उच्च रक्तदाब टाळण्याचे व नियंत्रणात ठेवण्याचे उपाय
उच्च रक्तदाब टाळण्याचे व नियंत्रणात ठेवण्याचे उपाय
ब्राझीलमधील सावध राहा! नियतकालिकाच्या लेखकाकडून
मॅरियन एकदम घाबरली होती! तिच्या नाकातून अचानक रक्त येऊ लागले होते आणि ते थांबत नव्हते. “मी नक्की मरणार असंच मला तेव्हा वाटलं,” असे ती आठवून सांगते. डॉक्टरांनी मॅरियनला सांगितले की, उच्च रक्तदाबामुळे (धमनी अतिरिक्त रक्तदाब) तिच्या नाकातून रक्त वाहू लागले होते. मॅरियन म्हणते, “पण मला तर काही त्रास होत नव्हता. पुष्कळ लोकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत त्यामुळे त्यांना उच्च रक्तदाब आहे हे कळत नाही.”
तुमच्या रक्तदाबाविषयी काय? तुमच्या सध्याच्या जीवनशैलीमुळे पुढे तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता आहे का? रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? *
रक्तदाब म्हणजे रोहिणीभित्तीवर पडणारा रक्ताचा दाब. एका फुगणाऱ्या रबरी पिशवीने हे मापता येते; ही पिशवी दंडावर गुंडाळली जाते व दाब मापणाऱ्या एका उपकरणाला जोडलेली असते. यातून दोन आकडे नोंदले जातात. उदाहरणार्थ, १२०/८०. पहिल्या आकड्याला आकुंचक रक्तदाब म्हणतात कारण हृदयाचा ठोका बसतो (आकुंचन) तेव्हाच्या रक्तदाबाला तो सूचित करतो आणि दुसऱ्या आकड्याला प्रसरणात्मक रक्तदाब म्हणतात कारण हृदय सैल पडते (प्रसारण) तेव्हाच्या रक्तदाबाला तो सूचित करतो. रक्तदाब हे पाऱ्याच्या मिलीमीटरमध्ये मोजले जाते आणि रक्तदाब १४०/९० पेक्षा वर असेल तर त्या रुग्णांना अतिरिक्त रक्तदाब असलेले असे मानले जाते.
रक्तदाब कशामुळे वाढतो? तुम्ही बागेला पाणी घालत आहात अशी कल्पना करा. तुम्ही नळ जोरात सोडला किंवा पाईपला लहान तोंडाची तोटी बसवली तर पाण्याचा दाब वाढतो. रक्तदाबाच्या बाबतीतही असेच घडते: रक्तप्रवाह वाढला किंवा रक्तवाहिनीचा व्यास कमी झाला तरी रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाब कसा निर्माण होतो? याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.
तुमच्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टी
संशोधकांना हे आढळले आहे की, कोणा व्यक्तीच्या नातलगांना उच्च रक्तदाब असल्यास त्या व्यक्तीलाही हा आजार होण्याची अधिक शक्यता असते. आकडेवारी दाखवते की, द्विबीज जुळ्यांपेक्षा समरूप जुळ्यांमध्ये अतिरिक्त रक्तदाबाचे प्रमाण जास्त असते. एका अभ्यासात, “धमनी अतिरिक्त रक्तदाबाला कारणीभूत असलेल्या जनुकांचा शोध” लावण्याविषयी सांगितले आहे, ज्यावरून उच्च रक्तदाबाला अनुवांशिक घटक जबाबदार आहे याला पुष्टी मिळू शकते. असामान्य उच्च रक्तदाबाचा धोका वयोमानानुसार वाढत जातो आणि काळ्या पुरुषांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे असेही म्हटले जाते.
