शिक्षक समाजाला त्यांची गरज का आहे?
शिक्षक समाजाला त्यांची गरज का आहे?
“हजार दिवस कसून अभ्यास करण्यापेक्षा आदर्श शिक्षकासोबत एक दिवस घालवणे अधिक श्रेयस्कर आहे.”—जपानी सुभाषित.
शाळेतले कोणते शिक्षक अथवा शिक्षिका तुम्हाला आठवतात का, ज्यांची अद्यापही तुमच्या मनावर छाप आहे? किंवा तुम्ही अजून शिकत असल्यास, तुमचे कोणी आवडते शिक्षक अथवा शिक्षिका आहेत का? ते तुम्हाला का आवडतात?
आदर्श शिक्षक विद्यार्थ्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण करून शिक्षणाला एका मनोरंजक आव्हानाचे रूप देतात. भारतात राहणारे एक मध्यमवयीन व्यापारी, कोलकत्यातील आपल्या शाळेतल्या इंग्रजी शिक्षकांची मोठ्या प्रेमाने आठवण सांगतात. “मिस्टर ससूनची शिकवण्याची पद्धत अप्रतिम होती. त्यांनी माझ्या मनात इंग्रजी भाषेबद्दल प्रेम तर निर्माण केलंच पण त्यांनी माझ्यात स्वाभिमान देखील उत्पन्न केला. बऱ्याचदा, मी लिहिलेले सर्वात चांगले उतारे ते निवडायचे, त्यांवर आणखी थोडे ‘पॉलिशिंग’ करायचे आणि निरनिराळ्या वृत्तपत्रांना व मासिकांना हे निबंध पाठवायचे. काही लेख नाकारण्यात आले पण इतर काही लेख स्वीकारले गेले. वृत्तपत्रांकडून मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा आपण लिहिलेला लेख छापला गेला याचे मला खूप अप्रूप वाटायचे आणि यामुळे मला आपल्या लिखाणाविषयी आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत मिळाली.”
जर्मनीतल्या म्युनिक शहरात राहणाऱ्या, पन्नाशीतल्या मार्गिट नावाच्या एका स्त्रीने म्हटले: “मला आमच्या एक बाई खूप आवडायच्या. अगदी कठीणातल्या कठीण गोष्टीसुद्धा त्या अगदी सोप्या करून सांगायच्या. काही समजलं नाही तर लगेच प्रश्न विचारा, असं त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. त्या कधीही आमच्याशी बाईंसारख्या वागल्या नाहीत, उलट त्या आम्हाला मैत्रिणीसारख्या होत्या. त्यामुळे आम्हाला त्यांच्या वर्गात खूप मजा यायची.”
ऑस्ट्रेलियाचा पीटर आपल्या गणिताच्या सरांविषयी सांगतो, “व्यावहारातली उदाहरणे देऊन, आम्ही शिकत असलेली माहिती वास्तविकतेला कशाप्रकारे समर्पक आहे हे समजून घेण्यास ते मदत करायचे. त्रिकोणमिती शिकवताना त्यांनी आम्हाला एखाद्या इमारतीची उंची, त्या इमारतीला हातसुद्धा न लावता, केवळ त्रिकोणमितीच्या तत्त्वांच्या आधारावर कशी मोजायची हे दाखवलं. मला आठवतं, हे इमारतीचं उदाहरण त्यांनी समजावून सांगितलं तेव्हा मी मनातल्या मनात म्हणालो, ‘व्वा, क्या बात है!’”
उत्तर इंग्लंडमध्ये राहणाऱ्या पॉलीनने आपल्या सरांजवळ कबूल केले, की तिला “गणित खूपच कठीण जातं.” त्यांनी विचारले: “तुला तुझं गणित सुधारायचं आहे का? मी तुला मदत करायला तयार आहे.” ती पुढे सांगते, “पुढचे काही महिने त्यांनी माझ्याकडे खास लक्ष दिलं, शाळेनंतरही ते मला मदत करायचे. मला यश मिळावं असं त्यांना मनापासून वाटत होतं हे मला माहीत होतं, त्यांना माझी काळजी होती. ही जाणीव झाली तेव्हापासून मी अधिकच मेहनतीने अभ्यास करू लागले आणि खरंच माझं गणित सुधारलं.”
स्कॉटलंडची ॲन्जी आता तिशीत आहे. ती आपल्या इतिहासाच्या शिक्षकांविषयी, मि. ग्रहॅमविषयी सांगते, “ते इतिहास अगदी रंगवून सांगायचे; प्रत्येक घटना ते गोष्टींच्या रूपात सांगायचे आणि प्रत्येक विषयाबद्दल अतिशय उत्साहाने बोलायचे. सगळं कसं प्रत्यक्ष पाहतोय असं वाटू लागायचं.” पहिल्या वर्गातल्या मिसेस ह्युइट या वयस्क बाईंविषयीही तिच्या अतिशय प्रेमळ आठवणी आहेत. “त्या अतिशय गोड आणि मायाळू होत्या. एकदा मी वर्गात त्यांना काहीतरी विचारायला गेले. त्यांनी काय करावं? चक्क मला कडेवर उचलून घेतलं. या बाईंना आपल्यावर खरोखर प्रेम आहे असं मला जाणवलं.”
दक्षिण ग्रीसच्या तिमथीने या शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. “मला विज्ञानाचे सर अजूनही आठवतात. त्यांनी, जगाकडे आणि जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून टाकला. वर्गात ते प्रचंड विस्मयाचं आणि आश्चर्याचं वातावरण निर्माण करायचे. त्यांनी आमच्या मनात ज्ञानाविषयी ऊर्मी आणि बुद्धीविषयी प्रेम जागृत केलं.”
