व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिश्‍चनांनी देवाकडून संरक्षण मिळण्याची अपेक्षा करावी का?

ख्रिश्‍चनांनी देवाकडून संरक्षण मिळण्याची अपेक्षा करावी का?

बायबलचा दृष्टिकोन

ख्रिश्‍चनांनी देवाकडून संरक्षण मिळण्याची अपेक्षा करावी का?

देवाकडे आपल्या उपासकांना संकटातून वाचवण्याची शक्‍ती आहे, याबद्दल बायबलमध्ये पुष्कळदा उल्लेख केला आहे. राजा दावीद म्हणाला: “हे परमेश्‍वरा, मला दुष्ट मनुष्यापासून सोडीव; जुलमी मनुष्यापासून माझे रक्षण कर.” (स्तोत्र १४०:१) आज देवाचे अनेक उपासक हिंसा, गुन्हेगारी किंवा नैसर्गिक आपत्तींमधून थोडक्यात वाचले आहेत. त्या वेळी देवाने त्यांचे चमत्कारिकरित्या संरक्षण केले की काय असे त्यांना वाटले आहे कारण दुसरीकडे पाहता, देवाला भिऊन वागणाऱ्‍यांना मोठ्या विपत्तींचा सामना करावा लागला आहे, इतकेच नव्हे तर काहीजण हिंसकरित्या ठारही झाले आहेत.

यहोवा देव काहींना संरक्षण देतो आणि काहींना देत नाही असे आहे का? आज हिंसा आणि विपत्तींमधून चमत्कारिकरित्या वाचवले जाण्याची अपेक्षा आपण करावी का?

बायबलच्या वृत्तान्तांमधील चमत्कारिक संरक्षण

बायबलमध्ये असे अनेक वृत्तान्त आहेत ज्यामध्ये देवाने आपल्या उपासकांना चमत्कारिकरित्या वाचवले. (यशया ३८:१-८; प्रेषितांची कृत्ये १२:१-११, १६:२५, २६) इतर वेळी यहोवाच्या सेवकांना संकटापासून संरक्षण मिळाले नाही याविषयी देखील शास्त्रवचनांमध्ये सांगितले आहे. (१ राजे २१:१-१६; प्रेषितांची कृत्ये १२:१, २; इब्री लोकांस ११:३५-३८) यावरून स्पष्ट होते की, विशिष्ट कारणाने किंवा उद्देशाने यहोवाने ठरवले तर तो संरक्षण देऊ शकतो. त्यामुळे, ख्रिश्‍चनांना संकटातून सुटका मिळाली नाही तर देवाने त्यांना त्यागले आहे असे त्यांनी समजू नये. आपण ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे की, संकटे येत राहतील; यहोवाचे सेवक देखील त्यातून सुटलेले नाहीत. पण हे असे का आहे?

देवाच्या विश्‍वासू सेवकांवर संकटे का येतात

एक कारण म्हणजे सर्वांना आदाम आणि हव्वेपासून पाप व अपरिपूर्णता वारशात मिळाली. त्यामुळे, वेदना, दुःख आणि मृत्यू हे सर्वांच्याच वाट्याला आले. (रोमकर ५:१२; ६:२३) दुसरे कारण म्हणजे आपण शेवटल्या काळात जगत आहोत. आपल्या काळातली माणसे, “ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी” आहेत असे बायबल म्हणते. (२ तीमथ्य ३:१-५) आज बलात्कार, अपहरण, खून आणि इतर क्रूर गुन्हे किती सर्रासपणे होत आहेत यावरून याचा पुरावा मिळतो.

देवाचे अनेक विश्‍वासू सेवक हिंसक लोकांमध्ये राहतात व वावरतात आणि काही वेळा ते त्यांचे लक्ष्य बनतात. कधी कधी, फक्‍त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे आपण एखाद्या धोकेदायक परिस्थितीत अडकतो. शिवाय, “समय व प्रसंग हे सर्वांना घडतात” या शलमोनाच्या शब्दांची सत्यता आपल्या प्रत्ययास येते.—उपदेशक ९:११, पं.र.भा.

तसेच, प्रेषित पौलाने सांगितले की, ख्रिस्ती लोक देवाची उपासना करत असल्यामुळे त्यांना छळाचा सामना करावा लागतो. तो म्हणाला: “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्‍तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.” (२ तीमथ्य ३:१२) अलीकडील वर्षांत अनेक देशांमध्ये हे घडत आहे.

त्यामुळे, हिंसा, गुन्हेगारी, नैसर्गिक आपत्ती किंवा अपघाती मरण या गोष्टींपासून देवाला भिऊन वागणारे लोक मुक्‍त नाहीत. सैतानाचा दावा असा आहे की, यहोवाने त्याच्या लोकांभोवती कुंपण घातले आहे म्हणूनच त्यांना कसलीही इजा होत नाही. (ईयोब १:९, १०) पण हे खरे नाही. परंतु एवढे मात्र निश्‍चित आहे की, यहोवा कोणालाही एखाद्या परिस्थितीतून चमत्कारिकरित्या वाचवत नसला तरी तो आपल्या लोकांना संरक्षण देतो.

आज यहोवा आपल्या लोकांना संरक्षण कसे देतो

यहोवा आपल्या वचनाद्वारे ईश्‍वरी मार्गदर्शन पुरवतो जे त्याच्या लोकांना संरक्षण देते. आधात्मिकता आणि बायबलचे ज्ञान आपल्याला उत्तम निर्णयशक्‍ती आणि योग्य विचारशक्‍ती देते ज्यामुळे अनावश्‍यक चुका टाळता येतील आणि सुज्ञ निर्णय घेता येतील. (स्तोत्र ३८:४; नीतिसूत्रे ३:२१; २२:३) उदाहरणार्थ, लैंगिक नैतिकता, लोभ, क्रोध आणि हिंसा यांवरील बायबलचा सल्ला ऐकल्याने ख्रिश्‍चनांना अनेक संकटांपासून संरक्षण प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे, वाईट लोकांशी जवळीक न ठेवल्यामुळे, आपण चुकीच्या ठिकाणी असणार नाही व अशाप्रकारे संकट टाळू. (स्तोत्र २६:४, ५; नीतिसूत्रे ४:१४) बायबलच्या तत्त्वांनुसार जे चालतात ते उत्तम जीवन जगतात आणि यामुळे सहसा ते मानसिक व शारीरिकरित्या सुस्थितीत असतात.

पण देवाने संकटांना अनुमती दिली असली तरी, त्या संकटांना तोंड देण्यासाठी तो आपल्या सेवकांना शक्‍ती देतो ही गोष्ट जाणणे अतिशय सांत्वनदायक आहे. प्रेषित पौल आपल्याला अशी शाश्‍वती देतो की, “देव विश्‍वसनीय आहे तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्‍यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.” (१ करिंथकर १०:१३) संकटांना तोंड देण्यासाठी आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ दिले जाईल असेही बायबल वचन देते.—२ करिंथकर ४:७.

देव स्वतःच्या इच्छेप्रमाणे करतो

प्रत्येक संकटातून देवाने आपल्याला चमत्कारिकरित्या वाचवावे अशी अपेक्षा ख्रिश्‍चनांनी करावी का? अशा अपेक्षेला बायबलच्या वृत्तान्तात आधार मिळत नाही.

अर्थात, यहोवा देवाने ठरवले तर तो आपल्या कोणत्याही सेवकांसाठी थेटपणे हस्तक्षेप करू शकतो. आणि ईश्‍वराने नुकसान होण्यापासून आपल्याला संरक्षण दिले असा कोणाचा विश्‍वास असल्यास आपण त्याची टीका करू नये. परंतु, यहोवाने काही मदत करायचे ठरवले नाही तर याचा अर्थ तो असंतुष्ट आहे असे कधीही समजू नये.

आपण ही शाश्‍वती बाळगू शकतो की, आपल्यावर कोणतेही संकट आले किंवा कठीण परिस्थिती आली तर, ती परिस्थिती दूर करून, तिला तोंड द्यायला शक्‍ती देऊन किंवा आपला मृत्यू झालाच तर त्याच्या नवीन जगात सार्वकालिक जीवनासाठी पुनरुत्थित करून यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांना संरक्षण पुरवेल.—स्तोत्र ३७:१०, ११, २९; योहान ५:२८, २९. (g०२ ४/८)