तुमच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टी
आहाराच्या बाबतीत जरा जपून! काही लोकांना, खासकरून मधुमेही, तीव्र स्वरूपाचा अतिरिक्त रक्तदाब असलेले, वृद्ध लोक आणि काही आफ्रिकन लोक यांचा मीठामुळे (सोडियम) रक्तदाब वाढतो. रक्त प्रवाहात जादा चरबी असेल तर रोहिणीभित्तीवर आतून कॉलेस्टरॉलचा थर निर्माण होऊन रोहिणींचा व्यास कमी होऊ शकतो आणि रक्तदाब वाढू शकतो. आदर्श शरीर वजनापेक्षा ज्यांचे वजन ३० टक्के
जास्त आहे त्यांना उच्च रक्तदाब होऊ शकतो. अभ्यासांतून असे सूचित होते की, पोटॅशियम आणि कॅल्शियमचे प्रमाण वाढवल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो.धूम्रपानाचा रोहिणीविलेपीविकार, मधुमेह, हार्ट अटॅक आणि पक्षघात यांचा धोका वाढण्याशी संबंध आहे. त्यामुळे, धूम्रपान आणि उच्च रक्तदाब हा घातक संयोग आहे ज्यामुळे हृदयविकार होऊ शकतात. पुरावा परस्परविरोधी असला तरीही कॉफी, चहा आणि कोला ड्रिंक्समध्ये असलेले कॅफेन आणि भावनिक व शारीरिक तणाव यांमुळेही उच्च रक्तदाब अधिक वाढू शकतो. त्याचप्रमाणे, शास्त्रज्ञांना हे ठाऊक आहे की, मद्याचे अतिसेवन किंवा दीर्घकालीन सवय तसेच व्यायामाचा अभाव यांमुळे रक्तदाब वाढू शकतो.
निरोगी जीवनशैली
उच्च रक्तदाबाचा विकार होईपर्यंत थांबणे आणि नंतर सकारात्मक पावले उचलणे ही मोठी चूक ठरेल. निरोगी जीवनशैली ठेवण्याचा विचार तरुण वयापासूनच केला पाहिजे. आता काळजी घेतल्याने भविष्यातले जीवन उत्कृष्ट बनू शकेल.
धमनी अतिरिक्त रक्तदाबावरील तिसरे ब्राझीलियन सर्वानुमत यामध्ये धमनी रक्तदाब कमी करणाऱ्या जीवनशैलीतील बदलांविषयी सांगितले होते. उच्च किंवा सामान्य रक्तदाब असलेल्या लोकांकरता यात मदतदायी मार्गदर्शन दिले आहे.
संशोधकांचे म्हणणे आहे की, स्थूल लोकांनी कमी कॅलरींचा संतुलित आहार घ्यावा, तत्काळ वजन घटवणारे “चमत्कारिक” आहार टाळावेत तसेच साधारण शारीरिक व्यायामाचा नित्यक्रम ठेवावा. मीठाच्या बाबतीत त्यांनी असे सांगितले की, प्रति दिवशी सहा ग्रॅम किंवा एक छोटा चमचा मीठ यापेक्षा जास्त घेऊ नये. * त्याचा अर्थ, जेवणामध्ये मीठाचा वापर कमीतकमी करणे त्याचप्रमाणे डबाबंद अन्न, थिजवलेले मांसाचे प्रकार (सलामी, हॅम, सॉसेज वगैरे) आणि भाजलेले अन्न यांचा वापरही कमीत कमी करणे. जेवणात वरून मीठ घालण्याचे बंद करणे आणि कोणतेही तयार अन्न विकत घेताना त्यातील मीठाचे प्रमाण पाहणे याद्वारे मीठाचे प्रमाण कमी केले जाऊ शकते.
ब्राझीलियन सर्वानुमतामध्ये, पोटॅशियमचा वापर अधिक करण्यासही सांगण्यात आले कारण त्याचा “अतिरिक्त रक्तदाबावर प्रतिरोधक परिणाम” होऊ शकतो. असे असल्यामुळे, निरोगी आहारात “सोडियमचे कमी प्रमाण असलेले व पोटॅशियमचे अधिक प्रमाण असलेले अन्न” जसे की, कडधान्य, *
हिरव्या पालेभाज्या, केळी, कलिंगड, गाजर, बीट, टमाटे आणि नारंगी यांचा समावेश झाला पाहिजे. मद्यसेवनही माफक प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे. काही संशोधकांनुसार, अतिरिक्त रक्तदाब असलेल्या पुरुषांनी दर दिवशी ३० मिलीलीटर आणि स्त्रियांनी व कमी वजन असलेल्यांनी १५ मिलीलीटर मद्यापेक्षा जादा घेऊ नये.ब्राझीलियन सर्वानुमताने असा निष्कर्ष काढला की, नियमित शारीरिक व्यायाम केल्याने रक्तदाब कमी होतो आणि त्यामुळे धमनी अतिरिक्त रक्तदाब विकार होण्याचा धोका कमी होतो. आठवड्यातून तीन ते पाच वेळा ३० ते ४५ मिनिटे चालणे, सायकल चालवणे आणि पोहणे अशा माफक प्रमाणात केलेल्या एरोबिक व्यायामाने फायदा होता. * धूम्रपान बंद करणे, रक्तातील मेदाच्या (कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लीसराईड्स) प्रमाणावर आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवणे, पुरेशा प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम घेणे, शारीरिक आणि भावनिक तणाव नियंत्रणात ठेवणे या गोष्टी अधिक निरोगी जीवनशैलीशी संबंधित आहेत. काही औषधांमुळे जसे की, बंद नाक मोकळे करणारी औषधे, सोडियमचे अधिक प्रमाण असलेली पित्तशामक औषधे, भूक कमी करणारी औषधे आणि कॅफेनचा समावेश असलेली मायग्रेनवरील वेदनाशामक औषधे यांमुळेही रक्तदाब वाढू शकतो.
