परफ्यूम एक सुंगधी इतिहास
परफ्यूम एक सुंगधी इतिहास
मेक्सिकोतील सावध राहा! लेखकाकडून
परफ्यूमचा फार जुना इतिहास आहे. प्राचीन काळी, धार्मिक उत्सवांमध्ये लोक गोंद आणि राळ जाळून धूप करत असत; तेथूनच परफ्यूम बनवायला सुरवात झाली. त्यामुळे, परफ्यूम हा शब्द लॅटिनच्या पर फमम या शब्दातून आला आहे आणि त्याचा अर्थ होतो, “धुरामधून.” सर्वात जुना परफ्यूमचा उल्लेख ईजिप्तमधील आहे. फारो टुटेनखामेनची कबर उघडण्यात आली तेव्हा ३,००० हून अधिक परफ्यूमची मडकी सापडली आणि ३० हून अधिक शतके उलटल्यावरही त्यांचा सुगंध थोड्याफार प्रमाणात टिकला होता!
सामान्य युगाच्या पंधराशे वर्षांआधी, इस्राएली याजक वापरत असलेले अभिषेकाचे पवित्र तेल बनवण्याकरता देवाने दिलेल्या पद्धतीत “मुख्य सुगंधी द्रव्ये” वापरण्यात आली होती. (निर्गम ३०:२३-३३, पं.र.भा.) इब्री लोक सौंदर्य प्रसाधनांकरता आणि औषधांकरता सुगंधी मलम वापरत असत; दफनविधीसाठी प्रेत तयार करतानाही ते याचा उपयोग करत होते जे निश्चितच जंतुनाशक आणि दुर्गंधीनाशकाचे कार्य करत असावे. उदाहरणार्थ, स्त्रियांनी येशूच्या मृत शरीराला लावण्यासाठी सुगंधी द्रव्ये व सुवासिक तेले कबरेत नेली. (लूक २३:५६; २४:१) इस्राएली घरात, पाहुण्याच्या पायांना सुगंधी तेल लावणे अतिथीसत्काराचे चिन्ह होते.—लूक ७:३७-४६.
एका अहवालानुसार, पहिल्या शतकात रोममध्ये दरवर्षी सुमारे २,८०० टन ऊद आणि ५५० टन गंधरस वापरला जात असे. हे सुगंधी पदार्थ बालक येशूलाही दाने म्हणून देण्यात आली होती. (मत्तय २:१, ११) सा.यु. ५४ मध्ये असे म्हटले जाते की, रोमन सम्राट निरो याने एका मेजवानीत सुगंधी द्रव्यांकरता ४६,००,००० रुपये इतका खर्च केला. त्याच्या भोजनाच्या दालनांत कोणालाही दिसणार नाहीत असे पाईप लावलेले होते आणि यांमधून पाहुण्यांवर सुगंधी पाण्याचा फवारा मारला जात होता. सा.यु. सातव्या शतकापासून चीनी लोकांनी सुगंधांचा तसेच सुगंधी पिशव्यांचा उपयोग करायला सुरवात केली. मध्य युगांत, इस्लामिक संस्कृतीत परफ्यूमचा, विशेषकरून, गुलाबाच्या सुगंधांचा उपयोग केला जात होता.
फ्रान्समध्ये सतराव्या शतकात परफ्यूम उद्योग इतका सुस्थापित झाला की, लुई पंधरावा याच्या दरबाराला सुगंधी दरबार असे नाव पडले. केवळ त्वचेला नव्हे तर कपड्यांना, हातमोज्यांना, पंख्यांना आणि फर्निचरलाही सुगंध लावला जात असे.
अठराव्या शतकात कोलोनचा नवीन शोध लागल्यावर, आंघोळीच्या पाण्यात, वाईनमध्ये, साखरेच्या गुठळीवर मुखशुद्धी म्हणून तसेच एनीमा आणि लेपांमध्ये औषधाकरताही त्याचा उपयोग होऊ लागला. एकोणीसाव्या शतकात, कृत्रिम सुगंध तयार करण्यात आले. अशाप्रकारे, औषधी उपयोग नसलेले पहिले परफ्यूम बाजारात आणले गेले. आज, परफ्यूम बनवणे हा करोडोंचा व्यापार आहे. * (g०२ २/८)
[तळटीप]
^ ऑगस्ट ८, २००० च्या (इंग्रजी) अंकात परफ्यूमचा त्रास होण्याविषयी चर्चा करण्यात आली आहे.
[२२ पानांवरील चित्र]
ईजिप्त, टुटेनखामेनच्या कबरेतील परफ्यूमचे मातीचे भांडे, सा.यु.पू. १४ वे शतक
[चित्राचे श्रेय]
Werner Forman/Egyptian Museum, Cairo, Egypt/Art Resource, NY
[२२ पानांवरील चित्र]
ग्रीस, सा.यु.पू. पाचवे शतक
[चित्राचे श्रेय]
Musée du Louvre, Paris
[२२ पानांवरील चित्र]
फ्रान्स, सा.यु. अठरावे शतक
[चित्राचे श्रेय]
Avec lʹaimable autorisation du Musée de la Parfumerie Fragonard, Paris
[२२ पानांवरील चित्र]
आधुनिक परम्यूमची बाटली