व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शिक्षकी पेशातील त्याग व अडचणी

शिक्षकी पेशातील त्याग व अडचणी

शिक्षकी पेशातील त्याग व अडचणी

“शिक्षकांकडून इतक्या प्रचंड अपेक्षा केल्या जातात, पण आमच्या शाळेतल्या समर्पित शिक्षकांना सर्वसामान्य जनतेकडून क्वचितच . . . प्रशंसेचे दोन शब्द ऐकायला मिळतात.”—केन्‌ एल्टस, सिडनी विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया.

शिक्षकांचा पेशा, ‘सर्वात महत्त्वाचा पेशा’ आहे असे म्हटले जाते परंतु हे कबूल करावे लागेल की, त्यांना असंख्य अडीअडचणींना तोंड द्यावे लागते—अपुरा पगार, निकृष्ट वर्ग, अत्यधिक लेखी काम, विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेले वर्ग, मुलांकडून अनादर, हिंसक वागणूक, आईवडिलांची बेपर्वाई इत्यादी. या सर्व आव्हानांना शिक्षक कसे तोंड देतात?

अनादर

आम्ही न्यूयॉर्क सिटीतल्या चार शिक्षकांना त्यांच्या मते सर्वात मोठी समस्या कोणती असे विचारले. त्या चौघांनीही एकच उत्तर दिले: “मुलांना शिक्षकांविषयी आदर नाही.”

केनियाच्या विल्यम यांच्या मते या बाबतीत आफ्रिकेतील परिस्थितीसुद्धा पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्यांनी सांगितले: “मुले दिवसागणिक बेशिस्त होऊ लागली आहेत. मी लहान होतो [आता ते चाळीशीत आहे] तेव्हा आफ्रिकन समाजात शिक्षकांना सर्वात जास्त आदर दिला जात होता. अबालवृद्ध त्यांना आपले आदर्श मानत होते. पण आज हा आदर नाहीसा होऊ लागला आहे. पाश्‍चात्त्य संस्कृती हळूहळू लहान मुलांच्या कोवळ्या मनांवर परिणाम करू लागली आहे आणि हीच परिस्थिती आफ्रिकेतल्या ग्रामीण भागातही पाहायला मिळते. चित्रपट, व्हिडिओ आणि साहित्य यात सहसा अधिकारास न जुमानणे हे शौर्याचे लक्षण असल्याचे दाखवले जाते.”

इटलीतल्या एका शाळेत शिकवणारे ज्यूल्यानो खेदाने म्हणतात: “सबंध समाजातच विद्रोहाची, अधीन न राहण्याची आणि आज्ञा मोडण्याची वृत्ती पसरली आहे आणि अर्थातच मुलेही यातून सुटलेली नाहीत.”

ड्रग्स आणि हिंसा

शाळांमध्येसुद्धा ड्रग्स एक समस्या बनली आहे, हे अतिशय दुःखाने कबूल करावे लागते. ही समस्या इतकी विकोपाला गेली आहे की अमेरिकेत शिक्षक आणि लेखक असलेल्या लूॲन जॉन्सन असे लिहितात: “ड्रग्स प्रतिबंध किंडरगार्टन (बालवाडी) पासून [तिरपे वळण आमचे.] शाळेतल्या प्रत्येक अभ्यासक्रमात सामील करण्यात आलेला विषय आहे. बहुतेक प्रौढांपेक्षा . . . लहान मुलांना ड्रग्सबद्दल जास्त माहिती असते.” त्या पुढे म्हणतात: “आत्मविश्‍वास नसलेली, वाळीत टाकलेली, एकाकी, कंटाळलेली, किंवा ज्यांना असुरक्षित वाटते अशी मुले ड्रग्सच्या मोहाला बळी पडण्याची सर्वाधिक शक्यता आहे.”—दोन भाग पाठ्यपुस्तकाचे, एक भाग प्रेमाचा (इंग्रजी).

