व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाऱ्‍याच्या पंखांवर

वाऱ्‍याच्या पंखांवर

वाऱ्‍याच्या पंखांवर

कॅनडामधील सावध राहा! लेखकाकडून

“लगेच मला नायलॉनचे कापड आणि दोर आणून द्या आणि मी तुम्हाला असे काहीतरी दाखवेन जे जगाला चकित करून सोडेल!”—जोसेफ मिशेल मॉन्टगॉल्फियर, १७८२.

अचानक आगीचा एक लोळ एका रंगीबेरंगी फुग्यातून वर सोडला जातो आणि हळूच फुगा वर उडू लागतो. या सुरेख, सप्तरंगी कापडाच्या फुग्यात तरंगणे हा एक आगळाच अनुभव असतो, शिवाय धकाधकीच्या जीवनापासून तेवढ्यापुरती सुटका. गरम हवेच्या फुग्यांत उडण्याचा छंद बऱ्‍याच काळापासून जोपासणाऱ्‍या एकाने म्हटल्याप्रमाणे “[हा अनुभव] शांती देणारा आणि त्याच वेळी रोमांचकारकसुद्धा आहे.”

१७८० च्या दशकाच्या सुरवातीला, जोसेफ मिशेल आणि झाक एट्येन मॉन्टगॉल्फियर यांनी पहिल्यांदा गरम हवेच्या फुग्यातून यशस्वी उड्डाण करून दाखवले; त्यानंतर फुग्यांच्या उड्डाणाचा छंद लोकांना आकर्षित करू लागला. (“फुग्यांतील उड्डाणाचा इतिहास” ही खालील पेटी पाहा.) पण १९६० च्या दशकापासून अग्नीरोधक कापडाचे उत्पादन होऊ लागले आणि फुग्याच्या आतले तापमान वाढवून ते नियंत्रणात ठेवण्याकरता वापरल्या जाणाऱ्‍या प्रोपेन वायूचे सुरक्षित आणि स्वस्त ज्वालक बाजारात आले तेव्हापासून फुग्यांचे उड्डाण मनोरंजक खेळाचा एक प्रकार म्हणून खूपच प्रचलित झाले.

जवळून निरीक्षण

या सुरेख फुग्याचे जवळून निरीक्षण केले असता खाली निमुळत्या झालेल्या रंगीबेरंगी कापडाच्या अनेक पट्ट्या जोडलेल्या आढळतात. यात हवा भरली जाते तेव्हा काही फुगे १५ मीटर रुंद आणि २५ मीटरपेक्षाही उंच होतात.

काही कल्पक उड्डाणपटू आपल्या वैयक्‍तिक आवडीनुसार निरनिराळे आकार शोधून काढतात; काही जण प्राण्यांच्या, बाटल्यांच्या आणि काही तर विदूषकांच्या आकाराच्या फुग्यांत उड्डाण करतात. आकार कोणताही असला तरीसुद्धा आकाशात शांतपणे उडणाऱ्‍या या फुग्यांचे तंत्र मात्र सारखेच असते.

फुग्याच्या तोंडाच्या अगदी खाली जाडसर तारांनी जोडलेली पक्की वेताची टोपली असते. याच टोपलीत फुग्याच्या चालकाला आणि प्रवाशांना बसण्याची सोय असते. काही टोपल्या ॲल्युमिनियमच्या असतात. टोपलीच्या वरती पुन्हा एकदा पाहा. फुग्याच्या तोंडाच्या थेट खाली धातूच्या पृष्ठभागावर इंधनज्वालक आणि तापमान नियंत्रक बांधलेले आढळेल. इंधनाच्या टाक्या टोपलीच्या आत असतात.

उड्डाणाकरता तयार व्हा

विमानाला उड्डाण करण्यासाठी एक मोठ्या धावपट्टीची गरज असते. पण गरम हवेच्या फुग्याच्या उड्डाणाकरता एखाद्या लहानशा शेताइतके खुले क्षेत्र पुरेसे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोक्यावरती कोणतेच अडथळे नसलेले ठिकाण शोधून काढणे. तुम्हालाही या शांत विमानात उडायला आवडेल का? पण टोपलीत चढण्याआधी काही तयारी करणे आवश्‍यक आहे.

