—तीत १:१५, १६.
दुसरी गोष्ट, दोषीपणामुळे अनुचित कार्य करायचे आपण टाळू. शारीरिक दुखणे ज्याप्रमाणे संभाव्य आरोग्य समस्येचा इशारा देते त्याचप्रमाणे दोषीपणामुळे वाटणारे भावनिक दुःख आपल्याला नैतिक किंवा आध्यात्मिक समस्या असून त्याकडे लक्ष दिले पाहिजे याचा इशारा देते. एकदा आपल्याला आपल्या दुर्बलतेची जाणीव झाली की, पुन्हा एकदा स्वतःचे, आपल्या प्रिय जनांचे किंवा इतरांचे मन दुखवण्याचे टाळायचा आपण अधिक प्रयत्न करू.—मत्तय ७:१२.
शेवटची गोष्ट, दोषी वाटत असल्याचे कबूल केल्याने दोषी वाटणाऱ्या व्यक्तीला आणि बळी ठरलेल्या व्यक्तीलाही त्याचा फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ, राजा दावीदाला दोषी वाटले तेव्हा त्याला तीव्र मानसिक वेदनाही झाल्या. त्याने लिहिले: “मी गप्प राहिलो होतो, तेव्हा सतत कण्हण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली.” परंतु शेवटी देवाला आपल्या पापाची कबुली दिल्यावर दावीदाने आनंदाने गायिले: “मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढिशील.” (स्तोत्र ३२:३, ७) कबुलीमुळे सहन कराव्या लागलेल्या व्यक्तीलाही बरे वाटू शकते कारण तिला याचे आश्वासन मिळते की, दुसऱ्या व्यक्तीचे तिच्यावर प्रेम असल्यामुळेच तिला दुःख पोहंचवल्याचा पस्तावा झाला.—२ शमुवेल ११:२-१५.
दोषीपणाबद्दल संतुलित दृष्टिकोन
दोषीपणाचा संतुलित दृष्टिकोन बाळगण्यासाठी, पापी लोकांबद्दल आणि पापाबद्दल येशू आणि परुशांचा किती वेगळा दृष्टिकोन होता ते पाहा. लूक ७:३६-५० येथे शिमोन नावाच्या एका परुशाच्या घरात येशू भोजनाला गेला असताना एक वाईट चालीची बाई आली तो वृत्तान्त आपल्याला वाचायला मिळतो. ती येशूकडे गेली, तिने त्याचे पाय आसवांनी धुतले आणि नंतर त्याच्या पायांना सुगंधी तेल लावले.
स्वतःला धार्मिक समजणाऱ्या परुशाला या स्त्रीकडे लक्ष देणे कमीपणाचे वाटत असल्यामुळे तो तिला तुच्छ समजत होता. तो आपल्या मनात म्हणाला: “हा [येशू] संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते.” (लूक ७:३९) येशूने तत्काळ त्याला सुधारले. येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लाविले नाही; परंतु हिने माझ्या पायांस सुगंधी तेल लाविले. ह्या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत, त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीति केली.” हे प्रेमळ शब्द ऐकून निश्चितच त्या स्त्रीला दिलासा मिळाला असेल व तिचे मन हलके झाले असेल.—लूक ७:४६, ४७.
येशू अनैतिकतेला प्रोत्साहन देत होता असे मुळीच नाही. उलट, देवाची सेवा करण्याची प्रेरणा म्हणून प्रेम किती श्रेष्ठ आहे हे तो त्या गर्विष्ठ परुशाला शिकवत होता. (मत्तय २२:३६-४०) अर्थात, त्या स्त्रीला तिच्या गत अनैतिक राहणीमानाविषयी दोषी वाटणे योग्यच होते. आणि तिने पश्चात्ताप केल्याचेही सिद्ध झाले कारण ती रडली; आपल्या आधीच्या चालचलनाची सफाई देण्याचा तिने प्रयत्न केला नाही आणि येशूला सगळ्यांच्या समोर सन्मानित करण्यासाठी पाऊल उचलले. हे पाहून येशूने तिला म्हटले: “तुझ्या विश्वासाने तुला तारिले आहे, शांतीने जा.”—लूक ७:५०.
दुसऱ्या बाजूला पाहता, परुशी तिला पापीच समजत राहिला. कदाचित ‘देवाची भीती तिच्या मनात घालून’ तिला लाजवायचा त्याने प्रयत्न केला असावा. पण आपल्या मनाप्रमाणे लोक नेहमीच करत नसल्यामुळे त्यांना सतत दोषी वाटायला लावल्याने प्रेम प्रदर्शित होत नाही शिवाय भविष्यात त्याचा अपेक्षित परिणामही मिळणार नाही. (२ करिंथकर ९:७) येशूचे अनुकरण केल्याने अर्थात चांगला आदर्श ठेवल्याने, मनापासून लोकांची प्रशंसा केल्याने आणि काही वेळा सुधारणूक किंवा सल्ला देण्याची गरज असली तरीही त्यांच्यावर भरवसा ठेवल्याने उत्तम परिणाम मिळू शकतात.—मत्तय ११:२८-३०; रोमकर १२:१०; इफिसकर ४:२९.
त्यामुळे दोषी वाटणे चांगले असू शकते; इतकेच नव्हे तर आपण काही तरी चूक केली असल्यास दोषीपणाची भावना आवश्यकही असेल. नीतिसूत्रे १४:९ (नॉक्स) म्हणते: “पश्चात्तापाची गरज असलेल्या दोषाची मूर्खाला थट्टा वाटते.” दोषी वाटत असल्यामुळे पश्चात्ताप करण्यास आणि इतर आवश्यक पावले उचलण्यास आपण प्रवृत्त होऊ शकतो आणि झाले पाहिजे. परंतु, यहोवाची सेवा करण्यामागचे मुख्य कारण दोषभावना नव्हे तर प्रेम असले पाहिजे. (ईयोब १:९-११; २:४, ५) ही गोष्ट लक्षात ठेवून चांगल्या लोकांना प्रोत्साहन दिले जाते आणि त्यांना तजेला मिळतो तेव्हा त्यांच्या परीने होता होईल तितके ते करतील. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, हे करण्यात त्यांना आनंद वाटेल.—मत्तय ११:२८-३०. (g०२ ३/८)