ऑस्ट्रेलियात शिक्षक असलेल्या केन याने असा प्रश्‍न विचारला: “एका नऊ वर्षांच्या मुलाला त्याच्या स्वतःच्या आईवडिलांनी ड्रग्सच्या संपर्कात आणले आणि आज तो ड्रग्सच्या आहारी गेलेला आहे, अशा या मुलांना आम्ही काय शिक्षण देणार?” तिशीत असलेला मायकल जर्मनीतल्या विविध अभ्यासक्रम चालवणाऱ्‍या एका शाळेत शिकवतो. तो लिहितो: “ड्रग्सची खरेदी-विक्री शाळेत चालते याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे; हा प्रकार कधी उघडकीस येत नाही, एवढेच.” तो गैरशिस्त वातावरणाविषयीही उल्लेख करून म्हणतो, “आणि याचा पुरावा म्हणजे मुलांमधील सर्वसामान्य विध्वंसक प्रवृत्ती.” पुढे तो म्हणतो: “टेबल, भिंती कळकटलेल्या असतात, फर्निचरची मोडतोड केलेली असते. माझ्या काही विद्यार्थ्यांना तर दुकानांत चोऱ्‍या करणे यांसारख्या गुन्ह्यांबद्दल पोलिसांनी पकडल्याचीही उदाहरणे आहेत. म्हणूनच, शाळेतही चोऱ्‍यांचे प्रकार रोजचेच झाले आहेत!”

अमीरा ही मेक्सिकोच्या गुआनाजुआटो राज्यात एका शाळेत शिकवते. ती कबूल करते: “कुटुंबातल्या हिंसक वातावरणाचे, ड्रग्सच्या सवयीचे मुलांवर थेट दुष्परिणाम झाल्यामुळे आम्हाला कितीतरी समस्यांना तोंड द्यावे लागते. ही मुले सतत गलिच्छ भाषा आणि इतर वाईट प्रभाव असलेल्या वातावरणात राहतात. दुसरी मोठी समस्या म्हणजे गरिबी. इथे शालेय शिक्षण मोफत असले तरीसुद्धा आईवडिलांना वह्‍यापुस्तके, पेन आणि इतर आवश्‍यक साहित्य विकत घ्यावे लागते. पण अर्थातच या सर्वापेक्षा अन्‍न जास्त महत्त्वाचे आहे.”

शाळेत बंदुका?

अलीकडे शाळेत गोळीबार झाल्याच्या अनेक घटना अमेरिकेत घडल्या. बंदुका घेऊन हिंसाचार करण्याच्या समस्येने या देशात रौद्र रूप धारण केले आहे ही वस्तूस्थिती या घटनांनी सर्वांसमोर आणली. एका अहवालानुसार: “या देशातल्या ८७,१२५ शाळांत दररोज अंदाजे १,३५,००० बंदुका आणल्या जातात. शाळेत बंदुका आणण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी मेटल डिटेक्टर्स, गुप्त कॅमरे, बंदुका शोधून काढण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलेली कुत्री, मुलांच्या लॉकर्सची झडती घेणे, ओळखपत्रे, शाळेत दप्तरे आणण्यावर बंदी यांसारखे अनेक उपाय योजले जात आहेत.” (अमेरिकन शिक्षकाचे अनुभव) (इंग्रजी) ही यादी पाहिल्यावर असे वाटते, की आपण शाळांविषयी बोलत आहोत का तुरुंगांविषयी? याच अहवालात असेही म्हटले होते की शाळेत बंदुका आणल्यामुळे ६,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले!

न्यूयॉर्क सिटीतील एक शिक्षिका आयरस हिने सावध राहाला! सांगितले: “मुले चोरून ही हत्यारे शाळेत आणतात. मेटल डिटेक्टर्ससारखी उपकरणे असूनसुद्धा काही उपयोग होत नाही. शाळेत तोडफोड करणे ही आणखी एक मोठी समस्या आहे.”

अशा या अंदाधुंदीच्या वातावरणात समर्पित शिक्षक मुलांना प्रबोधन देण्याची आणि त्यांच्यावर संस्कार करण्याची आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. साहजिकच अनेक शिक्षकांना डिप्रेशन (निराशा) आणि बर्नआउट (अत्याधिक थकवा) यांसारखे मनोविकार जडू लागले आहेत. जर्मनीतल्या थुरिंगिया येथील शिक्षक मंडळाचे अध्यक्ष, रॉल्फ बुश यांनी म्हटले: “जर्मनीतल्या एकूण दहा लाख शिक्षकांपैकी जवळजवळ एक तृतियांश, तणावामुळे आजारी पडतात. ही नोकरी त्यांना पूर्णपणे थकवून टाकते.”