सर्वप्रथम हवा न भरलेल्या फुग्याच्या एका बाजूला टोपली ठेवून एकीकडे जमिनीवर फुगा पसरून ठेवला जातो. मग फुग्याच्या तोंडातून मोठ्या यांत्रिक पंख्याच्या साहाय्याने हवा भरली जाते. त्यानंतर गरम हवा फुग्यात भरली जाते, ज्यामुळे जमिनीवर पसरलेला फुगा आपोआप वरती उचलला जातो आणि टोपलीसुद्धा सरळ उचलली जाते. यानंतर शेवटी एकदा सर्व उपकरणांचे तसेच इंधनांच्या ज्वालकांचे परीक्षण केले जाते तसेच फुग्यातली हवा काढण्याचे नियंत्रक खाली टोपलीत लोंबकळत आहेत याची खात्री केली जाते. आता फुग्याचा चालक प्रवाशांना घेऊन उड्डाण करण्यास तयार आहे. काही उड्डाण करणारे रेडिओ उपकरणे सोबत नेतात जेणेकरून ते जमिनीवर एका गाडीतून फुग्याचा पाठलाग करणाऱ्‍या कर्मचाऱ्‍यांसोबत संपर्क कायम ठेवू शकतात; फुगा जमिनीवर उतरल्यावर प्रवाशांना नेण्याकरता ही गाडी तयार असते.

वाऱ्‍याच्या पंखांवर

फुग्यांतून उड्डाण करणाऱ्‍यांना सहसा १०० मीटरची उंची सोयीस्कर वाटते कारण या उंचीवरून ते अगदी शांतपणे हवेत तरंगत खालचे विहंगम दृश्‍य पाहू शकतात. या उंचीवर त्यांना जमिनीवरच्या लोकांच्या हसण्याओरडण्याचा आवाज देखील ऐकू येतो. हवेत उडणाऱ्‍या फुग्याचे दृश्‍य अतिशय मोहक असते; ते मंद वाऱ्‍यावर तरंगणाऱ्‍या पिसासारखे दिसते. फुग्यांतून उड्डाण करणाऱ्‍या काहींना ६०० मीटर किंवा त्याहूनही अधिक उंचावर उड्डाण करण्याचा सराव असतो. पण प्राणवायूचा पुरवठा असल्याशिवाय ३,००० मीटर पेक्षा जास्त उंची गाठणे इष्ट नाही.—“उंच उड्डाणे” हे शीर्षक असलेली पेटी पाहा.

पण एकदा वर गेल्यावर खाली कसे यायचे? गुरुत्वाकर्षण. शिवाय, फुग्यातली गरम हवा काढण्यासाठी असलेला दोर वापरून तुम्ही खाली उतरण्याचा वेग नियंत्रित करू शकता. पण तुम्ही कोणत्या दिशेने उडणार हे चालकाच्या हातात नसते. तो पूर्णतः नैसर्गिक शक्‍तीच्या स्वाधीन असतो. एक अनुभवी उड्डाण करणाऱ्‍याने सांगितले, “प्रत्येक उड्डाण वेगवेगळे असते कारण तुमची दिशा आणि वेग हा पूर्णतः वाऱ्‍याच्या दिशेवर आणि वेगावर अवलंबून असतो.” शिवाय वेगवेगळ्या उंचीवर हवेच्या प्रवाहाचा वेग आणि दिशा बदलू शकते. बऱ्‍याचदा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरून १०० मीटरच्या उंचीवर वारा एका दिशेने वाहत असतो आणि २०० मीटरवर तो अगदी उलट दिशेने वाहत असतो.

फुगा वाऱ्‍याच्याच वेगाने उडत असल्यामुळे तुम्हाला उडताना असे वाटते की तुम्ही हवेत एकाच ठिकाणी तरंगत आहात आणि खाली पृथ्वी फिरत आहे. स्मिथसोनियन नियतकालिकानुसार, “फुग्यांत उड्डाण करणारे वाऱ्‍यासोबत इतके समरूप झालेले असतात की वरती गेल्यावर त्यांनी नकाशा उघडून ठेवला तरीसुद्धा तो उडून जाणार नाही.”

उड्डाणाचे कौशल्य आत्मसात करणे

उड्डाण करण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे हवेत सर्वात कमी हालचाल असते तेव्हा. ही वेळ सहसा सूर्योदयानंतर लगेच किंवा सूर्यास्ताच्या काही वेळाआधीची असते. सकाळची वेळ त्यातल्या त्यात अधिक चांगली कारण तेव्हा वातावरण सहसा थंड असते आणि त्यामुळे फुगा अधिक चांगल्याप्रकारे हवेत उचलला जातो. शिवाय संध्याकाळी लवकर अंधार होण्याचीही भीती असते.

