शिक्षकाच्या पेशात विशेष काय?
शिक्षकाच्या पेशात विशेष काय?
“बहुतेक शिक्षक हा पेशा निवडतात कारण तो त्यांना सेवा करण्याची संधी देतो. [शिकवणे] म्हणजे मुलांच्या जीवनाला दिशा देण्याची वचनबद्धता आहे.”—शिक्षक, शाळा आणि समाज (इंग्रजी).
काही शिक्षकांना पाहिल्यावर हा पेशा अगदी आरामाचा आहे असे भासत असले तरीसुद्धा, वास्तवात याची तुलना अडथळ्यांच्या मॅरथॉन शर्यतीशी करता येईल—मुलांनी खचाखच भरलेले वर्ग, भरमसाट पेपर-वह्या तपासणे, जाचक व्यवस्थापन, प्रतिसाद न देणारी मुले, अपुरा पगार अशा असंख्य अडथळ्यांचा उल्लेख करता येईल. स्पेनमधील मॅड्रिड शहरात शिक्षकाचे काम करणारा पेद्रो म्हणतो: “शिक्षक असणं नक्कीच सोपं नाही. बराच त्याग करावा लागतो. पण सर्व अडचणी असूनही, मला विचाराल तर व्यावसायिक जगातील इतर कोणत्याही नोकरीपेक्षा शिक्षकाचं काम अधिक संतुष्टीदायक आहे असंच मी म्हणेन.”
बहुतेक देशांतील मोठ्या शहरांतील शाळांत शिक्षकांना असंख्य आव्हानांना तोंड द्यावे लागते. ड्रग्स, गुन्हेगारी, अनैतिक वातावरण, आणि कधीकधी आईवडिलांकडून या सर्व प्रकारांकडे केले जाणारे दुर्लक्ष यामुळे शाळेतल्या सर्वसाधारण वातावरणावर आणि शिस्तीवर अनिष्ट परिणाम होतो. मुलांमध्ये शिक्षकांविरुद्ध विद्रोह करण्याची प्रवृत्ती अगदी सर्रास दिसून येते. मग शैक्षणिक पात्रता असलेले इतकेजण शिक्षक होण्याचे का निवडतात?
लीमारीझ आणि डायना या दोघी न्यूयॉर्क शहरांमध्ये शिक्षिका आहेत. किंडरगार्टन पासून दहा वर्षांच्या मुलांना त्या शिकवतात. या दोघींनाही इंग्रजी व स्पॅनिश या दोन्ही भाषा अवगत आहेत आणि त्या खासकरून स्पॅनिश पार्श्वभूमीच्या मुलांना शिकवतात. आम्ही त्यांना विचारले:
शिक्षकाला कशामुळे प्रेरणा मिळते?
लीमारीझ सांगते: “मला कशामुळे प्रेरणा मिळते? मुलांवर असलेल्या प्रेमामुळे. या मुलांपैकी काही मुलांसाठी, त्यांच्या प्रयत्नांत त्यांना साथ देणारी मी एकच व्यक्ती आहे हे मला माहीत आहे.”
डायना सांगते: “माझ्या आठ वर्षांच्या भाच्याला शाळेतला अभ्यास खूप कठीण वाटत होता, खासकरून वाचणं त्याला जमत नव्हतं; तेव्हा मी त्याला शिकवण्याची जबाबदारी घेतली. त्याला आणि इतर काही मुलांना शिकताना पाहून मला इतका आनंद व्हायचा की शेवटी मी शिक्षिका व्हायचं ठरवलं आणि बँकेतली नोकरी सोडून मी हे काम करू लागले.”
इतर काही देशांतील शिक्षकांनाही सावध राहाने! हाच प्रश्न विचारला तेव्हा त्यांच्यापैकी काहींनी खालीलप्रमाणे उत्तर दिले.