मुलांना मुले होऊ लागलीत

आणखी एक मोठी समस्या म्हणजे षोडशवयीनांची लैंगिकता. अमेरिकन शिक्षकाचे अनुभव या पुस्तकाचे लेखक जॉर्ज एस. मॉरिसन त्या देशाविषयी असे म्हणतात: “जवळजवळ दहा लाख षोडशवयीन (१५-१९ वयोगटातील ११ टक्के मुली) दर वर्षी गरोदर राहतात.” सर्व विकसित देशांपैकी अमेरिकेत षोडशवयीन मुलींचे गरोदर राहण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

आयरस या गोष्टीला दुजोरा देते: “या षोडशवयीन मुलामुलींच्या संभाषणाचा विषय फक्‍त सेक्स आणि पार्ट्यांपुरताच मर्यादित असतो. जणू ते झपाटलेले आहेत. आणि भरीस भर म्हणजे आता शाळेतल्या कम्प्युटर्सवर इंटरनेटची सोय उपलब्ध झाली आहे! म्हणजे चॅट ग्रूप्स आणि अश्‍लील साईट्‌स पाहायला रान मोकळे.” स्पेनच्या मॅड्रिड शहरात राहणारी आन्काल म्हणते: “लैंगिक स्वैराचार ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील वस्तूस्थिती आहे. काही तर अतिशय कमी वयाच्या मुली गरोदर राहिल्याची उदाहरणे आमच्यासमोर आहेत.”

‘मोठेपणा दिलेल्या मोलकरणी’

काही शिक्षकांची आणखी एक तक्रार अशी आहे की आईवडील आपल्या मुलांना घरात शिक्षण देण्याची जबाबदारी पूर्ण करत नाहीत. शिक्षकांच्या मते आईवडिलांनी मुलांचे सर्वात प्रथम शिक्षक बनावे. चांगल्या सवयी आणि शिष्टाचार घरातूनच सुरू झाले पाहिजेत. म्हणूनच अमेरिकन शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा सॅन्ड्रा फेल्डमन म्हणतात की “शिक्षकांना . . . मोठेपणा देऊन त्यांना मुलांची काळजी घेणाऱ्‍या मोलकरणीसारखे वागवण्याऐवजी इतर व्यावसायिकांप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार करणे आवश्‍यक आहे.”

बहुतेकदा आईवडील शाळेतल्या अनुशासनाला सहकार्य देत नाहीत. याआधीच्या लेखात उल्लेख केलेल्या लीमारीझने सावध राहाला! सांगितले: “गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलांविषयी तुम्ही मुख्याध्यापकांकडे तक्रार केली की लगेच आईवडील तुमच्या जिवावर उठतात!” आधी उल्लेख करण्यात आलेल्या बुश यांनी, अशाप्रकारच्या मुलांशी व्यवहार करण्याविषयी म्हटले की “कौटुंबिक संस्कार नाहीसे होत चालले आहेत. बहुतेक मुले चांगल्या कुंटुंबातून आलेली, चांगले संस्कार झालेली आहेत असे आता गृहीत धरून चालता येत नाही.” मेन्डोझा, अर्जेन्टिनाच्या एस्टेलाने म्हटले: “आम्ही शिक्षकच विद्यार्थ्यांना घाबरतो. कमी गुण दिले की ते आम्हाला दगडं फेकून मारतात किंवा आमच्यावर हल्ला करतात. आमच्याजवळ कार असेल तर तिची तोडफोड करतात.”

बऱ्‍याच देशांत शिक्षकांचा दुष्काळ आहे यात आश्‍चर्य ते काय? न्यूयॉर्कच्या कार्नेगी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष वार्टन ग्रेगोरियन यांनी असा इशारा दिला: “आपल्या [अमेरिकेतील] शाळांना पुढच्या दशकात जवळजवळ २५ लाख नव्या शिक्षकांची गरज भासेल.” मोठाल्या शहरांतील शाळा “भारत, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, युरोप आणि सर्व संभाव्य ठिकाणांहून चांगले शिक्षक/शिक्षिका मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.” याचा अर्थ पर्यायाने त्या त्या ठिकाणीही शिक्षकांचा दुष्काळ येईल.

शिक्षकांचा दुष्काळ का?

योशिनोरी ३२ वर्षांचा अनुभव असलेल्या जपानी शिक्षिका आहेत. त्या म्हणतात: “शिक्षकाचे काम हे जपानी समाजात एक थोर, चांगला मोबदला मिळवून देणारे आणि अतिशय आदरणीय कार्य आहे.” पण दुर्दैवाने, हे प्रत्येक समाजाच्या बाबतीत म्हणता येत नाही. याआधी उल्लेख करण्यात आलेल्या ग्रेगोरियन यांनी असेही म्हटले की शिक्षकांना “व्यावसायिक आदर, मान्यता आणि मोबदला मिळत नाही . . . [अमेरिकेतल्या] बहुतेक राज्यांत बॅचलर किंवा मास्टर पदवीची पात्रता लागणाऱ्‍या इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा शिक्षकांना कमी पगार मिळतो.”