उड्डाणाचे कौशल्य बऱ्‍याच सरावानंतर येते. यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या दिशेने वाहणारा हवेचा प्रवाह शोधणे आणि मग त्यात टिकून राहणे. अनुभवी उड्डाण शौकीन वाऱ्‍यावरती पायऱ्‍या चढण्याचे तंत्र आत्मसात करतात. म्हणजे ते एक विशिष्ट उंची गाठून काही वेळ त्यावर फुगा तरंगत ठेवतात. मग ज्वालकातून थोडी आग पेटवून फुग्यातून गरम हवा वर सोडतात; गरम हवा फुग्याच्या वरपर्यंत पोचताच फुगा आणखी थोडा वर उचलला जातो.

फुग्यावरचे नियंत्रण कायम ठेवण्याकरता ज्वालक योग्य वेळी पेटवण्याचे तंत्र आत्मसात करणे आणि सतत लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण चालकाचे लक्ष थोडेही विचलित झाल्यास अनपेक्षितपणे फुगा खाली उतरू लागतो. दक्ष चालक नेहमी आठवणीत ठेवतो की गरम हवा पुरवणारा ज्वालक फुग्याच्या वरच्या टोकापासून जवळजवळ १५ ते १८ मीटर खाली असतो; त्यामुळे ज्वालक पेटवून त्यातून गरम हवा सोडल्यावर १५ ते ३० सेकंदांनंतरच फुगा वर उचलला जातो.

खाली उतरणेही अतिशय रोमांचकारी असते; खासकरून वाऱ्‍याचा वेग जास्त असतो आणि उतरायला जागा कमी असते तेव्हा. अशा परिस्थितीत एक उड्डाण तज्ज्ञ सांगतात त्याप्रमाणे, “अगदी अलगद हवेवर तरंगत प्राणीसंग्रहालयात सिंहाच्या पिंजऱ्‍यात उतरण्यापेक्षा वेगाने आणि जोराचे हेलकावे खात का होईना पण योग्य ठिकाणी खाली उतरणे केव्हाही चांगले.” पण वाऱ्‍याचा वेग आणि दिशा मनासारखी असते तेव्हा, अलगद हवेत तरंगत खाली उतरण्याची मजा काही औरच आहे.

मनोरंजनाकरता गरम हवेच्या रंगीबेरंगी फुग्यांतून उड्डाण दिवसेंदिवस लोकप्रिय होत जाईल कारण अधिकाधिक लोक या उड्डाणाच्या शर्यती व स्पर्धा आणि उड्डाण उत्सवांत भाग घेऊ लागले आहेत; तर काहीजण फक्‍त या आगळ्यावेगळ्या अनुभवाचा आनंद लुटण्यासाठी उड्डाण करतात. (g०२ ३/८)

[१४, १५ पानांवरील चौकट/चित्रे]

फुग्यांतील उड्डाणाचा इतिहास

जोसेफ-मिशेल आणि झाक-एट्येन मॉन्टगॉल्फियर या फ्रान्समधील ॲनोने शहरातील एका धनाढ्य कागद उत्पादकाच्या मुलांना पहिला गरम हवेचा फुगा बनवण्याचे आणि त्याचे यशस्वी उड्डाण करण्याचे श्रेय दिले जाते. १७८० च्या दशकाच्या सुरवातीला त्यांनी कागदी फुगे वापरून प्रयोग केले; सुकलेले गवत आणि लोकर जाळल्यामुळे निघणाऱ्‍या धुरामुळे हे फुगे उडतात असे त्यांना वाटायचे. पण लवकरच त्यांच्या लक्षात आले की गरम हवा निर्माण झाल्यामुळे फुगा वर उचलला जातो.

नंतर त्यांनी कापडी फुगे बनवण्यास सुरवात केली तेव्हा त्यांना दिसून आले की जितके मोठे फुगे त्यांनी वापरले तितकीच अधिक उंची त्यांना प्रत्येक वेळा गाठता आली; तसेच मोठ्या फुग्यांत अधिक प्रवासी आणि इतर सामान वाहून नेणे शक्य झाले. १७८३ सालच्या जून महिन्यात त्यांनी ॲनोनेच्या एका सार्वजनिक चौकातून तोपर्यंत निर्माण करण्यात आलेला सर्वात मोठा फुगा हवेत सोडला. हा फुगा वर आकाशात उडाला आणि जवळजवळ दहा मिनिटे उड्डाण करून मग जमिनीवर उतरला.