अमेरिकेतील कॅलिफोर्नियाची रामोना हिचे उदाहरण पाहा. ती लिहिते: “माझ्या हायस्कूलच्या शिक्षिकेला इंग्रजी भाषेवर प्रेम होतं. त्यांचा उत्साह इतका प्रचंड होता की त्यांच्या वर्गात कोणी निरुत्साही राहूच शकत नव्हतं! त्या शिकवू लागल्या की कठीण विषय देखील सोपा वाटू लागायचा.”
कॅनडाची जेन आपल्या शारीरिक शिक्षणाच्या सरांविषयी अतिशय उत्साहाने सांगते. “मौज करता करता नवीन गोष्टी शिकण्याच्या कितीतरी कल्पना त्यांच्याजवळ होत्या. ते आम्हाला निरनिराळ्या ठिकाणी सहलीला न्यायचे; बर्फावरून घसरण्याच्या स्पर्धांविषयी तसेच बर्फाच्छादित नदीत मासे कसे पकडायचे हे त्यांनीच आम्हाला पहिल्यांदा शिकवलं. एकदा तर आम्ही स्वतः चूल पेटवून त्यावर
बॅनॉक, म्हणजे इंडियन जमाती बनवतात त्यासारखा एक प्रकारचा ब्रेडसुद्धा बनवला होता. चार भिंतींआड राहणाऱ्या, सदा पुस्तकात नाक खुपसून बसणाऱ्या माझ्यासारख्या मुलीसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव होता!”हेलन ही एक लाजरीबुजरी स्त्री आहे. तिचा जन्म शांघाय येथे आणि शालेय शिक्षण हाँगकाँगला झाले. ती सांगते: “पाचवीत आमचे एक सर होते, मि. चन. ते आम्हाला शारीरिक शिक्षण आणि पेन्टिंग शिकवायचे. मी कृश बांध्याची होते त्यामुळे व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यांसारखे खेळ मला जमत नव्हते. त्यांनी कधीही याविषयी मला इतरांसमोर हिणवले नाही. उलट, बॅडमिन्टन आणि माझी शरीरयष्टी ज्यांसाठी योग्य होती असे इतर खेळ ते मला खेळू द्यायचे. ते खूप समजूतदार आणि प्रेमळ होते.
“तसेच पेन्टिंगच्या वर्गात, मला वस्तू आणि व्यक्तींच्या आकृती काढणे जमत नव्हते. पण कलात्मक डिझाईन्स काढण्याची मला हौस होती त्यामुळे ते मला तशी चित्रं काढू द्यायचे. मी इतर विद्यार्थ्यांपेक्षा वयानं लहान असल्यामुळे, त्याच वर्गात आणखी एक वर्ष राहणं चांगले राहील अशी त्यांनी माझी खात्री पटवली. हे माझ्या शालेय जीवनातलं सर्वात निर्णायक पाऊल होतं. माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला आणि माझी चांगली प्रगती होऊ लागली. मी सदैव त्यांची ऋणी राहीन.”
कोणत्या प्रकारच्या शिक्षकांचा मुलांवर सर्वाधिक प्रभाव पडतो? विल्यम एयर्स यांनी अध्यापन—एक प्रवास (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात या प्रश्नाचे अशाप्रकारे उत्तर दिले: “आदर्श शिक्षक तो असतो जो विचारशील, प्रेमळ असतो आणि मुलांच्या जीवनाला आकार देण्याकरता त्याने स्वतःला वाहून घेतलेले असते. . . . आदर्श अध्यापन हे केवळ विशिष्ट कार्यपद्धती, योजना किंवा कृतींपुरते मर्यादित नाही. . . . शिकवणे हा मुळात प्रेमाचा मामला आहे.” मग यशस्वी शिक्षक कोणाला म्हणता येईल? ते सांगतात: ‘ज्यांनी तुमच्या हृदयाला स्पर्श केला, ज्यांनी तुम्हाला समजून घेतले, तुमच्यात वैयक्तिकरित्या रस घेतला, एखाद्या विषयातील—मग ते संगीत असो, गणित, लॅटिन किंवा पतंग असोत—या विषयांतील ज्यांचा अनावर उत्साह तुमच्यातही चैतन्य उत्पन्न करत होता, अशाच शिक्षकांना खऱ्या अर्थाने यशस्वी म्हणता येईल.’
बऱ्याच शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडूनही कित्येकदा कृतज्ञतेचे उद्गार ऐकायला मिळाले असतील यात शंका नाही; आणि यामुळे त्यांना कितीही समस्यांना तोंड द्यावे लागले तरीसुद्धा शिकवत राहण्याचे प्रोत्साहन मिळाले असेल. यांपैकी बहुतेक प्रशंसोद्गारांत वारंवार उल्लेख केल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्याबद्दल दाखवलेली कळकळ आणि प्रेम.
अर्थात सगळेच शिक्षक या सकारात्मक वृत्तीने शिकवत नाहीत. शिवाय, त्यांनासुद्धा अनेक दबावांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे इच्छा असूनही ते विद्यार्थ्यांसाठी करावे तितके करू शकत नाहीत. मग प्रश्न असा उद्भवतो, की लोक इतका आव्हानात्मक पेशा का निवडतात?
(g०२ ३/८)
[४ पानांवरील चित्र]
“शिकवणे हा मुळात प्रेमाचा मामला आहे”