अगदी सुरवातीला ज्यांचे शब्द उद्धृत करण्यात आले होते ते केन एल्टस असे लिहितात: “बरीच कमी शैक्षणिक पात्रता लागणाऱ्‍या अनेक नोकऱ्‍या शिक्षकाच्या व्यवसायाच्या तुलनेत बराच जास्त पगार मिळवून देतात हे शिक्षकांना दिसून येते तेव्हा साहजिकच काय होईल? किंवा जेमतेम बारा महिन्यांआधी आपण स्वतः ज्या विद्यार्थ्यांना शिकवले होते . . . तेच विद्यार्थी आपण सध्या कमवत आहोत त्यापेक्षा जास्त किंवा पुढच्या पाच वर्षांत आपण कमवू शकणार नाही इतके कमवू लागले आहेत असे शिक्षकांना आढळते तेव्हा काय होते? साहजिकच यामुळे शिक्षकांना कमीपणा वाटू शकतो.”

विल्यम एयर्स लिहितात: “शिक्षकांना फार कमी पगार मिळतो . . . आम्ही वकीलांच्या मिळकतीपेक्षा सरासरी एक चतुर्थांश, अकाऊंटंटच्या मिळकतीपेक्षा निम्मे, ट्रक चालक आणि शिपयार्ड कामगारांपेक्षाही कमी कमवतो . . . इतर कोणताही असा व्यवसाय नाही जो तुमच्याकडून इतकी मागणी करतो आणि ऐवजात इतका कमी मोबदला मिळवून देतो.” (अध्यापन—एक प्रवास). याच विषयावर भूतपूर्व यु. एस. अटर्नी जेनरल जॅनेट रेनो यांनी २००० सालच्या नोव्हेंबर महिन्यात असे म्हटले: “आपण चंद्रावर माणसांना पाठवू शकतो. . . . आपल्या खेळाडूंना लठ्ठ पगार देतो. मग आपल्या शिक्षकांना आपण चांगला पगार का देऊ शकत नाही?”

लीमारीझ म्हणते “सर्वसामान्यपणे शिक्षकांना कमी पगार दिला जातो. इतकी वर्षे अभ्यास करून, न्यूयॉर्क सिटीसारख्या शहरातील जीवनाचा ताण तणाव सहन करून माझी वार्षिक मिळकत निम्न वर्गातच मोडते.” सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे राहणारी एक शिक्षिका व्हॅलेन्टिना म्हणते: “मिळकतीच्या संदर्भात तरी शिक्षकाच्या नोकरीला कोणी विचारत नाही. त्यांचा पगार पूर्वीपासूनच किमान वेतनश्रेणीपेक्षा कमी होता आणि आहे.” अर्जेन्टिनाच्या शबुट शहरात राहणारी मार्लीन देखील त्याच सुरात म्हणते: “कमी पगार असल्यामुळे नाईलाजाने आम्हाला दोन तीन ठिकाणी काम करणे भाग पडते; एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी जायला खूप धावपळ करावी लागते. यामुळे साहजिकच तितक्या परिणामकारकपणे आम्हाला काम करता येत नाही.” केनियाच्या, नायरोबी शहरात राहणाऱ्‍या आर्थर नावाच्या एका शिक्षकाने सावध राहाला! सांगितले: “अर्थव्यवस्था खालावत चालली आहे आणि एक शिक्षक म्हणून माझे जीवनही काही सोपे नाही. माझे बहुतेक सहकारी या गोष्टीला दुजोरा देतील की कमी पगारामुळे सहसा लोकांना आमच्या व्यवसायात यावेसे वाटत नाही.”

न्यूयॉर्क सिटीची एक शिक्षिका डायना, तासनतास कराव्या लागणाऱ्‍या लेखी कामाविषयी तक्रार करते. दुसऱ्‍या एका शिक्षिकाने लिहिले: “दिवसभर तोच, रटाळ परिपाठ असतो.” बहुतेकांकडून ही तक्रार ऐकायला मिळाली: “हा फॉर्म भर, तो फॉर्म भर—सारा दिवस यातच जातो.”