तुम्हाला धमनी अतिरिक्त रक्तदाबाचा विकार असल्यास, तुमच्या व्यक्तिगत गरजांनुसार तुमच्या आहाराबद्दल व सवयींबद्दल सल्ला देण्यास तुमचे डॉक्टर सर्वात योग्य व्यक्ती असतील. तथापि, प्रत्येकाची परिस्थिती कशीही असली तरी सुरवातीपासूनच निरोगी जीवनशैली ठेवल्याने केव्हाही फायदाच होतो; हा फायदा केवळ अतिरिक्त रक्तदाब असलेल्यांनाच नव्हे तर कुटुंबातल्या सर्वांनाच होतो. या लेखाच्या सुरवातीला जिच्याविषयी सांगितले होते त्या मॅरियनला स्वतःच्या जीवनशैलीत बदल करावे लागले. सध्या ती औषधे घेत आहे आणि आरोग्य समस्या असतानाही सामान्य जीवन जगत आहे. तुमच्याबद्दल काय? सर्वांना निरोगी जीवन प्राप्त होईल आणि “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही” त्या काळाची वाट पाहत असता तुमच्या रक्तदाबावर नियंत्रण ठेवा!—यशया ३३:२४. (g०२ ४/८)
[तळटीपा]
^ कोणताही उपचार एका व्यक्तीचा व्यक्तिगत निर्णय आहे हे ओळखून सावध राहा! कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या उपचाराची शिफारस करत नाही.
^ तुम्हाला धमनी अतिरिक्त रक्तदाब किंवा हृदय, यकृत अथवा मृत्रपिंडाचा विकार असल्यास व त्यावर उपचार चालू असल्यास दररोज किती प्रमाणात सोडियम आणि पोटॅशियम घ्यावे याविषयी आपल्या डॉक्टरांना विचारा.
^ तीस मिलीलीटर मद्य म्हणजे ६० मिलीलीटर डिस्टील्ड ड्रिंक्स (विस्की, व्होडका आणि इतर पेय), २४० मिलीलीटर वाईन किंवा ७२० मिलीलीटर बिअर.
^ तुमच्याकरता व्यायामाचा नित्यक्रम किती आवश्यक आहे याविषयी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा,
[१६ पानांवरील चौकट]
उच्च रक्तदाबाचा सामना
१. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदतदायी ठरणारे उपाय
• वजन कमी करा
• आहारात मीठाचे प्रमाण कमी करा
• पोटॅशियमची अधिक मात्रा असलेले अन्न खा
• मद्यसेवन कमी करा
• नियमित व्यायाम करा
२. रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत करणारे इतर उपाय
• अतिरिक्त प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम संपुरके घेणे
• तंतूमय पदार्थ अधिक असलेला शाकाहारी आहार
• तणाव घालवण्यासाठी उपचार
३. संबंधित उपाय
• धूम्रपान थांबवणे
• कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे
• मधुमेहावर नियंत्रण ठेवणे
• रक्तदाब वाढवणारी औषधे टाळणे
[चित्राचे श्रेय]
धमनी अतिरिक्त रक्तदाबावरील तिसरे ब्राझीलियन सर्वानुमत यावर आधारित—रव्हिस्टा ब्राझीलेरा दे क्लिनिका ॲण्ड टेराप्युटीका.
[१७ पानांवरील चित्रे]
नियमित व्यायाम आणि सकस आहारामुळे उच्च रक्तदाब टाळता व नियंत्रणात ठेवता येऊ शकतो