हा विक्रम कायम केल्यावर त्यांनी ठरवले की आता लोकांना घेऊन उड्डाण करणारा फुगा तयार करण्याची वेळ आली होती. पण पहिल्यांदा १७८३ सालच्या सप्टेंबर महिन्यात व्हर्सायच्या एका मैदानात हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने एक कोंबडा, एक बदक आणि एक मेंढरू फुग्याच्या टोपलीत बसवून फुगा हवेत सोडण्यात आला. हे तिघेही आठ मिनिटांचे उड्डाण करून सहीसलामत जमिनीवर उतरले. त्यानंतर काही काळातच म्हणजे नोव्हेंबर २१, १७८३ रोजी पहिल्यांदा मनुष्यांना घेऊन उड्डाण करण्याचा प्रयोग करण्यात आला. सोळाव्या लुई राजाची समजूत घालून दोन उमरावांना हा सन्मान देण्याची परवानगी काढण्यात आली. शॅटो द ला म्युएत येथून त्यांनी फुग्यांतून उड्डाण केले आणि पॅरिस शहरावर जवळजवळ आठ किलोमीटर अंतरापर्यंत ते तरंगले. साधारण २५ मिनिटांनंतर फुग्याला आग लागल्यामुळे त्यांना लगेच खाली उतरावे लागले.

या कालखंडात पॅरिसमधल्या अकॅडमी ऑफ सायंसेस या संस्थेने देखील या नवीन शोधाविषयी उत्सुकता दाखवली. प्राध्यापक झाक शार्ल हे त्या काळातले सर्वात मानलेले भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी दोन निपुण मेकॅनिक्स, चार्ल्स आणि एम. एन. रॉबर्ट यांच्या मदतीने पहिला हायड्रोजन वायूने भरलेला फुगा तयार केला आणि ऑगस्ट २७, १७८३ रोजी त्याचा प्रयोग करून पाहिला. या फुग्याने ४५ मिनिटे, २४ किलोमीटर अंतरापर्यंत उड्डाण केले आणि त्याला शार्लियर असे नाव पडले. या प्रकारचा फुगा आजही जवळजवळ त्याच मूळ रूपात उपयोगात आणला जातो.

[१७ पानांवरील चौकट]

उंच उड्डाणे

हेन्री कॉक्सवेल हा इंग्रज, उंच उड्डाण करणारा पहिला फुगा चालक ठरला. सप्टेंबर १८६२ मध्ये त्याला ब्रिटिश मिटियरॉलॉजिकल सोसायटीच्या जेम्स ग्लायशर यांना वैज्ञानिक निरीक्षणे करण्यासाठी उंच उड्डाणाकरता नेमण्यात आले. त्यांनी प्राणवायूच्या पुरवठ्याशिवायच नऊ किलोमीटरपेक्षा अधिक उंची गाठली!

८,००० मीटर पेक्षा अधिक उंची गाठल्यावर, थंड व विरळ हवेत श्‍वास घेण्यास त्यांना त्रास होऊ लागला तेव्हा कॉक्सवेल यांनी उतरण्याची तयारी सुरू केली. पण फुगा सतत फिरत असल्यामुळे हवा सोडण्याचा दोर गुंतला गेला होता. त्यामुळे कॉक्सवेलला गुंतलेला दोर मोकळा करण्यासाठी वरती चढावे लागले. एव्हाना ग्लायशर बेशुद्ध झाले होते आणि कॉक्सवेल यांचे हात गारठल्यामुळे त्यांना अक्षरशः दातांनी दोर सोडवावा लागला. शेवटी कसेबसे ते खाली उतरू लागले.

दोघांनाही काही वेळाने बरे वाटू लागले आणि त्यांनी फुग्याचा खाली उतरण्याचा वेग कमी केला. त्यांनी चक्क १०,००० मीटरची उंची गाठली होती. हा विक्रम जवळजवळ १०० वर्षांपर्यंत कायम राहिला. उघड्या टोपलीच्या फुग्याचे त्यांचे उड्डाण आजपर्यंतच्या सर्वात आश्‍चर्यकारक पराक्रमांत गणले जाते. कारण ते प्राणवायूच्या पुरवठ्याशिवाय, पुरेशा संरक्षक कपड्यांशिवाय आणि इतक्या उंचावरील हवामानाचे काहीही ज्ञान नसताना साध्य करण्यात आले होते.

[१५ पानांवरील चित्र]

हवा भरताना फुग्याचा आतला भाग

[१५ पानांवरील चित्र]

फुगा वर उचलला जाऊन उडावा म्हणून गरम हवा फुग्यात सोडली जाते

[१६ पानांवरील चित्र]

चित्रविचित्र फुगे