शिक्षक थोडे, विद्यार्थी फार

जर्मनीच्या ड्युरेन शहरात राहणारी बर्टहोल्ड हिने आणखी एक सामान्य तक्रार सांगितली: “वर्ग फारच मोठे आहेत! काही वर्गात तर ३४ विद्यार्थी आहेत यामुळे आम्ही समस्या असलेल्या विद्यार्थ्यांकडे खास लक्ष देऊ शकत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. वैयक्‍तिक गरजांची दखल घेता येत नाही.”

याआधी जिचे शब्द उद्धृत करण्यात आले होते ती लीमारीझ असे सांगते: “आईवडिलांच्या बेपर्वा वृत्तीशिवाय मागच्या वर्षी माझी सर्वात मोठी समस्या म्हणजे माझ्या वर्गात ३५ मुले होती. सहा वर्षांच्या ३५ मुलांसोबत काम करण्याची कल्पना करून बघा!”

आयरसने म्हटले: “इथे न्यूयॉर्कमध्ये शिक्षकांचा तुटवडा आहे खासकरून गणित व विज्ञानाच्या शिक्षकांचा. त्यांना इतर ठिकाणीही चांगल्या नोकऱ्‍या मिळतात. त्यामुळे शहरातल्या बऱ्‍याच शाळांनी परदेशी शिक्षकांना कामावर घेतले आहे.”

शिक्षकांचे काम काही सोपे काम नाही, हे स्पष्टच आहे. मग कोणती गोष्ट शिक्षकांना प्रेरित करते? ते आपल्या कामात सातत्याने का टिकून राहतात? आमचा शेवटचा लेख हे प्रश्‍न विचारात घेईल. (g०२ ३/८)

[९ पानांवरील संक्षिप्त आशय]

अमेरिकेतील शाळांमध्ये दररोज अंदाजे १,३५,००० बंदुका आणल्या जातात

[१० पानांवरील चौकट/चित्र]

यशस्वी शिक्षकाची ओळख काय?

तुम्ही कोणाला चांगला शिक्षक किंवा चांगली शिक्षिका म्हणाल? मुलांना उत्तम पाठांतर करता यावे आणि त्यांनी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे म्हणून त्यांची स्मरणशक्‍ती वाढवणाऱ्‍याला चांगला शिक्षक म्हणावे का? की मुलांना प्रश्‍न विचारायला, विचार करायला आणि तर्कशक्‍तीचा वापर करायला उत्तेजन देणाऱ्‍याला चांगला शिक्षक म्हणावे? की मुलांना उत्तम नागरिक बनायला जो मदत करतो तो उत्तम शिक्षक असतो?

“विद्यार्थ्याच्या जीवनाच्या लांब आणि खडतर प्रवासात आपण त्याचे सोबती आहोत अशी जेव्हा आम्हा शिक्षकांना जाणीव होते, त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून जेव्हा आम्ही आदर देऊ लागतो, तेव्हा आम्ही उत्तम शिक्षक होण्याच्या मार्गावर पाऊल टाकलेले असते. एका दृष्टीने हे फार सोपे आणि एका दृष्टीने अतिशय कठीण देखील आहे.”—अध्यापन—एक प्रवास (इंग्रजी).

एक चांगला शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याची कुवत ओळखतो आणि तिचा उत्तम उपयोग कसा करता येईल हे त्याला माहीत असते. विल्यम एयर्सने म्हटले: “विद्यार्थ्याची ताकद, अनुभव, कौशल्ये आणि क्षमता वाढीस लावण्याचा अधिक चांगला मार्ग आपल्याला शोधून काढता आला पाहिजे . . . एका अमेरिकन इंडियन जमातीच्या मुलाच्या आईचे उदाहरण मला आठवते. या मुलाला अभ्यासात ‘ढब्बू’ ठरवण्यात आले होते, पण त्याच्या आईने काकुळतीने आम्हाला सांगितले, ‘विन्ड-वुल्फला चाळीसपेक्षा अधिक पक्ष्यांची नावे आणि त्यांच्या स्थलांतराच्या सवयी माहीत आहेत. उत्तम संतुलन असलेल्या गरूड पक्ष्याच्या शेपटीवर १३ पिसे असतात हे त्याला माहीत आहे. त्याला केवळ त्याची क्षमता ओळखणाऱ्‍या शिक्षकाची गरज आहे.’”

