शिक्षकांना मिळणारे समाधान आणि आनंद
शिक्षकांना मिळणारे समाधान आणि आनंद
“मी या कामात का टिकून आहे? शिकवण्याचे काम कठीण आणि थकवणारे आहे, पण मुले शिकायला किती उत्सुक असतात आणि ती कशी प्रगती करतात हे पाहून मला टिकून राहण्याची प्रेरणा मिळते.”—लीमारीझ, न्यूयॉर्कची एक शिक्षिका.
सगळी आव्हाने, समस्या आणि निराशा असूनही सबंध जगात लाखो शिक्षक आपण निवडलेल्या या पेशाला चिकटून राहतात. आणि या पेशाला पुरेशी मान्यता नाही याची पूर्ण जाणीव असूनही हजारो विद्यार्थी शिक्षक होण्याची पात्रता मिळवण्याकरता का झटतात? या सर्वांना कशामुळे प्रेरणा मिळते?
भारताची राजधानी नवी दिल्ली येथील एका शाळेतील शिक्षिका मेरिॲन हिने याचा खुलासा केला: “किशोरवयीन मुलांना त्यांच्या जीवनातील सर्वात खडतर वर्षांत योग्य दिशा दाखवणारी व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्हाला ओळखलं जातं तेव्हा खूप समाधान मिळतं. तुम्ही दिलेल्या मदतीला प्रतिसाद देऊन ही चिमुकली मुलं मोठी होतात आणि येणाऱ्या वर्षांत तुम्हाला अतिशय प्रेमळपणे आठवणीत ठेवतात यापरते दुसरे समाधान नाही आणि हे समाधान इतर कोणत्याही व्यवसायात मिळणे शक्य नाही.”
शिक्षक ज्युल्यानो ज्यांचा उल्लेख याआधीच्या लेखात करण्यात आला होता, ते म्हणतात: “एखाद्या विषयातील मुलांचे कुतूहल जागृत करण्यात तुम्हाला यश आले आहे याची जाणीव होते तेव्हा सर्वात मोठे समाधान मिळते. उदाहरणार्थ, एकदा मी इतिहासातला एक मुद्दा समजावून सांगितल्यानंतर काही विद्यार्थी म्हणाले: ‘थांबू नका सर. आणखी सांगा!’ असे मनःपूर्वक उद्गार ऐकल्यावर, शाळेतली कंटाळवाणी सकाळ अचानक उजळून जाते, कारण या लहान मुलांच्या मनात तुम्ही अगदी नवख्या भावनांना नुकताच जन्म दिला आहे याची तुम्हाला जाणीव होते. एखादा मुद्दा स्पष्टपणे समजल्यावर त्यांच्या डोळ्यात अचानक एकप्रकारची चमक येते, तेव्हा त्यांचे चेहरे पाहून खूप आनंद होतो.”
इटलीतल्या शिक्षिका, एलेना यांनी म्हटले: “माझ्या मते क्वचितच घडणाऱ्या लक्षणीय, विक्रमी विजयांपेक्षा दररोजच्या लहानसहान गोष्टींमुळे, विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या यशांमुळे जास्त समाधान मिळते.”
नुकतेच तिशीत पदार्पण केलेल्या कॉनी नावाच्या ऑस्ट्रेलियन शिक्षिकेने म्हटले: “शालेय जीवनात ज्या विद्यार्थ्यासोबत तुमचे एक नाते निर्माण झाले होते तो अनेक वर्षांनंतर तुमच्या मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चार ओळी तुम्हाला लिहितो तेव्हा अगदी कृतकृत्य वाटतं.”
अर्जेन्टिनाच्या मेन्डोझा शहरात शिकवणाऱ्या ऑस्करने हीच भावना व्यक्त केली: “माझे विद्यार्थी रस्त्यावर किंवा इतरत्र अचानक भेटतात आणि मी त्यांना शिकवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात तेव्हा सगळ्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटते.” स्पेनच्या मॅड्रिड शहरात राहणारी आन्काल म्हणते: “माझ्या जीवनाचा काही काळ मी या अप्रतिम पण अवघड व्यवसायाला समर्पित केला याचे सर्वात मोठे समाधान मला हे पाहून मिळते, की मी शिकवलेली चिमुरडी मुले काही प्रमाणात माझ्या प्रयत्नांमुळे मोठेपणी सात्विक स्त्रीपुरूष बनली आहेत.”
अगदी सुरवातीला जिचे शब्द उद्धृत करण्यात आले होते ती लीमारीझ म्हणते: “मला खरोखर वाटतं की आम्ही शिक्षक जगावेगळेच आहोत. इतकी मोठी जबाबदारी स्वतःहून स्वीकारण्याइतके वेडेही आहोत. पण निदान दहा मुलांच्या किंवा एकच मुलाच्या का होईना, जीवनाला जर आपण आकार देऊ शकलो तर आपण आपले काम केले आहे असे वाटते आणि यासारखी सुंदर कोणतीही जाणीव नाही. ही भावना असल्यामुळे आम्ही आमचे काम आनंदाने करू शकतो.”
तुम्ही आपल्या शिक्षकांचे कधी आभार मानले का?
तुम्ही कधी विद्यार्थी किंवा पालक या नात्याने एखाद्या शिक्षकाला अथवा शिक्षिकेला त्याने किंवा तिने खर्च केलेल्या वेळेबद्दल, शक्तीबद्दल आणि दाखवलेल्या आस्थेबद्दल आभार व्यक्त केले आहेत का? किंवा निदान धन्यवाद मानणारे एखादे लहानसे पत्र लिहिले का? केनियाच्या नायरोबी शहरातील आर्थरने हा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला: “शिक्षकांनाही प्रशंसेची गरज असते. सरकार, पालक आणि विद्यार्थी या सर्वांनी त्यांचा आणि त्यांच्या सेवेचा परम आदर केला पाहिजे.”
लेखिका-शिक्षिका लूॲन जॉन्सन हिने लिहिले: “शिक्षकांविषयी येणाऱ्या प्रत्येक टीकात्मक पत्रामागे त्यांच्याविषयीच्या प्रशंसेची शंभर पत्रे माझ्याकडे येतात, आणि त्यामुळे माझी वारंवार खात्री पटते की वाईट शिक्षकांच्या तुलनेत चांगल्या शिक्षकांची संख्याच जास्त आहे.” गंमत म्हणजे, बरेच लोक “एखाद्या जुन्या शिक्षकाचा पत्ता शोधायला” चक्क गुप्तहेराची मदत घेतात. लोकांना आपल्या शिक्षकांना शोधून त्यांचे आभार मानायचे असतात.”
शिक्षक एखाद्या व्यक्तीच्या सबंध शैक्षणिक जीवनाचा मूलभूत पाया घालतात. सर्वात प्रख्यात विद्यापीठांतील सर्वात नामवंत प्राध्यापक देखील आपल्या शिक्षकांचे ऋणी आहेत कारण त्यांनी वेळ आणि शक्ती खर्च करून आपल्या या विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची, ज्ञानाची आणि बुद्धीची लालसा निर्माण केली व ती विकसित केली. नायरोबीचा आर्थर म्हणतो: “सार्वजनिक आणि खासगी खात्यांमधील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या जीवनात कोणत्या न कोणत्या वळणावर एका शिक्षकाने शिकवलेले आहे.”
आपण या सर्व स्त्रीपुरुषांचे किती आभार मानले पाहिजे ज्यांनी आपली जिज्ञासा जागृत केली, ज्यांनी आपल्या मनाला आणि बुद्धीला चालना दिली, ज्यांनी आपल्याला आपली ज्ञानाची आणि बुद्धीची तहान कशी भागवायची ते शिकवले!
महान शिक्षक यहोवा देवाचे आपण किती अधिक आभार मानले पाहिजे, ज्याने आपल्या प्रेरणेने नीतिसूत्रे २:१-६ मधील हे शब्द लिहून घेतले: “माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारिशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेविशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारिशील, सुज्ञतेची आराधना करिशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करिशील, व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढिशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल, कारण ज्ञान परमेश्वर देतो; त्याच्या मुखांतून ज्ञान व सुज्ञता येतात.”
या विचारप्रवर्तक वचनांत तीन वेळा सशर्त “जर” वापरण्यात आले आहे याकडे लक्ष द्या. कल्पना करा, जर आपण हे आव्हान स्वीकारले तर खुद्द “देवाविषयीचे ज्ञान” आपल्याला प्राप्त होऊ शकते! हे निश्चितच सर्वात श्रेष्ठ शिक्षण ठरेल. (g०२ ३/८)
[१३ पानांवरील चौकट]
एक आनंदी आई
न्यूयॉर्क येथील एका शिक्षकाला हे पत्र मिळाले:
“तुम्ही माझ्या मुलांसाठी जे काही केले त्याबद्दल मी मनापासून, अंतःकरणापासून आभार मानू इच्छिते. तुमची काळजी, प्रेमळपणा आणि कौशल्य यामुळे तुम्ही त्यांना यशाची उत्तुंग शिखरे गाठण्यास मदत केली आहे. तुमच्या मदतीशिवाय हे निश्चितच शक्य झाले नसते. तुमच्याच कृपेने आज मला माझ्या मुलांचा खूप अभिमान वाटतो—हे मी कधीही विसरणार नाही. आपली विश्वासू, एस. बी.”
तुम्ही एखाद्या शिक्षकाला ओळखता का, ज्यांना तुम्ही अशाचप्रकारे प्रोत्साहन देऊ शकता?
[१२ पानांवरील चित्र]
‘एखादा विषय समजल्यावर मुलांच्या डोळ्यांतली चमक पाहून खूप आनंद होतो.’—ज्युल्यानो, इटली
[१३ पानांवरील चित्रे]
‘कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी चार ओळी तुम्हाला लिहितो तेव्हा अगदी कृतकृत्य वाटतं.’—कॉनी, ऑस्ट्रेलिया