ज्युल्यानो हे चाळीशीत असलेले एक इटॅलियन शिक्षक आहेत. ते सांगतात: “मी हा पेशा निवडला कारण मी स्वतः विद्यार्थी असतानाच मला याविषयी खूप आकर्षण वाटायचे (उजवीकडे). माझ्याकरता हा कल्पनाशक्तीला वाव देणारा आणि इतरांना प्रेरित करण्याच्या अनेक संधी देणारा एक पेशा होता. अर्थात हा पेशा निवडल्यावर लगेच मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले पण तो सुरवातीचा
उत्साह कायम राहिल्यामुळे या अडचणींवर मी मात करू शकलो.”ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समध्ये राहणारा निक सांगतो: “माझ्या रासायनिक संशोधनाच्या क्षेत्रात नोकऱ्या मिळण्यास फारसा वाव नव्हता पण शिक्षण क्षेत्रात पुष्कळ चांगल्या संधी होत्या. या क्षेत्रात उतरल्यापासून मला शिकवण्याचं काम आवडू लागलं आहे आणि मुलांनाही माझी शिकवण्याची पद्धत आवडते असं जाणवतं.”
जे शिक्षक होण्याचे निवडतात अशांपैकी बऱ्याच जणांवर खासकरून त्यांच्या आईवडिलांचा प्रभाव असतो. विल्यम नावाच्या केनिया येथील शिक्षकाने आमच्या प्रश्नाचे असे उत्तर दिले: “माझ्या मनात शिकवण्याची इच्छा निर्माण झाली ती मुख्यतः माझ्या वडिलांमुळे. १९५२ च्या दरम्यान ते स्वतः शिक्षक होते. तरुण मुलांच्या मनाला आपण आकार देत आहोत ही जाणीव मला या पेशात टिकून राहण्यास मदत करते.”
केनियाच्याच रोझमेरीने आम्हाला सांगितले: “मला गरजू लोकांना मदत करण्याची इच्छा पूर्वीपासूनच होती. त्यामुळे माझ्यासमोर नर्स किंवा शिक्षिका होण्याचे दोन पर्याय होते. शिक्षिका होण्याची संधी आधी आली. शिवाय मी स्वतः आई असल्यामुळे माझं या कामाबद्दलचं प्रेम अधिकच वाढलं.”
ड्यूरेन, जर्मनी येथील बर्टहोल्डचे शिक्षक होण्याचे कारण वेगळेच होते: “माझ्या पत्नीने मला खात्री पटवून दिली की मी एक उत्तम शिक्षक होऊ शकतो.” तिचे म्हणणे खरे निघाले. ते पुढे सांगतात: “माझ्या कामातून मला खूप समाधान मिळतं. शिक्षकाला शिक्षणाचं महत्त्व कळलं पाहिजे, तसेच मुलांबद्दल त्याला स्वारस्य वाटलं पाहिजे; त्याशिवाय त्याला किंवा तिला एक उत्तम, यशस्वी, समर्पित आणि समाधानी शिक्षक किंवा शिक्षिका होताच येणार नाही.”
नाकात्सू सिटी येथे राहणारे मासाहीरो नावाचे जपानी शिक्षक म्हणतात: “माध्यमिक शाळेतल्या पहिल्या वर्षात आमचे एक अतिशय उत्तम शिक्षक होते. त्यांनीच मला शिक्षक होण्याची प्रेरणा दिली. ते अक्षरशः प्राण ओतून शिकवायचे. आणि मी या पेशात टिकून राहिल्याचं आणखी एक कारण म्हणजे मला मुलं अतिशय आवडतात.”
जपानचेच ५४ वर्षांचे योशिया कारखान्यातल्या चांगल्या पगाराच्या नोकरीवर होते; पण त्यांना ती नोकरी आणि दररोजचा प्रवास करता करता एखाद्या गुलामासारखं वाटू लागलं. “एकदा मी विचार केला, ‘किती दिवस हे असंच चालणार?’ मग मी अशी एखादी नोकरी शोधायचं ठरवलं ज्यात वस्तूंसोबत नव्हे तर लोकांसोबत काम करायला मिळेल. शिक्षकाचा पेशा अगदीच अतुलनीय आहे. लहान मुलांसोबत काम करायला मिळतं. हे अतिशय उदात्त कार्य आहे.”
रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरात राहणाऱ्या व्हॅलेन्टिनाला देखील शिक्षकी पेशाचा हा भाग सर्वाधिक आवडतो. त्या म्हणतात: “हा माझ्या स्वतःच्या आवडीचा पेशा आहे. मी ३७ वर्षांपासून प्राथमिक शाळेत शिकवत आले आहे. मुलांसोबत, विशेषतः लहान मुलांसोबत काम करणे मला खूप आवडतं. मला माझं काम प्रिय आहे आणि म्हणूनच मी अजूनही निवृत्त झालेले नाही.”
स्वतः शिक्षक असलेले विल्यम एयर्स आपल्या पुस्तकात म्हणतात: “लोक शिक्षक होण्याचे निवडतात कारण त्यांना मुलांवर प्रेम
असते किंवा त्यांना मुलांचा सहवास हवाहवासा वाटतो, मुलांना वाढताना, बहरताना, अधिक समर्थ, अधिक कार्यक्षम आणि समाजात अधिक सशक्त होताना पाहणे त्यांना आनंददायक वाटते. . . . शिक्षक शिकवतात . . . स्वतःच्या रूपात इतरांना एक वरदान देतात. मी शिकवतो ते या आशेने की हे जग एक अधिक चांगले ठिकाण बनावे.”होय, शिक्षकी पेशात कित्येक अडचणी आणि उणिवा असूनही हजारो समर्पित स्त्रीपुरुष या पेशाकडे आकर्षित होतात. त्यांना तोंड द्यावी लागणारी काही मुख्य आव्हाने कोणती आहेत? पुढच्या लेखात या प्रश्नावर चर्चा करण्यात येईल. (g०२ ३/८)
[६ पानांवरील चौकट]
शिक्षक-पालक सुसंवादाकरता काही सहायक सूचना
✔ पालकांशी ओळख करून घ्या. यासाठी घालवलेला वेळ व्यर्थ ठरणार नाही उलट हे त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठीही फायद्याचे ठरेल. पालकांशी ओळख केल्यामुळे तुम्हाला त्यांच्यासोबत सुसंवाद साधणे शक्य होईल आणि ते तुमचे सर्वात प्रमुख सहकारी ठरू शकतील.
✔ पालकांशी त्यांच्या ग्रहणक्षमतेनुसार बोला—त्यांना काहीच कळत नाही अशा आविर्भावात बोलू नका. शिक्षकांची तांत्रिक भाषा वापरण्याचे टाळा.
✔ मुलांसंबधी चर्चा करताना त्यांच्या जमेच्या बाजूवर अधिक जोर द्या. टीकेपेक्षा प्रशंसेमुळे अधिक चांगले परिणाम दिसून येतात. मुलाला यशस्वी होण्याकरता मदत करण्यासाठी पालकांना काय करता येईल हे समजावून सांगा.
✔ पालकांनाही आपले विचार मांडण्याची संधी द्या आणि ते बोलत असताना लक्षपूर्वक ऐका.
✔ मुलांच्या घरचे वातावरण समजून घेण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास त्यांच्या घरी भेट द्या.
✔ पुढच्या चर्चेकरता दिवस निश्चित करा. नियमितपणा अतिशय महत्त्वाचा आहे. यावरून दिसून येईल की तुमची आस्था केवळ वरपांगी नाही.—अमेरिकेत अध्यापन (इंग्रजी), या पुस्तकावर आधारित.
[६ पानांवरील चित्र]
‘माझे वडीलही शिक्षक होते.’—विल्यम, केनिया
[७ पानांवरील चित्र]
“मला मुलांसोबत काम करायला आवडतं.”—व्हॅलेन्टिना, रशिया
[७ पानांवरील चित्र]
“शिक्षकांचा पेशा अतुलनीय आहे. यात लहान मुलांसोबत काम करायला मिळतं.”—योशिया, जपान