प्रत्येक मूल उत्तमरित्या बहरण्यासाठी, त्याला कशात रस आहे, कोणत्या गोष्टी त्याला प्रेरित करतात, किंवा कोणत्या विशिष्ट गोष्टी त्याच्यावर चटकन परिणाम करतात हे शिक्षकाने शोधून काढले पाहिजे. समर्पित शिक्षकाचे मुलांवर प्रेम असणे अनिवार्य आहे.

[चित्राचे श्रेय]

United Nations/Photo by Saw Lwin

[११ पानांवरील चौकट]

शिक्षण नेहमीच मजेदार असले पाहिजे का?

शिक्षक विल्यम एयर्स यांनी शिकवण्याविषयीच्या दहा गैरसमजुतींची यादी केली. त्यांपैकी एक चुकीची समजूत म्हणजे: “चांगला शिक्षक शिक्षणाला एक मजेदार अनुभव बनवतो.” ते पुढे म्हणतात: “मौजमजा ही लक्ष विचलित करणारी, मनोरंजन करणारी असते. विदूषकांना पाहून आपल्याला मजा वाटते. विनोद ऐकायला मजा वाटते. शिकणे मात्र तुम्हाला तल्लीन व्हायला लावते, तुमचे लक्ष एकाग्र करते; ते कधी आश्‍चर्यचकित करणारे तर कधी गोंधळवून टाकणारे आणि बऱ्‍याचदा अतिशय आनंददायक असते. जर ते मजेदार असेल, तर ठीकच आहे. पण ते मजेदार असलेच पाहिजे, असे नाही.” पुढे ते सांगतात: “शिकवण्यासाठी बऱ्‍याच विविध क्षेत्रांतील ज्ञान, कौशल्ये, वाकबगारपणा, निर्णयक्षमता आणि समज लागते—आणि या सगळ्याव्यतिरिक्‍त एक विचारशील, मायाळू व्यक्‍ती असावी लागते.”—अध्यापन—एक प्रवास.

जपानमधील नागोया सिटीचा सुमीओ, त्याच्या विद्यार्थ्यांच्या सर्वात मोठ्या समस्येविषयी असे सांगतो: “उच्च माध्यमिक शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांना फक्‍त मजा करायला आणि ज्यांसाठी फारशी मेहनत घ्यावी लागणार नाही अशा गोष्टी करायला आवडतात.”

ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक सल्लागार असणारी रोझा असे सांगते: “अभ्यास कंटाळवाणा, शिक्षक कंटाळवाणे, अशीच मुलांची सर्वसामान्य प्रवृत्ती दिसून येते. त्यांना वाटते की सगळे काही मौजमजेखातर असते. त्यांना हे कळत नाही की शिक्षणासाठी तुम्ही ज्या प्रमाणात मेहनत घ्याल त्याच प्रमाणात तुम्हाला परिणाम मिळतील.”

हे मौजमजेचे खूळ मुलांना मेहनत घेण्यापासून आणि अभ्यासासाठी त्याग करण्यापासून परावृत्त करते. याआधी ज्याचे शब्द उद्धृत करण्यात आले होते तो सुमिओ म्हणतो: “सर्वात महत्त्वाची वस्तुस्थिती अशी आहे की या मुलांना दीर्घ पल्ल्याचा विचारच करता येत नाही. उच्च माध्यमिक शाळांमध्ये असे फार कमी विद्यार्थी आहेत ज्यांना याची जाणीव आहे की एखाद्या गोष्टीसाठी त्यांनी आता मेहनत घेतली तर भविष्यात त्यांच्या सगळ्या मेहनतीची परतफेड होईल.”

[७ पानांवरील चित्र]

डायना, अमेरिका

[८ पानांवरील चित्र]

‘ड्रग्सचा वापर सर्रास चालतो पण क्वचितच उघडकीस येतो.’—मायकल, जर्मनी

[८, ९ पानांवरील चित्र]

“कुटुंबातला हिंसाचार आणि ड्रग्सची सवय यासंबंधी समस्यांना आम्हाला तोंड द्यावे लागते.”—अमीरा, मेक्सिको

[९ पानांवरील चित्र]

“शिक्षकांना . . . मोठेपणा देऊन मुलांची काळजी घेणाऱ्‍या मोलकरणींसारखे वागवण्याऐवजी त्यांच्याशी इतर व्यावसायिकांप्रमाणे व्यवहार करण्याची गरज आहे.”—सॅन्ड्रा फेल्डमन, अमेरिकन शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा