व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

दिरंगाई आणि आरोग्य

“दिरंगाईचा तुमच्या आरोग्यावर उलट परिणाम होऊ शकतो,” असे व्हॅन्कूव्हर सन नावाच्या एका बातमीपत्रातील अभ्यासात म्हटले होते. कॅनडातील टोरंटो येथे अलीकडेच अमेरिकन सायकॉलॉजी सोसायटीने भरवलेल्या एका परिषदेत, २०० कॅनडियन विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर केलेला अभ्यास सादर करण्यात आला. त्यात असे दिसून आले, की “दिरंगाई करण्याची सवय असणाऱ्‍यांनी, एखादे काम उशिरा करण्याद्वारे स्वतःवर इतका दबाव टाकला, की त्यांना इतर आजारांव्यतिरिक्‍त तणावाशी संबंधित असलेले आजार जडले. . . . परिक्षेची तारीख जसजशी जवळ येत राहिली तसतसे या लोकांमध्ये तणावाचे प्रमाण तेजीने वाढले. त्यांच्यात नेहमीच्या मनमौजी वृत्तीऐवजी डोकेदुखी, पाठदुखी, सर्दी, झोपेच्या समस्या, ॲलर्जी यांसारख्या त्रासांचे प्रमाण वारंवार दिसून येऊ लागले. याशिवाय, श्‍वसनाच्या समस्या, संसर्ग आणि अर्धशिशी (मायग्रेन) हा देखील त्रास त्यांना सुरू झाला.” (g०२ ४/८)

आर्क्टिकची धोक्याची सूचना

“पृथ्वीग्रहाच्या नाजूक आर्क्टिक प्रदेशातील ८० टक्के भाग, तेथील औद्योगिक विकास कमी झाला नाही तर या शतकाच्या मध्यापर्यंत गंभीररीत्या नष्ट होऊ शकतो,” असे कॅनडाच्या द ग्लोब ॲण्ड मेल वृत्तपत्राने म्हटले. युएन पर्यावरण कार्यक्रमाने दिलेला अहवाल, संपूर्ण आर्क्टिक प्रदेशावर होणाऱ्‍या मानवी विकासाच्या वाढत जाणाऱ्‍या परिणामांवर विवेचन मांडतो. अहवालानुसार, हा औद्योगिक विकास १९४० पासून १९९० पर्यंत ज्या तेजीने होत गेला त्याच तेजीने जर पुढेही होत राहिला तर त्याचे परिणाम अतिशय विनाशकारक ठरतील. असे म्हटले जाते, की ही हानी इतर ठिकाणी देखील पसरण्याची शक्यता आहे कारण आर्क्टिक प्रदेशातील पुष्कळ प्राणी स्थलांतर करणारे आहेत. वृत्तपत्र पुढे म्हणते: “औद्योगिक विकासाचा परिणाम नाहीतरी जगाच्या आर्क्टिक प्रदेशावर १० ते १५ टक्क्यांनी झालेलाच आहे.” (g०२ ३/२२)

“धर्म दुय्यम स्थानावर”

ब्राझीलच्या गरीब लोकांच्या अलीकडेच घेतलेल्या एका सर्व्हेत दिसून आले, की ६७ टक्के लोक कॅथलिक असल्याचा दावा करत असले तरी, केवळ ३५ टक्के लोक, येशू, मरीया आणि इतर चर्च शिकवणुकींवर मनापासून विश्‍वास करतात. त्याहूनही कमी लोक—केवळ ३० टक्के—दर आठवडी चर्चला जातात. ब्राझीलमधील बिशपांच्या राष्ट्रीय परिषदेने नेमण्यात आलेल्या या सर्व्हेत हेही दाखवण्यात आले, की पुष्कळ लोकांचे, लग्नाआधीचे संबंध (४४ टक्के), घटस्फोट (५९ टक्के), पुनर्विवाह (६३ टक्के) आणि गर्भनिरोधकांचा वापर (७३ टक्के) यांविषयी असलेल्या चर्चच्या शिकवणींबद्दल दुमत आहे. सेवेरिनो विन्सेंट नावाच्या धर्मविद्वानानुसार, पाळकांचा तुटवडा, ब्राझीलच्या शैक्षणिक व्यवस्थेवर चर्चचा कमी होत चाललेला प्रभाव आणि धर्मसिद्धांतांची वरवर शिकवण, या कारणांमुळे चर्चचा आपल्या लोकांवरील पगडा ढिला पडत चालला आहे. ते म्हणतात: “कॅथलिकांच्या नवीन पिढीला सापेक्षतावादाची शिकवण मिळत आहे व धर्म दुय्यम स्थानावर येतो, अशी या नवीन पिढीची धारणा आहे.” (g०२ ३/८)

डुलकीची कमाल

लॉफब्रो विद्यापीठातील ब्रिटिश निद्रा तज्ज्ञ, प्राध्यापक जिम हॉर्न यांच्या मते, दुपारी येणाऱ्‍या गुंगीवर प्रभावशाली उपाय म्हणजे, “फक्‍त दहा मिनिटांची डुलकी घेणे,” असे लंडनच्या द टाईम्सने वृत्त दिले. “हे एखाद्या उपचारासारखेच आहे: तुम्हाला जास्तीतजास्त त्रास होत असताना तुम्ही उपचार घेता तेव्हा तो उपचार अधिक प्रभावशाली ठरतो,” असा हॉर्न यांचा दावा आहे. अमेरिकेतील काही कंपन्यांमध्ये डुलकी घेण्यासाठी काही खोल्याही बनवल्या आहेत—त्यांत कर्मचाऱ्‍यांसाठी बिछाना, रग, उशा, मधूर संगीत आणि दर २० मिनिटांनी वाजणारे गजर घड्याळे आहेत. परंतु, प्राध्यापक हॉर्न असा इशारा देतात, की तुम्ही जर जास्त वेळ—समजा, २५ मिनिटे—डुलकी घेऊन उठलात तर तुमची अवस्था पहिल्यापेक्षा आणखी वाईट होईल. तुम्ही, “दहा मिनिटांपेक्षा अधिक झोपला तर तुमचे शरीर रात्र झाली आहे असे समजते आणि मग, गाढ झोपेची क्रिया सुरू होऊ लागते.” (g०२ ३/८)

पुरुषांनी मासे खावेत

क्वचित मासे खाणाऱ्‍यांच्या तुलनेत, सालमन, हेरिंग व बांगडा यांसारखे चर्बीदार मासे मोठ्या प्रमाणात खाणाऱ्‍या पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सर होण्याची दोन किंवा तीन पटीने कमी शक्यता असते असे स्टॉकहोममधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटचे संशोधक सांगतात. ६,२७२ पुरूषांचा ३० वर्ष अभ्यास करून धूम्रपानासारख्या धोक्यांचा देखील विचार केला. संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की, “[खासकरून तेलकट माश्‍यांमध्ये असणारे] ओमेगा-३ म्हटले जाणारे चर्बीयुक्‍त ॲसीड्‌स प्रोस्टेट कॅन्सरची वाढ खुंटवते.” हेच ॲसीड्‌स “हार्टअटॅकचा धोकाही कमी करते,” असे तो अहवाल पुढे म्हणतो. यास्तव, तज्ज्ञांचा लोकांना असा सल्ला आहे, की त्यांनी “आठवड्यातून एकदा किंवा दोनदा” मासे खावेत. (g०२ ४/८)

त्रासदायक तणांचा चांगला उपयोग

“वॉटर हायसिंथ, टणटणी आणि गाजर गवत यांसारख्या काटक तणांमुळे डेव्हलपर्स हैराण झाले आहेत,” असे इंडिया टुडेने म्हटले. १९४१ साली ब्रिटिशांनी कुंपणासाठी भारतात आणणलेल्या टणटणीने, २,००,००० पेक्षा अधिक एकर जमिनीवर आपले बस्तान मांडले आहे व काही केल्या तिचा नाश करणे शक्य नाही. तिला हाताने उपटून काढण्याचा प्रयत्न केला, रासायनिक किंवा जैव पद्धतींचा उपयोग करण्यात आला तरीसुद्धा तिचा नाश होत नाही. तिच्या विषारी परिणामांमुळे इतर वनस्पतींची वाढ खुंटते; शिवाय जमिनीवर ती पसरत चालल्यामुळे अख्खीच्या अख्खी गावे दुसरीकडे हलवावी लागली. परंतु, लच्चीवाला गावांतील लोकांना मात्र हीच टणटणी आर्थिकरीत्या मौल्यवान ठरली आहे. या गावात, टणटणीच्या फाट्यांवर मातीचा लेप देऊन त्यापासून घरे आणि कोंबड्यांची खुराडे बनवली जातात. साल काढल्यावर आतल्या लाकडापासून उत्तम प्रकारचे फर्निचर व टोपल्या बनवल्या जातात; या लाकडाला कीड लागत नाही. टणटणीची पाने मच्छर पळवण्यासाठी व उदबत्त्या बनवण्यासाठी वापरली जातात. आणि तिच्या मुळांची पूड, दांतांतील किडीसाठी दंतमंजन म्हणून वापरली जाते. (g०२ ४/२२)

सर्वात अचूक कालमापक

लंडनच्या द टाईम्सच्या वृत्तानुसार यु.एस. शास्त्रज्ञांच्या एका गटाने एका मर्क्युरी-आयन कालमापकाचा शोध लावला आहे. “कालमापनाकरता विज्ञानात सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्‍या सर्वात लहान एककाचा, अर्थात फेम्टोसेकंदाचा फरक देखील [या कालमापकात] अचूकपणे दिसेल.” हे कालमापक “जागतिक कालमापनाचे मानक समजले जाणारे कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाईम (युटीसी) ठरवण्याकरता जी परमाणू घड्याळे वापरली जातात, त्यांच्यापेक्षा १,००० पटीने अधिक अचूक आहे,” असे म्हटले जाते. भौतिकशास्त्रज्ञ स्कॉट डिडम्स याविषयी खुलासा करतात: “या कालमापन तंत्राचा सर्वप्रथम मूलभूत भौतिकशास्त्रात, विश्‍वाचा अधिक सूक्ष्म अभ्यास करण्याकरता उपयोग केला जाईल.” कालांतराने, दूरध्वनी जाळी आणि प्रवासी उपग्रहांकरता देखील या तंत्राचा उपयोग होऊ शकेल. डिडम्स यांच्या मते हे कालमापन यंत्र “जगातले सर्वात अचूक घड्याळ” आहे आणि येणाऱ्‍या काळात त्यात अधिक सुधारणा होण्यासही वाव आहे. (g०२ ४/२२)

तरुणांमधील डायटींग

अलीकडेच, १२ ते १८ वयोगटातील कॅनडातील १,७३९ मुलींचा सर्व्हे घेण्यात आला; त्यात, २७ टक्के मुलींमध्ये आहारासंबंधीच्या तक्रारींची चिन्हलक्षणे दिसून आली असे ग्लोब ॲण्ड मेल वृत्तपत्राने म्हटले. शहरातून, उपनगरांतून आणि ग्रामीण भागांतून सर्व्हेत भाग घेतलेल्या या मुलींना एक प्रश्‍नावळी देण्यात आली होती; त्या प्रश्‍नावळीतून, त्यांचे खाण्याबद्दलचे व शरीराच्या आकाराविषयी असलेल्या दृष्टिकोनांचे परीक्षण करण्यात आले. तेव्हा असे दिसून आले, की १२ वर्षांच्या या लहान मुलींना, अतीसेवन, मुद्दामहून उलटी काढणे, डायटच्या गोळ्या खाणे, पोट साफ करणारी आणि वजन कमी करण्यासाठी वारंवार लघवी व्हावी म्हणून औषधे घेणे यासारख्या सवयी आहेत. टोरंटो युनिर्व्हसिटी हेल्थ नेटवर्कसह संशोधन करणाऱ्‍या तज्ज्ञा, डॉ. जेनीफर जोन्स यांचे असे म्हणणे आहे, की मुलींनी विशेषकरून “अन्‍न व व्यायाम याबाबतीत उचित दृष्टिकोन बाळगणे महत्त्वाचे आहे. त्यांना त्यांच्या शरीराविषयीचे शिक्षण मिळाले पाहिजे; जाहिरातीत, मासिकांत, रॉक व्हिडिओत दाखवल्या जाणाऱ्‍या मुली या सर्वसामान्य नाहीत हे त्यांना समजले पाहिजे.” ग्लोब वृत्तपत्राने पुढे म्हटले: “पुष्कळ किशोरवयीन मुलींना माहीत नसते, की पौगंडावस्थेत चरबीचे प्रमाण वाढणे हे सर्वसामान्य आहे व असे होणे हे सर्वसामान्य वाढीसाठी महत्त्वाचे असते.” (g०२ ४/२२)

डासांचा प्रलोभक

सिंगापोरमधील एक कंपनी, कीटकनाशकांविना डासांचे निर्मूलन करण्याकरता एक उपकरण बनवत आहे. हे उपकरण म्हणजे, ३८ सेंटीमीटर उंचीची एक काळ्या रंगाची प्लास्टिकची पेटी, जी “मानव शरीराप्रमाणे उष्णता व कार्बन डाय-ऑक्साइड” बाहेर टाकते, असे लंडनच्या द इकॉनॉमिस्टने वृत्त दिले. शरीराची उष्णता आणि श्‍वासोच्छवासातील कार्बन डाय-ऑक्साइड यांद्वारे डास आपल्या पोषकांकडे आकर्षित होत असल्यामुळे, हे उपकरण “डासांना फसवते व त्यांना अन्‍न मिळणार असल्याचे भासवते.” ही पेटी विजेमुळे उष्ण होते आणि पेटीतील एका लहानशा कुपीतून कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर पडतो. चमकणाऱ्‍या प्रकाशदिव्यांमुळे डास पेटीतील एका छिद्रात जातात. आत असलेल्या एका पंख्यामुळे हे डास खाली असलेल्या पाण्यात पडून मरतात. या उपकरणामुळे एका रात्रीत १,२०० डास मारले जाऊ शकतात आणि मलेरिया जंतूंचे वाहक असलेले ॲनॉफेलीस, किंवा पीत्तज्वर व डेंग्यू जंतूंचे वाहक असलेले ईडिस, या रात्रिंचर डासांसाठीसुद्धा ते उपकरण लावले जाऊ शकते. या उपकरणाचा आणखी एक फायदा म्हणजे, फुलपाखरांसारख्या निरुपद्रवी कीटकांना या उपकरणापासून कसलाही धोका नाही. (g०२ ४/८)

भाताच्या कोंड्यामुळे झाडे वाचली

उत्तर पेरूच्या विटांच्या कंपनीत पर्यायी जळण म्हणून भाताचा कोंडा वापरला जात असल्यामुळे, नामशेष होत चाललेल्या कॅरब झाडांची जळणासाठी तोडणी कमी झाली आहे, असे एल कोमर्सियो नावाच्या पेरूच्या वृत्तपत्राने बातमी दिली. विटा बनवणाऱ्‍या २१ कंपन्यांनी, कृषी टाकाऊ माल समजला जाणारा भाताचा कोंडा वापरण्यास सुरवात केल्यामुळे कार्बन डाय-ऑक्साइडचे उत्सर्जन कमी झाले आहे. शिवाय, वाळू, शाडूमाती आणि उसाची मळी यांच्या मिश्रणाने, भट्टीला आतून लेप दिल्यास, भट्टीची उष्णता बाहेर जात नाही व यामुळे भट्टींची कार्यक्षमता १५ टक्क्यांनी वाढली आहे. भाताच्या कोंड्याची राख विटांच्या मिश्रणात मिसळण्याचे प्रयोगही करण्यात आले आहे; यामुळे विटा चांगल्या पक्क्या होऊ शकतील अशी आशा केली जाते. “भाताच्या कोंड्याच्या वापरामुळे प्रदूषण आणि टाकाऊ माल साठवण्याची समस्या देखील कमी होते,” असे एल कोमर्सियोने म्हटले. (g०२ ४/८)